पाऊस ऐनवेळी लिटरली टपकल्यामुळे इंद्रनील तिला जपत खांद्यावर हात टाकून तिची छोटीशी लेडीज छत्री वेडीवाकडी दोघांच्या उंचीनुसार ऍडजस्ट करत थेंबांपासून वाचत कसाबसा कारपर्यंत घेऊन गेला. त्याच्या इतक्या जवळ येण्याने, तो उबदार स्पर्श आणि त्याने लावलेल्या वूडी, स्पायसी अंडरटोन असलेल्या सुगंधाने तिला पावसातून उडून पार ढगातून चालत असल्यासारखं वाटत होतं.
घरी पोहोचेपर्यंतचा प्रवास असाच शांततेत झाला. पार्किंगमध्ये उतरल्यावर तिला हळूहळू आपण करून ठेवलेल्या राड्याची जाणीव झाली. नील तिच्याजवळ येऊन उभा राहिला तेव्हा ती कसंबसं एक स्माईल देत त्याला लिफ्टच्या दिशेने घेऊन गेली. दारासमोर येऊन तिने बेल वाजवली, इंद्रनील तिच्या मागेच उभा होता. तिच्या आईने घाईघाईत येऊन दार उघडलं, पहिल्यांदा नीलकडेच लक्ष गेल्याने त्याच्याकडे पाहून गोड हसली. "या या" म्हणत त्यांचं स्वागत केल्यावर मागे तिचे बाबा उभेच होते. त्यांनी डोळे बारीक करून आधी त्याचे अपादमस्तक ऑडिट केले. शेवटी हाडाचे सीए च ते! मग त्याला आपल्या शेजारी बसवून मनवाला समोरच्या सोफ्यात बसायला लावले. इंद्रनीलने आत आल्याक्षणी दोघांच्याही पायाला हात लावून प्रणाम केल्यामुळे दोघे पहिल्या बॉललाच आउट झाले होते. पाणी वगैरे पिऊन झाल्यावर त्यांनी अरुआंटी मग क्रिती मग अजून कुठले कुठले रेफरन्स चेक करत त्याचे पूर्णच ऑडिट केले.
ते गप्पा मारत असताना मनवाला आईने किचनमध्ये हाक मारली. "मना, आधी सांगायचं नाही का तू मला? तुमच्यात असं काही सुरू आहे म्हणून.. सौरभ किती चिडून आला होता रात्री. आता आज मुलांना घेऊन मॉलमध्ये गेलाय. गौरव काही दिल्लीहून येऊ शकणार नाही. मग त्या दोघांचं म्हणण पडलं की आधी आम्ही दोघंच भेटू तुम्हाला आणि आम्हाला हा तुझा बॉयफ्रेंड आवडला तरच बाकी सगळे नंतर भेटतील. हा मुलगा मात्र छाssन आहे हं, कुठे भेटलात तुम्ही? आई पुऱ्या तळता तळता कृतककोपाने मनवाला विचारत होती.
बापरे, आता काय सांगावे न सुचून मनवा सरळ एक टम्म फुगलेली गरम पुरी फोडून खायला लागली. "मी काहीच सांगणार नाही, तुम्ही त्याच्याशी गप्पा मारा. आपोआप कळेल तुम्हाला." उत्तर द्यायचं टाळत मनवा म्हणाली.
"काय ग आणि बंगाली आहे ना तो? मग बोलता कसे दोघे? फक्त इंग्लिश? आणि एकत्र कसे राहाताय अरुकडे?? आईने तोंडावर हात ठेवत हळूच विचारले.
"हो बोलतो तसंच पण तो मुंबईत वाढलाय ग, येतं त्याला मराठी. शाळेत पण होतं त्याला मराठी. आईss एकत्र म्हणजे फक्त घरात एकत्र आहोत, वेगळ्या रूम्समध्ये झोपतो आम्ही" डोळे मोठे करून बघत ती म्हणाली.
"नशीब! मी घाबरलेच होते, सारखं कसं इंग्लिश बोलणार याच्याशी.." एक प्रॉब्लेम सॉल्व झाल्याच्या थाटात आई म्हणाली. "कालच ह्यांनी अरूला फोन केला होता, तिचा फारच लाडका भाचा आहे म्हणे. तुमच्याबद्दल बाकी काही नाही सांगितलं पण ती भाच्याचं खूप कौतुक करत होती. क्रितीची तब्येत छान आहे आता. अशोक जरा कंटाळलाय फक्त. तिकडे भाषेचा प्रॉब्लेम येतो, बिल्डिंगमध्ये बोलायला कोणी नाही वगैरे सांगत होता बिचारा."
"आई आत्तासं आम्ही एकमेकांना जाणून घेतोय, लगेच लग्नबिग्न नाही करत आहोत हं.. तू काय लगेच श्रीखंड पुरी वगैरे करायचा घाट घातलाय? एवढी धावपळ करण्यापेक्षा साधं करायचं ना जेवण, किती दमतेस तू उगाच.." मनवा तोंड वाकडं करत म्हणाली.
"तू गप्प बस, आम्हाला समजतं कसं वागायचं ते. तुला नको असेल तरी त्याला खायला घालेन मी श्रीखंड. बघ आवडतं की नाही माझ्या हातचं.." आई हसत म्हणाली. मनवा मग कोशिंबिरीसाठी काकडी चोचवत काहीतरी इकडचे तिकडचे विषय काढून बडबड करत बसली.
एव्हाना बाहेर बाबांबरोबर बसून इंद्रनीलने भारताच्या इकॉनॉमी पासून मोदी, नोटबंदी ते अगदी कश्मीरपर्यंत सगळे प्रश्न डिस्कस करून झाले होते, तेही आवाज न वाढवता! निवडणुकांचे प्रचार आणि त्याचे कॅम्पेनिंग, त्यांचे बदललेले स्वरूप, ऑनलाइन प्रचार, ट्रोल्स याबद्दलच्या बऱ्याच इनसाईड गोष्टी सांगून त्याने बाबांना आश्चर्याने थक्क केले.
मनवाने मध्येच दारातून बाहेर डोकावून पाहिले तर बाबा अगदी जोरात हसत नीलला टाळ्या बिळ्या देत होते. तिने हसत नीलला थम्बज अप करून दाखवले आणि आत गेली.
आत श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, नारळाची हिरवी चटणी, टोमॅटो सार आणि मनवाने केलेली खमंग काकडी सगळं तयार होतं. आधीच करून ठेवलेला मसालेभात फक्त गरम करायचा होता. तो गॅसवर ठेऊन आईने मठ्ठा करायला घेतला.
इंद्रनीलला जेवण प्रचंड आवडलं. आई त्यांना पुऱ्या गरम तळून पानात वाढत होती, ते थांबवून त्याने आईला सगळ्यांबरोबर जेवायला बसायला लावलं. अधूनमधून क्लायंट्स बरोबर घडणारे जोक्स, देशोदेशी फिरताना झालेले किस्से असं काय काय सांगून तो सगळ्यांना जाम हसवत होता.
मध्येच बाबा त्यांच्या लाडक्या गाण्याच्या टॉपिकवर आले तेव्हा त्याने लहानपणी हिंदुस्तानी क्लासिकल शिकल्याचे सांगत त्यांना गारच केले. मग लाईट म्युझिकवर येत बाबांचा लाडका किशोरकुमार आणि मन्ना डे, रफी वगैरेंच्या आठवणी काढून झाल्या.
"तू कामासाठी इतका फिरतोस, मग कुठेतरी स्टेबल रहातोस की नाही?" मनवाच्या बाबांनी विचारलं.
"हो, एरवी अंधेरीला फ्लॅट आहे तिथे रहातो. पण लवकरच पुण्यात शिफ्ट होणार आहे." तो मनवाकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाला.
मनवाही काय acting आहे! असा लुक देत हसली. "अरे वा, किती छान ना?" आई बाबांकडे बघून म्हणाली.
"चांगलं आहे, मी मदत करतो तुला फ्लॅट शोधायला." बाबा म्हणाले.
मनवा त्याच्या बारीक बारीक गोष्टी नोटीस करत होती. त्याचं हसणं, लोकांना आदर देऊन बोलणं, समोरच्याने कितीही ट्रीव्हीअल गोष्ट मांडली तरी ऐकून घेणं, त्याचा केअरिंग स्वभाव.. ही'ज सच अ वंडरफुल सोल! ती मनात म्हणाली..
'आणि दोन दिवसांनी तो इथून निघून जाणार आहे..' आतून तिला दुखवत दुसरा विचार आला..
जेवण झाल्यावर लिविंग रूममध्ये बसून बडीशेप खाता खाता बाबांनी त्याला गायचा खूपच आग्रह केला. "हां आणि किशोरचं गा रे काहीतरी" असं बाबांनी म्हटल्यावर तो त्याच्या मखमली आवाजात तिच्या डोळ्यांत पहात गायला लागला.
एक अजनबी हसीना से,
यूँ मुलाकात हो गई
फिर क्या हुआ ये ना पूछो
कुछ ऐसी बात हो गई..
आणि तिला लाजून कुठे पाहू अन कुठे नकोसं होऊन गेलं..
क्रमशः
---
इंद्रनीलच्या गाण्याचा फील घेण्यासाठी हे ऐका :)