"खरंच! त्याचा खरा झगडा स्वतःशीच आहे."
तिने मान्य केले होते. तिच्याइतक्याच त्रासातून तोही जात होता. तिला दिवाळीत झालेल्या त्यांच्या गप्पा आठवत होत्या. एकमेकांना सांगितलेली त्यांची स्वप्नं कितीही वेगळ्या वातावरणात राहिले तरी एकमेकांसारखीच होती. त्यांच्यात न सांगता येण्यासारखा एक बंध निर्माण झाला होता. तरीही ती कदाचित त्याच्या प्रेमात वेडी झाल्यामुळे असा विचार करायची शक्यता होती. पण जर आदित्यला मनापासून ह्या नात्याबद्दल शंका असेल आणि तिच्यापासून लांब रहायचे असेल तर ती त्याच्या वाटेत येणार नव्हती. ती विचारात पडली होती.
"मला भीती वाटतेय की तो पुढे माझ्याबरोबर नसेल तर? त्याच्यानंतर बाकी कोणावरच मी तेवढं प्रेम नाही करू शकणार." ती बारीक आवाजात म्हणाली.
"ओह डिअर.." आई तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली. "आत्ता तुला जेवढा त्रास होतोय तो हळूहळू कमी होत जाईल. प्रेम रहातंच गं पण त्याची तीव्रता कमी होत जाते. बऱ्याच काळाने तुला दुःख असेल पण त्यातली वेदना निघून गेलेली असेल."
"आई तुला माहितीये, मी खरंच त्याच्या प्रेमात पडतेय हे मला कधी जाणवलं? मी चिटकुलला गेले तेव्हा खूप बर्फ पडत होता. तो थांबल्यावर आम्ही रात्री केबिनबाहेर पडून आकाश बघत होतो. हिमाचल मधलं आकाश इतकं मॅजिकल असतं! आकाश असं वेल्वेटसारखं घट्ट काळं आणि त्यात स्पार्कल पावडर उधळल्यासारखे पसरलेले चांदणे.
पायाखाली चमकता पांढराशुभ्र बर्फ. हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं होतं, तेव्हा मला खरंच जाणीव झाली की तो मला किती आवडायला लागलाय." तेव्हाच त्यालाही ते जाणवलं होतं, तिला नक्की माहीत होतं. त्या क्षणापासून त्यांच्यात सगळं बदललं. तिच्याभोवती लपेटलेल्या त्याच्या हातांमध्ये काहीतरी जादू, काहीतरी अद्भुत गोष्ट होती ज्याने तिचं अस्वस्थ मन अगदी मऊ, शांत शांत झालं होतं. त्याने कबूल केलं नाही तरी त्या चांदणक्षणी तोही हलला होता.
ती आईच्या मांडीवर डोकं ठेऊन आडवी झाली. आई हळूच तिला थोपटत होती. थोड्या वेळाने आत जाऊन झोपताना तिला आईबरोबरचे संभाषण आठवत होते. त्याच्या कॉल किंवा मेसेजची ती आसुसून वाट बघत होती. पण नाहीच.. उत्तराची फार आशा नव्हती, तरीही तिने फोन हातात घेतला आणि टेक्स्ट पाठवून दिला.
U: Look at the stars tonight. Merry Xmas!
पुढचे पाच दिवस घराची साफसफाई, आईबरोबर शॉपिंग, आईच्या मैत्रिणी, एका लांबच्या नातेवाईकांकडचे लग्न असे माणसांनी भरगच्च होते पण आदित्यसाठी तुटणारे तिचे मन काही शांत होत नव्हते. ३१ च्या संध्याकाळी बाबांचे एक मित्र सहकुटुंब भेटायला आले होते. जेवून सहज बाहेर बसल्यावर बाबांनी कवितांचा विषय काढला आणि त्यांनी मिळून काही आवडत्या कविता वाचायची टूम निघाली. त्यांच्या आग्रहामुळे उर्वीनेही बासरीवर काही मराठी भावगीतं वाजवली. सगळ्यात शेवटी त्यांनी ग्रेस वाचायला घेतला.
'कंठात दिशांचे हार, निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ, गडे येतसे जिथून मुलतानी.
लागली दरीला ओढ, कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब, चोचीत बिंब पाऊस जसा तुजभवती.
गाईंचे दुडूदुडू पाय, डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज, वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.
मातीस लागले वेड, अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे, पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.'
ऐकताना मनातली कालवाकालव असह्य होऊन, ती काहीतरी कारण काढून तिच्या खोलीत गेली. काही वेळाने ते लोक निघून गेल्यावर बाबा तिच्या खोलीत आले. ती खिडकीतल्या खुर्चीत बसून उदास, कोरड्याठक्क डोळ्यांनी बाहेर बघत होती.
"उर्वी? बरं वाटतंय का?" बाबांनी काळजीने विचारलं.
"बरी आहे." ती त्यांच्या पोटाला मिठी मारत म्हणाली. "हळूहळू अजून बरी होणारे."
"नक्की होशील. मला माहिती आहे." बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.
---
सकाळी उठल्यापासून किचनमध्ये आईची गडबड सुरू होती. उद्या पहाटे निघायचं म्हणून उर्वीसाठी गुळाच्या पोळ्या बनवून ठेवायचा घाट घातला होता आणि कोथिंबिरीच्या भल्यामोठ्या दोन जुड्या संपवायला कोथिंबीर वडी. मध्येच चहा आणि बटाटेपोह्यांचा नाश्ताही करून झाला. उर्वी थ्री फोर्थ टाईट्स आणि वर लूज टीशर्ट घालून न्हायलेले केस फॅनखाली वाळवत होती. बाबा सोफ्यावर बसून सुडोकू सोडवत होते. तेवढ्यात डोअरबेल वाजली. "थांबा थांबा, मी बघते, ती खालची अर्चना मला चिक्कीचा गूळ आणून देणार होती." आई आतून ओरडत बाहेर आली. बाबांनी उर्वीकडे पाहून कठीण आहे! असा लूक दिला.
पण आत आलेली व्यक्ती अर्चना नव्हतीच.
"सॉरी मी अशी अचानक न कळवता आले, पण मी कुणाला तरी बरोबर घेऊन आले आहे. मी माया, आदित्यची आई." त्या तिच्या आईकडे बघून हसत म्हणाल्या.
"सॉरी कशाला, या ना. मी अपर्णा, उर्वीची आई."
तेवढ्यात आदित्य शूज काढून त्याच्या आईशेजारी येऊन उभा राहिला. बाबा उठून त्यांच्याशी बोलायला लागले.
उर्वीच्या तोंडाला कोरड पडली होती. तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. नॉट अ सिंगल वर्ड! नुसत्या डोळ्यांनी ती आदित्यला पिऊन टाकत होती. केस थोडेसे वाढले होते, चेहऱ्यावर एक दोन दिवसांची खुरटी दाढी होती, प्लेन व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिम्स. वजन बरेच कमी झालेले दिसत होते पण चेहरा! त्याचा चेहरा इतका आनंदाने फुललेला तिने कधीच पाहिला नव्हता. त्याच्या डोळ्यांत चमक होती आणि त्याचा एकंदर मूडच रिलॅक्स, हलका झालेला दिसत होता. आत आल्यापासून त्याचे डोळे तिला शोधून तिच्यावरच खिळले होते.
तिला अचानक आठवलं की तो तिला सोडून गेला म्हणून ती चिडली होती. लगेच तिने रागाने त्याच्यावरची नजर वळवून टेबलावरची बॉटल उचलून पाणी प्यायले. तो अजूनही चमकत्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत ओठ चावून हसत होता.
उफ्फ आदी.. तिच्या अंगातून विजेची एक लहर सळसळत गेली. ती मुद्दाम मोठे डोळे करून, न हसता त्याच्याकडे बघत राहिली. त्याने ओठांनी सॉरीचा अविर्भाव करून बाकीच्यांना दिसू न देता, एका हाताने कानाची पाळी पकडली. तिने मोठ्ठ हसून डोळे मिचकावले. आईबाबा त्याच्या आईशी काय बोलतायत याकडे तिचे लक्षच नव्हते.
"मला वाटतं, या दोघांना जरा बोलू द्यावं का?" मायाकाकू त्या दोघांकडे मिश्कीलपणे बघून हसत म्हणाल्या.
"ओके. पण आदित्य, मला नंतर तुझ्याशी थोडं बोलायचंय." त्याच्याकडे बघून बाबा म्हणाले.
"हो काका, त्यासाठीच तर आलोय मी!" तो त्यांच्याकडे हसून बघत म्हणाला. तिने भुवया उंचावून त्याच्याकडे बघितले. सगळी पेरेन्ट कंपनी टेरेसमधल्या सोफ्याकडे गेल्याचं बघून दोन पावलात तो उर्वीपर्यंत पोचला. घट्ट मिठीत घेत त्याने तिला सवयीने जमिनीवरून उचललं. तिच्या ओल्या केसांतून त्याच्या खांद्यावर पाणी टपकत होते. "आदी, तुझा शर्ट.. म्हणायला तिने तोंड उघडले आणि त्याने लगेच ओठांनी तिचे तोंड बंद करून टाकले. इतक्या दिवसांचे सगळे दुःख, सगळा विरह तो त्याच्या ओठांनी शांत करत होता. शेवटी बऱ्याच वेळाने तो श्वास घ्यायला थांबला तेव्हा त्याने तिला खाली ठेवले.
ती सोफ्यावर त्याला बिलगून बसल्यावरही दोन्ही हातात त्याचा चेहरा घेऊन प्रेमाने त्याच्या डोळ्यात बघत होती. "तू आलास! तू खरंच आलास." ती कुजबुजली. त्याने मान हलवली. एखाद्या तहानलेल्याला पाण्याचा झरा सापडावा अश्या नजरेने तो तिला न्याहाळत होता. "तू माझ्यावर कसली जादू केली आहेस उर्वी?" तो पुटपुटला.
"मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय." ती फिल्मी स्टाईलने पापण्या फडफडून हसली.
"मी तुझ्या करियरसाठी एवढा चांगला चान्स देत होतो तर तू नाही का म्हणालीस?" त्याने तिच्या गालाला चिकटलेले ओले केस बाजूला करत विचारले.
तिच्या निर्णयाचे तिलाही आश्चर्य वाटत होते पण तिचा निर्णय पक्का होता. "कारण माझं करियर मला तुझ्याइतकं महत्वाचं वाटत नाही."
"हा किती वेडेपणा आहे उर्वी? आपल्यात काहीच कॉमन नाही. तू मुंबईत, मी सांगला.. कसं मॅनेज-
"श्श.. ती त्याच्या तोंडावर बोट ठेवत म्हणाली. "मी तुझ्याकडे शिफ्ट होईन." पुढे होत त्याचा श्वास रोखून किस करत ती म्हणाली. "वी विल मेक इट वर्क!" ती डोळे मिटून त्याच्या मानेवरून खांद्यावर बोट फिरवत म्हणाली. ती शेवटची त्याच्या मिठीत असल्याला कितीतरी काळ लोटल्यासारखा वाटत होता. त्याचा स्पर्श ती किती जास्त मिस करत होती ते तिच्या आत्ता लक्षात येत होते.
"तू असं किस करतेस तेव्हा आपोआप विश्वास ठेवला जातो."
तिने त्याच्याकडे बघून डोळा मारला. "मग? आईला कधी भेटलास तू?" तिने उत्सुकतेने विचारले.
त्याने एक खोल श्वास घेतला, "मी तुला माझ्या आयुष्यातून दूर करूनच गेलो होतो. मला वाटलं आधीही मी एकटाच होतो, आताही एकटाच राहीन. पण ह्या वेळचे एकटेपण जीवघेणे होते. माझी पूर्णपणे भिगी बिल्ली झाली होती. तुला 'क्राऊन शायनेस' माहिती आहे? जंगलात झाडं उंच वाढतात तेव्हा पुरेसा उजेड मिळून सगळी झाडं वाढावीत म्हणून ती एकमेकांमध्ये थोडी जागा सोडून फांद्या पसरतात. एकमेकांना स्पर्श न करता ती मोठी होतात. मलाही तसंच वाटत होतं. माझ्यामुळे तुला त्रास होऊ नये म्हणून मी लांब जात होतो. असाच विचार करता करता मला तुझे शब्द आठवले."
"माझे? काय?" तिने भुवया उंचावल्या.
"मी आईला काही हवंय का विचारलं होतं, तेव्हा तू म्हणाली होतीस की आईला फक्त तिच्या मुलाची गरज आहे. बराच विचार करून शेवटी मी आईकडे जायचं ठरवलं. आता तिचा एकटेपणा मी समजू शकतो." त्याच्या आईने त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाल्याचं तिला का सांगितलं नाही? ती विचारात पडली.
"आईला माहीत नव्हतं. मी कॉल वगैरे न करता काल सकाळी तिच्या दारात जाऊन थडकलो. तिच्या घरासमोर जाऊन बेल वाजवेपर्यंत मला तिथून पळून जावंसं वाटत होतं. मी स्वतःला आईच्या ओढीने मुंबईला चाललोय असे सांगत होतो. पण खरं कारण म्हणजे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आता अजून एक मिनिटसुद्धा नाही."
"आणि मीही!" म्हणून ती अजूनच त्याच्या मिठीत घुसली.
टेरेसच्या दारातून त्याच्या आईच्या बोलण्याचा आवाज येत होता, "May be she needed someone to show her how to live and he needed someone to show him how to love."
समाप्त