"स्टोअर रूम..." मिनीटभरानंतर व्यवस्थित जाग आल्यानंतर तिने थोडासा विचार केला आणि तडक उठली. बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर उजवीकडे वळून हॉलवे मधून चालू लागली. तिच्या मनात आता भीती, कुतूहल अशा संमिश्र भावना तयार होत होत्या. उजवीकडेच फारशा वापरात नसल्या दुसऱ्या बेडरूम चा दरवाजा ओलांडून ती पुढे गेली. थोडंसंच पुढे एका लहान दरवाज्यासमोर येऊन थबकली. स्वप्नात दिसलेला दरवाजा हाच होता आणि ती मुलगीही ती स्वतःच होती!
तिने हँडल फिरवून दरवाजा उघडला. अंधारा, अरुंद जिना.. उजेडाला कुठूनही जागा नसल्याने दिवसाही तिथे अंधारच, पण दिवसा किमान पायऱ्या तरी नीट दिसत होत्या. जिन्याच्या पहिल्या पायरीवर टाकण्यासाठी पाय उचलला पण लगेच तसाच मागे घेतला. झपाझप पावलं टाकत ती पुन्हा तिच्या बेडरूम मध्ये आली, मोबाईल उचलुन तिच्या स्वेट पॅन्ट च्या खिशात घातला आणि पुन्हा जिन्यापाशी आली. सावकाश पाय टाकत शरीराबरोबर मनाचा तोल सांभाळत ती जीना चढू लागली. स्टोअर रूम मध्ये पाय ठेवण्याआधी तिने शेवटच्या पायरीवरून सगळी रूम निरखून घेतली. हृदयाची धडधड आता कानांपर्यंत पोहचत होती. आत गेली. थोडंसं पुढे चालल्यावर तिने आधी खाली पाहिले, धडकण्यापूर्वीच तिने खाली पडलेली लाकडी खुर्ची बाजूला केली. समोर वरती तिला तशीच लोम्बकळणारी दोरी दिसली . पण आता बल्ब ची गरज भासत नव्हती. अजून पुढे गेली आणि खाली पाहिले. कालच्याच जागी ती सुंदर, मजबूत लाकडी पेटी पडून होती. पडून म्हणण्यापेक्षा कोणीतरी मुद्दामहून ती तिथे ठेवल्यासारखी वाटत होती. क्रिस्टन भान हरपल्यासारखे तिच्याकडं बघत राहिली, तिला डोळ्यांवर विश्वासच बसेना.
तशाच अवस्थेत ती गुडघ्यावर बसली. पेटीला निरखून घेतले. आत काय आहे हे तिला आता माहीत होते तरीही कडी वर उचचली. खाली कोरलेल्या V वर हलकेच तर्जनीने स्पर्श केला. अचानक कुठूनतरी थंडगार, गोठवणारा झोत अंगावर आल्यासारखा भास झाला. तिला तिथे थांबावेसे वाटेना.पुन्हा कडी लावत तिने ती पेटी उचलली आणि तडक उठली. जिना उतरत थेट स्वतःच्या बेडरूम मध्ये आली.
पेटी बेडवर ठेऊन उघडावी की नको अशा अवस्थेत ती काही मिनिटं तशीच बसून राहीली. "आय डोन्ट वॉन्ट टू डील विथ धिस राईट नाऊ" असं मनाशी म्हणत ती उठली, घड्याळाकडे पाहीले. 7 वाजून गेले होते. तिने पेटी उचलून टेबलवर ठेवली आणि किचन मध्ये गेली. फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून तोंडाला लावली. गटागट पाणी पिऊन तिने घशाची कोरड शमवली.
....
