"काक्कुआज्जी!"
ती चिरपरिचीत हाक हवेत विरते न विरते तोच फाटक सताड उघडे टाकून तो धापा टाकत आत पळत आला. फाटकाची कडी त्याचा हात जेमतेमच पुरत असे. तरी तो प्रयत्न करून फाटक उघडायचाच. ती हाक शोभाताईंनाच उद्देशून आहे हे ताडले तरी मुग्धा बैठकीत आली.
"कोण आहे? "
अंगावर जेमतेम कपडे घालून त्याच्यापेक्षा मोठ्या टाॅवेलला सावरत उभ्या त्या बटूला बघून तिला हसू आलं. तरी तिने वरकरणी सरळ चेहरा ठेवत पुन्हा विचारलं, "कोण बरं?"
"अण्ड्राग"
"काय? Android?!", नव्यानेच अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला course आठवला मुग्धाला.
"नै कै. अ..न..रा..ग"
"अनुराग होय. अच्छा अच्छा. तसं सांगायचे की मग. अण्ड्राग काय?", हसतच म्हणाली मुग्धा.
"मावशी पुजेला बसल्यात"
"शक्यच नाही! मग माझी आंघोळ?"
"मला तयार केल्याशिवाय पूजा करणे शक्यच नाही. पुजेची फुले मीच आणून देतो ना "
मुग्धाचा गोंधळलेला चेहरा पाहून अनुने स्पष्टीकरण दिले.
तेवढ्यात शोभाताई मागच्या दारातून आत आल्या. हातातली फुले त्यांनी घाईघाईने ओट्यावर ठेवून त्यावर झाकण ठेवलं आणि त्या पुढे झाल्या.
"आलास का रे? बरं तुला शिकवलंय ना आंघोळ करायला?", शोभाताई विचारत्या झाल्या.
"हो पण काल मी आंघोळ करताना साबण संपला ना. म्हणून जयंतशेठ ओरडले-कार्ट्या नवा साबण संपवलास? जा आता. रहा तस्साच! आता तुम्हीच सांगा, मी आंघोळ केली नाही, फुले तोडली नाही तर काकुआज्जींची पुजा कशी व्हायची?"
त्या निरागस चेहर्यावरचे जबाबदारीचे भाव पाहून मुग्धाला हसू आवरेना.
"बरं बरं. चल पटकन. आंघोळ घालते. पण हे काय? कपडे आण ना घालायचे. फक्त टाॅवेल आणलास. "
तशी हातभर जीभ बाहेर काढत घरी पळत गेला अनु.
"समोरच राहतात. तू मागच्या सुट्टीत आलीस तेव्हा नव्हते इकडे ते. खूप गोड आणि मस्तीखोर आहे अनु. संपूर्ण काॅलनीमध्ये हैदोस घालतो. पण आता त्याच्याशिवाय कुणाचंच पान हलत नाही", शोभाताई हसत म्हणाल्या.
"रोज त्याने तोडून आणलेल्या फुलांनीच पुजा करावी असा हट्ट धरतो. मी तोडलेली चालत नाही त्याला"
शोभाताई माहिती पुरवत होत्या.
"तुम्हाला चांगलाच विरंगुळा म्हणायचा. पण जयंतशेठ कोण?", मुग्धाने विचारलं.
"जयंतशेठ म्हणजे त्याचे वडील".
हे ऐकताच खळखळून हसली मुग्धा.
समोरून भुर्र्कन अनुरागची स्वारी प्रवेश करती झाली. त्याच्यापाठोपाठ धावत एक स्त्रीदेखील आत आली.
"अनु अरे! आंघोळ करून ये चल बाळा". अनुची आई त्याला हाक मारत पुढे आली.
"बघा ना शोभाताई. आपला नवीन साबण संपून जाईल. त्यापेक्षा मी काकुआज्जींकडे आंघोळ करतो असं म्हणून हा इकडे पळत आलाय. हाकला बरं त्याला घरी."
त्याच्या आईने केलेली तक्रार ऐकून ओठांवर पदर लावला शोभाताईंनी.
'बरं बरं. असू दे गं सुमा. मी घालते त्याला आंघोळ. ", असं म्हणून चोरी पकडल्यामुळे अवघडून कोपर्यात उभ्या असलेल्या अनुचा ताबा घेतला शोभाताईंनी.
आई गेल्याचं पाहून घाईघाईने शोभाताईंना मिठी मारून त्यांच्या कडेवर चढला अनु. लाडीकपणे त्यांच्या गळ्यात हात टाकून म्हणाला- "आईने किनै उप्पीट केलंय मला आवडत नाही तरी. म्हणून मी इकडे आलो पळून. आता जयंतशेठला खावं लागणार ते. तुम्ही मला मेतकूट आणि साईचं दही द्याल ना पुजा झाल्यावर? "
लगेचच डॅबिसपणे कहाणी रचून सांगणार्या अनुला आणि ते ऐकत त्याला न्हाणीघरात नेणार्या शोभाताईंना बघत राहिली मुग्धा. सूर्य हळूहळू डोकावत होता.
चिठ्ठी भाग 2- https://www.maitrin.com/node/3949