किती वर्षे उलटली असतील? दोन? तीन? पाच? सतत इथेच बसून काळाचं भान राहिलेलंच नाहीये. आणि हवंय तरी कशाला? ना मी मागे जाऊ शकत, ना पुढं. आताशा मला कळू लागलंय. इथेच , अशीच, याच परकर पोलक्यात , गुडघ्यावर हनुवटी ठेऊन बसायचंय मला कायम. नाही म्हणायला हा डोक्यावरचा वड सोबतीला असतो. तो मात्र आहे तसाच आहे. त्याच्या लांब, अस्ताव्यस्त, खालीवर लोम्बणाऱ्या पारंब्या मात्र मला आवडत नाहीत. रात्र झाली की चंदेरी प्रकाशात खालून एवढ्या उंचावर पाहताना भेसूर दिसतात. कधी कधी वाटतं माझ्या हातांची बोटंच पसरली आहेत अशी लांबच लांब, वाकडी तिकडी, फाटे फुटलेली! छे , मूर्खच आहे मी. मी का घाबरतेय?