किती वर्षे उलटली असतील? दोन? तीन? पाच? सतत इथेच बसून काळाचं भान राहिलेलंच नाहीये. आणि हवंय तरी कशाला? ना मी मागे जाऊ शकत, ना पुढं. आताशा मला कळू लागलंय. इथेच , अशीच, याच परकर पोलक्यात , गुडघ्यावर हनुवटी ठेऊन बसायचंय मला कायम. नाही म्हणायला हा डोक्यावरचा वड सोबतीला असतो. तो मात्र आहे तसाच आहे. त्याच्या लांब, अस्ताव्यस्त, खालीवर लोम्बणाऱ्या पारंब्या मात्र मला आवडत नाहीत. रात्र झाली की चंदेरी प्रकाशात खालून एवढ्या उंचावर पाहताना भेसूर दिसतात. कधी कधी वाटतं माझ्या हातांची बोटंच पसरली आहेत अशी लांबच लांब, वाकडी तिकडी, फाटे फुटलेली! छे , मूर्खच आहे मी. मी का घाबरतेय? उलट मीच तो खेळ बंद केला ना माझा! दोर बांधलेली बादली खाली आली, डबs डबsडुबुकs आवाज करत पाण्यात बुडून , पाण्याने भरून वर वर जायला लागली की मी धरून तिला परत पालथी करायचे. दोर ओढणाऱ्या माणसाला वाटायचं त्याच्यामुळेच बादली पालथी झाली. असं एकदा दोनदा झालं की खुळाच व्हायचा तो माणूस. काय मजा यायची मला! बादली वर ओढून नुसताच बघत राहायचा खाली डोकून. पुढे पुढे मला या खेळाचा नादच लागला. पण सगळीकडे चर्चा होऊ लागली असावी नक्कीच. इथं फिरकणं बंद झालं लोकांचं तर काय करू मी एकटी? मग बंदच केला. लोक काय, विसरून गेले. अधूनमधून पुन्हा कधीतरी खेळायला हरकत नाही पण असं. माझा वेळ छान जातो. पुन्हा वेळ? घालवायला वेळ पुढं सरकला तर पाहिजे! त्या दिवशी जशी ओलीगच्च झाले होते, तशी आताही आहे. अंगाला घट्ट चिकलेलं ओलं परकर पोलकं, शेंडयांतून टिपटीप पाणी निथळत, विस्कटलेले, चेहऱ्यावर रुळणारे केस तसंच आहे सगळं. गेलाय कुठे तो क्षण पुढं? खरं सांगू? अगदी थोड्या वेळेपुरता , अगदी थोड्याच हा, थोडासा हलल्यासारखा वाटला मला तो त्या दिवशी. भास ही असेल कदाचित पण झाला खरा. वरतून बदकन एक लहानगं कोकरू पाण्यात पडलं होतं. जो गलका सुरू झाला वर पोराटोरांचा की बास. लुकड्यासुकड्या , किडमिड्या पायांनी ते गोड कोकरू तरंगत होतं, पण किती वेळ चालणार असं! माझं असंच झालं असेल ना, वरतून पाहीलं असतं कोणी तर अशीच दिसले असते मी कोकरासारखी. वीस - एकवीस वयाला कोकरू म्हणतेय मी, हसू येणार नाही तर काय? त्या खऱ्या कोकराकडं मी अशीच भान हरपून , एकटक बघत राहीले होते, तोच धापकन पाण्याचा आवाज झाला. काळ्या - हिरव्या भिंतीवर फूट दोन फूट पाणी वर उडालं. पाण्यातून डोक वर काढत त्याने साट्कन मानेला मोठा झटका देत चेहऱ्यावरचं , डोक्यावरचं पाणी झटकलं. डोळे फाडून पाहतच राहीले मी. किती वेगळा दिसला तो मला! कॉलेजात जाताना बाकीच्या पोरांबरोबर पांढरा शर्ट , काहीशी डगली पॅन्ट घालून चालायचा तर केवढासा वाटायचा! चालताना मुद्दाम उजव्या बाजूने चालायचा, डावीकडे आम्हा पोरींच्या घोळक्यात चालणाऱ्या मला मध्ये मध्ये बघता यावं म्हणून. माझं लक्ष गेल्यावर मी ओठ आवळून कपाळाला आठ्या पाडायचे मुद्दामच. मग डोळे बारीक करत एकदम खाली बघायचा. मी बळच हसू दाबायचे चेहऱ्यावरचं. खरं सांगू, हा रोजचा क्रम चुकला एखादेवेळी, तर मला करमायचं नाही अगदीच. आता हा असा पाठमोरा तरंगत होता पाण्यात. पिळदार बाहूंत अलगद त्या भेदरलेल्या, भिजक्या कोकराला धरून. कोकराचे मऊमऊ कान चिमटीत घेऊन चोळत त्याने त्याच्या इवल्याश्या तोंडावर क्षणभर नाक घासलं. तो खूप बदलला होता पण चेहऱ्यावरचे आताच्या हलक्याशा दाढी मिशातुन उठून दिसणारे ते भाव तसेच होते, पांढऱ्या हाफ शर्टातले. मला त्याच्या पाठीला हात लावायचा मोह आवरला नाही. मी तळवा उभा धरला, थरथरत पुढे नेते तोच वरतून आवाज आला. " अहो, ही ओढणी पुरेल का?" मी खूप प्रयत्न करून तिचा चेहरा पुसून टाकलाय डोक्यातून. पण तिचे डोळे आणि ते गळ्याशी चिकटलेले , उठून दिसणारे काळे मणी मात्र आजवर विसरू शकले नाही. अंगाला तापलेल्या उचटण्याने चटके द्यावे एकदम तसे चटके बसले मला. विजेचा लोळच जणू वाहत गेला अंगातून. कोकराला ओढणीने अंगाशी बांधून तो भिंतीतल्या कपारीत पाय ठेऊन वर चढणार तोच मी त्याच्या मानेला हातांनी विळखा घालून मागे ओढलं. तो आणि मी कायमचे इथंच आणि काळ थांबलेला, केवढी सुखद कल्पना होती ती. अक्षरशः शीण आला होता आता या एकटेपणाचा. कुठलं बळ तेव्हा अंगात आलं माहीत नाही. पुढच्या पाच मिनिटांच्या आत त्याचे हातपाय झाडायचे बंद झाले. वरतून माणूस उडी टाकेपर्यंत हा निश्चल झाला. अंगाशी बांधलेलं कोकरू पाय मारत राहीलं. मी तसंच गुडघ्याभोवती हात आवळून मन भरून त्याच्याकडे पाहून घेतलं . पण फुटक्या नशिबाने दगा दिलाच! अजून वाट पाहतेय त्याची, आज दिसेल उद्या दिसेल पण आलाच नाही तो परत. मी पुन्हा एकटीच राहीले, कायमची, अगणित काळासाठी. भिजलेली, गोठलेली, पाणी निथळणारे केस पुढ्यात घेऊन गुडघ्यात डोकं घालून बसलेली, खोल, खोल एकांतात!!
मी सांगितलं होतं का मघाशी ? मी कधीच पावसात भिजले नव्हते. मला प्रचंड तिटकारा आहे भिजायचा, ओलेत्याचा आणि त्या दमट कुबट जाणिवेचा!
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle