कभी यूँ भी तो हो - ८

भाग ७

"आय'ल गेट इट" म्हणून त्याने पुढे जाऊन दार उघडले.

दाराबाहेर एक त्याच्याएवढ्याच उंचीचा जरा बाळसेदार माणूस हातात एक look. think. act. GREEN! लिहिलेली जाड कापडी पिशवी धरून घाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे रोखून पहात होता.

"येस??" इंद्रनीलने जरा वैतागूनच विचारले.

"सौरभ गोखले! आपण इथे आत्ता काय करता आहात?" त्याच्यामागून पुढे येत मनवाने कंबरेवर हात ठेवून मान वाकडी करत विचारले.

"हाय!" तो आत येत नीलकडे तिरक्या नजरेने पहात म्हणाला. "मी आणि मुलं आज आई बाबांना भेटायला कोथरूडला गेलो होतो. निलू घरीच थांबली आहे, तिला एक दोन कॉल्स आहेत ऑफिसचे. मुलं राहणार आहेत दोन दिवस आजीकडे. आईने गुलाबजाम केले होते ते तुला आवडतात म्हणून तुझ्यासाठी पाठवलेत." हातातली पिशवी तिच्या हातात देत त्याने भराभर सांगितले.

"अगदी! तुला आनंदच झाला असेल नाही? तेवढंच बहिणीवर लक्ष ठेवता येईल. बहीण एकटी कशी काय रहातेय, मोठमोठ्या गार्डस शिवाय.. हो ना? म्हणूनच आलायस तू!" ती रागात म्हणाली.

"एकटी? मलातरी तू एकटी दिसत नाहीयेस. ह्या माणसाचं नाव जोई आहे का?" त्याने कपाळाला आठ्या घालत विचारले.

"इंद्रनील रायचौधरी, मीट माय ब्रदर सौरभ. मी मघाशी सांगितलेला उत्तम नमुना." रागाने सौरभवरची नजर न हटवता ती म्हणाली.

"कसला नमुना?" सौरभने तिला विचारले.

"जाऊदे, सोड. बाय सौरभ.. आई वाट बघत असेल." ती म्हणाली.

"एक मिनिट! मी आईबाबांना काय सांगू? मनवा एक कुत्रा आणि एका मजबूत माणसाच्या साथीने मजेत रहातेय?? नक्की काय सुरू आहे हे?" सौरभने प्रश्नांची सरबत्तीच लावली होती.

"हेय, हे स्टॉप.." नीलने मध्ये पडायचा प्रयत्न केला.

"वेट! आय एम आस्कींग हर, लेट हर आन्सर."

नीलचं अचानक जवळ येणं, नंतरचा किस आणि त्याने मेंदूत अजून साठलेलं गुलाबी धुकं, त्यातच सौरभची एन्ट्री आणि आता हा प्रश्नांचा पूर यामुळे ती पुरती भंजाळून गेली होती. रागाच्या भरात तिने अचानक जाऊन इंद्रनीलच्या हातात हात अडकवला.

"बरं दादासाहेब ऐका. आज तू माझं सिक्रेट पकडलं आहेस. बरेच दिवस हे मला सांगायचंच होतं. घरी तुम्ही मला कितीही बाळू ट्रीट केलं तरी मी एकोणतीस वर्षांची अडल्ट मुलगी आहे. आणि मी माझा डिसीजन घेतलाय. इंद्रनील आणि मी.. नीलकडे खोटा प्रेमळ कटाक्ष टाकत ती पुढे म्हणाली.. "काही नाही, हा आमचा खाजगी प्रश्न आहे. मी सांगेन आईबाबांना काय सांगायचं ते. गुड नाईट! आणि गुलाबजामसाठी आईला थँक्स सांग"

"मनवा! ही नाटकं बास झाली, लगेच बॅग भर आणि माझ्याबरोबर घरी चल." तो दारातूनच रागाने आवाज वाढवत म्हणाला.

"नाईस मीटिंग यू सौरभ, पण मनवा आत्ता कुठेही जाणार नाही. आम्हाला बऱ्याच इंम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. आपण नंतर बोलू" आता मात्र इंद्रनील पुढे होत म्हणाला.

सौरभ हताश चेहऱ्याने, खांदे उडवत "बssर्.. करा काय करायचं ते" म्हणत पाय आपटत बाहेर गेला आणि इंद्रनीलने तत्परतेने दार लावून घेतले.

मागे वळून परत सोफ्यापर्यंत येईतो, मनवा डोक्याला हात लावून बसली होती. "हे भगवान! मी काय राडा करून ठेवला हा.."

इंद्रनील तिला शांत करायला तिच्या शेजारी जाऊन बसला तर ती उठून समोर विचार करत फेऱ्या मारायला लागली.

"शीट! काय केलं मी हे सगळं. आता सौरभ घरी जाऊन आईबाबांना रंगवून रंगवून ही गोष्ट सांगणार. मग निलूला फोन करून लगेच हे सगळं रिपोर्टिंग करणार. आईबाबा शॉक होणार, लगेच बाबा गौरवला आणि आई मला कॉल करणार.. काय उत्तर देऊ मी? काहीही सुचत नाहीये. हे सगळं तुझ्यामुळे इंद्रनील रायचौधरी! कशाला आलास तू पुण्यात?" तिची फेऱ्या मारता मारता बडबड सुरू होती.

तो सोफ्यावर गुपचूप बसून तिच्याकडे प्रत्येक फेरीबरोबर लेफ्ट राईट डोकं हलवून पहात होता.

तिची नॉनस्टॉप बडबड ऐकून आणि चेहऱ्यावरचे रागीट, कन्फ्युस्ड भाव बघून त्याला एकीकडे हसूही येत होते आणि तो तिच्या निरागसपणाच्या अजून अजून प्रेमात पडत होता. कुणाहीबद्दल इतकं खरं पॅशनेट प्रेम त्याला पहिल्यांदाच जाणवत होतं. मनवाने त्याच्या मना-शरीरावर इतक्या पटकन जी काही जादू केली होती ती त्याची त्यालाच अजून खरी वाटत नव्हती.

पण आत्ता? आत्ता ती एवढी त्रासलीय तर आपण मदत करायला हवी हे त्याला जरा उशिराच आठवलं. "मनवा, आय वॉन्ट टू हेल्प यू आऊट. तू इतका स्ट्रेस का घेते आहेस? तुझी माँ कॉल करून काय म्हणेल? जास्तीत जास्त तुझे दादालोक मिळून माझा खिमा करतील. इज इट सो?"

"कमॉन! वी आर नॉट सम गुंडा फॅमिली. ते आता असलं काही करणार नाहीत. मी दहावीत असताना एका मुलाने रस्त्यात मला बघून शिट्टी वाजवली होती त्याला मात्र त्यांनी चोपला होता. पण आता.. त्याहून जास्त कॉम्प्लिकेट करतील सगळं." ती विचारात पडत म्हणाली.

"बच गया! मुझे हॉस्पिटल तो नही जाना पडेगा. आय हेट हॉस्पिटल्स. गॉड ब्लेस द गोखले फॅमिली" तो हसत म्हणाला..

भाग ९

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle