चांदणचुरा - ३५

सकाळी उठल्याबरोबर उर्वीने पहिलं काम कुठलं केलं असेल तर माया कासेकरांना कॉल करून त्यांना भेटायची वेळ ठरवली. सकाळपासून आईबाबांबरोबर मजेत वेळ कसा गेला ते तिचे तिलाच कळले नाही. आईच्या हातचे चविष्ट खाणे-पिणे, गप्पा आणि झोप एवढाच एक कलमी कार्यक्रम रिपीट मोडवर सुरू होता.

चार वाजता भेटायची वेळ होती त्यामुळे ती साडेतीनला घरातून निघाली. कार पार्क करून येईपर्यंत मायाकाकू दार उघडून पायरीवर तिची वाट बघतच थांबल्या होत्या. बाहेर अरोकारीयाच्या पाच फुटी झाडाला त्यांनी बारीक पिवळे फेअरी लाईट्स गुंडाळले होते. उर्वी आल्यावर तिच्या खांद्यावर थोपटून त्या आत घेऊन गेल्या.

"Wow! झाड न तोडता असं लाईव्ह ख्रिसमस ट्री बनवायची आयडिया मस्त आहे." उर्वी म्हणाली.

त्या आतून चहा आणि घरी केलेल्या कुकीज घेऊन आल्या.

"हम्म, आदित्य लहान असताना मी घराबाहेरचं मोठं पाईन ट्री असं सजवत असे. तेवढीच त्या जंगलातल्या एकांतवासात मजा. ह्या ख्रिसमस स्पेशल कुकीजसुद्धा मी आदित्यला मदतीला घेऊन करत असे. त्याला खूप मजा यायची लुडबुड करायला. बंगल्यात एक भट्टी होती त्यामुळे तिथल्या कूककडून मी बरंच बेकिंग शिकले होते. आदित्य सारखा माझा डोळा चुकवून कच्चं कुकी डो तोंडात कोंबायचा पण त्याला शेप्स कापायला भारी मजा वाटायची. आदित्यला कुकीज करताना बघून त्याच्या बाबाला राग यायचा, ह्या कसल्या गर्लिश गोष्टी शिकवतेस, बाहेर खेळायला पाठव म्हणायचा. बट आदित्य वॉज जस्ट अ बेबी, तीन चार वर्षांचा असेल तो तेव्हा."

"ह्या डबल चॉकलेट पेपरमिंट कुकीज त्याच्या अगदी आवडत्या होत्या. एकदा दुपारी आम्ही झोपून उठलो तर हा कुठे दिसत नव्हता. सगळे शोधून शोधून दमले, तर हा कुठे सापडावा? दिवाणाखाली अक्खा डबा मांडीवर घेऊन एकेक कुकी तोंडात कोंबत बसला होता!" आठवणी सांगताना त्यांच्या थकलेल्या डोळ्यात थोडी चमक आली होती.

किती गोड! तिला बेबी आदित्यची कल्पना करून मजा वाटत होती. हसून मान डोलवत तिने एक कुकी उचलली.

"मग हल्ली तुझा काही कॉन्टॅक्ट झाला का त्याच्याशी?" त्यांनी उत्सुकतेने विचारले.

"थोडासाच." कालच्या टेक्स्टपासून काहीच नाही.

"हम्म त्याच्या बाबावर गेलाय अगदी. अडेलतट्टू!" त्या मान हलवत म्हणाल्या.

"मॅम, खरं तर इथे मी त्या अंगठीबद्दल तुम्हाला सांगायला आले, कारण ते न सांगता मला चैन पडत नव्हते आणि फोनवर सांगणं मला योग्य वाटत नव्हतं." तिने अंगठी आदित्यने बर्फात फेकून देणे आणि तिने शोधण्यापर्यंतची सगळी कहाणी त्यांना सांगितली.

त्यांचा फुरंगटलेला चेहरा बघून ती पुढे बोलत राहिली, "खरं म्हणजे मी तिथे पोहोचताच त्याला अंगठी दाखवून चूक केली. थोडं थांबून दिली असती तर कदाचित त्याने ठेवली असती. तुमची खूप मौल्यवान आठवण नाहीशी झाली म्हणून मला इतके दिवस खूप गिल्टी वाटत होतं. आय एम रिअली सॉरी."

"तू वाईट वाटून घेऊ नको. उलट त्या अंगठीमुळे तुला तिथे पोहोचता आलं हेही काही कमी नाही. अंगठीहून महत्वाचा आदित्य आहे, त्याला निदान मी माझ्या बाजूने त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते आहे हे तरी कळले. तू मला समजावून सांगितलं ते बरं केलंस नाहीतर माझ्या डोक्याला उगीच भुंगा लागून राहिला असता. हो आणि मला मॅडम वगैरे म्हणू नको, काकू म्हटलं तरी चालेल." त्या हसून म्हणाल्या.

"बरं. तुम्हाला सगळं सांगून आता बरंच हलकं वाटतंय मला." म्हणून ती ही हसली.

"कुकीज आवडल्या का तुला? अजून देऊ?"

"खरंच खूप मस्त झाल्यात, पण पोट भरलंय माझं. अरे हो, अजून गोष्ट मला विचारायची होती." ती पर्समधून काचेचा ग्लोब बाहेर काढत म्हणाली. "हे मधे खारकेसारखं काय आहे ते माहिती आहे का तुम्हाला?"

त्यांनी ग्लोब हातात घेऊन चष्म्यातून निरखून पाहिले. "ओह! हे पण आदित्यने दिलेलं दिसतंय तुला?" त्यांना मजा वाटत होती हे त्यांच्या मिश्किल डोळ्यांतून दिसत होतं.

"हो" ती नकळत जरा लाजत म्हणाली.

"त्या खारकांसारख्या आहेत ना त्या वाईल्ड मश्रूम्स आहेत. 'गुच्छी' म्हणतात त्यांना. त्या फक्त हिमालयातल्या जंगलातच उगवतात आणि त्यांची शेती नाही करता येत. त्यामुळे दुर्मिळ आणि भरपूर महाग असतात. ही तिथली डेलिकसी आहे. त्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्या जंगलात झाडांच्या मुळाशी कायम जोडीने उगवतात. ही एकटी मश्रुम कधीच दिसणार नाही. ह्यासुद्धा त्याने जंगलातून शोधून आणल्या असणार."

"ओह!" ती कान देऊन ऐकत होती.

"So it is as good as declaration of his love for you." त्या हसून तिच्याकडे बघत म्हणाल्या.

ती हसली खरी पण तिला आता भीती वाटत होती. कालच्या टेक्स्टनंतर तो आता तिच्यापासून कायमचा लांब जातो की काय असे राहून राहून वाटत होतं. तिने तिचे सगळे पत्ते उघड केले होते, सगळा प्लॅन पूर्ण केला होता, तरीही तो पाऊल पुढे टाकत नसेल तर कशालाच अर्थ रहात नव्हता. तो तिच्या समोर यायला कचरत होता. त्या दिवशी किचनमध्ये जे सांगायचे अधुरे सोडून तो गेला होता ते कधीच पूर्ण होणार नव्हते.

त्यांचा निरोप घेऊन ती घरी परतली तेव्हा ड्रॉईंग रूममध्ये आईच्या सोसायटीतल्या मैत्रिणींचा घोळका जमला होता. तिला बघून बाबांनी टेरेसमध्ये बसायला बोलावलं.

"हां उर्वी! बरं झालं तू आलीस. ह्या बायकांनी डोकं उठवलं होतं." ते कपाळ दाबत म्हणाले.

ती हसत टेरेसचं दार सरकवून त्यांच्याशेजारी जाऊन बसली.

"मला जरा हे प्रेझेंटेशन बनवायला मदत कर, दोन तारखेला ऑफिसमध्ये एक सेमिनार घ्यायचा आहे त्याची तयारी करत होतो आणि नेमक्या ह्या बायका कलकल करत आल्या." ते समोरचा लॅपटॉप तिच्याकडे सरकवत म्हणाले.

"ओके, लेट्स सी.." म्हणून तिने प्रेझेंटेशनमध्ये डोके घातले.

---
रात्री जेवल्यावरसुद्धा बाबांची सेमिनारचीच तयारी सुरू होती म्हणून ती आईबरोबर टेरेसमध्ये बसली होती. तिने आईजवळ सरकून तिच्या गळ्यात हात टाकत खांद्यावर डोके ठेवले.

"तुला हे वर्ष किती वाईट गेलं ते जाणवतंय बेटा.. तुझं दुःखही कळतंय मला." आई तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली.

"माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे आई."

"माझ्याशी बोल ना मग, आत आत सगळं दाबून ठेवू नको. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं ते सांग सगळं. मोकळी झालीस की दुखणार नाही असं." आई समजावणीच्या सुरात म्हणाली.

तिच्या मनातल्या भावना कुणालातरी उघडून दाखवायच्याच होत्या. आईबाबा आल्यापासून तिला आठवून वाईट वाटेल म्हणून आदित्यचा विषय शक्य तितका टाळत होते. त्याचं नाव आलं की नकळत विषय बदलला जात होता. त्याच्याबद्दल न बोलता नुसतंच सगळं छान छान असल्यासारखं तिच्याने आता वागलं जात नव्हतं. ते दोघे तिला जपायला बघत होते पण आदित्यबद्दल न बोलून ती आतून अजून पोखरली जात होती.

"आई, मी आदित्यसारखा कुणीच माणूस अजूनपर्यंत बघितला नाही. वेगळाच आहे तो. बाहेरून तो एकदम टफ गाय असल्याचं दाखवत असला तरी आतून खूप मायाळू आहे. आधी त्याच्या थंड प्रतिसादामुळे लोक त्याला घाबरून असतात पण एकदा त्याला ओळखायला लागलं की तो अगदी दिलदार होतो. त्याचे जवळचे लोक अगदी थोडे असतात पण जे असतात ते अगदी घट्ट असतात. त्याला बघून अजिबात वाटणार नाही पण त्याच्याकडे अगदी सटल सेन्स ऑफ ह्युमर आहे, तो बरोबर असला की मी पूर्ण वेळ हसत असते."

आई गालावर हात ठेवून लक्ष देऊन तिचे म्हणणे ऐकत होती.

उर्वी पुढे सांगत होती. "तो तुला खूप रुक्ष, जंगली वाटतो ना तसा अजिबात नाहीये. पण ते त्याच्याबरोबर राहिल्यावर हळू हळू कळतं. इव्हन मी सगळ्या नातेवाईकांशी इतकी क्लोज आहे बघितल्यावर त्यालाही त्याची माणसं हवीशी वाटत होती. तो मला म्हणाला तसं."

"त्याची फॅमिली? त्याच्या घरी कोण कोण असतं?" आईने पुढे विचारलं.

"त्याचे वडील सात आठ वर्षांपूर्वी वारले आणि आई इथेच आहे पण तो तिच्याशी बोलत नाही. हिमाचलमध्ये सांगल्याला घर आहे, तिथे तो एकटाच रहातो. तुला मागे म्हटलं होतं ना आई, की त्याला त्याच्या आईबद्दल प्रचंड राग आहे. पण मनातून तिची तेवढीच काळजीही आहे, फक्त तो अजून ते स्वतःशीच मान्य करत नाहीये. तो स्वतःशीच झगडतोय.." ती त्याचा आईबद्दल चौकशी करताना मऊ झालेला चेहरा आठवत म्हणाली.

"हम्म, तो एकाच वेळी बऱ्याच गोष्टींसाठी झगडतोय असं दिसतंय.." आई गंभीर होत म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle