कांगडा टीच्या चौकोनी डब्यातून आदित्यने किटलीत चहा घातला. उकळत्या पाण्यात हलकेच पसरणारा सोनसळी रंग पहात त्याने आलं ठेचून दोन तुकडे घातले आणि खूष होत किटलीवर दरवळणाऱ्या वाफेत नाक खुपसून खोलवर श्वास घेतला. किटलीवर झाकण ठेवताना समोर काचेतून त्याची नजर लांबवर पसरलेल्या हिरव्यागार देवदारांच्या दाटीतून खळाळत्या बस्पाच्या प्रवाहापर्यंत गेली. उन्हात चमकत्या पाण्याकडे पाहता पाहता त्याला तो दिवस आठवला...
तिचे दार ओढून घेताना झालेला लॅचचा हलकासा क्लिक, रेंगाळण्याचा मोह होताना चटचट उचललेली त्याची पावले, अवकाळी काळोख भरून कोंदटलेला रस्ता आणि गर्दीवर कोसळणारा मुंबईचा जाडजूड पाऊस. पावसाची जराही तमा न बाळगता मिळेल ती फ्लाईट आणि मिळेल त्या वाहनाने तो दुसरा दिवस संपता संपता घरी पोहोचला होता. संपूर्ण प्रवासात डोके बधिर होते पण नदीवरच्या त्या छोट्याश्या पुलापाशी उतरताना त्याच्या सगळ्या आठवणी फसफसून वर आल्या. बर्फातून तसाच ओलेत्या शूज अन कपड्यांनिशी केबिनमध्ये जाऊन तो सोफ्यावर आडवा पडला आणि वर टांगलेला आकाशकंदील दिसताच त्याने दुखरे डोळे मिटून घेतले.
त्याने तडकाफडकी घेतलेला निर्णय चूक की बरोबर ते उमजत नव्हते पण तो निर्णय दोघांच्या पुढच्या आयुष्यासाठी गरजेचा आहे हे त्याचे मत ठाम होते. पण तरीही ही बेचैनी कशी शांत करावी याचा काहीएक उपाय त्याच्याकडे नव्हता. एक अक्खा दिवस त्याने केबिनमध्येच कोंडून घेऊन घालवला पण तो दडदडीत सोफा ते डायनिंग टेबलपासून अगदी फोन आणि बेडपर्यंत तिच्याच आठवणी पताका लावल्यासारख्या फडफडत होत्या. असेच किती दिवस गेले कुणास ठाऊक, शेवटी असह्य होऊन तो सरळ केबिनला कुलूप ठोकून सांगल्याला निघून गेला.
पण तिथे जाऊन काही खास बदल झालाच नाही उलट त्याच्या लहानपणच्या सगळ्या कडवट आठवणींनी त्याच्या मनात घर केले. एकीकडे त्याला त्या दिवसांतले आई बाबामधील शीतयुद्ध, अबोला, उघड भांडणही न होता एकमेकांपासून तुटत जाऊन शेवटी आईचे निघून जाणे नि नंतर बाबाचे कित्येक वर्षे चिडचिडत रहाणे दिसत होते आणि आपण हे आपल्या बाबतीत होऊ दिले नाही हे लॉजीकली पटत होते. पण बाकी सगळं काही झाकोळून टाकणारी उर्वी आणि तिच्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. दुपारी बाबाच्या कपाटात सापडलेली ओल्ड मंक उघडून त्याने सगळं काही विसरून जायचा प्रयत्न केला पण बाटली हलकी झाली तरी त्याचे मन अजूनही तितकेच जड होते. तारवटलेल्या डोळ्यांनी एकटक छताकडे पहात तो तसाच पडून राहिला. उर्वीपासून दूर गेल्याने तिचीही त्याच्यासारखीच अवस्था असेल हे जाणून निदान तिची इंटरव्ह्यू छापायची इच्छा तरी पूर्ण करावी या हेतूने त्याने शेजारीच पडलेला सेलफोन उचलून पेज पॅल्स पब्लिशिंगला कॉल केला. बस्स, आता सगळं नीट होईल म्हणून तो पुन्हा बेडवर पडला.
सलग वाजणाऱ्या डोअर बेलने तो भानावर आला तेव्हा दुसऱ्या दिवशी दुपारचे दोन वाजले होते. जडावलेल्या पापण्या कशाबशा उघड्या ठेवत त्याने दार उघडले. दरवाज्याच्या चौकटीवर हात रोवून फते उभा होता. त्याला बघून आदित्यने परत दार लावायचा प्रयत्न केला पण तो सरळ दार ढकलून आत घुसला.
"ओ प्पाजी की हाल? अंदर तो बुलाओ यार! कैसी रही ट्रिप? भाब्बी कैसी है?" आत येता येताच हसत हसत त्याने सरबत्ती सुरू केली.
"मत पूछ." आदित्य पुन्हा जाऊन सोफ्यावर आडवा होत मिटल्या डोळ्यांनी म्हणाला.
"क्या हुआ यार, इतना मूड क्यू ऑफ करके बैठा है?" फते त्याच्या शेजारी बसत म्हणाला. उत्तरादाखल आदित्यच्या कपाळावर फक्त आठ्या उमटल्या होत्या. "ठीक है, मत बता. मुझे पता है तुने कुछ खाया भी नही होगा. देख बीजीने तेरे पसंदीदा मदरे आलू, खट्टामीठा कद्दु, रोटी, डुबका और मोटा भात भेजा है!" हातातला भलामोठा पाच पुडी टिफिन उचलून दाखवत तो म्हणाला. "और सीडरभी तुम्हे याद कर रहा है, लेके आऊ क्या?"
सीडरच्या उल्लेखाने आदित्यच्या डोळ्यात चमक आली पण त्याने लगेच नकारार्थी मान हलवली. "अभी तुम्हारे पास ही रखो, मैं बाद मे लेके जाऊंगा."
सीडरलाही नकार दिल्याने प्रकरण बरंच मोठं आहे हे फते समजून गेला. "ठीक है फिर.. मै निकलता हूँ. खाना याद से खा लेना. कल आता हूं, मुझे टिफिन बिल्कुल खाली दिखना चाहीए." टिफिन डायनिंग टेबलवर ठेवता ठेवता तिथे पडलेला मोबाईल उचलून त्याने पटकन उर्वीचा नंबर आपल्या फोनमध्ये डायल करून ठेवला. "चलता हूँ फिर!" म्हणत दरवाजा ओढून तो बाहेर गेला.
टिफिन उघडून एव्हाना गार होत आलेले मदरे आलू आणि एक रोटी खाल्ल्यावर त्याच्या जरा जीवात जीव आला. बाकी टिफिन फ्रिजमध्ये ढकलून त्याने मोबाईल उचलला. अपेक्षेप्रमाणे पेज पॅल्सची ईमेल आलेलीच होती. पण मजकूर अनपेक्षित होता. उर्वीने नकार दिला होता! कसं शक्य आहे? ज्या गोष्टीसाठी तिने इतके प्रयत्न केले ती गोष्टच नकोशी कशी होऊ शकते? तिच्या करियरसाठी हा एवढा गोल्डन चान्स आहे तरीही? तो कोड्यात पडला होता, एकीकडून त्याला बरं वाटत होतं की ती त्याला काय वाटतं याला महत्व देते आहे पण तिच्या कष्टाचं चीज व्हावं असंही वाटत होतं. तिच्या अटीवर तो खूप वेळ विचार करत राहिला. तिला परत भेटून तो नक्की वितळेल हे त्याला चांगलंच ठाऊक होतं त्यामुळे तो पर्यायच नव्हता. काय करावं ज्याने उर्वीपासून लांब राहता येईल आणि त्याचवेळी तिच्या दुःखात भर पडणार नाही असा काही फॉर्म्युला त्याला सुचत नव्हता.
विचारांमधून बाहेर येण्यासाठी तो कोपऱ्यातली काठी घेऊन बाहेर पडला. मळलेल्या डोंगरी पायवाटेवरून सफरचंदाच्या बागेत पोहोचेपर्यंत कडेकडेने पिवळे पडलेले गवत तेवढे त्याच्या सोबतीला होते. नवीन रुजवात करायला हारीने खणलेले खड्डे आणि आणि बहर संपून अर्धवट छाटणी केलेली मोठी विरक्त झाडे त्याची वाट बघत होती. दोन तीन महिन्यांपूर्वी लालभडक, रसाळ फळांनी ओथंबलेली झाडे आता ओकीबोकी पाने गाळताना बघवत नव्हती. पण हे कायम थोडंच आहे लवकरच पुन्हा गुलाबी फुलोऱ्याने ती लदबदून जातील, एका वठलेल्या खोडावर हात फिरवीत तो थोडासा हसला. काठीने वाळक्या फांद्या, काटक्या तोडत, वाटेतले चुकार दगड धोंडे दूर ढकलत शेवटपर्यंत पोहोचला तरीही त्याचे मन अजून उर्वीपाशीच घोटाळत होते. पानापानांतून काळोखाची शाई दाट होऊ लागल्यावर काही पर्याय नसल्यासारखा तो घराकडे वळला. घरी येऊन हॉलमध्ये येरझारा घालताना काहीतरी आठवून तो बेडरूममध्ये गेला. बॅग उघडली आणि उर्वीने कधीतरी वाचायला दिलेलं ग्रेसच्या कवितांचं पुस्तक बाहेर काढलं. पहिल्या पानावर निळ्या शाईने लिहिलेल्या उर्वीच्या नावावर हळुवार बोट फिरवत त्याने मिळेल ते पान उघडलं.
या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो,
डोळ्यात कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो...
तू आठवणीतून माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी...
त्याच्या कोरड्याठक्क डोळ्यांत पाणी साचायला सुरुवात होताच पुस्तक मिटून त्याने उशीखाली सरकवले आणि तसाच आढ्याकडे पहात झोपायचा प्रयत्न करू लागला.
छताच्या नक्षीदार काचेतून ऊन्हाचा कवडसा थेट डोळ्यांवर पडल्यावर आदित्यला जाग आली. डोळे चोळत उठून ब्रश करता करता तो विचार करत होता. बाहेर येऊन त्याने कॉफी केली. हातातला मग टेबलवर ठेऊन मोबाईल उचलला आणि उर्वीला पटापट टेक्स्ट केला.
A: Why won't you write that article?
फोन हातात घट्ट धरून तो रिप्लायची वाट बघत होता. दहा मिनिटांनी निराश होऊन त्याने फोन खाली ठेवला. रिकामा मग उचलून तो सिंककडे वळताच मेसेजचा आवाज आला. गर्रकन वळून त्याने घाईत मेसेज वाचला.
U: I would love to write.
त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
A: nice.
U: once you give me an interview. Face to face.
तिचा रिप्लाय बघून लगेच ते हसू मावळलं.
A: Not gonna happen.
काही सेकंदात तिचा रिप्लाय आला.
U: Then find someone else.
रागाने त्याने ओठ घट्ट मिटून घेतले आणि फोन खाली ठेवला. कमॉन यार छापून टाक ना तो इंटरव्ह्यू! मी कशाला समोर यायला पाहिजे. तिला परत भेटलो तर तिच्यापासून कधीच लांब जाता येणार नाही हे त्याला जाणवत होतं आणि त्यामुळेच आपण घेतलेला निर्णय खरंच योग्य होता का हा प्रश्न पुनःपुन्हा पडत होता. त्याने घटाघट पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला आणि पुन्हा मोबाईल उचलून टाईप केले.
A: why are you being so difficult?
थोड्या वेळाने तिचा रिप्लाय आला.
U: Coz you lied to me. Fact is you love me.
त्याने डोळे मिटून घेतले.
क्रमशः
फोटो कर्टसी: इंटरनेट