कॉलेजच्या पार्किंग लॉट मध्ये गाडी लावून काहीशी तंद्रीतच ती स्टाफ रूम मध्ये येऊन बसली. दहा मिनिटांनी नोट्स आणि बुक घेऊन ती क्लास मध्ये आली. मुलांना गुड मॉर्निंग विश करत तीने बोर्ड कडे वळून आजच्या टॉपिक चे हेडर लिहिले. पुन्हा मुलांकडे वळून तिने बोलायला सुरुवात केली. कशीबशी 10 मिनिटे जातात न जाताच तोच तिच्या डोळ्यांसमोर अचानक वीज चमकल्यासारखे त्या दिवशी स्वप्नात थंड, भेदक डोळ्यांनी पाहणाऱ्या मुलीचा चेहरा चमकून गेला. ती गडबडली आणि बोलायची थांबली. ऐकता ऐकता नोट्स घेणाऱ्या मुलांनी एकदम वर बघितले. ती त्यांच्याकडे बघत भानावर आली.डोके एकदोनदा जोरजोरात हलवत तिने तो विचार झटकून टाकला." एक पॉज घेऊन "अम म, सॉरी फॉर दॅट.., ऍज आय वज सेयीन" म्हणत तिने बोलणे कँटीन्यू केले. मिनिटभरातच पुन्हा तीच मुलगी, बरोबर असलेल्या एका मुलाच्या हातात हात घालून, हसत हसत नदीकिनारी चालतानाचे दृश्य तिच्या डोळ्यांसमोर चमकून गेले. ती पुन्हा गडबडून थांबली. यावेळी अजून पॉज न घेता तिने लक्ष केंद्रित करत बोलणे चालू ठेवले. नंतरची चाळीस मिनिटे मात्र नॉर्मल गेली. पण आता तिला राहवेना. बेल वाजताच ती बुक्स, नोट्स उचलुन तडक स्टाफ रूम मध्ये गेली. तिच्या कलीग मिसेस स्वान तिथे बसून काहीतरी वाचत होत्या. त्यांच्याजवळ घाईघाईने "लिविंग फॉर सम इमर्जन्सी, प्लिज इंफॉर्म मिस्टर टेनिसन" असा निरोप ठेवत पार्किंग लॉट मध्ये येऊन, गाडी घेतली अणि थेट घरी पोहोचली.
बेडरूम मध्ये येऊन ती पेटी ती बेडवर घेऊन बसली. कडी उघडली. आतमधले रेशमी कापड उघडून त्यातल्या ड्रेस ची तशीच घडी तिने हातात घेतली. त्याचा वास घेऊन पाहीला. नुकत्याच दुकानातून आणलेल्या नव्या वस्त्राला जसा विशिष्ट, ताजा फील असतो, अगदी तसाच तिला जाणवला. तो ठेवणीतला किंवा वापरलेला वाटेना.थोड्यावेळ तिने तो ड्रेस कोणाचा असावा ते आठवण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईचे लग्न झाले नव्हते. आजीचा असणे शक्य नव्हते. सध्याच्या तिच्या कुटुंबात 'व्ही' कोणाचेही इनिशीयल नव्हते. तिने उभा राहून तो ड्रेस उलगडला. ते अतिशय उंची सिल्क होते. त्याच्या लॉंग स्लीव्ह्ज ट्रान्सपरंट कापडाच्या होत्या. गळ्यापासून सुरू होणारी हेवी सोनेरी फ्लावरी डिझाइन लॉंग स्लीव्ह्ज वरून थेट मनगटापर्यंत आली होती. स्लीव्ह्ज वर मध्येमध्ये हातांची स्किन दिसावी म्हणून काही जागा प्लेन ठेवण्यात आली होती. अप्पर हाफ चा, बस्ट वरचा थोडासा गोलाकार भाग सोडला तर सगळीकडे सम्पूर्ण सोनेरी सिल्कच्या धाग्यांची एम्ब्रॉयडरी होती. ड्रेस चा घेर कमरेपासून खाली प्रमाणात वाढत गेला होता. तिने ड्रेस उलटून धरला. मागे रुंद त्रिकोणी गळा खोल , पाठीच्या अर्ध्या भागापर्यंत जात होताना. मागेही सगळीकडे तेवढीच दाट कलाकुसर. त्यामुळे तो ड्रेस तिच्या हातांना भलताच जड लागत होता.
क्रिस्टन तसाच तो ड्रेस घेऊन ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर गेली. आरशात बघत तिने तो ड्रेस स्वतःच्या अंगाला लावून पाहीला. ती जणू त्या ड्रेस ने झपाटून गेली. तिला तो ड्रेस घालून बघण्याची प्रचंड इच्छा झाली. ताबडतोब तिने अंगावरचा प्लेन, लाईट ब्लु फॉर्मल शर्ट आणि स्कर्ट काढून टाकला. ड्रेस च्या मागच्या गळ्याच्या खाली असलेले हुक्स काढले. "हु कॅन युज हुक्स नाऊ अ डेज इन्स्टेड ऑफ झिप्स" असा विचार मनात आला. ड्रेस खाली धरून दोन्ही पाय तिने त्यात घातले. वरपर्यंत चढवून मागे हातांनी कसेबसे हुक्स अडकवले आणि ती आरशात पाहण्यासाठी मागे वळाली. खालपासून सुरवात करत तिची नजर हळूहळू वर येऊ लागली. ती आता स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचे हसरे, उत्साही भाव आता नाहीसे होऊन गंभीर झाले. निळ्या डोळ्यांत आता एक वेगळी चमक आली होती.. आणि नजर थंड, गोठवून टाकणारी!!