आदित्य आला होता.
इतक्या पहाटे उठून बाहेर इतका वादळी वारा असताना बर्फात तो काय करायला गेला होता काय माहीत. तिने उठून नकळत गरम चहाचा दुसरा कप भरला. समोरच्या खिडकीतून लांबवर दिसणारे उंच हिरवेगार देवदारसुद्धा आता पांढराशुभ्र बर्फ पांघरून झोपले होते.
लॅच उघडून त्याने आत पाऊल टाकताच त्याच्या मागोमाग आलेला सीडर पळत तिच्या पायापाशी आला, तीपण लगेच गुडघ्यावर खाली बसून तिच्या नवीन मित्राशी खेळायला लागली.
ती चक्क इतक्या लवकर उठून किचनमध्ये काम करते आहे! हातातली काठी दारामागे ठेऊन तो स्टुलावर बसला. गुडघ्यापर्यंत येणारे जड बूट काढता काढता तो आश्चर्याने बघत होता.
"आता वादळ थोडं कमी झालं आहे." तो हळूच म्हणाला."पण रस्त्यावर इतका बर्फ आहे की आज काही रस्ते सुरू होतीलसे वाटत नाही. फतेला येता नाही येणार आज तरी. बघू संध्याकाळपर्यंत बर्फ थांबला तर बरं होईल." त्याने खांद्यावरच्या जड सॅकमधून गडद नारिंगी रंगाची, हार्ट शेपसारखी दिसणारी पण तिने कधीही न बघितलेली मऊ, रसाळ फळं काढून टेबलावरच्या बांबूच्या टोकरीत रचून ठेवली.
"अरे यार..." तोंड वाकडं करत ती म्हणाली. तिला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडत होतं. तिने चहाचा कप त्याच्या हातात दिला.
"तू चहा केलास!" तो अश्या सुरात म्हणाला जसे काही ते रॉकेट सायन्स आहे.
"हम्म." रात्रीच्या अंधारात तो समोर नसताना त्याला उलट उत्तरे देणे, वाद घालणे सोपे होते पण असे समोरासमोर उभे राहून त्याच्या डोळ्यात बघून काही बोलायला शब्द फुटत नव्हता. रात्री ती जे काही बोलली त्याबद्दल आता तिला स्वतःची लाज वाटत होती. त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचा तिला काय अधिकार होता? चूकच होती ती.
आदित्यही जरा अस्वस्थ वाटत होता.
"नाश्ता झाला तुझा?" तिने उगीच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. आणि नसेल झाला तर तू काय करणार आहेस? जसा काही इथे फ्रीज भरलेला आहे वस्तूंनी! तिने मनातल्या मनात स्वतःला टपली मारली. फ्रीजमध्ये फक्त फळंच फळं होती, नाही म्हणायला दुधाचा मोठा कॅन, थोड्या शिमला मिरच्या, मटार आणि मश्रूम्स होते. मोठा फ्रीझर फक्त फ्रोझन चिकन आणि बाकी वेगवेगळे मीट कट्स आणि रेडिमेड रोट्यांच्या पॅकेट्सने भरलेला होता. इथे मैलोन मैल जंगलाशिवाय काहीच नाहीये, त्याला नक्की सांगला किंवा अजून लांब दुसऱ्या गावाला जाऊन किराणा, भाजीपाला वगैरे आणावा लागत असणार.
"मी निघतानाच कॉर्नफ्लेक्स खाल्ले होते. तू?" हे पहिल्यांदाच त्याने तिला सरळ उत्तर दिले असेल.
"नाही अजून." त्याचे हे अचानक थोडे मवाळ वागणे तिला आता झेपत नव्हते. त्यांनी रात्री एकमेकांबरोबर जेवढा वाद घातला होता त्यानंतर आता तरी त्याला सगळ्या गोष्टी सांगून टाकणे तिला गरजेचे वाटत होते. कुठून सुरुवात करावी ते तिला सुचत नव्हते.
"त्या कपाटात दोनतीन प्रकारचे जॅम आणि ब्रेड आहे."
"नाही नको, मला ब्रेकफास्टची सवय नाही. सकाळी उशिरा उठते आणि ऑफिसला गेल्यावर लंचटाइम पर्यंत सारखा चहा होत असतो." तिला बऱ्याच वेळाने ऑफिसची आठवण झाली. बिचारी अना दोघींचे मिळून डबल काम करत बसली असेल.
"ओके." म्हणून कप टेबलावर ठेऊन त्याने जॅकेट, बीनी, मफलर, ग्लव्हज सगळे काढून स्टँडला अडकवले. बर्फाने ओलसर झालेले केस झटकून तो कप उचलून टेबलपाशी बसला. तिच्याकडे न बघता तो कपकडेच बघत होता.
जणू काही कपमध्ये बघून भविष्यच सांगायचंय याला! ती त्याच्याकडे बघत मनात म्हणत होती.
ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. जरासे खाकरून तिने बोलायला सुरुवात केली. "काल रात्री-"
"काल रात्री काय?" त्याने एकदम तोंड वर कर करून, डोळे बारीक करत तिच्याकडे पाहिले.
"रात्री मी तुझ्या आईबद्दल, तुझ्याबद्दल जे काही बोलले त्यासाठी मला माफी मागायची होती. खरंच मला तुमच्या खाजगी गोष्टीत बोलायला नको होतं."
"डोन्ट मेन्शन इट!" त्याने बेफिकिरपणे मान हलवली.
"तरी तुला बायकांबद्दल ट्रस्ट इशूज आहेत हे नक्की." ती बारीक डोळे करून त्याला निरखत होती.
"आता बस्स." त्याच्या ओठांची आता सरळ रेष झाली होती.
"राईट! सॉरी." ती दोन्ही हात वर करत म्हणाली. तो ऐकतोय म्हणून आपण आपला मुद्दा पुढे ढकलू शकत नाही हे तिला जाणवलं. जरा विषय पुढे गेला की त्याचा राग फणा काढत होता.
त्याने रिलॅक्स होत पुन्हा उरलेल्या चहाचा घोट घेतला.
"मला अजून एक महत्वाची गोष्ट करायची आहे. पण प्लीssज प्लीssज तू चिडू नको. तुला माझा खूप राग येईल, मी आधीच सांगून ठेवतेय. पण प्लीज तुझा राग कंट्रोल कर." ती अजिजीने म्हणाली.
"आता काय अजून?" तो आधीच वैतागला होता.
ती उठून सेंटर टेबलापाशी गेली. तिने पर्समधून त्याच्या आईने दिलेली अंगठी काढून मुठीत घट्ट आवळत एक खोल श्वास घेतला. स्टे स्ट्रॉंग. तिने स्वतःला म्हटले.
वळून ती पुन्हा त्याच्यासमोर जाऊन बसली.
"तुझ्या आईने मी तुला जर शोधू शकले तर तुला द्यायला एक वस्तू दिली आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं त्यामुळे ते पूर्ण करावंच लागेल."
"वस्तू?"
"तुझ्या बाबांची अंगठी. एंगेजमेंट रिंग. त्यांनी आईला परत केली होती ते तुला माहिती असेल. आईला ती तुझ्याकडे असावी अशी इच्छा होती म्हणून त्यांनी पाठवली आहे. " ती त्याच्यासमोर मूठ उघडत म्हणाली.
त्याने जोरात एक श्वास घेत दात घट्ट आवळले.
"ठेव तुलाच."
"मी ती ठेवू शकत नाही, मी प्रॉमिस केलंय त्यांना."
तो तिच्याकडे बघून खुनशीपणे हसला. "हा! हेच सांगून तू फतेला इथे यायला पटवलंस तर. त्याने मला वस्तूबद्दल सांगितलं पण काय वस्तू ते मुद्दाम सांगितलं नाही."
तीला सगळंच खरं सांगून टाकायचं होतं. "फते माझ्या बोलण्यामुळे किंवा या अंगठीमुळे तयार नाही झाला. त्याला वाटलं की मी जे करतेय तुला बरं वाटेल, तुझ्या भल्यासाठी तो तयार झाला. तुझ्या आईचा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचायला हवा असं त्याला वाटलं म्हणून तो तयार झाला. तो धोकेबाज नाही, फक्त चांगला मित्र आहे."
"मला वाटलंच असंच काहीतरी असणार म्हणून. फते इतक्या ईझीली फुटणारा माणूस नाही."
तिने ती अंगठी टेबलावर त्याच्या पुढ्यात सरकवली. "माझ्यामते तू आईला भेटावं आणि त्यांच्याशी काहीतरी संपर्क ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे. तू त्यांचा एकुलता एक मुलगा असून का त्यांना प्रतिसाद देत नाहीस? खूप थकलेल्या वाटल्या त्या."
"स्टॉप इट. उलट तीच आम्हाला सोडून गेली होती. तू मला एकुलत्या एक मुलाचं सांगतेस तर त्याच एकुलत्या एक मुलाला जेव्हा त्याच्या आईची गरज होती तेव्हा वाऱ्यावर सोडून कायमची निघून जाणाऱ्या आईची काहीच चूक नाही?" संतापून त्याच्या कपाळाची शीर ताडताड उडत होती.
रागाने त्याचे डोळे बर्फाच्या लादीसारखे थिजले होते. घाबरून अजून उत्तरे न देता ती त्याची नजर चुकवत गप्प बसून राहिली.
"झालं तुझं समाधान?" दहा पंधरा मिनिटे त्या अंगठीकडे टक लावून पाहिल्यानंतर त्याने विचारले.
"आता झालं." त्याने अंगठी हातात घेतलेली पाहिल्यावर मनात हुश्श म्हणत ती किंचित हसली.
त्याने लाकडी फ्लोरिंगवर खर्रर्रर्र चरा पाडत खुर्ची मागे सरकवली आणि उभा राहिला. दाराकडे जाऊन त्याने दार उघडलं. बाहेरून सोसाट्याचा वारा आणि बर्फाचे कण त्याच्या अंगावर आपटूनही तेवढ्याच वेगाने आत आले. तिला काही कळायच्या आत हात मागे नेत पूर्ण जोर लावून त्याने ती अंगठी बाहेर साचलेल्या उघड्या बर्फाच्या पलीकडे जंगलाच्या हद्दीत कुठेतरी लांबवर फेकून दिली.
क्रमशः