ह्या गोष्टीची सुरुवात होते २०१४ मध्ये...आम्ही ७ जण म्हणजे आम्ही दोघे, दोघांचेही आई वडील आणि आमची ८ वर्षाची लेक असे सगळे किन्नोरच्या ट्रिपला गेलो होतो... तेव्हाच हिमालय फिवरची लागण झाली होती.... ही ट्रिप आम्ही अगदी सावकाश आणि आरामात, थांबत थांबत केली होती.
त्यानंतर २०१५ मार्चमध्ये आम्ही तिघेच फक्त एकदा येऊन गेलो... ह्यावेळी आम्ही स्पितीची तोंड ओळख करण्यापुरती एक "डे ट्रिप " फक्त करून आलो होतो. यावेळी मात्र आम्हाला तिघांनाही हिमालयाने पुरतं वेडं करून सोडलं.... आम्ही परत आलो ते मोठ्या स्पिती ट्रिपची स्वप्नं बघतच...
२०१७ काही जमलं नाही पण २०१८ च्या मेमध्ये आम्ही तिघे परत आलो १३-१४ दिवसांच्या स्पिती ट्रिपसाठी... ह्या ट्रिपचे फोटो पाहून दोन्ही आई बाबांना स्पिती बघायची खूपच इच्छा व्हावयाला लागली... अमितच्या बाबांचं वय आता ७७ पूर्ण आहे आणि माझ्या बाबांना मधुमेह आणि हृदयविकार दोन्ही आहे त्यामुळे फक्त त्यांनाच पाठवायला काही जीव होईना... शेवटी हो-ना करता करता, आम्ही सर्वानीच एकत्र स्पितीची ट्रिप करायचं ठरवलं... त्याच ट्रिपची ही गोष्ट...