अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ४)

९ एप्रिल १८६५ साली व्हर्जिनियामध्ये कन्फेडरेट सैन्याचा सेनापती जनरल रॉबर्ट इ ली याने शरणागती पत्करली आणि अमेरिकेत ४ वर्ष सुरु असलेले उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांमधील युद्ध संपले. या युद्धाने जवळपास सहा लाखांच्या वर सैनिकांचा आणि हजारो नागरिकांचा बळी घेतला. पराभवाबरोबरच लाखो मुलगे, वडील, भावंडे यांचे मृत्यू, जप्त झालेली जमीन, बेचिराख झालेली शहरे, खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था याने दक्षिणेतील राज्ये पोळून निघाली, संतप्त आणि हतबल झाली.या पराभवाचे खापर कोणावर तरी फोडणे क्रमप्राप्त होते. ते साहजिकच नवमुक्त गुलामांवर फोडले गेले. त्यांचा सुरुवातीला युद्धात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी गुलामी सुरु ठेवणे किंवा गुलामांना मुक्त करणे हा पूर्णपणे आमचा अधिकार आहे या मुद्द्यांवरुनच तर दक्षिणेतील राज्यांनी युनियनमधून फुटण्याचा निर्णय घेतलेला होता. हे गुलाम अप्रत्यक्षरित्या युद्धाचे मुख्य कारण बनले होते. एकेकाळी सुबत्तेचे प्रतीक असलेली दक्षिणेतील राज्ये या युद्धानंतर कधीही त्यांचे गतकाळाचे वैभव मिळवू शकली नाहीत, किंबहुना काही काळातच ती आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत अमेरिकेतील सर्वात मागासलेली राज्ये बनली.

अब्राहम लिंकनने १ जानेवारी १८६३ रोजी अमेरिकेतील सर्व राज्यांमधील गुलामांच्या मुक्ततेची घोषणा करणार्‍या Emancipation Proclamation वर सही केली. पण दक्षिणेतील राज्यांनी ह्या घोषणेला मान्यता दिलेली नव्हती. युद्धही सुरु होते, त्यामुळे 'डीप साउथ'मधील गुलामांच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नव्हता. उत्तर दक्षिण सीमेवरील राज्यांमध्ये मात्र अनेक गुलाम उत्तरेकडे पळून जात होते आणि गुलामीतून बाहेर येत होते. बरेच जण उत्तरेतील सैन्यामध्ये भरती होऊन धारातीर्थी पडत होते. युद्ध संपल्यानंतर काही महिने उत्तरेकडील सैनिकांनी दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये फिरुन गुलाम मुक्त झाल्याची खात्री करुन घेतली. अडीचशे वर्षानंतर अमेरिकेतील गुलाम शेवटी मुक्त झाले होते. अमेरिकेच्या इतिहासातील हा एक फार मोठा मैलाचा दगड होता. पण या मुक्तीच्या शिल्पकाराला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. उत्तरेत जसे स्लेव्हरीला विरोध असणारे लोक होते तसे दक्षिणेशी सहानुभूती बाळगणारे, दक्षिणेत पाळेमुळे असणारे, स्लेव्हरीला पाठींबा असणारे लोकही होते. दक्षिणेचा अपमानकारक पराभव या लोकांना अतिशय खुपला होता. लिंकनच्या यापुढील धोरणांनी दक्षिणेवर कशा प्रकारे परिणाम होईल याबद्दल त्यांच्यात संदिग्धता होती. युद्ध संपल्यावर लगेच काही दिवसातच, १४ एप्रिल १८६५ रोजी, दक्षिणेविषयी सहानुभूती बाळगणार्‍या John Wilkes Booth या स्टेज अ‍ॅक्टरने वॉशिंगटन डिसी येथील फोर्ड थिएटरमध्ये नाटकाचा खेळ बघण्यास आलेल्या अब्राहम लिंकनची गोळ्या घालून हत्या केली.

Lincoln_murder.jpg
(स्रोत - en.wikipedia.org)

लिंकनच्या अकाली मृत्यूनंतर त्याचा उपराष्ट्रपती अँड्र्यू जॉन्सन हा अमेरिकेचा राष्ट्रपती झाला. १८६३ च्या गेटीसबर्गच्या विजयानंतर दक्षिणेतील राज्यांच्या पुनर्बांधणीच्या आणि गुलामांच्या पुनर्वसनाच्या योजनेवर लिंकनने काम सुरु केले होते. त्याच्या मृत्यूनंतर ते काम जॉन्सनला पुढे न्यावे लागले. या योजनेबद्दल लिंकनच्या रिपब्लिकन पार्टीमध्येच मतभेद होते. लिंकन हा दक्षिणेतील राज्यांच्या, कन्फेडरेट अधिकार्‍यांच्या बाबतीत क्षमशीलतेच धोरण ठेवून त्यांना परत युनियनमध्ये आणण्याच्या मताचा होता. शिक्षा देऊन आपण दक्षिणेतील लोकांना अजून दूर लोटू आणि त्यांना देशात सामावून घेण्याच्या प्रक्रियेत त्यामुळे अडथळे येतील असे त्याचे मत होते. पण काही रिपब्लिकन्स (यांना रॅडिकल रिपब्लिकन्स असे म्हटले जाते) या सर्व परिस्थितीला दक्षिणेला जबाबदार ठरवून त्यांना शिक्षा, दंड देण्याच्या मताचे होते. दक्षिणेतील लोकांच्या स्वार्थीपणामुळे हे युद्ध सुरु झाले होते. कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी, तोडग्यांना त्यांनी नकार दिलेला होता, आणि त्याची परिणिती लाखो लोकांच्या मृत्यूमध्ये झाली होती. रॅडिकल रिपब्लिकन्सच्या मते या करता कुठल्यातरी प्रकारे त्यांना शिक्षा मिळणे गरजेचे होते. तसेच ते श्वेतवर्णीय अमेरिकनांना मिळणारे सर्व अधिकार मुक्त झालेल्या कृष्णवर्णीयांना मिळावे या मताचेही होते. दक्षिणेतील राज्यांची पुनर्बांधणी आणि मुक्त झालेल्या गुलामांचे पुर्वसन हे कमीत कमी काळात पूर्ण करुन त्यांना मुख्य धारेत आणण्याच्या मताचा लिकंन होता. सर्वांना एकत्र आणून, काही तोडगा काढून या पुनर्बांधणीच्या कामाला लिंकनने सुरुवात केली असती, परंतू त्याच्या अकाली मृत्यूमुळे या योजनेवर जॉन्सनला काम करावे लागले. लिंकनचा दूरदर्शीपणा, सर्वांना एकत्र आणून काम करण्याची हातोटी जॉन्सनमध्ये नव्हती. या काळात दक्षिणेतील नेत्यांना माफी देणे आणि गुलामांचे पुर्वसन याबाबतीत रिपब्लिकन पक्षातील मदभेत ठळक होऊ लागले. सिव्हिल वॉरनंतर दक्षिणेतील राज्यांच्या पुनर्बांधणीच्या काळाला Reconstruction Era असे म्हटले जाते. १८६३ ते १८७७ असे तब्बल चौदा वर्ष हे काम सुरु होते. या पुनर्बांधणीच्या काळाच्या सुरुवातीला कृष्णवर्णीय अमेरिकनांनी थोडा काळ नागरी हक्क उपभोगले मात्र जसा Reconstruction Era चा कालावधी संपत गेला आणि सैनिक उत्तरेत परतू लागले तशी दक्षिणेतील राज्यकर्ते आणि दहशत पसरवणारे गट यांच्यामुळे त्यांच्या हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर अधिकाधिक गदा येत गेली.

लिकंनचा मृत्यूने उत्तरेत जनक्षोभाचे वातावरण निर्माण झाले आणि सुरुवातीला जॉन्सनने कन्फेडरेट्सच्या विरोधात कडक भूमिका घेण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात त्याने कोणत्याही कन्फेडरेट अधिकार्‍यांवर खटले भरले नाहीत, किंबहुना त्यांच्यावर कोणतेही खटले न भरता त्यांना माफीच दिली. मोठमोठ्या जमीनदारांची हजारो एकर जमीन ही युद्धानंतर जप्त केली गेलेली होती आणि त्यातला काही हिस्सा आणि एक खेचर हे त्यांच्या मुक्त झालेल्या गुलामांना देऊन त्यांच्या पुर्वसनास मदत करण्याची योजना करण्यात आलेली होती, पण प्रत्यक्षात जॉन्सनच्या कारकिर्दीत ही जमीन परत जमीनदारांना देण्यास सुरुवात झाली. जॉन्सन दक्षिणेतील राजकारणी, अधिकारी, जमीनदार यांच्याशी नरमाईने वागत असल्याची त्याच्यावर टिका होऊ लागली. दक्षिणेतील राज्ये ही त्यांच्या अखत्यारीत जाचक नियम निर्माण करुन मुक्त झालेल्या गुलामांचे जीवन अवघड करतील याबद्दल उत्तरेतील बरेच लोक आणि राजकारणी चिंतीत होते, पण जॉन्सनने या मुद्द्याकडे फारसे लक्ष दिले नाही. जॉन्सनच्या धोरणांमध्ये कृष्णवर्णीयांना राजकारणात आणण्याबद्दल, विविध पदे देण्याबद्दल काहीही भूमिका नव्हती. त्याचे आणि संसदेचे (काँग्रेस) पुनर्बांधणीच्या अंमलबजावणीबद्दल खटके उडायला लागले. जॉन्सनच्या काळात त्याने दक्षिणेतील राज्यांना युनियनमध्ये आणून त्यांना नवीन राज्यपाल निवडण्यास सांगितले. सर्व राज्यातील नवीन राज्यपाल हे कन्फेडरेट समर्थक, स्लेव्हरी, वर्णभेद यांचे समर्थन करणारे होते. त्यांनी ताबडतोब त्यांच्या अखत्यारीत नवीन कायदे करण्यास सुरुवात केली. कुठलाही नियम हे गुलामाचे स्वातंत्र्य परत हिरावून घेऊ शकणारा नसला तरी हे सर्व नियम कृष्णवर्णीयांकरता जाचक असेच होते. १८६६ मध्ये कृष्णवर्णीयांच्या हक्कांचे संरक्षण करणारे, काँग्रेसने मंजुर केलेला मसुदा जॉन्सनने फेटाळला आणि त्याचे काँग्रेसबरोबरील संबंध अधिक चिघळले. १८६८ साली जॉन्सन रिपब्लिकन्सकडून निवडणूक लढला नाही. डेमोक्रॅट्स त्याला त्यांच्या बाजूने निवडणूक लढू देतील हा त्याचा अंदाजही चुकला. १८६८ साली झालेल्या निवडणूकीत लिंकनच्या युनियन सैन्याचा जनरल युलसिस एस ग्रँट हा राष्ट्राध्यक्ष झाला आणि यापुढे दक्षिणेतील राज्यांना मुख्य प्रवाहधारेत आणून त्यांना पुर्नबांधणीस मदत करणे आणि कृष्णवर्णीयांना त्यांचा हक्क मिळवून देणे याची जबाबदारी काँग्रेसने घेतली.

सिव्हील वॉरनंतर अमेरिकेच्या घटनेत केल्या गेलेल्या दुरुस्त्यांना सिव्हील वॉर अ‍ॅमेंडमेंट्स असे म्हटले जाते. यातील १८६५ साली मंजूर झालेल्या तेराव्या घटनादुरुस्तीनुसार अमेरिकेत स्लेव्हरी अधिकृतरित्या संपुष्टात आली. १८६८ मंजुरी मिळालेल्या चौदाव्या दुरुस्तीनुसार मुक्त झालेल्या, अमेरिकेत जन्मलेल्या सर्व गुलामांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आणि १८७० साली मंजुर झालेल्या पंधराव्या दुरुस्तीनुसार सर्व कृष्णवर्णीय पुरुषांना मतदानाचा हक्क मिळाला. (अमेरिकेत सर्व स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळेपर्यंत १९२० साल उगवावे लागले) या तीन घटना दुरुस्त्यांमुळे सर्व घटकांना प्रवाहात आणण्यास, लोकशाही पुढे नेण्यास मदत झाली.

ammendments.jpg
(स्रोत - mshaugheysclass.blogspot.com)

१८६८ नंतर काँग्रेसने रिकन्स्ट्रक्शनचे (याला Congressional Reconstruction असेही म्हणतात) धोरण राबविण्यास सुरुवात केली आणि मुक्त झालेल्या गुलामांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता अनेक योजनांची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी दक्षिणेतील राज्यांवर १४वी घटनादुरुस्ती पाळण्याची सक्ती करण्यास सुरुवात केली. १८६८ सालानंतर दक्षिणेत झालेल्या विविध राज्यांतर्गत निवडणूकांमध्ये कृष्णवर्णीयांनी मतदान केली आणि निवडणूकही लढवली. काही कृष्णवर्णीयांनी निवडणूका जिंकून विविध पदे भूषविण्यास सुरुवात केली. परिस्थिती कदाचित बदलायला लागेल अशी थोडीशी आशा कृष्णवर्णीयांमध्ये निर्माण झाली. परंतु अगदी काही वर्षांपूर्वी आपले गुलाम असणारी लोकं सरकारी पदे भूषविताना, निर्णय घेताना पाहणे हे अजुनही वर्णद्वेषी असलेल्या दक्षिणेतील बहुसंख्य लोकांकरता सोपे नव्हते. शेकडो वर्षे दक्षिणेत गोर्‍या लोकांचे वर्चस्व होते, ते स्वतःला इतरांपेक्षा उच्च समजत. या white supremacy च्या भावनेतून दक्षिणेतील राज्यांमध्ये Ku Klux Klan, White Brotherhood, Knights of the White Camelia अशा वर्णद्वेषी संघटनांचा उदय झाला. कृष्णवर्णीयांमध्ये हिंसात्मक मार्गाने जबर दहशत निर्माण करणे हे या संघटनांचे मुख्य कार्य होते. शारीरिक इजा, प्रसंगी हत्या यामधून दहशत निर्माण करुन मतदान करण्यापासून रोकणे, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना काम करण्यापासून परावृत्त करणे, कृष्णवर्णीयांना जागा विकत घेणे/व्यवसाय करणे यामध्ये अडथळे आणणे, गोर्‍या लोकांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करण्यापासून त्यांना मज्जाव करणे अशा आणि इतर अनेक गोष्टींची सुरुवात त्यांनी केली. या संस्थांच्या स्थापनेमध्ये पराभवामु़ळे दुखावलेले माजी कन्फेडरेट जनरल्स, सैनिक आणि समर्थक यांचा मोठा हात होता. यातल्या अनेक जनरल्सना जॉन्सनने माफी दिलेली होती.

यात सर्वात दरारा असलेल्या Ku Klux Klan ची स्थापना १८६५ साली टेनेसी राज्यात झाली आणि लवकरच दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये त्याचे सदस्य आणि समर्थक वाढीस लागले. या संस्थेचा उदयास्त ३ वेगवेगळ्या कालखंडात झालेला आहे. सुरुवातीचा कालखंड म्हणजे १८६० आणि १८७० चे दशक. वर लिहिल्याप्रमाणे सर्व दक्षिणेतील राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांमध्ये दहशत निर्माण करुन त्यांच्यात कुठल्याही प्रकारची समानतेची भावना निर्माण न होऊ देणे हा सुरुवातीला क्लॅनचा मुख्य हेतू होता. जसा त्यांचा हिंसाचार वाढायला लागला तसे काँग्रेसने काही कायदे आणून त्यांच्यावर वचक बसवला. कृष्णवर्णीयांविरुद्धची दडपशाही जरी वेगळ्या मार्गाने सुरुच राहिली तरी क्लॅनच्या कार्याला उतरती कळा लागली. क्लॅनचा दुसरा अध्याय १९१५ मध्ये सुरु झाला. तोपर्यंत थोडेफार सदस्य सोडले तर क्लॅन संपुष्टात आलेली होती, लोकांच्या स्मृतीपटलावरुन जवळपास पुसली गेली होती. तेवढ्यात आला १९१५ साली क्लॅनच्या पहिल्या कारकिर्दीचे, गोर्‍यांच्या वर्चस्वाचे, क्लॅनचे उदत्तीकरण करणारा 'द बर्थ ऑफ अ नेशन' नावाचा सिनेमा. हा सिनेमा दक्षिणेतील राज्यात अतिशय लोकप्रिय झाला. या चित्रपटावरुन प्रेरणा घेऊन अ‍ॅटलांटा जवळील स्टोन माउंटन या ठिकाणी विल्यम जोसेफ सिमन्सने क्लॅनची पुनःस्थापना केली. ह्या कारकिर्दीत क्लॅनची लोकप्रियता कमालीची वाढली. १९२४ पर्यंत जवळपास ४० लाख लोक क्लॅनचे सदस्य बनले. या वेळची क्लॅन ही कमालीची कट्टर होती. त्यांचा विरोध फक्त कृष्णवर्णीयांनाच नव्हे तर समलिंगी, ज्यू, कॅथलिक लोकांनाही होता. अर्थातच कृष्णवर्णीय हे मुख्य लक्ष होते. क्लॅनचा हा काळ दक्षिणेतील कृष्णवर्णीयांकरता कमालीचा दहशतीचा होता. कधी जीव जाऊन शकेल याची शाश्वती नव्हती. हजारो कृष्णवर्णीयांची या काळात लिंचींगद्वारे (जमावाने एकत्र येऊन हत्या) हत्या झाली. १९५० ते १९६० काळात वाढीस लागलेला क्लॅनचा तिसरा अध्याय हा प्रामुख्याने सिव्हिल राईट्स मुव्हमेंटच्या काळात जास्त फोफावला. या काळात कृष्णवर्णीय/श्वेतवर्णीय निदर्शक, समर्थक यांच्यात दहशत निर्माण करणे, मारहाण, लिंचिंग वगैरे मार्गांनी त्यांनी चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. दक्षिणेतील पोलिसांचा ही याला पाठिंबा असल्याने या गुन्हेगारांना अगदी बोटावर मोजण्याइतपत वेळा कोणत्याही प्रकारची शिक्षा होत असे.

reconstruction.jpeg
(स्रोत - learning.hccs.edu)

विविध राज्यांमध्ये रिकन्स्ट्रक्शनच्या काळ वेगवेगळा होता. काही राज्यात ते कमी काळ तर काही राज्यात अधिक काळ चालले. केंद्र सरकार आणि सैनिक हे सरकारी कायदे पाळले जात आहेत की नाही याची शाहनिशा करत असत. या काळात उत्तरेतून अनेक शिक्षक, मुक्त गुलाम, स्वयंसेवक, चर्चचे मिनिस्टर्स, छोटे व्यवसायिक हे दक्षिणेत येऊन शाळा उघडणे, शिक्षकाचे काम करणे, छोटे उद्योग सुरु करुन कृष्णवर्णीयांना रोजगार मिळवून देण्यास मदत करणे, त्यांच्या पुनर्वसनास मदत करणे इत्यादी प्रकारे नवमुक्त गुलामांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु दक्षिणेतील राज्यांची सत्ता ही कृष्णवर्णीयांच्या द्वेष करणार्‍या white supremacist लोकांकडे होती. नवमुक्त गुलामांना मुख्य प्रवाहात येणे अधिक अवघड होईल अशा प्रकारचे कायदे ते हळूहळू मंजुर करुन घेत होते. क्लु क्लक्स क्लॅन आणि त्याप्रकारच्या इतर संघटना राजकारण्यांच्या आश्रयाखाली कृष्णवर्णीयांमध्ये जबर दहशत निर्माण करुन त्यांना मतदानापासून रोखत होते. अमेरिकेतील लोकशाहीमध्ये राज्यांना खूप जास्त स्वायत्तता आहे. राज्ये स्वत:चे कायदे बनवून आपापल्या राज्यात त्यांच्या अंमलबजावणीची सक्ती करु शकतात. जसे जसे सरकारने विविध राज्यांमध्ये पुनर्बांधणीचे काम संपवले आणि सैनिक परत जायला लागले तसे तसे (आणि त्या आधीही) दक्षिणेतील राज्य कृष्ण आणि श्वेतवर्णीयांना विभक्त ठेवण्यासाठी कायदे करु लागले. दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये सेग्रिगेशन म्हणजेच विभक्ततेला पाठिंबा देणारे सरकार आले होते. १८७०च्या दशकात कृष्णवर्णीयांच्या विभक्तीकरणास सुरुवात झाली. या काळात वांशिक म्हणजेच racial segregation करता जे कायदे केले गेले त्यांना Jim Crow Laws असे नाव पडले. या कायद्यांनुसार दक्षिणेतील राज्यांमध्ये segregation हे कायदेशीर झाले, आणि त्यांचे पालन न केल्यास अटकेपासून ते मृत्यूदंडापर्यंत कडक शिक्षांची तरतूद करण्यात आली. जिम क्रो कायदे हे मुख्यत्वे कृष्णवर्णीयांना मतदानापासून, कुठलीही सरकारी नोकरी करण्यापासून, शिक्षणापासून किंवा उन्नत्ती करण्याची कुठलीही संधी मिळण्यापासून वंचित ठेवण्याकरताच निर्माण केले गेले होते. दक्षिणेतील राज्यसरकार, कायदेपंडीत, पोलिस आणि दहशत निर्माण करणारे गट मिळून कृष्णवर्णीयांना त्यांच्या स्वातंत्र्याची जबर किंमत मोजायला लावत होते.

जिम क्रो कायद्यांनुसार कृष्णवर्णीयांवर वेगळ्या किंवा विभक्त सरकारी शाळा, रेल्वेत वेगळे डबे, वेगळी प्रसाधनगृहे, पाण्याचे नळ, प्रार्थनाघरं, खानावळी, प्रेक्षागृहं आणि इतर अनेक विभक्त सुविधा वापरण्याची सक्ती करण्यात आली. अनेक सरकारी कचेर्‍यांमध्ये त्यांच्याकरता वेगळे प्रवेशद्वार असे. दवाखाने, जेल, बस आणि अनेक ठिकाणी segregation कडक झाले. कृष्णवर्णीयांना श्वेतवर्णीय लोकांच्या वसाहतीत किंवा जवळपास राहण्यास मज्जाव करण्यात आला. हे कायदे तोडणार्‍यांना ताबडतोब शिक्षा केली जाई. कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय जोडीला लग्न करुन किंवा त्याशिवाय एकत्र राहण्यास बंदी करण्यात आली.

seggregation.jpg
(स्रोत - encrypted-tbn0.gstatic.com, history.org, bridgemi.com, scencyclopedia.org)

ग्रामीण भागात हे कायदे जास्त कठोरपणे पाळले जायचे. एखाद्या छोट्या चुकीकरता, किंवा चूक नसतानाही फक्त वचक ठेवण्याच्या हेतूने कृष्णवर्णीयांना मारहाण, घर जाळणे, मॉब लिंचिंग हे प्रकार होत. १४ व्या घटना दुरुस्ती नुसार केंद्रसरकारने जरी कृष्णवर्णीयांना मतदानाचा हक्क दिलेला असला तरी मतदानाकरता नोंदणी करण्याचा किंवा मतदानाचा हक्क बजावण्याच्या प्रयत्न करणार्‍या लोकांना क्लॅनसारखे दहशत पसरवणारे गट मतदान करण्यापासून मज्जाव करत. कोणी जायचा प्रयत्न केलाच तर मारहाण ते मॉब लिंचींगसारख्या मार्गाने धडा शिकवला जात असे. दक्षिणेतील सर्वच नागरिक या विचारांचे आणि भावनाशून्य होता का, तर नाही. पण या नागरिकांना आवाज नव्हता, प्रस्थापितांच्या विरुद्ध जाण्याची हिंमत नव्हती. पुढची जवळपास १०० वर्षे दक्षिणेतील राज्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती होती आणि या मुक्त झालेल्या गुलामांचे आयुष्य त्यांच्या पूर्वायुष्याएवढेच किंवा कधी कधी त्यापेक्षा क्लेषकारक होते. या १०० वर्षात दक्षिणेतून लाखोच्या संख्येनी कृष्णवर्णीयांनी उत्तर आणि पश्चिम अमेरिकेत स्थलांतर केले. याचा फटका दक्षिणेतील राज्यांना बसला. तो काळ अमेरिकेत औद्योगिक क्रांतीचा काळ होता, पण नवीन व्यवसायिकांनी दक्षिणेत न येणे पसंत केले, दक्षिण अजुनही शेतीप्रधान भागच राहिला. मोठा कामगारवर्ग कमी झाल्याने या काळात दक्षिणेतील राज्यांची आर्थिक प्रगती खुंटली. अजुनही शिक्षण, आर्थिक संधी, उद्योगधंदे या बाबतीत दक्षिणेतील काही राज्ये इतर पुढारलेल्या राज्यांची बरोबरी करु शकले नाही आहेत.

------

स्रोत -
पुस्तके
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
Us and Them: A History of Intolerance in America - Jim Carnes
वेबसाईट्स
http://history.org
https://en.wikipedia.org

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle