कधी नव्हे तो वेधशाळेने दिलेला वादळी पावसाचा इशारा जांभूळवाडीत तरी आज खरा ठरला होता. सकाळपासून फिरून फिरून येणारा सोसाट्याचा वादळी वारा, शब्दशः मुसळधार पाऊस आणि या दोहोंचा मिळून ऐकू येणारा रौरव यात समोरच्या माणसाचे बोलणेही ऐकू येत नव्हते. जागच्याजागी स्प्रिंगसारखी हलून कंबरेतून वाकणारी भलीमोठी झाडे आजपर्यंत कोणी पहिली नव्हती. माडा पोफळींची झुलून झुलून वाताहात झाली होती. झाडांवर तयार फुले, फळे तुटून चिखलात पडून अजूनच राडा झाला होता. रस्त्यातून तांबडेलाल चिखलमिश्रित पाणी फुफांडून वहात होते. आजूबाजूच्या घरांवरचे पत्रे ताडताड उडून गर्जत होते. काही घरांची कौले उडून गेली होती. अंगणात सगळीकडे तुटून पडलेल्या फांद्या, वादळाने झोडपून पडलेले कोपऱ्यातल्या झाडाचे शंभरेक चिकू आणि हिरव्यागार पानांचा खच पडला होता.
ह्या सगळ्या गदारोळात मनोहरराव नाईक घामाघूम होऊन माजघरात येरझाऱ्या घालत होते. घरामागे गोठ्यात त्यांची सगळ्यात लाडकी नऊ महिने भरलेली रंगू गाय वेणा द्यायला लागली होती. वादळाने घाबरून की काय पण बरेच तास उलटूनही काहीच प्रगती नव्हती. हंबरून हंबरून आता तिच्या घशातून आवाज निघत नव्हता. तिचा हंबरडा ऐकून बाकीची पंधरा वीस ढोरे हंबरायला लागली होती. रमाबाई धावपळ करत तिच्या पाठी पोटावर गरम वीट धोतरात बांधून शेकवायचा प्रयत्न करत होत्या. शर्वरीवहीनी विजा आणि गडगडाटाने घाबरलेल्या गार्गीला थोपटून शांत करत होती. शिरीषदादा सारखा वरच्या खोलीत जाऊन मोबाईलला रेंज मिळतेय का पहात होता. तसा त्याने चंदू गड्याबरोबर डॉक्टरांना निरोप पाठवला होता, पण तो व्यवस्थित पोहोचेल का ही शंकाच होती.
गावापासून दूर समुद्रालगत असणाऱ्या ब्लू लगून रिसॉर्टवर वादळी वारा बरेच तास घुमूनही आजूबाजूला फार मोठी झाडे नसल्याने फार नुकसान करू शकला नाही. नशिबाने वादळाची सूचना लवकर मिळाल्यामुळे टुरिस्ट नव्हतेच. पण काही ठिकाणी आडव्यातिडव्या पावसाने झड लागून आत आलेले पाणी, काही खिडक्यांच्या फुटलेल्या काचा साफ करून घेण्यात बराच वेळ गेला. सूर्याचा कुठे मागमूसही नव्हता. आभाळ काळ्याभोर ढगांनी भरलेले होते. समुद्र जोशात भयंकर मातकट लाटा पुढे पुढेच फेकत होता. हे उधाण काही कमी होणार नव्हते.
बऱ्याच वेळाने वादळाचा वेग जरा कमी झाल्यावर पलाशने रिसॉर्टच्या गेटमधून त्याची राखाडी रंगाची चकचकीत थार काढली आणि गावात घराकडे निघाला. रस्त्याच्या आजूबाजूला सगळीकडे वादळी विध्वंस असला तरी नशीबाने रस्त्यात काही अडचण नव्हती. माती, खड्डे, पाण्यातून शिल्लक न राहिलेल्या रस्त्यावरून तीन किलोमीटर सुळकन आल्यावर नेमका घराजवळच्या चौकात पारावरचा भलाथोरला म्हातारा पिंपळ उन्मळून रस्त्यावर आडवा झाला होता. स्टेअरिंगवर हात आपटून वादळाला शिव्या घालत तो गाडी बाजूला घेऊन खाली उतरला. आता घरापर्यंत हा चिखल तुडवतच जावे लागणार होते. त्याचे महागडे स्निकर्स घोट्यापर्यंत चिखलाच्या पाण्यात बुडाले. ग्रे जीन्ससुद्धा आधीच चिखलात बरबटली होती. गाडीत असल्यामुळे रेनकोट नव्हताच. वाऱ्यात फोल्डिंगची छत्री कशीबशी उघडून त्याने डोक्यावर धरली. वाऱ्याच्या झोताने वाकडीतिकडी होणारी छत्री सांभाळत तो कंटाळून चालत निघाला तोच कडेने एक बुलेट सुसाट येऊन त्याच्या पांढऱ्या टिशर्टवर चिखलाची रांगोळी काढून पुढे गेली. "अरे ए sss" म्हणून बुलेटवरच्या रेनकोटला पुढे काही शिवी देण्याच्या आधीच बुलेट वळणावरून नजरेआडही झाली. वैतागून खिशातला बहुतेक भिजलेला आयफोन चाचपून तो पुढे निघाला.
अंगणात पडलेल्या कोवळ्या चिकूंची पखरण चुकवत त्याने दारापुढे येऊन छत्री मिटून बेल वाजवली. तिसऱ्या बेलनंतर चंदूने दार उघडले. "अरे काय चंदू, किती वेळ लावतोस दार उघडायला?" तो चंदूवर बरसला.
"अहो दादा सगलीजनां वाड्यात हाईत. रंगू गाय विताय ना. अडलेली हाय सकलपासना.. डॉक्टरपण हाय आता आतमंदी" चंदू घाबरून म्हणाला.
"बरं आपल्याकडे काय पडझड, नुकसान काही नाही ना, माणसं सगळी ठीक ना?" त्याने घाईत इकडेतिकडे बघत विचारले.
"नाय नाय तेवडी देवाची कृपा म्हणायची, सगला वेवस्थित हाय. थोडा पत्र्यान धडाम धुडुम केलान पन उडाले नाय. एक तो भायल्या जुन्या संडासावरचो कोन्या उडाला वाटता. तुमका चाय देऊ काय?" तो नकळत डोकं खाजवत म्हणाला.
"नको. तू जा गोठ्यात. मी हातपाय धुतो." म्हणून तो बाथरूमकडे गेला. काळोखात गारेगार पाण्याने हातपाय, तोंड धुवून त्याने चिखलाने बरबटलेली जीन्स बदलून शॉर्ट्स घातल्या आणि भिजलेले कुरळे केस टॉवेलने कोरडे करत बाहेर आला. लाईट नाहीच आणि त्यात पावसाने अजून काळोख दाटलेल्या घरामागच्या गोठ्याकडे म्हणजे वाड्याकडे तो निघाला. वाड्याच्या दारातून घाबरून वाकून आत बघणाऱ्या गार्गीला त्याने उचलून घेतले. "काय म्हणते आमची बार्बी? घाबल्ली का पावशाला?" तिची पापी घेत त्याने विचारले. "मी नाई घाबल्ले" म्हणत लगेच गडगडाट झाल्यावर तिने त्याच्या खांद्यात तोंड लपवले. आत शिरीषदादा कंदील धरून उभा होता. आई आणि वहिनी स्वयंपाकघरातून गरम पाण्याचे मोठे पातेले धरून आणत होत्या. अप्पा गायीच्या पाठीवरून हात फिरवून तिला शांत करत होते. चंदू भराभर डॉक्टरांनी मागितलेल्या वस्तू त्यांच्या बॅगेतून काढून हातात देत होता. काळोखात गाईमागचे डॉक्टर दिसत नव्हते पण अप्पा आणि त्यांचे जे काही बोलणे सुरू होते तेही पावसामुळे ऐकू येत नव्हते. गरम पाणी देऊन आई त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. "दहा तास झाले, सुटका होऊक नाय!" कपाळावरचा घाम पुसत ती म्हणाली. "तुझ्यावांगडा सगळा बरा आसा मां?" त्याच्या पाठीवर हात ठेवून तिने काळजीने विचारले.
"होय तर!" म्हणून आईकडे बघून तो हसला. आई अगदी लंडन पॅरिसला जाऊन आली तरी तिचा मालवणी हेल काही बदलणार नाही.
"वासरू जास्त पोसला वाटता, म्हणून अडकलाय, त्याका काढायला इंजेक्शन दिला हात. देवा परमेश्वरा.. बघू आता.." आई डोळे मिटून म्हणाली. "श्श.. डॉक्टर आत हात घालून ओढून काढतात वाटतं" तिकडून वहिनी कुजबुजली.
इतक्यात जोरात आवाज होऊन रक्ताळलेल्या पाण्याचा धबधबाच जमिनीवर सांडला. "पाणमोटळी फुटली!" आई जरा घाबरून म्हणाली. अप्पा मोठ्याने रामरक्षा म्हणत होते. डॉक्टरांनी चंदूला गायीच्या पोटावर विशिष्ट दिशेने दाबायला सांगितले आणि वासरावर जोर लावला. गायीने एकदाच जोरात हंबरडा फोडला आणि क्षणात वासरू बाहेर आले. "गणपती बाप्पा मोरया!" बायकी आवाज आल्याने पलाशने चमकून आत रोखून पाहिले. कंदिलाच्या उजेडात ओलसर, बुळबुळीत, घसरड्या वासराला अख्खा दोन्ही हातांनी खांद्याशी धरून एक उंच मुलगी पुढे येत होती. घामाने तिचे पोनिटेलमध्ये बांधलेले केस घट्ट चिकटले होते. रक्त आणि प्रसूतीस्रावानी तिचा कोपरापर्यंत बाह्या दुमडलेला शर्ट पूर्ण ओला झाला होता. घामेजून दमलेला चेहरा चमकत होता आणि तरीही ती हसत होती. तिच्या हरणासारख्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यात जग जिंकल्याचा आनंद होता.
वासराला खाली पसरलेल्या पोत्यावर ठेऊन तिने रबरी डिस्पोजेबल ग्लव्हज काढले आणि वासराला सुती साडीच्या तुकड्याने पुसून स्वच्छ केले. "काही होणार नाही, मस्त मजबूत कालवड आहे. वार पडेल एक पाच सहा तासात. गायीला भरपूर आंबोण द्या, आराम करू द्या आणि पाडी उठून उभी राहिली की दूध प्यायला सोडा" ती अप्पांना म्हणाली.
"बाय गो, देवासारखी आलीस! ह्या पावसात कोणी डेरिंग केली नसती" अप्पा कृतज्ञतेने म्हणाले.
"ओ माझं कामच आहे ते अप्पा!" म्हणून तिने आईकडे पाहिलं. "मला बाथरूम दाखवता काकी?" आई तिला आत घेऊन गेली आणि तो वळून बघतच राहिला.
"चंदू तर सरकारी डॉक्टर आलाय म्हणाला होता.." तो वहिनीला म्हणाला. "हो आहे की डॉक्टर! हीच की!" वहिनी हसत म्हणाली.
"अरे ही नोरा! आपल्या अंतोन बेकरीवाल्याची. ल्हानपणी बघितली असशील हिला. व्हेटर्नरी डॉक्टर झाली आणि सरकारी पोस्टिंग इथेच झालाय तिचा." दादाने पुस्ती जोडली. पलाश आ वासून बघतच राहिला. ही ती लहानपणी बागेतून चिंचा, कैऱ्या तोडून पळवणारी शेंबडी?? एक दोन वेळा त्याने तिला पकडून धपाटेही दिले होते. ती दुसरी तिसरीत असताना तो सातवीत वगैरे होता.
वाड्यातलं सगळं आटपून ते बाहेर येईतो नोरा चहा पिऊन निघाली होती. "अगो रमा, गाईवरना तांदूळ काढून टाक गो." अप्पा आत बघून ओरडून म्हणाले. "होय होय तोच करताव." वाड्यातून परस्पर चंदू ओरडला.
"अप्पा, उद्या वासराला बघायला येते." म्हणत नोरा पिवळा रेनकोट घालून घराबाहेर पडली आणि हेल्मेट चढवून शेजारी लावलेली बुलेट पुढे घेऊन आली. पलाश दारात उभा होता. तिने बुलेटवर बसता बसता त्याला खांद्याला बोट लावून दाखवले. न कळून त्याने स्वतःच्या खांद्याला हात लावला तर टीशर्टभर ओल्या चिखलाचे शिंतोडे होते. "शिट!" तो मोठ्याने म्हणाला. "हॅपन्स!" ती हसत बुलेटच्या गुरगुराटावर ओरडून म्हणाली आणि गाडी वळवून पसार झाली.
पलाशच्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या.
क्रमशः
सौजन्य: इंटरनेट