डोक्यात काहीतरी नवीन खूळ येतं आणि ते शांत बसू देत नाही. मागच्या वर्षी लेकीकडे युएसएला गेलो होतो. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच होता. वाचून वाचून किती वाचणार आणि पाहून पाहून किती टीव्ही बघणार? नवरात्र झाल्यावर इंडियन स्टोअरमध्ये गेलो तर मराठी/भारतीय फराळाच्या पदार्थाने व दिवाळीच्या सामानाने दुकाने भरलेली, सजलेली होती. डाॅलर किंमती म्हणजे त्याचे रुपयांतर बघून डोळे विस्फारले. त्यापेक्षा कितीतरी स्वस्तात व चविष्ट पदार्थ घरी करता येऊ शकतो, असा ठराविक पिढीजात ममव (मराठी मध्यमवर्गीय) विचार आला नाही तर... असं कसं बरं व्हावं...??? पण असे होणे ह्या जन्मी शक्य नाही (ममव लक्षण: हाॅटेलात मेन्युकार्डवरची उजवी बाजू आधी पाहिल्या जाते)! आणि घुसलं की डोक्यात खूळ!
मुलगी ज्या काॅलनीत राहते तिथे पंचवीसेक देसी कुटुंब आहेत. तेवढ्यांनाही घरगुती फराळ देता आला तरी खूप झालं. तिथे एक मराठी केटरिंग देणारी आहे तिच्याकडे गणपतीतच दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डरी बुक होतात, हे ऐकून तर डोक्यात खूळ घट्ट रूतलं. खरं तर 'अनारसा' ही माझी हातखंडा पाककृती; तेवढचं करायचं मनात होतं, पण बाकीच्याही पदार्थांची मागणी आली आणि आयुष्यात पहिल्यांदा सगळे म्हणजे झाडून सगळे फराळाचे पदार्थ केले व विकले... लेकीबाळी खुश झाल्या!
मागच्या वर्षीच्या ह्या अनुभवातून आत्मविश्वास आला होता. येस्स आय कॅन डू इट! आमचा इथे (पुणे)नैसर्गिक शेती करणारे शेतकरी व ग्राहकांचा "नैसर्गिक फुड्ज" नावाचा ग्रुप आहे, ज्यात थेट शेतमालाची देवाणघेवाण होते. तिथे धान्य, भाज्या व नैसर्गिक धान्य, तेल(लाकडी घाणीवरचं), तूप(गीर गाईंचं) वापरुन केलेले पदार्थही विकायला असतात. मागच्या वर्षीच्या खुळाची धुगधुगी अश्या ह्या ग्रुपवर येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या फोटो, मेसेजेसनी प्रज्वलित होऊ लागली होती. कोथरुड ग्रुपच्या ॲडमिन प्रतिभाताईंशी बोलणं झालं त्यांनी संमती दिली, अट एकच: नैसर्गिक पदार्थच वापरायचे व कोणाकडून घेतले ते मेसेजमध्ये लिहायचे. किंमत वैगेरे काही काढत बसले नाही (तो उद्देशही नव्हता) बाजारात जो भाव होता तोच भाव लिहून मेसेज टाकला!
महिन्याभरावर दिवाळी आलीये. नवरात्रीचे नऊ दिवस कसे जातात ते कळतच नाही आणि मग सुरू होते दिवाळीच्या कामांची लगबग! आता काही पूर्वीसारखं दिवाळीच्या फराळाचं अप्रुप राहिलं नाही, असं म्हणत म्हणत एखादी मधुरा भाजणी भाजत असते तर दुसरी अपूर्वा तांदूळ भिजत घालत असते. हे दोन्ही चकल्याची भाजणी काय किंवा अनारश्याची उंडी करणे काय दोन्ही प्रकरणं वेळखाऊ व कौशल्याचे! आज बहुतेक मुली नोकरी करणाऱ्या त्यांना वेळ नाही तर काहीजणींना हे पदार्थ रिस्की किंवा पीएचडीवाले वाटतात अश्यांसाठी घेऊन येतेय अनारश्याचे पीठ/उंडी...
एक किलो ... ₹
संपर्क ...
पाव व अर्ध्या किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध!
ऑर्डर नोंदवलीत तर त्या प्रमाणात तांदूळ भिजत घालता येतील.
धन्यवाद!
दहा वेळेला कट, काॅपी, पेस्ट करत करत गणपती बाप्पा मोरया म्हणत मेसेज दिला धाडून. चार पाच दिवस झाले एकही ऑर्डर नाही. नवरात्रही गेलं... जाऊ दे नाही तर नाही! दसऱ्याला पहिली ऑर्डर प्रतिभाताईंनी (हा त्यांचा चाणाक्षपणा/मोठेपणा... मला ग्रुपवर कोणी ओळखत नव्हतं. अनोळख्या व्यक्तीला कोण ऑर्डर देणार?) टाकली अन् काय विचारता! पुढच्या चार दिवसात पाच किलोची ऑर्डर! उंडी बरेच दिवस टिकते, हे बऱ्याच जणींना माहीत नव्हते व ही एकूण पाच दिवसांची प्रोसेस आहे, हे ही माहीत नसल्याने वेळेवर दिवाळीच्या आधी ऑर्डर देऊ, असा विचार बर्याच जणींनी केल्याचं नंतर समजलं... अजूनही बरंच अज्ञान समजलं ते पुढे येईलच.... असो! अजून पाचेक किलोची सहजच होईल आपल्या व बहिणीच्या सोसायटीची मिळून... दिल खुश हो गया! तांदूळ भिजत पडायला लागले...
गांधीभवनच्या ग्रुपला सुगावा लागला की! तिकडून ग्रुपवर बोलावणे आले तेच दहा किलोच्या ऑर्डरसह! पहिल्या पाच किलो तांदूळाची उंडी करताना लक्षात आले की विक्री दर, महाग नैसर्गिक सामग्री व कष्ट ह्याचा हिशेब चूकलाय... ऑर्डर तर घेऊन बसलेय, आता काय? कोथरूडमध्ये पहिली ऑर्डर तर देऊन टाकू ह्याच किंमतीत पुढे बघू. पाच किलोपैकी तीन किलो नेलं दोन किलो उरलं. प्रतिभाताईंना काय चूक झाली ते सांगितलं व दुरूस्त कशी करता येईल, त्यावर चर्चा करून दरवाढीचा छानसा मेसेज टाकला. कमी ऑर्डर आल्या तरी हरकत नाही पण कष्टाला परवडले तर पाहिजे ना!
पण काय सांगावं... खरंच भारावूनच गेले! कोणी ऑर्डर कॅन्सल केल्या तर नाहीच उलट काहीजणींना माझा प्रामाणिकपणा भावला तर काहींना योग्य मोबदला देत असल्याचं समाधान तर काहींना अगदी घरच्या चवीचं नैसर्गिक व शुध्द खायला मिळणार म्हणून आनंद! एकीने तर लिहीलं "ताई, गैरसमज करुन घेऊ नका. मला किमतीबाबत काहीच तक्रार नाही कारण माझी आई ही प्रक्रिया करताना पहात आलेय, किती कष्टांचे व वेळखाऊ काम आहे ते, पण माझ्याकडे जवळचे नातेवाईक गेल्याने दिवाळी साजरी नाही करू शकणार..." हे असे मेसेजेस वाचून उत्साह वाढला.
आणि सुरु झालं सकाळी तांदूळ भिजत घालणं, दुपारी तीन दिवसांपूर्वी भिजवलेले तांदूळ उपसून वाळत घालणं संध्याकाळी ते वाटणं (अर्थात मिक्सरवर) चाळणं, गूळ मिसळणं व रात्री आदल्या दिवशीच्या तांदूळाचं पाणी बदलणं आणि हो अतिशय महत्वाचं म्हणजे '2T' (tasting & testing) भाजी फोडणीला द्यायच्या आधी तयार झालेल्या पीठाचा एक अनारसा तळून पाहणं... मधल्या वेळात ऑर्डरीची नोंद ठेवणे, विक्रीला नेण्याच्या आदल्या दिवशी बटर पेपरमध्ये(नो प्लॅस्टीक) पॅकिंग असा रोजचा दिनक्रम सुरू झाला. हे सगळं करत असतांना आठवत होती खलबत्त्यात तांदूळ कुटणारी आई!
तीस किलोच्या ऑर्डर झाल्यावर विश्रांती घेऊन परत दहा किलोच्या घेतल्या. दिवाळीच्या दोन दिवस आधी सगळ्या ऑर्डर्स पूर्ण केल्यावर मग घरच्यासाठी फराळ बनवणं सुरू केलं. लाडू सोडून सगळं चिवडा, चकल्या, खारे-गोड शंकरपाळे, करंजी आणि हो, अनारसे पण केले. :)
ग्रुपवर बोलताना लक्षात आलं आणि खूप भावलं की करून पाहायची आवड व उत्साह आहे, कुटुंबाला चांगलं स्वत: करून खाऊ घालण्यातला आनंद आहे, पण बेसिकमध्ये लोच्या आहे. पीठ तर घेतलं... पुढे काय? FAQs सुरू झाले... डिटेलवार अगदी बारीक-सारीक टीपांसह पाककृती लिहली आणि व्हिडीओही करून टाकला ग्रुपवर! चला, आता काही प्रश्न येणार नाहीत विचार करत पुढच्या कामाला लागणार, तोच फोन खणखणला...
- ताई, तो तुम्ही अनारसा पलटला नाही, एकाच बाजूने तळला...
टीपेत भर पडली... अनारसा एकाच बाजूने तळावा व खसखशीची बाजू वर असावी(माझ्या बहिणीची सूचवणी)!
- भिजवलेल्या कणकेप्रमाणे म्हणताय तर गरज असेल तर पाव चमचा दूध किंवा केळं लावावं तर मग एवढुसं कसं पुरेल? हे पीठ ओलं असतं का कोरडं?
- तुम्ही तुपात तळावे लिहीलंय, तेल चालेल का?
- पीठ किती दिवस टिकतं? फ्रीजमध्ये ठेवायचं की फ्रीजरमध्ये? (अग बाई 'फ्रीज'मध्ये लिहीलंय फ्रीजर असतं तर फ्रीजर लिहीलं असतं ना! पुण्याच्या पाट्यालेखकांडून दीक्षा घ्यायला हवी.)
- पीठ US ला पाठवता येईल का? (जगाच्या पाठीवर कुठेही पाठवता येईल... ग्लुटेनफ्री डायटवालेही खाऊ शकतील) इ.इ.
इकडे काही जणींचे कढईत जाळीदार अनारसे तळल्या जात होते. (स्मिताने तर पहिला अनारसा हसला नाही बघून उडीच मारली आणि लगेच फोन केला) ग्रुपवर फोटो येऊ लागले... ज्यांनी पीठ घेतलं नाही त्यांना इनो घ्यायची वेळ आली. ताई, ऑर्डर द्यायला विसरले आता मिळेल का पीठ? दिवाळी झाल्यावर दिलं तरी हरकत नाही. कुणाला नाराज करायची इच्छा नव्हती पण शक्यही होत नव्हतं. तरी दिवाळी नंतर दहा किलोची ऑर्डर घेऊन पूर्णविराम दिला.
दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला कितीतरी जणींच्या (हो, एक जण होते बालसाहित्यकार राजीव तांबे!) कौतुक वर्षावाने... आईच्या हातच्या चवीची आठवण... पुरवून पुरवून खावे लागताहेत... परत ऑर्डर सुरु केली की माझी पहिल्यांदा घ्या... ह्यावर्षी एक किलो घेतले पुढच्या वर्षी दोन किलो हं... सासरी भाव खाल्ला अनारसे खायला घालून... इ.इ.
पण! पण! पाय जमिनीवरच राहायला हवे ह्याची सोय देवाने करून ठेवलीये... देवाचे आभार व अश्या लोकांबद्दल कृतज्ञता!
अनारसे हसले, फसले कुणाचेच नाही पण दोघी जणी स्वत:च्या चुका माझ्या नावावर फाडू पहात होत्या. एकीने भर पावसात दिवसभर फिरून ओलं झालेलं पीठ डब्यात न काढून ठेवता बाहेर ठेवलं तर एकीने पाककृती नीट न वाचता पाव किलो पिठात अर्धा कप दूध घातलं. बरं झालं पूर्ण पिठात घातलं नव्हतं.
ह्या सगळयात मजेशीर व प्रामाणिक फोटो होता शंकाराणीचा(प्रांजळपणे शंका विचारणारी)!
फोटो पाहून काय काय प्रतिसाद द्यावा, कुठली इमोजी टाकावी कळेचना...
शंकाराणी typing... ताई, सगळ्या टीप्स फाॅलो केल्या पण मला नं उचलून नीट टाकताच आले नाहीत... मला खूप आनंद झाला... बदकं, चिमण्या माझ्या मुलांनी आवडीने खाल्ले...
असं हे खूळ इतकं समाधान व आनंद देऊन गेलं की, गेल्या वर्षी व ह्या ही वर्षी त्याचा हिशोब नाही मांडावासा वाटला - ना डाॅलर ना रूपयामध्ये!
फोन नं ९६६५०९८४४९
किंमत: साखर / गूळ ४०० कि