चिठ्ठी भाग 2

चिठ्ठी भाग 1- https://www.maitrin.com/node/3948

"एखादं छानसं भजन म्हण ना मुग्धा", वाती तुपात बुडवत शोभाताई म्हणाल्या.
"कुठलं म्हणु?"
"कुठलंही म्हण अगं ", अनुला जवळ घेऊन कुरवाळत शोभाताई म्हणाल्या.
"किती वेळ लावशील? मी असतो तर आतापर्यंत म्हणून देखील झालं असतं आणि प्रसाद देखील खाऊन झाला असता..देवाचा", अनुची बडबडीकडे दुर्लक्ष करून मुग्धाने गायला सुरवात केली.

"तुझी पदकमले मज शतकोटी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी

तुझ्या पद-धुळीची आस देवा
नित्य नव्याने घडू दे सेवा
राहू दे तुझे आशिष पाठी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी
तुझी पदकमले मज शतकोटी||"
मुग्धा डोळे बंद करून गात रममाण झाली होती. शोभाताई मांडीवरल्या अनुचे हात धरून हळूच ताल धरत होत्या. अनुचं लक्ष होतं कुठे? एक डोळा प्रसादाच्या वाटीकडे होता त्याचा.
भजन संपलं तसं मुग्धा शोभाताईंच्या पाया पडली. त्यांनीही मनापासून आशीर्वाद देत तिचा चेहरा गोंजारला.
"तू काय कलाकार आहेस का? ", त्या दोघींची तंद्री तोडत, प्रसादाचे पेढे तोंडात कोंबत अनु मुग्धाला विचारत होता.
"कलाकार! नाही रे साधंसुधं गाते मी". मुग्धा उत्तरली.
"मी आहे बरं कलाकार. माझ्या कडे तसा फोटो पण आहे". अनुने फुशारकी मारीत सांगितले.
मुग्धाचा गोंधळलेला चेहरा पाहून शोभाताईंना हसू आवरेना.
"अगं त्याच्या मते कलाकार म्हणजे जे लोकं डोळे बंद करतात ते. मागे त्याच्या मामांबरोबर काढलेल्या फोटोमध्ये त्याचे डोळे बंद आलेत. तो त्या फोटोबद्दल तुला सांगतोय. "
मुग्धाने कपाळावर हात मारून घेतला.
"अनु, ए अनु!"
"बापरे आली सुमाक्का", आईची हाक ऐकून शोभाताईंच्या मागे लपला अनु.
"आईला सुमाक्का म्हणतोस काय रे?", मुग्धाने डोळे वटारले.
तेवढ्यात सुमा आत आली.
"चार चकल्या केल्या होत्या काल. बघा बरं कश्या झाल्या ते. तुम्हाला सोसवत नाही म्हणून तिखट कमीच टाकलंय हो", असं म्हणत चकल्यांचा डबा शोभाताईंना दिला सुमाने.
"काय काय करत असतेस बघ", असं कौतुकाने म्हणत डबा घेतला त्यांनी.
"दही संपवले असणार आमच्या बोक्याने", लपलेल्या अनुचा हात धरून बाहेर काढत सुमा म्हणाली.
"काय महाराज? येथून कुठे जाणार स्वारी? घरी येणार का सरळ चिंगीकडे मोहीम? ", सुमाने विचारलं.
"गेलो असतो गं. पण पानकीबेगम नाहीये ना. फक्त मेंदीचं झाड आहे घरी". आईच्या प्रश्नाला अनावधानाने उत्तर दिलं अनुने. जीभ चावत आत पळाला तो.
"थांब तू, चिंगीच्या आईबाबांना काय म्हणतोस ते सांगते मी त्यांना", सुमा ओरडली.
"मगाशी तुम्हाला सुमाक्का म्हणाला ", मुग्धाने माहिती पुरवली.
"असु दे गं. खेळू दे त्याला इथंच. पाठवते थोड्या वेळाने घरी. काही त्रास नाही द्यायचा तो.", अनुला धरायला जाणार्या सुमाला थोपवत शोभाताई म्हणाल्या.
"लवकर ये बरं अनु आणि त्रास नको देऊस ", असं म्हणत सुमा घरी परतली.
"बापरे! तू तर सर्वांना नावं ठेवतोस. मला काय म्हणणारेस?" , मुग्धाने घाबरल्यासारखं करत अनुला बैठकीत आणलं.
"मुग..." असं म्हणून वेडावून दाखवत पळणार्या अनुचं पकडताच "धा!", असे म्हणून मुग्धाचे नाव पूर्ण केले अनुने.
"ए मुग..धा काय? मुग्धाताई म्हणायचं मला. काहीही म्हटलेले खपवून घेणार नाही बरं सांगून ठेवते." मुग्धाने तंबी दिली.
"बरं. तुला मी दिदी म्हणु? ", सोडवून घेतलं अनुने स्वतःला.
"हो. चालेल ना ".
"दिदी तेरा देवर दिवाना!" असं मोठ्याने ओरडत घराकडे धूम ठोकली अनुने.
घराच्या अंगणात शिरताना ओसरीवरच्या बायकांना चुकवायचा प्रयत्न केला त्याने.
"काय आज शाळेत जायचं नाही वाटतं? ". त्यातल्या एकीने बाण सोडलाच. तो जाईल त्या दिवशी शाळा आणि तो नाही जाणार त्या दिवशी शाळेला सुट्टी असणारच हे अनुचं साधं सोपं लाॅजिक असल्यामुळे त्याने फार काही लक्ष दिले नाही तिकडे.
"मी डायरेक्ट काॅलेजलाच जाणारे!"
"बघा बघा कस्सा बोलतोय ", असे कौतुकमिश्रीत उद्गार कानी पडताच सरळ आत न शिरता त्या बायकांकडे आला अनु.
"काय? कामं झालीत काय तुमची? इकडे बसून गप्पा काय मारताय? जा, कामं करा जा!", असं ओरडून तो घरात शिरला.
"जयंतशेठनी बघितले तर काही खरं नाही. शाळेची वेळ टळेपर्यंत काहीतरी केलं पाहिजे ". असं पुटपुटत, विचार करत आत गेला अनु. "ही चिंगी पण ना, काय गरज होती आताच मामांकडे जायची". मान हलवत मागच्या अंगणातल्या पेरूच्या झाडाकडे बघत बसला तो.

चिठ्ठी भाग 3 - https://www.maitrin.com/node/3951

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle