अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ५)

होमर प्लेसी हा लुइझियाना राज्यातील न्यू ऑर्लियन्स शहराचा रहिवाशी होता. तो वंशाने एक अष्टमांश अफ्रिकन अमेरिकन होता. त्याचे मूळचे फ्रेंच असलेले आजोबा हे अठराव्या शतकात न्यू ऑर्लियन्सला आले. तिथे त्यांनी अफ्रिकन अमेरिकन वंशाच्या 'फ्री' स्त्रीशी लग्न केले. होमरच्या आईच्या बाजूचा सगळा परिवार हा श्वेतवर्णीय होता. त्याच्या उजळ त्वचेमुळे त्याच्या पूर्वजांविषयी माहिती नसलेल्या लोकांमध्ये तो श्वेतवर्णीयच समजला जायचा पण सेग्रिगेशनच्या नियमानुसार, एका अफ्रिकन पूर्वजामुळे त्याला कृष्णवर्णीयांना लागू होणारे सर्व नियम लागू व्हायचे, पाळावे लागायचे. असे विभक्त ठेवणे हे कृष्णवर्णीयांना कमी लेखणारे आणि अपमानकारक होते. कृष्णवर्णीयांना हे नियम मान्य नव्हते आणि जमेल तेंव्हा त्यांच्यातले काही या नियमांना आपल्या पद्धतीने विरोध करत. ७ जून १८९२ रोजी न्यू ऑर्लियन्सहून रेल्वेने प्रवास करताना प्लेसीने प्रथम वर्गाचे तिकीट काढून श्वेतवर्णीयांकरता राखीव असलेल्या डब्यात प्रवेश केला. तिकीट तपासनिसाला याची कुणकुण लागताच त्याने प्लेसीला डब्यातून खाली उतरवले आणि कायदा मोडल्याबद्दल अटक केले. प्लेसीने लुइझियाना राज्यावर खटला भरला. त्याच्या वकीलाने असा युक्तीवाद केला की तेराव्या आणि चौदाव्या घटनादुरुस्तीनुसार कृष्ण आणि श्वेतवर्णीयांना (अमेरिकेच्या सर्व नागरिकांना) समान वागणूक दिली जाणे अपेक्षित आहे, त्यामुळे रेल्वे कंपनीने श्वेतवर्णीयांच्या डब्यातून प्लेसीला काढणे हे या घटनादुरुस्तीचा भंग आहे. पण न्यायाधीश जॉन हॉवर्ड फर्ग्युसन याने 'रेल्वे कंपनीला त्यांच्या अखत्यारीत प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचे कायदे बनविण्याचा अधिकार आहे' असा निवाडा देऊन प्लेसीला दंड ठोठावला. या निर्णयाविरुद्ध प्लेसीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. १८ मे १८९६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ७-१ मताधिक्याने प्लेसीच्या विरोधात निकाल दिला. '१४ व्या घटनादुरुस्तीनुसार दोन्हीही वंशांच्या लोकांना समान दर्जा देण्याची तरतूद केली गेलेली आहे, परंतु रंग किंवा वंशानुसार सर्वांनी एकत्र यावे अशी कुठलीही तरतूद त्यात नाही, त्यामुळे दोन्ही वंशांच्या लोकांना समान पण वेगळी (segregated) वागणूक देणे हे कायद्याला धरुन आहे. वेगळ्या/विभक्त असल्या तरी जोपर्यंत कृष्णवर्णीयांना समान सुविधा मिळत आहेत तो पर्यंत कुठल्याही कायद्याचा भंग होत नाही' असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला. सेग्रिगेशनचे समर्थन करुन दक्षिणेतील राज्यांमध्ये त्याला पाठबळ देण्यात 'प्लेसी व्हर्सेस फर्ग्युसन' खटला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असे मानले जाते. या खटल्यातील 'Separate but Equal' निवाड्याने विभक्तीकरण हे बेकायदेशीर नाही आहे यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर दक्षिणेतील विभक्तीकरण मोठ्या प्रमाणात वाढले. प्रत्येक गोष्ट कृष्ण आणि श्वेतवर्णीयांकरता कायद्याने विभक्त झाली. सर्वोच्य न्यायालयानेच विभक्तीकरण कायदेशीर आहे असा निर्णय दिल्यामुळे यापुढे दाद मागणार तरी कोणाकडे! दक्षिणेतील कृष्णवर्णीयांची परिस्थिती यापुढे अजून बिकट झाली.

