ह्या गोष्टीची सुरुवात होते २०१४ मध्ये ...आम्ही ७ जण म्हणजे आम्ही दोघे , दोघांचेही आई वडील आणि आमची ८ वर्षाची लेक असे सगळे किन्नोर च्या ट्रिप ला गेलो होतो ... तेव्हाच हिमालय फिवर ची लागण झाली होती .... ही ट्रिप आम्हे अगदी सावकाश आणि आरामात , थांबत थांबत केली होती.
त्यानंतर २०१५मार्च मध्ये आम्ही तिघेच फक्त एकदा येऊन गेलो ... ह्यावेळी आम्ही स्पिती ची तोंड ओळख करण्यापुरती एक "डे ट्रिप " फक्त करून आलो होतो. यावेळी मात्र आम्हाला तिघांनाही हिमालयाने पुरतं वेडं करून सोडलं .... आम्ही परत आलो ते मोठ्या स्पिती ट्रिप ची स्वप्न बघतच
२०१७ काही जमलं नाही पण २०१८ च्या मे मध्ये आम्ही तिघे परत आलो १३-१४ दिवसांच्या स्पिती ट्रिप साठी ...ह्या ट्रिप चे फोटो पाहून दोन्ही आई बाबांना स्पिती बघायची खूपच इच्छा व्हावयाला लागली ... अमित च्या बाबांचं वय आता ७७ पूर्ण आहे आणि माझ्या बाबांना मधुमेह आणि हृदयविकार दोन्ही आहे त्यामुळे फक्त त्यांनाच पाठवायला काही जीव होई ना ... शेवटी हो ना करता करता , आम्ही सर्वानीच एकत्र स्पिती ची ट्रिप करायचं ठरवलं ... त्याच ट्रिप ची ही गोष्ट ...
नमनाचं घडाभर तेल झालेले आहे , तेव्हा आता सुरु करते ....
सगळ्यांच्या सुट्ट्या /लेकीची शाळा वगैरे पाहता , २७ मे ते ५ जून अशा तारखा नक्की केल्या ..विमानाची बुकिंग केली. अमितच्या आईबाबांचा हात तसा मोकळा असल्यामुळे ते एक दिवस आधी चंदीगड ला जाऊन थांबणार होते .... त्यांची दगदग कमी होईल असा हेतू ...जानेवारीतच आम्ही ही सगळी तिकिटं काढून ठेवली.. स्पितीमधल्या बेभरवश्याच्या हवामानामुळे इतक्या आधीच प्रत्येक दिवसाचा प्लॅन ठरवणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे आता दिवास्वप्न बघायला आम्ही सगळे मोकळे :) खयाली पुलावा बरोबर आम्ही हे पाहू ते पाहू असे बेत करायला सुरुवात करत होतो ... आई बाबा बरोबर असल्यामुळे आम्ही चंद्रतालला जायचा बेत AMS च्या भीतीपायी रद्द केला होता
एकीकडे ह्यावर्षी अगदी भरपूर बर्फवृष्टी झाल्यामुळे चंद्रताल आणि कुंझुम पास उघडला नव्हताच ...आता मे महिना सुरु झाला होता आणि तेव्हड्यात जेट एअर वेज बंद पडली अमितच्या आईबाबांची आदल्या दिवशीची तिकिटं जेट ची होती ... घाईघाईने ती बदलून आम्ही एअर इंडिया ची आमच्या बरोबरच काढून घेतली ...
आता नवीन काही विघ्न येणार नाहीत अशी आशा बाळगून आम्ही साधारण प्लॅन बनवायला सुरुवात केली
साधारण असा बेत होता ...
२७ मे २०१९ - मुंबई -चंदीगड फ्लाईट - शक्यतोवर झाकडी पर्यंत पोचायचा बेत होता
२८ मे २०१९ - झाकडीहोऊन कल्पा पर्यंत - हॉटेल अँपल पाय मध्ये रात्र , AMS चा त्रास हा अचानक उंचीवर गेल्याने होतो म्हणून ही रात्र कल्प्याला काढायचा बेत होते
२९ मे २०१९ - कल्पा ते काझा - हॉटेल कुनफेन , रस्त्यात जमलं तर धनकार मधली मोनॅस्टरी आणि घिऊ इथली नॅचरल मम्मी बघण्याचा इरादा होता
३० मे २०१९ - दिवसा हिक्कीम/लान्गझा बघून रात्र परत काझ्यात काढायची होती
३१ मे २०१९ - चीचम बघून लोसर ला पोचणे - ताशी कॅस्टल होम स्टे
१ जून २०१९ - कुन्झुमच्या दिशेने जाउन भरपूर स्नो दिसला की परतणे. रात्र परत लोसर मध्ये
२ जुन २०१९ - लोसर मधून निघून पिन व्हॅली मध्ये गुलिन्ग.रात्र तान्डूप होम स्टे
३ जुन २०१९ - परत झाकडी ...
४ जुन २०१९ - रात्री चन्दीगड ला पोचणे
५ जुन २०१९ - दुपारी बारा वाजताची फ्लाइट
हिमाचलमध्ये बर्यापैकी उन्चीवर जाणार होतो म्हणून मग मी यलो पीक साइटवरचा हा तक्ता आणि त्यान्चाच नकाशा वापरला होता.
ट्रिपची आखणी
आम्ही ७ जण असणार होतो त्यामुळे प्रवास सुखकर व्हावा म्हणून दोन इनोव्हा ठरवल्या... its journey that matters rather than the destination ही गोष्ट स्पिती मध्ये जास्तच लागू असल्याने प्रत्येक दिवशीच्या प्रवासात थान्बून फोटो काढायला वेळ राखीव ठेवला होता. सगळी बूकिन्ग्स आम्ही मुकेश शर्मा 09820796047 /8894579727 यान्च्या कडून घेतली होती.या भागात त्यान्ची ओळख चान्गली आहे. त्यान्च्या शब्दाला मान पण चांगलाच आहे, त्यामुळे आयत्यावेळीचे बदल करायला सोयीचं जातं.