स्पिति - मे महीन्यात - 28 मे - दिवस २
----------------------------------------------
एकंदर कारमध्ये घालवलेला वेळ ::जेवणखाण /मध्ये मध्ये घेतलेले ब्रेक्स धरून ~५- ५:30 तास
कापलेले अंतर - ~100 km
रस्ता कसा आहे - तसा ठीक ठीक आहे पण काही पॅचेस जरा खराब आहेत
हॉटेल - हॉटेल अँपल पाय कल्पा
आज कल्प्याला जाऊन राहायचा बेत होता ... खरं म्हणजे, अंतर पाहता आम्ही झाकडीहून टाबोला पोचू शकलो असतो , मागच्या ट्रीपला तसंच केलं होतं. यावेळी मात्र ज्येना बरोबर असल्याने झाकडी ते टाबो एव्हडा उंचीतील फरक एकाच दिवशी न करता मजल दरमजल करत जाणं बरं असा विचार करून टाबो ऐवजी कल्प्याला राहायचा विचार केला होता
तसा खूप प्रवास नसल्याने आम्ही सावकाश ९;३० च्या सुमारास निघालो .. हवा अगदी मस्त पडली होती ..आजूबाजूचा नजारा पण अगदी हिंदी सिनेमात दाखवलेल्या हिल स्टेशन सारखा हिरवा गार होता ..मुंबईच्या सिमेंट जंगलाला सरावलेल्या आमच्या डोळ्यांना हा फारच सुखद अनुभव होता
अचानक एका वळणानंतर हिरव्या डोंगरांना पांढर्याशुभ्र बर्फ़ाच्या टोप्या दिसायला लागल्या ... आता आपण हिमालयात आहोत हा साक्षात्कार अगदी तीव्रतेने झाला
तेव्हड्यात आम्ही अगदी ऑफिशियली प्रवेश द्वारातून किन्नोर मध्ये शिरलो...
एकच फोटो काढून पुढे सरकतो तोपर्यंत किन्नोर म्हटल्या बरोबर डोळ्यासमोर येणारा आयकॉनिक बोगदा अचानक पुढे ठाकला ..यहा पे तो एक फोटो ब्रेक बनताही था ....
आता आम्ही बरेच वर चढलो होतो , काल माहेरवाशिणी सारखी खळाळणारी सतलज आता वरून बघताना अगदी जबबाबदार पोक्त बाई सारखी संथ दिसत होती.
हळूहळू डोंगरांवरची हिरवाई कमी होऊन करड्या /तपकिरी छटा वाढत होत्या
हिमालयात असण्याच्या एकसाईटमेन्ट मध्ये आम्ही पीओ मध्ये येऊन पोचलो होतो ... मोमो आणि थुक्पा असा गरम गरम चवदार लोकल मेनू खाऊन सुखावलेले जीव गाड्यांमध्ये घालून कल्प्याच्या दिशेने वळलो आणि समोरचं चित्र पाहून सर्वांचेच डोळे चमकले ....
प्रत्येक वळणावर उलगडणारं नवीन चित्र बघता बघता एकदम हॉटेलमध्येच पोचलो .. अमानभाई आमची वाटच पाहात होते .. त्यांनी आणि त्यांच्या स्टाफ ने पटापट खोल्या लावून दिल्या
इथे जमलं तर वरच्या मजल्यावरच्या खोल्या घ्या असा एक फु.स.
आमच्या सेकंड फ्लोअर वरून हे असं चित्र दिसत होतं
हे असं दिलखुष चित्र पाहून अजून कुठे जायचा बेत आम्ही रद्द केला आणि गॅलरीमध्येच गरम गरम सूप बरोबर पत्त्यांचा फड रंगवत बसून राहिलो
रात्री जेवताना अमनभाईंबरोबर भरपूर गप्पा झाल्या ... यावर्षी बंपर स्नो झाल्याची बातमी देत त्यांनी अजून एक धक्का दिला - आमचं लोसर मधलं हॉटेल अजून या मौसमासाठी उघडलं नव्हतं. शिवाय तिथली थंडी ज्ये नांना झेपणार नाही असं त्यांचं मत होतं ..गेल्या ट्रिप मध्येच लोसर आमच्या मनात भरलं होतं ... थोड्या हिरमुसलेल्या मनानेच आम्ही झोपायला गेलो