कभी यूँ भी तो हो - १

"जो! नॉट फेअर! असा ओठ बाहेर काढून, डोळ्यातून कितीही मध सांडलास ना तरी मी अजिबात पाघळणार नाही. तू माझ्याशेजारी झोपू शकत नाहीस, ok? उतर आधी, जा बरं तुझ्या बेडवर. गो!" मनवा समोर बोट दाखवत जास्तीत जास्त कडक दिसण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

दुःखी तोंड करत, नाईलाजाने जोई खाली उतरला. त्याच्या निळ्या मऊ अंथरुणात गुबगुबीत पंज्यांवर त्यांचं सुरकुतलेलं, गोंडस तोंड ठेऊन तिच्याकडे पुन्हा आशेने पाहू लागला. हसून खाली उतरून मनवाने हळूच त्याच्या डोक्यावर थोपटून त्याचं आवडतं, त्याच्या लाडक्या मालकिणीने विणलेलं ब्लॅंकेट त्याच्या कानांपर्यंत ओढून घेतलं. "गुड नाईट!" म्हटल्यावर लगेच ब्लॅंकेटमध्येच हललेलं छोटंसं गोल शेपूट दिसल्यावर तिला हसूच आलं. "कसला गोडू आहेस रे तू.." हळूच पुटपुटत तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवला.

बेडवर जाऊन तिने चारी बाजूचे पातळ पडदे ओढून घेतले. ही खास अरुआंटीची स्पेशालिटी! फोर पोस्टर बेड! आंटीला जुनं लाकडी पारसी फर्निचर फार आवडायचं. हा गेस्ट बेड, लिविंग रूममधला तिचा लाडका बुक शेल्फ, अति नक्षीकाम केलेला लहानसा टी पॉय, त्याच सेटमधला एक नक्षीदार अल्मिरा, एक क्रोकरी शोकेस आणि असे असंख्य पिसेस तिने कुठून, कुठून जमवले होते काय माहीत. पण जे काही इंटिरियर होतं ते फार क्लासी होतं.

अरुणीमा भट्टाचार्य, मनवाची फॅमिली फ्रेंड आणि आता 'AMP Legal' नावाच्या त्यांच्या लॉ फर्मची सिनियर पार्टनर. मनवा गोखले आणि पारुल पटेलने इंटर्नशिपपासून साधारण सात, आठ वर्ष प्रॅक्टिस केल्यावर अरुणीमाने त्या दोघींना पार्टनर करून बराचसा वर्कलोड हँडओव्हर केला होता. आज अचानक अरुआंटीने रात्री साडेआठला फोन करून मनवाला घरी रहायला बोलावून घेतलं, तेव्हा ती जरा घाबरतच त्यांच्या घरी गेली होती. ती आणि अंकल काही जुजबी गोष्टी सांगून, जोईला तिच्या हवाली करून घाईने निघून गेले तेव्हा मनवा जरा रिलॅक्स झाली. आज दिवसभराच्या मिटींग्ज आणि आर्ग्युमेंट्सनंतर तिला जरा एकांत हवाच होता.

जोई घोरायला लागल्यावर तिने उशीखाली ठेवलेला फोन उचलला. सगळ्या नोटिफिकेशन्स चेक करून, काही क्लायंट मेल्सना रिप्लाय झाल्यावर नेहमीप्रमाणे ती रेडीटच्या जत्रेत घुसली. हो, जत्रेतल्या खेळण्यांसारखंच तिला वेगवेगळे थ्रेड्स आपल्याकडे ओढून घेत होते पण एक दोन गोष्टी वाचून तिने निग्रहाने फोन बाजूला ठेवला. डोक्यावरून ब्लॅंकेट ओढून घेतल्यावर खिडकीच्या काचेवर बारीक पावसाची पिटपिट आणि वाऱ्याचा आवाज अंधुक ऐकू येत होता.

याआधी ती या घरात कधी रहायला अशी आली नव्हती. नवी जागा आणि  तिथल्या बारीक बारीक आवाजांमुळे तिला शांत झोप लागत नव्हती. "कमॉन यार. इट्स ओss के.." म्हणत एक जांभई देत ती झोपेच्या अधीन झाली.

बऱ्याच वेळाने अचानक ती बेडमध्येच थाडकन उठून बसली तेव्हा तिचं तिलाच कळेना की अचानक कशाने बरं जाग आली.. जोई अजून फुरफुरत घोरतच पडला होता. हाच आवाज असणार, हुश्श म्हणून ती झोपणार इतक्यात बाहेरून धप्प! आणि मग खुर्ची सरकवल्याचा खर्र.. आवाज आला. "शिट!.. नक्कीच चोर घुसलाय घरात. काय करू.. काय करू.." म्हणत तिने ब्लॅंकेट अजूनच गुडघ्याभोवती आवळून घेतले.

भाग २

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle