दक्षिणेतील प्लँटेशन्समधील प्रचंड मेहनतीला, जाचाला, खच्चीकरणाला कंटाळून स्वतःच्या जिवावर उदार होऊन काही स्लेव्ह्ज पळून जाण्याचा प्रयत्न करीत. काही जण उत्तरेतील मुक्त राज्यात पळून जाण्यात यशस्वी ठरत. आपल्या कुटुंबाला कसे तरी करुन आणण्याची त्यांची धडपड सुरु होई. उत्तरेतील अॅबॉलिशनिस्ट्स आणि त्यांच्या समर्थकांनी 'अंडरग्राउंड रेलरोड' नावाखाली या गुलामांना फ्री स्टेट्स आणि कॅनडमध्ये पळून जाण्याकरता सुरक्षित घरांची साखळी सुरु केली. या घरातील लोक पळून आलेल्या गुलामांना आपल्या घरी आसरा देऊन फार मोठी जोखीम पत्करायचे. रात्री, अंधारात लपून छपून हे गुलाम एका घरातून दुसर्या घरी हलवले जायचे. मुख्यत्वे उत्तरेतील राज्ये आणि कॅनडा इथे सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यास त्यांना मदत केली जाई,.काही मार्गाने स्लेव्ह्ज हे पळून मेक्सिकोतही गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात छोट्या प्रमाणात सुरु झालेल्या अंडरग्राउंड रेलरोडने १८५० पर्यंत जवळपास एक लाख गुलामांना पळून जाऊन मुक्त होण्यास मदत केली. अनेकदा हे गुलाम किंवा त्यांना मदत करणारे लोक अशस्वी होत आणि गुलामांना पकडून परत मालकाकडे पाठवले जाई. या गुलामांच्या डोक्यावर मोठे इनाम ठेवले जाई. त्यांना पकडायला सशस्त्र पोलिस, शिकारी कुत्री आणि घोड्यावरुन माणसे रवाना होत. इतरांना जरब बसावी म्हणून आणि गेलेल्या वेळेचा आणि पैशाचा अपव्ययाने चिडून मालक पकडल्या गेलेल्या गुलामाची हालत भयानक करत असे. पण तरीही जीवावर उदार होऊन गुलाम पळून जाणण्याचा प्रयत्न करीत असत. यावरुन हे गुलाम कुठल्या प्रकारचे आयुष्य कंठीत होते याची कल्पना येते. पळून गेलेल्या गुलामाचे कुटुंब त्याच्या आणि इतरांच्या मदतीने स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करीत. कधी कधी ते यशस्वी होत, पण बरेचदा त्यांची नेहेमीकरता ताटातूट होई. राहीलेल्या व्यक्तींना अजुन जास्त त्रासास तोंड द्यावे लागे. १८५० मध्ये अमेरिकन सरकार दक्षिणेतील राज्यांचा दबावाला झुकले आणि त्यांच्याबरोबर तडजोड म्हणून 'Fugitive Slave Act' नावाचा कायदा केला गेला. या कायद्यानुसार उत्तरेतील नागरिकांवर पळून आलेल्या गुलामाला दक्षिणेत त्यांच्या मालकाकडे परत करण्याची सक्ती करण्यात आली. तसे न केल्यास त्यांना कायद्याने शिक्षा होत असे. हा कायदा उत्तरेतील वादग्रस्त ठरला, अनेक लोकांना तो अमान्य होता. कायद्याच्या धाकामुळे गुलामांना पळून जायला मदत करणे खूप अवघड झाले पण तरीही अनेकांनी जोखीम पत्करुन ते काम चालूच ठेवले.
(स्रोत - harriet-tubman.org)
क्वचित वेळेला गुलामांनी उठाव करुन मालकांविरुद्ध सशस्त्र लढाही दिलेला आहे. या उठावाची परिणीती ही मृत्यूदंडातच होत असे. गुलामांवर प्रचंड वचक असल्याने ही प्रकरणे फार जास्त आणि मोठ्या प्रमाणात होत नसत. १८३१ साली मात्र व्हर्जिनियामध्ये अशी घटना घडली ज्याने सारे दक्षिण हादरले. दक्षिण व्हर्जिनियामधील काही प्लँटेशन्समधुन नॅट टर्नर नावाच्या गुलामाने आणि त्याच्या ७० साथीदारांनी सशस्त्र बंड केले. अनेक दिवस ही योजना ते आखत होते. जवळपास ७० गोर्या मालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी ठार मारले. २ दिवसांनी हा उठाव तिथल्या गोर्या अधिकार्यांनी चिरडून टाकला. या उठावाचा हिस्सा असलेल्या गुलामांला शोधून तात्काळ फासावर दिले. परंतू या घटनेने दक्षिणेतील गोरे मालक चवताळून उठले. गोर्यांचा हत्येने निर्माण झालेल्या प्रचंड जनक्षोभात या उठावात कुठल्याही प्रकारचा भाग नसलेल्या जवळपास २०० निरपराध गुलामांचीही हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अनेक राज्यातील गुलामांवरील निर्बंध अतिशय जास्त वाढले. जमावबंदी, चर्चमध्ये गोरा मिनिस्टर असल्याशिवाय प्रार्थनेला मज्जाव, प्रत्येक हालचालीवर कडक नजर अशा परिस्थितीत स्लेव्ह्जचे आधीच पिचलेले जीवन अजुन जास्त अवघड झाले.
बहुतांशी अॅबॉलिशनिस्ट्स हे शांततापूर्ण चळवळ, वर्तमानपत्रातून लिखाण, दबावतंत्र, निदर्शने, भाषणे, जनजागृती, परदेशातून चळवळीस पाठींबा मिळवणे इत्यादींचा वापर करुन स्लेव्हरी रद्द करण्यासाठी लढत होते. पण अॅबॉलिशनिस्टसचा असा एक गट होता जो स्लेव्हरी रद्द करण्याकरता सशस्त्र बंडखोरीचा वापर करण्यास अनुकुल होता. जॉन ब्राउन हा अशा गटाचा पुरस्कर्ता होता. 'मिझुरी काँप्रमाइझ' झाल्यापासून उत्तरेतील अॅबॉलिशन चळवळ जास्त तीव्र झालेली होती. १८५४ मध्ये कँसस आणि नेब्रास्का ही राज्ये जेंव्हा देशात सामील होणार होती तेंव्हा राज्य हे स्लेव्ह किंवा फ्री स्टेट यापैकी काय असावे या करता त्यांनी तेथील रहिवाश्यांचे मत विचारात घेण्याचे ठरवले. यानंतर कँससमध्ये स्थायिक होण्याकरता अचानक उत्तर आणि दक्षिणेतून खोर्याने लोक धडकू लागले. सार्वमताच्या निकालामध्ये कँसस फ्री किंवा स्लेव्ह राज्य म्हणून घोषीत व्हावे या करता आग्रही असलेल्या दोन्ही बाजुच्या लोकांमध्ये मतभेत, चढाओढ आणि हिंसा वाढू लागली. अशा परिस्थितीत जॉन ब्राउन आणि त्याच्या सहकार्यांनी स्लेव्हरीच्या पुरस्कर्त्या ५ स्थानिकांची हत्या केली आणि पूर्ण राज्यात स्लेव्हरीला पाठिंबा देणारी आणि विरोध करणारी लोकं एकमेकांना भिडली. दोन्ही गटांमध्ये हिंसा सुरु झाली आणि कँसस पेटले, परिस्थिती चिघळली. हिंसेने दहशत वाढली आणि दोन्हीही गटांमध्ये जिवीत हानी होऊ लागली. परिस्थिती शांत होण्यास ३-४ वर्षे लागली. या सर्वात आणि उत्तर आणि दक्षिणेतले वैर अजुन वाढले.
(स्रोत - student.ucps.k12.nc.us)
एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात उत्तरेतील फ्री स्टेट्स आणि दक्षिणेतील स्लेव्ह स्टेट्स यामधील असंतोष खदखदत होता. त्यात १८५९ मध्ये अजुन एका घटनेची भर पडली. अमेरिकेत यादवी किंवा सिव्हिल वॉर सुरु होण्यात कारणीभूत असलेल्या अनेक घटनांमध्ये जॉन ब्राउनने १८५९ साली व्हर्जिनियामधील हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर घातलेला छापा ही निर्णायक घटना ठरला. हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर छापा मारुन, तेथील शस्त्रे लुटून स्थानिक गुलामांना त्यांचा पुरवठा करायचा, आणि त्यांच्या सशस्त्र लढ्यात मदत करायची अशी योजना जॉन ब्राउन आणि त्याच्या सहकार्यांनी आखली. गुलामांना हीन आणि अपमानकारक अशा स्लेव्हरीच्या जोखडातून मुक्त करणे, त्याकरता मदत करणे हे जॉन ब्राउनच्या आयुष्याचे ध्येय बनले होते. १७ ऑक्टोबर १७५९ साली हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर पूर्वनियोजनानुसार ब्राउन आणि त्याच्या सहकार्यांनी छापा घतला मात्र नंतरच्या गोष्टी नियोजनानुसार घडल्या नाही. शस्त्रागार लुटल्याची बातमी पसरल्यावर आलेले अमेरिकन सैनिक आणि जॉन ब्राउनचे सहकारी यांच्यामध्ये चकमक घडून जॉन ब्राऊन पकडला गेला. त्याच्यावर घाईघाईत खटला भरला गेला आणि दक्षिणेतील अधिकार्यांनी २ डिसेंबर १८५९ रोजी त्याला फासावर चढवले. जॉन ब्राउन हा कोणी स्लेव्ह नव्हता, तो स्लेव्ह्जना मुक्त करण्याच्या कार्याला वाहुन घेतलेला एक अॅबॉलिशनिस्ट होता. त्याचा मार्ग काही अबॉलिशनिस्ट्सना जरी पटत नसला तरी त्याला अशा प्रकारे फासावर चढवल्यामुळे उत्तरेतील असंतोष कमालीचा वाढला. जॉन ब्राउन हा मोठा हिरो ठरला आणि त्याच्या मृत्यूने उत्तर आणि दक्षिणेतील दरी अजून वाढली. दक्षिणेतही अॅबॉलिशनिस्ट्स बद्दल राग वाढला. तसेच या घटनेपासून स्फूर्ती घेऊन गुलामांना मुक्त करण्याकरता अशा प्रकारचे अजून छापे मारले जातील, त्यांना पळून जाण्यास मदत केली जाईल असे तर्कवितर्क वाढू लागले.
या सर्व घडामोडींमध्ये १८६० मध्ये झालेली निवडणुक रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार अब्राहम लिंकन याने जिंकली. लिंकन हा मवाळवादी रिपब्लिकन होता. त्याचा स्लेव्हरीला विरोध होता. नोव्हेंबर १८६० मध्ये झालेल्या निवडणुकीत उत्तर आणि पश्चिमेतील बहुतांशी राज्ये लिंकनने जिंकली (त्यावर्षी निवडणुकीत ४ उमेदवार होते), पण दक्षिणेत मात्र त्याने सपाटून मार खाल्ला. पण एकुण मतांनुसार (electoral college) लिंकनने १८६० ची निवडणूक जिंकली. रिपब्लिकन पार्टी आणि अब्राहम लिंकन यांची स्लेव्हरी बद्दलची मते माहिती असल्याने दक्षिणेतील राज्यांमध्ये कमालीचे अविश्वासाचे आणि चिंतेचे वातावरण पसरले. लिंकन जिंकल्यानंतर एक महिन्यातच साउथ कॅरोलिना या राज्याने एकसंघ देशातून फुटण्याचा निर्णय जाहीर केला. साउथ कॅरोलिना पाठोपाठ जॉर्जिया, अॅलाबामा, मिसिसिपी, लुइझियाना, टेक्सास आणि फ्लोरिडा या राज्यांनी देशातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यांना जसा देशात (युनियन) सामील व्हायचा हक्क आहे तसा त्यांना देश सोडण्याचाही हक्क आहे असा युक्तिवाद त्यांनी मांडला. हा युक्तिवाद अमेरि़केच्या संस्थापकांच्या एकसंघ देशाच्या हेतूच्या विरोधात आहे असे मत उत्तरेच्या राजकारण्यांनी दिले. एकसंघ देशामधून अशी राज्ये फुटून बाहेर पडणे हे देशाच्या एकात्मतेकरता चांगले नव्हते. देशाचे तुकडे करण्यास, तो तोडण्यास उत्तरेतील लोक आणि राजकारणी तयार नव्हते.
(स्रोत - britannica.com)
या फुटलेल्या राज्यांमध्ये असलेल्या मोठमोठ्या सैनिकतळांचे भवितव्य या फुटीरतेने धोक्यात आले. साउथ कॅरोलिनामधील चार्ल्स्टन येथे असलेल्या फोर्ट समटर येथील तळावर लिंकनने शस्त्रपुरवठा पाठवला, पण दक्षिणेच्या ताब्यात असलेल्या जहाजांनी पुरवठा करणार्या जहाजांना परतवले, आणि फोर्ट समटरवर सतत ३४ तास दारुगोळ्यांनी हल्ला केला. शेवटी फोर्ट समटरने दक्षिणेतील जहाजांसमोर शरणागती पत्करली. इथुन अमेरिकेतील सिव्हिल वॉरला तोंड फुटले. लिंकनने सर्व राज्यांना सैनिक पाठवण्यासाठी आवाहन केले, आणि व्हर्जिनिया, नॉर्थ कॅरोलिना, टेनिसी आणि आर्कंसा यांनी देशातून फुटण्याची घोषणा केली. सर्व फुटलेल्या राज्यांनी मिळून नवीन कन्फेडरेट (confederate) राष्ट्राची स्थापना केली, अमेरिकेपासून स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषीत केले आणि तेथुन अमेरिकेत यादवी सुरु झाली. उत्तर आणि दक्षिण यांच्यात स्लेव्हरी आणि सत्तेची चढाओढ यामुळे मतभेद होतेच, त्याकरता पुढे कधी तरी युद्ध झाले असते. पण लिंकनच्या राष्ट्रध्यक्षपदी नेमणुकीमुळे युद्धाचा क्षण जवळ आला. हे युद्ध उतरेच्या दृष्टीने राष्ट्र संयुक्त ठेवण्याकरता, तर दक्षिणेच्या दृष्टीने स्लेव्हरीच्या विरोधात असलेल्या उत्तरेचे वर्चस्व झुगारुन देण्याकरता आणि स्वतःचे स्वातंत्र्य, स्लेव्हरीचा हक्क अबाधित ठेवण्याकरता सुरु झाले. स्लेव्हरीच्या बाबतीत सिव्हील वॉरचे महत्त्व म्हणजे या युद्धाचे कारण जरी स्लेव्हरी रद्द करणे नसले तरी त्याची परिणिती स्लेव्हरी रद्द होण्यात झाली.
(स्रोत - civilwar1860s.weebly.com)
युद्ध सुरु झाल्यावर राष्ट्राध्यक्ष अब्राहन लिंकनने सुरुवातीला स्पष्ट केले होते की हे युद्ध स्लेव्हरी रद्द करण्याकरता नाही तर अमेरिकेचे एकसंघ राज्य टिकवून ठेवण्याकरता आहे. लिंकनला हे २ मुद्दे एकत्र करायचे नव्हते. युद्धाच्या सुरुवातीला कृष्णवर्णियांना उत्तरेच्या सैन्यात भरती होण्याची मुभा देखील नव्हती. पण जसे युद्ध पुढे सरकत गेले तशी सैन्याची गरज भासत गेली, आणि मुख्य म्हणजे स्लेव्हरीला पाठींबा देणार्या राज्यांना हरवण्याकरता सेनेत दाखल होण्याकरता उत्तरेतील कृष्णवर्णीयांचा आग्रह वाढू लागला. उत्तर दक्षिण सीमेवरील राज्यातील स्लेव्ह्जही पळून उत्तरेत येऊन या कार्याकरता आपला जीव देण्यास तयार होते. Antietam येथील सप्टेंबर १८६२ मधील विजयानंतर लिंकनने Emancipation Proclamation म्हणजेच सर्व गुलामांना मुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आणि हा कायदा १ जानेवारी १८६३ सर्व दक्षिणेतील राज्यांना लागू होईल हे जाहीर केले. तसेच सैन्यात कृष्णवर्णीयांची भरती करण्याची घोषणाही केली. त्यानंतर सेनेत भरती होण्याकरता कृष्णवर्णीयांची रीघ लागली. या युद्धात जवळपास १,८०,००० कृष्णवर्णीयांनी उत्तरेकडून भाग घेतला. १८६१ ते १८६५ असे ४ वर्षे सुरु असलेले हे युद्ध अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित युद्ध आहे. कन्फेडरेट आर्मी आणि युनियन आर्मी यांचे पारडे सतत खालीवर होत असे. या युद्धात दोन्हीही बाजुंचे मिळून सहा लाखाच्या वर सैनिक, आणि जवळपास ५०,००० नागरिक यांचा बळी गेल्यावर शेवटी ९ एप्रिल १८६५ साली कन्फेडरेट सैन्याने युनियन आर्मीसमोर व्हर्जिनियामध्ये शरणागती पत्करली. युद्ध हरल्याची बातमी दक्षिणेकडे सर्वत्र वार्यासारखी पसरली. युद्ध संपल्यावर काही महिने उत्तरेकडचे युनियनचे सैनिक दक्षिणेतील सर्व राज्यात फिरुन गुलामांना मुक्त करीत होते. या युद्धाच्या सुरुवातीला काही महिन्यातच उत्तरेच्या सैन्याला हरवू अशा वल्गना करणार्या दक्षिणेची मोठी नाचक्की झालेली होती. हा अपमान ते कधीही विसरु शकणार नव्हते. सततच्या ४ वर्षाच्या युद्धामुळे आणि आता स्लेव्ह्ज फ्री झाल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोसळली. एकेकाळी सुबत्तेचे प्रतीक असलेले दक्षिण हे यातून कधीही वर येऊ शकले नाही.
अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेत (Declaration of Independence) एक वाक्य आहे. "We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness." अतिशय प्रभावी आणि वजनदार असलेले वाक्य किती दांभिक होते! २५० वर्षे गुलामीचे जोखड वागविणार्या कृष्णवर्णीय पुरुषांना (आणि स्त्रियांना) कुठल्याही प्रकारच्या आयुष्य (Life), स्वातंत्र्य (Liberty) आणि सूख मिळवण्याचा (pursuit of Happiness) हक्क नव्हता. राष्ट्राच्या प्रगतीचा, अर्थव्यवस्थेचा कणा असलेली दक्षिणेतील प्लँटेशन्स फक्त गुलामांच्या जोरावर चालत होती. त्यांच्या अनेक पिढ्या या देशात राबल्या होत्या. पूर्वजांच्या मातृभूमीशी त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. पण ज्या देशात ते राहत होते तिथे ते फक्त इतरांची मालमत्ता होते, त्यांना त्या देशाचे नागरिकत्त्व किंवा तिथे कुठलाही अधिकार नव्हता. १८६५ साली, जवळपास अडीचशे वर्षांनी पहिल्यांदा या गुलामांनी मोकळा श्वास घेतला. परंतु पुढे काय होणार याबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. लवकरच त्यांच्या लक्षात आले की मुक्त झाल्यावरही कोणतेही हक्क मिळवण्याकरता त्यांना यापुढे खूप झगडावे लागणार होते.
कित्येकांच्या विरोधात जाउन त्यांना मुक्त केलेला त्यांचा रक्षणकर्ता अब्राहम लिंकन याची युनियनच्या विजयानंतर एका आठवड्याच्या आतच १५ एप्रिल १८६५ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुक्त केलेल्या गुलामांच्या पुनःस्थापनेकरता लिंकनने तपशीलवार योजना बनवलेली होती, आणि त्याच्या हयातीत त्याची कदाचित प्रभावीपणे अंमलबजवणी झाली असती. पण तसे होणे नव्हते. मुख्य प्रवाहात येण्याच्या दॄष्टीने पुढचे एक शतक या मुक्त झालेल्या स्लेव्हज करता अतिशय कठीण असणार होते. याचे दूरगामी परिणाम त्यांच्या येत्या अनेक पिढ्यांवर होणार होते...
--------
स्रोत -
पुस्तके:
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
A People's History of the United States - Howard Zinn
वेबसाईट्स:
http://history.org
https://en.wikipedia.org