कायद्याने दोन्हीही वंशांच्या लोकांना दिल्या गेलेल्या सुविधा जरी 'separate' असल्या तरी 'equal' दर्जाच्या असाव्यात असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात कृष्णवर्णीयांच्या शाळा, रेल्वेचे डबे, वस्त्या आणि इतर सर्व सुविधा या नेहेमीच अतिशय कनिष्ठ दर्जाच्या असायच्या. त्यांच्या शाळांना अनुदान मिळायचे नाही, जिथे दोन्हीही वंशाचे लोक एकत्र काम करु शकायचे तिथे त्यांना कमी दर्जाचे काम मिळायचे, त्यांच्या वस्त्यांच्या विकासाकरता निधी मिळायचा नाही. कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार मिळालेला असला तरी दहशतीने त्यांना मत देण्यापासून रोकले जायचे. त्यामुळे सरकार, पोलिस, शाळा आणि इतर विकास समित्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पूर्णपणे थांबले होते. १८९६ सालापासून सेग्रिगेशन अधिक कडक झाले आणि शिक्षण, सुविधा, चांगल्या संधीची कमतरता यामुळे कृष्णवर्णीय समाजाची पिछेहाट वाढीस लागली.

पण याच समाजातून पुनर्बांधणीनंतरच्या काळात, प्रतिकूल परिस्थितीतूनही अनेक कृष्णवर्णीय लोक पुढे आले, आपल्या (आणि एकंदरीत अमेरिकन) समाजाच्या उन्नतीकरता झटले, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कृष्णवर्णीयांवरच्या अन्यायाला वाचा फोडत राहिले. असाच एक युवक होता 'बूकर टी वॉशिंग्टन'. १८५६ साली स्लेव्हरीमध्ये जन्मलेला वॉशिंग्टन शिक्षण घेण्याच्या ध्येयाने इतका भारुन गेलेला होता की छोट्या वयात वेस्ट व्हर्जिनियामधील दिवसभर खाणकामगार म्हणून काम करुन तो रात्रीच्या शाळेत जायचा. कॉलेजमध्ये शिकण्याची तीव्र इच्छा, जिद्द आणि खिशात पैसे नाही, अशा परिस्थितीत अंगावर पडेल ती कामे करुन त्याने कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या भाऊबंदांनाही व्हावा या हेतूने वयाच्या २४-२५ वर्षी वॉशिंग्टनने अ‍ॅलाबामा राज्यामध्ये कृष्णवर्णीयांकरता Tuskegee Institute ची स्थापना केली. १८८० च्या दशकामधील दक्षिणेतील राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांकरता पोषक वातावरण नव्हते, पण खडतर परिस्थितीत वॉशिंग्टनने थोड्या सहकार्‍यांना घेऊन ही मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. १८८१ मध्ये जमिनीच्या एका तुकड्यावर, एका खोलीमध्ये सुरु केलेल्या या कॉलेजमध्ये वॉशिंग्टनने पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना हर प्रकारचे व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी स्वयंभू बनावे, इतरांवरील अवलंबित्व कमी करावे याकरता त्यांना शेती, माळीकाम, पाककला, हस्तकला, सुतारकाम, बांधकामाशी निगडीत सर्व कामे आणि इतर अनेक जोडधंद्यांचे शिक्षण दिले जायचे. टस्किगी इन्स्टिट्युटच्या सर्व इमारती या तेथील विद्यार्थ्यांनी स्वतः बांधल्या. विद्यार्थ्यांना लागणारा सर्व भाजीपाला, फळे, पिके ते स्वतः उगवायचे. स्वयंपाकाची जबाबदारीही विद्यार्थ्यांचीच असायची. स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा यावरही खूप भर दिला जायचा. सुरुवातीला सतत आर्थिक चणचण, अनुदानाची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरु झालेले टस्किगी इन्स्टिट्युट बूकर टी वॉशिंग्टन, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळे खूप मोठे झाले. वॉशिंग्टनने बर्‍याच दयाळू, पुढारलेल्या मताच्या श्वेतवर्णीयांशी, राजकारण्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करुन, युरोपातील देशांमध्ये फिरुन संस्थेकरता अनुदान मिळवले. या कामाकरता तो सतत फिरतीवर असायचा. दक्षिणेतील सर्व भागांमधून येणार्‍या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांकरता टस्किगी इन्स्टिट्युट शिक्षणाचे माहेरघर ठरले. लवकरच टस्किगी इन्स्टिट्युटचे रुपांतर टस्किगी युनिव्हर्सिटीमध्ये झाले आणि तिथे वेगवेगळे शैक्षणिक विभाग सुरु झाले. तिथल्या शेतीविभागाचा प्रमुख होता अजुन एक असामान्य तरुण जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. शेतीविषयक शास्त्रामध्ये संशोधक असलेला कार्व्हर हा १८६० साली स्लेव्हरीमध्ये जन्मला होता. त्याच्या आई आणि बहिणीला धाड घालून पळवून देऊन दूर विकण्यात आल्यावर त्याला त्याच्या मालकानेच मोठे केले. अतिशय कुशाग्र बुद्धीच्या कार्व्हरने प्रतिकूल परिस्थितीत, वर्णद्वेषाचा सामना करत कॉलेज शिक्षण पूर्ण केले आणि तिथेच शिकवण्यास सुरुवात केली. १८९६ साली बूकर वॉशिंग्टनने कार्व्हरला टस्किगी युनिव्हर्सिटीमध्ये शेती विभागाचा जबादारी घेण्याकरता आमंत्रण दिले आणि कार्व्हरनेही ते स्वीकारले. पुढील ४७ वर्ष कार्व्हरने तिथे अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले. दक्षिणेतील राज्ये ही शेतीप्रधान होती. वर्षानुवर्ष जमिनीवर कापूस, तंबाखु, ऊस, गहू या पिकांची लागवड व्हायची. जमिनीची काळजी न घेतली गेल्यामुळे ती निकृष्ट दर्जाची बनली होती. पिके फिरवणे (Crop rotation) ही संकल्पना शिकवून, जमिनीचा कस वाढवणारी पिके लावायला शिकवून कार्व्हरने अक्षरशः एकहाती दक्षिणेतील शेतजमीन वाचवली म्हटले तर वावगे ठरणार नाही. कार्व्हरच्या हयातीत आणि नंतरही त्याला कित्येक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्व्हर, वॉशिंग्टन यांच्याप्रमाणेच कृष्णवर्णीयांच्या उन्नतीसाठी झटलेले त्या काळातील अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे ड्ब्ल्यू. ई. बी. डु बॉइस (W. E. B. Du Bois). १८६८ मध्ये मॅसॅच्युसेट्स राज्यात जन्मलेला डु बॉइस हा हार्वर्ड विद्यापीठात डॉक्टरेट मिळविणारा पहिला कृष्णवर्णीय आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग त्याने आपल्या बांधवांवर होत असणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याकरता केला. जिम क्रो कायद्यांच्या विरोधात आवाज उठवणे, वर्णभेदाला कडा विरोध करणे आणि त्याबद्दल जनजागृती करणे, नागरी हक्क चळवळीची (civil rights movement) सुरुवात करणे, कृष्णवर्णीयांना संघटीत करण्याकरता, त्यांच्या विकासाकरता National Association for the Advancement of Colored People (NAACP) ची स्थापना करणे याकरता डु बॉइसने आयुष्यभर कष्ट घेतले. काही महिने डु बॉइसने टस्किगी इन्स्टिट्युटमध्ये विद्यार्थ्यांनाही शिकवले, परंतु कृष्णवर्णीयांना त्यांचे हक्क कोणत्या पद्धतीने मिळवून द्यावेत याबद्दल बूकर वॉशिंग्टन आणि डु बॉइस यांची विचारसरणी वेगळी होती आणि त्याबद्दल त्यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले, त्यामुळे पुढे वेगळे राहून दोघांनीही हे कार्य आपल्या पद्धतीने सुरु ठेवले. या काळात अनेक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या हजारो कृष्णवर्णीयांनी आपल्या परिस्थितीकरता इतरांना दोष देत बसण्यापेक्षा शाळा-कॉलेजमध्ये जाऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वत:च्या, आपल्या बांधवांच्या विकासाकरता करण्यास सुरुवात केली.

बूकर टी वॉशिंग्टन, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, ड्ब्ल्यू ई बी डु-बॉइस
PeopleCollage.jpg
(स्रोत - en.wikipedia.org)

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत निरपराध कृष्णवर्णीयांच्या समुहाद्वारे हत्या (lynching) किंवा सामुहिक हत्येच्या (massacres) घटना वाढीस लागल्या होत्या. या काळात दक्षिणेतून अनेक कृष्णवर्णीयांनी उत्तरेस आणि पश्चिमेस स्थलांतर करण्यास सुरुवात केली. पहिले महायुद्ध सुरु झाल्यावर हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले. १९१६ ते १९७० सालामध्ये कृष्णवर्णीयांनी केलेल्या स्थलांतरास 'The Great Migration' असे म्हणतात. सहा दशकांच्या कालावधीमध्ये चांगल्या संधीकरता, शिक्षणाकरता, दहशतीपासून, लिंचिंगपासून वाचण्याकरता जवळपास ६० लाख कृष्णवर्णीयांनी दक्षिणेतून स्थलांतर केले. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली. उत्तरेत मोठमोठे कारखाने वाढत होते, संपूर्ण अमेरिकेत रेल्वेचे जाळे पसरत होते. कच्चा माल आणि तयार उत्पादनाची वाहतूक सोपी झालेली होती. दरवर्षी लाखोंच्या संख्येने युरोपातून अमेरिकेत लोक स्थलांतर करत होते, त्यामुळे कामगारांची कमतरता नव्हती. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरु झाले आणि युरोपातून येणारा लोंढा कमी झाला. कारखान्यात काम करणारे अनेक तरूण युद्धाकरता देशाबाहेर पाठवले गेले. याकाळात अमेरिकेत स्थलांतराकरता नवी धोरणे राबविल्यामुळे आधीपेक्षा स्थलांतरदेखील कमी झाले. युद्धाकरता लागणार्‍या मालाकरता नवे कारखाने उघडले पण लोकांची कमतरता भासायला लागली. दक्षिणेतील कृष्णवर्णीयांकरता उत्तरेत मोठी संधी उपलब्ध झाली. विभक्तीकरण आणि हालाखीच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या लोकांनी मिळेल त्या साधनाने उत्तरेतील राज्यांमध्ये जायला सुरुवात केली. न्यूयॉर्क, शिकागो, डेट्रॉइट, फिलाडेल्फिया या शहरात मोठ्या संख्येने कृष्णवर्णीय लोक दाखल झाले. बरेच जण कॅलिफोर्निया, ओरेगॉन आणि वॉशिंग्टन राज्यातही गेले. मिळेल ते काम करण्याची या लोकांची तयारी होती. १९७० पर्यंत कमी अधिक प्रमाणात सतत उत्तरेस आणि पश्चिमेस स्थलांतर सुरुच होते. १९१० सालापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा जास्त कृष्णवर्णीय हे दक्षिणेत राहायचे, १९७० पर्यंत हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले. या पूर्वी कृष्णवर्णीयांची वस्ती ही ग्रामीण भागात जास्त होती, १९७० पर्यंत प्रमाण बरोबर उलटे झाले, आणि अमेरिकेतील शहरांमध्ये कृष्णवर्णीयांची संख्या जास्त वाढली.

या नवीन जागेवर कृष्णवर्णीयांकरता सर्वच काही अलबेल नव्हते. गरीब युरोपियन लोकांच्या सततच्या आगमनामुळे, औद्योगीक क्रांतीनंतर संधी निर्माण झाल्याने सुरु झालेल्या स्थलांतरामुळे उत्तरेतील शहरे अतिशय गजबजलेली होती. कृष्णवर्णीयांच्या स्थलांतरामुळे शहरांमध्ये कामाकरता स्पर्धा वाढली. घरांची कमतरता भासायला लागली. कित्येक गावांमधील रहिवाशी त्यांच्या आगमनाने खुष नव्हते. त्यांचे आणि या नवीन आलेल्या लोकांचे संघर्ष व्हायचे, कधी कधी ते विकोपालाही पोहोचायचे. उत्तरेत जरी विभक्तीकरणाचा सामना करावा लागला नाही तरी पूर्वग्रह, भेदभाव याचा सामना कृष्णवर्णीयांना तेथेही करावा लागलाच. त्या काळात आयरिश, जर्मन, इटालियन, चायनिज आणि इतर देशांमधून आलेले लोक आपापली वस्ती करुन राहायचे. स्थलांतरीत कृष्णवर्णीयांनी नव्या शहरात आपली वस्ती करुन राहायला सुरुवात केली. या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधांची कमतरता असायची, अतिशय कमी जागेत लोकांना दाटीवाटीने रहावे लागायचे. ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात गजबलेल्या शहरांमधील प्रत्येक गरीब वस्तीमध्ये होती. सेग्रिगेशन नसले तरी दुर्लक्षित शाळा, अस्वच्छ वस्त्या यांचा सामना त्यांना नवीन ठिकाणही करावा लागला. कृष्णवर्णीयांकरता आयुष्य हे कधी सोपे नव्हतेच. पण त्या काळात ते बहुतांशी गरीब अमेरिकन लोकांकरता नव्हते. १९३० च्या जागतिक मंदीचा धक्का सर्व अमेरिकन जनतेला बसला. नोकरी गेली, पैसे गेले, वस्तुंच्या किमती वाढल्या, जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवू लागला. पण या मंदीचा धक्का श्वेतवर्णीयांपेक्षा कृष्णवर्णीयांना जास्त बसला. बरेच कृष्णवर्णीय हे 'unskilled workers' होते. मंदीच्या काळात त्यांच्या नोकर्‍यांवर गदा आली. नोकरी गेल्यामुळे आणि बचत नसल्याने त्यांचे आयुष्य आणखी हालाखीचे झाले. १९३२ मध्ये जवळपास ५० टक्के कष्टकरी कृष्णवर्णीय हे बेरोजगार होते. दक्षिणेत त्यांची परिस्थिती अजुन बिकट होती. नोकरीवरुन काढण्यात येणे किंवा त्यांची नोकरी श्वेतवर्णीय अमेरिकन व्यक्तीला दिली जाणे यामुळे मंदीच्या काळात तिथे गोर्‍या लोकांच्या दुप्पट, तिप्पट कृष्णवर्णीय बेरोजगार झाले.

migration.jpg

(स्रोत - www.communitiescount.org)

शिक्षणाचा अभाव, पैशांची कमतरता, अपमानाची भावना यामुळे कृष्णवर्णीय तरुणांमध्ये बंडखोरीची भावना वाढीस लागायला सुरुवात झाली होती. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मोठ्या संख्येने कृष्णवर्णीय तरुण सैन्यात भरती झाले. आपल्या श्वेतवर्णीय देशबंधुंच्या खांद्याला खांदा लावून शौर्याने लढले, कित्येक जण मृत्यूमुखी पडले. सैन्यात असताना थोड्या काळाकरता दक्षिणेतून सैन्यात भरती झालेले अनेक कृष्णवर्णीय सैनिक पहिल्यांदा समानता अनुभवत होते. युद्ध झाल्यावर ते परत आले आणि त्यांचा फार मोठा भ्रमनिरास झाला. अर्थातच त्यांच्या राज्यातील परिस्थिती मुळीच बदलेली नव्हती. देशाच्या विजयाकरता प्राणाची आहुती द्यायला निघालेल्या या सैनिकांना परत आल्यावर तीच अपमानास्पद वागणूक, तेच विभक्तीकरण याचा सामना करावा लागला. १९५० च्या दशकात दक्षिणेतील कृष्णवर्णीय नागरिकांमध्ये असंतोष वाढत होता. कित्येक जण आपापल्या पद्धतीने अन्यायाला विरोध करत होते, वाचा फोडायचा प्रयत्न करत होते. पण शेवटी त्यांचे सर्व प्रयत्न हे कमीच पडायचे. राज्यात त्यांच्या शब्दांना किंमत नव्हती. जनजागृती करणे, संघटित प्रयत्न करणे आणि मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे हेच त्यांचे मुख्य शस्त्र होते. त्यांच्याकडून विफलतेतून निर्माण झालेली हिंसा ही फार वाईट पद्धतीने चिरडली जायची, जेणेकरुन असा प्रयत्न परत कोणी करु नये. राजकारणी, पोलिस एकत्र मिळालेले असल्याने हे सहज शक्य व्हायचे. या काळात अनेक कृष्णवर्णीयांनी कायद्याचे शिक्षण घेण्यास, अमेरिकेच्या राज्यघटनेचा बारीक अभ्यास करण्यास सुरुवात केली. याच राज्यघटनेतील दुरुस्तीमध्ये पळवाट काढून सर्वोच्च न्यायालयाने १८९६ पासून त्यांना श्वेतवर्णीयांपासून विभक्त ठेवण्यास सुरुवात केली होती. आता कित्येक कृष्णवर्णीयांचे खटले त्यांच्या बांधवांनी लढ्ण्यास सुरुवात केली. बरेच खटले लढण्याकरता NAACP (National Association for the Advancement of Colored People) ही संघटना आर्थिक मदत करायची. उत्तरेतील काही श्वेतवर्णीयांचाही त्यांना पाठींबा होताच. आपण संघटीत होऊन कायद्याच्या आणि चळवळीच्याद्वारेच स्वतःला न्याय मिळवूण देण्याशिवाय पर्याय नाही हे कृष्णवर्णीयांच्या लक्षात आले होते.

१८९६ मध्ये 'प्लेसी व्हर्सेस फर्ग्युसन' निवाड्याने जसे सेग्रिगेशन किंवा विभक्तीकरणावर शिक्कमोर्तब केले तसे सेग्रिगेशनला खिंड पाडणारा पहिला महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने १९५४ साली 'ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन' या खटल्यात दिला. कँसस राज्यामधील टोपेका जिल्हात ऑलिव्हर ब्राऊन याला आपल्या तिसरीत असलेल्या मुलीला घराजवळच्या सार्वजनिक शाळेत (पब्लिक स्कूल) पाठवायचे होते. पण सेग्रिगेशनच्या नियमाखाली शाळेने त्याची मागणी फेटाळली. दुसरी शाळा ही घरापासून बरीच दूर होती. ब्राऊन आणि त्याच्यासारख्याच परिस्थितीत सापडलेल्या इतर १२ कृष्णवर्णीय कुटुंबियांनी मिळून २० मुलांना शाळेत भरती करुन घेण्याबद्दल स्कूल बोर्डाला विनंती केली आणि ती फेटाळल्यावर शाळेच्या बोर्डावर खटला दाखल केला. त्या काळात इतर राज्यांच्या न्यायालयांमध्येही विभक्त शिक्षणाबद्दल असे खटले आले होते. शाळांचा कनिष्ठ दर्जा, अनुदानाचा अभाव आणि विभक्तीकरणाला प्रामुख्याने विरोध या आणि इतर कारणाने कित्येक राज्यातील कृष्णवर्णीय पालक शिक्षणपद्धतीत बदल आणण्याकरता आग्रही होते. 'प्लेसी व्हर्सेस फर्ग्युसन'चा दाखला देत डिस्ट्रिक्ट कोर्टाने 'ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन'चा निकाल 'बोर्ड ऑफ एज्युकेशन'च्या बाजूने दिला. पुढे हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला. बोर्ड ऑफ एज्युकेशनशी संबंधित असलेले ५ खटले त्या वेळी एकत्रित 'ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन' नावाखाली सर्वोच्च न्यायालयात लढले गेले. या खटल्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. संपूर्ण अमेरिकेचे डोळे निकालावर लागले होते. आतापर्यंत सेग्रिगेशनला आव्हान देणारा कुठलाही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला नव्हता. पण या खटल्याचा निकाल एकमताने (९-०) सर्वोच्च न्यायालयाने ब्राऊनच्या बाजूने दिला. १८९६ साली निर्णय दिला गेलेला 'Separate but Equal' नियम शा़ळांच्या बाबतीत असंवैधानिक (unconstitutional) आहे आणि 'separate' शैक्षणिक संस्था या मूलतः 'unequal' असतात असा निवाडा देऊन त्यांनी यापुढे शा़ळेतील विभक्तीकरण बेकायदेशीर ठरवले. ९-० निकाल देण्याकरता पडद्यामागे बरेच नाट्य घडले, पण सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे जवळपास ६० वर्ष चालवलेल्या धोरणातला फार मोठा बदल होता. हा निर्णय येणार्‍या बदलांची नांदी देणारा होता. दक्षिणेचा अपवाद वगळता देशभरातील लोकांनी या निर्णायाचे स्वागत केले. मात्र दक्षिणेतील राजकारण्यांनी, अनेक लोकांनी हा निकाल फेटाळून लावला. फक्त एका निर्णयाने कृष्णवर्णीयांबरोबर आपल्या मुलांना एकत्र शाळेत पाठवणे हे दक्षिणेतील गोर्‍यांच्या पचनी पडणे अवघड होते. पण आता सार्वजनिक शाळांमध्ये कृष्णवर्णीयांना नोंदणी करण्यापासून ते कायद्याने रोकू शकत नव्हते. कित्येक महिने (काही प्रकरणांमध्ये वर्षभरही) बर्‍याच सार्वजनिक शाळा बंद ठेवल्या गेल्या. ज्या शाळा सुरु झाल्या त्यातील बर्‍याच शाळांमध्ये तिथे येणार्‍या कृष्णवर्णीय मुलांना टोमणे, मारहाण, दगडफेक, थुंकणे, दहशत या मार्गाने शाळेत येण्यापासून थांबवण्याचे प्रकार घडले. पण जिथे शक्य होते तिथे मुले शाळेत जातच राहिली. काही ठिकाणी सैनिकांच्या संरक्षणाखाली गेली, पण मुलांनी शाळेत जाणे थांबवले नाही. अमेरिकेत लवकरच सुरु होणार्‍या कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्क चळवळीमध्ये (civil rights movement) या निवाड्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही केस ब्राउनच्या बाजूने लढलेला NAACP चा प्रमुख सल्लागार थरगूड मार्शल हा अत्यंत निष्णात वकील पुढे १९६७ साली सर्वोच्च न्यायालयाचा प्रथम कृष्णवर्णीय न्यायाधीश बनला.

Brown.png

(स्रोत - en.wikipedia.org)

या काळात अमेरिकन राजकारणात अजुन एक बदल घडत होता तो म्हणजे अमेरिकेतील राजकारणामधील २ प्रमुख पक्ष रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटीक पक्षांच्या विचारसरणीमधील अदलाबदल. १८६५ साली सुरु झालेल्या रिपब्लिकन पार्टीची सुरुवात उदारमतवाद, गुलामीला विरोध, स्थलांतरीतांकरता मुक्त धोरण, सार्वजनिक शिक्षणामध्ये गुंतवणूक, समाजाच्या सर्व घटकांना एकत्र पुढे नेणे या धोरणांवर झाली. अब्राहम लिंकन सारखा लायक नेता त्यांना पक्षाचे पुरोगामी विचार पुढे नेण्याकरता मिळाला. उत्तरेत या पक्षाला जबरदस्त पाठींबा होता. याउलट १८२८ साली सुरु झालेला डेमोक्रॅटीक पक्ष हा पुराणमतवादी (conservative) विचारसरणीवर सुरु झाला होता. स्लेव्हरीला, वर्णभेदाला पाठिंबा आणि १८०० साली सुरु झालेल्या Democratic-Republican पक्षाच्या उदारमतवादी धोरणांना तसेच प्रस्थापितांना विरोध हे डेमोक्रॅटीक पक्ष स्थापन होण्याचे मुख्य कारण ठरले. या पक्षाचा पहिला राष्ट्राध्यक्ष अँड्र्यु जॅकसन आणि त्यानंतर जेम्स पोल्क या राष्ट्राध्यक्षांनी वर्ण/वंशभेदी योजना अजून पुढे नेल्या. सिव्हील वॉर नंतर त्या जास्त कट्टर झाल्या. डेमोक्रॅटीक पक्ष दक्षिणेतील राज्यांमध्ये फोफावला. मात्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन्हीही पक्षांच्या विचारसरणीतील अदलाबदलाची सुरुवात झाली, १९३० च्या दशकात तो बदल जास्त ठळक झाला, आणि १९५० आणि १९६० च्या दशकात तो बदल पूर्ण झाला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समान हक्क मिळवून देण्यात डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर तो हक्क दिला जाऊ नये म्हणून रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी प्रयत्न केले. हा बदल आता आपल्याला जरी आश्चर्यकारक वाटत असला तरी राजकारणात धोरणे आणि समर्थक कसे बदलू शकतात याचे हे मोठे उदाहरण आहे. १९६० सालानंतर उत्तरेतील राज्ये डेमोक्रॅटीक पक्षाला पाठींबा देऊ लागली तर दक्षिणेतील रिपब्लिकन पक्षाला. ज्या डेमोक्रॅटीक पक्षाने गुलामगिरीला पाठिंबा दिला होता, दहशत निर्माण करणार्‍या संघटनांना पाठीशी घातले होते, कृष्णवर्णीयांचे आयुष्य कमालीचे खडतर केले होते त्याच पक्षाला १९६० नंतर कृष्णवर्णीयांचा मोठा पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली.

खालील नकाशा १८९६ आणि २००० साली पार पडलेल्या निवडणुकांमधील निकाल दाखवतो. इथे निळ्या रंगात डेमोक्रॅटीक पक्षाला बहुमत मिळालेली राज्ये तर लाल रंगात रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळालेली राज्ये दिसून येतात. पक्षाच्या धोरणातील बदलामुळे तसेच स्थलांतरामुळे बदललेल्या समीकरणामुळे काही राज्यांचा अपवाद सोडता १८९६ आणि २००० साली या दोन पक्षांना पाठिंबा देणारी राज्ये पूर्णपणे पलटलेली दिसत आहेत.

DemocratRepublicanFlipCollage.jpg
(स्रोत - www.270towin.com)

१९५० आणि १९६० ची दशके ही अमेरिकेच्या सिव्हिल राइट्स चळवळीमधील अतिशय महत्त्वाची दशके आहेत. विभक्तीकरणाच्या नियमांना जरी लोकांनी आपापल्या पद्धतीने विरोध सुरु केला असला तरी १९५० च्या दशकामध्ये या विरोधाला संघटीत चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरच्या नेतृत्वाखाली कृष्णवर्णीयांमध्ये चैतन्य प्राप्त झाले. हजारो कृष्णवर्णीयांनी (आणि त्यांच्या श्वेतवर्णीय समर्थकांनी) समानतेकरता या चळवळीद्वारे शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्यास सुरुवात केली. कृष्णवर्णीयांना विभक्त ठेवणारे, त्यांची प्रगती रोखून ठेवणारे कायदे बदलून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची वेळ आता जवळ आलेली होती.

तळटीप -
रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटीक पक्षांच्या विचारसरणीमधील अदलाबदल हा या लेखाशी संबंधित विषय नसल्याने यावर जास्त खोलात लिहीले नाही आहे. मात्र ज्यांना या विषयी जास्त माहिती हवी आहे त्यांनी खालील लिंक्स नक्की पाहाव्यात.

डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रवास - व्हाईट सुप्रिमसी ते ओबामा

रिपब्लिकन पक्षाचा प्रवास - लिंकन ते ट्रंप

(स्रोत -
पुस्तके
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
Up from Slavery - Booker T. Washington
A People's History of the United States - Howard Zinn
वेबसाईट्स
http://history.org
https://en.wikipedia.org)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle