रूपेरी वाळूत - ७

दाराबाहेर उन्हात चमकणारी थार पाहून नोराच्या पोटात खड्डा पडला. केक सांभाळत, खड्डे चुकवत कमीत कमी स्पीडने ब्लू लगूनपर्यंत पोहोचायला पाऊण तास तरी लागेल. पाऊण तास एकटीने या माणसाबरोबर घालवणे ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तरीही धीर करून ती उभी राहिली. तिच्याबरोबर आतून ममाचा मदतनीस ऑली हातात केक बॉक्स घेऊन आला. ड्रायव्हर सीटवर तिच्या ओळखीचे जेलने सेट केलेले केस किंवा महागडा रेबॅन न दिसता वेगळंच डोकं दिसत होतं. ती पुढे जायच्या आत तो माणूसच खाली उतरला.

"हॅलो मॅम, मला पलाश सरांनी केक न्यायला पाठवलंय. मी मुकेश, रिसॉर्टवर काम करतो." तो हसून म्हणाला.

"ओह ओके. मला संध्याकाळच्या पार्टीला यायचं आहे म्हणून केक मीच डिलिव्हर करणार आहे." ती रिलॅक्स होत म्हणाली.

ती मागच्या सीटवर बसल्यावर ऑलीने तिच्या शेजारी केकचा खोका ठेवला. तिने आठवणीने बाकी साहित्य ठेवलेली पिशवी घेतली आणि मुकेशने गाडी सुरू केली. पलाश न आल्यामुळे तिला हायसं वाटलं, निदान पार्टी सुरू होईपर्यंत तरी त्याला टाळता येईल. पण एकीकडे तो आला असता तर त्याला काय काय टोचून बोलून गप्प करता आले असते याची उजळणी करून तिला आताचा शांत प्रवास डल वाटायला लागला. तिने मुकेशला थोडं बोलतं करायचा प्रयत्न केला पण तो मालकापेक्षाही बोर होता म्हणून ती मोबाईल काढून बबल शूटर खेळायला लागली.

सकाळपासून गर्दीत राहून, बडबड करून आणि अति गोड खाऊन त्याचं डोकं दुखायला लागलं होतं, आडवं झालं तर झोपही येत नव्हती. शेवटी अर्धा तास तरी मोकळ्या हवेत पळून येऊ म्हणून त्याने कपडे बदलले, शूज चढवले आणि बाहेर पडला. बॅकग्राऊंडला समुद्राचा आवाज आणि चेहऱ्यावर रपारप आपटणारा खारा वारा खात पळताना त्याचा शिणवटा कुठल्याकुठे उडून गेला. एमबीए झाल्यावर गेली दहा वर्षे मुंबईत राहून फंड मॅनेजर म्हणून एका इंवेस्टमेंट कंपनीत काम करून भरपूर पैसा, पार्टीज, मजा सगळं मिळूनही त्याच त्या ठोकळेबाज आयुष्याला कंटाळून त्याने हे इको रिसॉर्ट सुरू करायचा निर्णय घेतला होता. अनायसे खार जमिनीमुळे इथे शेती होत नव्हतीच. तीच जमीन डेव्हलप करून त्याने रिसॉर्ट बांधून घेतले आणि मुंबईतली नोकरी सोडून दिली. फक्त त्यामुळे त्याच्या कंपनीतली एचआर आणि त्याची ऑन अँड ऑफ गर्लफ्रेंड इशिता त्याला कायमची सोडून गेली होती. त्याला तिच्याबरोबर आयुष्यभर राहण्याची गॅरंटी नव्हतीच पण तरीही तो वी वर ऑन अ ब्रेक म्हणत पुनःपुन्हा तिच्या जाळ्यात ओढला जायचा, मुंबई सोडून निघताना मात्र ती त्याला शेवटचा गुडबाय म्हणून तिच्या वस्तू एका बॉक्समध्ये घालून घेऊन गेली ती गेलीच. पुन्हा कधीही ती त्याला आठवली नव्हती. कालपर्यंत.

काल वरुणच्या मित्रमंडळीत तीही ब्लू लगूनवर आली होती. दिवसभर त्याने तिला टाळायचा आटोकाट प्रयत्न करूनही ती त्याच्याजवळ येत होती. आणि नोरा! ती त्याच्या डोक्यातून प्रयत्न करूनही निघत नव्हती. ही वॉज लव्हिंग टू हेट हर. पण मेंदूच्या एका कोपऱ्यात कुठेतरी तिचा बिनधास्तपणा, तिचा आत्मविश्वास, तिचं काम, तिचा चिडखोरपणा आणि मध्येच चमकून जाणारा निरागस स्वभाव यांनी त्याला भुरळ घातली होती. आणि न विसरता येणारी तिच्या शरीराची वळणे! ऊफ!! त्याने धावता धावता थांबून गुढघ्यावर हात ठेवून दम टाकला आणि वळून पुन्हा रिसॉर्टच्या दिशेने पळू लागला.

थार ब्लू लगूनच्या गेटमधून आत शिरल्यावर दोन वेटर केक सांभाळून उचलत आत किचनमध्ये घेऊन गेले. नोरा तिची पिशवी घेऊन त्यांच्याबरोबर गेली. त्यांनी बॉक्समधून केक काढून ट्रॉलीवरच्या केक स्टँडवर ठेवला. नोराने लगेच पिशवीतून आयसिंगचे लहान मोठे कोन काढत काही ठिकाणी हललेले आयसिंग दुरुस्त केले. केकच्या कोपऱ्यात दोन बदामांत Happy Married Life लिहीलेला एडीबल टॅग खोचला. केक रेडी झाल्यावर तिने पॅन्ट्री मॅनेजरकडे रिसीट देऊन delivered ok म्हणून त्याची सही घेऊन रिसीट पर्समध्ये ठेवली.

केकशेजारी खाली बसून ट्रॉली गोल फिरवत ती केकवर एक शेवटची नजर टाकत होती तोच पॅन्ट्रीच्या मागच्या दारात शूज काढून आत येणाऱ्या पावलांचा आवाज आला. तिने केकमागून वाकून पाहिले. त्याचे वाळू चिकटलेले ओले तळवे, फुटबॉल प्लेयरला लाजवतील अश्या कातीव पोटऱ्या, आखूड ब्लॅक रनिंग शॉर्टसमधले लांब पाय, वर घातलेला पांढऱ्या अँकरचे डूडल स्केच असलेला ग्रे गंजी, सपाट पोट, घामाने गंजी चिकटून दिसणारे ऍब्ज, दमून खालीवर होणारी छाती, घामाने चमकणारे मान आणि दंडाचे मसल्स, क्लीन शेव्हड करकरीत जॉ लाईन, परफेक्ट धनुष्याकृती ओठ.. "डॅम!" तिने पटकन नजर बाजूला वळवली. केकआधी त्याचे लक्ष केकमागे लपणाऱ्या तिच्याकडे गेले. त्याने मनातल्या मनात तिच्या ड्रेसला कॉम्प्लिमेंट देत एक शिट्टी वाजवली आणि मग केककडे पाहिले. नकळत टाळ्या वाजवत तो पुढे आला. "दिस इज बियॉन्ड अमेझिंग!" आता त्याने मोठ्याने शिट्टी वाजवली. "आय बेट ह्यात तुझा काही हात नाही." तो तिच्याकडे बघून म्हणाला. "ऑफ कोर्स! इट्स ऑल ममा." ती अभिमानाने हसत म्हणाली. "माझं काम झालंय, मी मिनूला भेटायला जाते." कुणालाच न उद्देशून ती पटकन म्हणाली आणि तो पुढे अजून काही म्हणायच्या आत तिने तिथून काढता पाय घेतला.

वर जाऊन तिने पायलकडून आय लायनर, मस्कारा आणि लावलेली डस्टी रोझ लिपस्टिक टच अप करून घेतली. जॅकेट घडी करून पायलच्या बॅगमध्ये ठेवायला दिलं आणि मिनूची हेअरस्टाईल होता होता तिला चिडवत बसली. खिडकीतून खाली तिला पार्टीची तयारी करणारे लोक धावपळ करताना दिसत होते.

बरोबर सात वाजता सगळी मंडळी पूलसाईडला सजवलेल्या पार्टी एरियात दाखल झाली. पुलमध्ये निळ्या पाण्यात पडलेली दिव्यांची चमचमती प्रतिबिंबे दिसत होती. वातावरणात यानीच्या इन्स्ट्रुमेंटल नॉस्टालजिआचे सूर भरून गेले होते. सगळीकडे पिंक ऑर्किडस् ची सजावट, एका बाजूला मोठ्या बार टेबलवर मांडलेल्या रंगीबेरंगी बॉटल्स आणि ग्लासेस, टेबलमागे आग फुंकून कॉकटेल्स शेक करणारे दोन बारटेंडर्स होते. तिथे लगेच शौकीन लोकांनी गर्दी केली. शेजारीच टेबलांवर व्हेज आणि नॉनव्हेज फिंगर फूडचा बुफे मांडला होता. काही वेटर गर्दीतून फिरत हातात मोठ्या ट्रे वर कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि टूथपिक टोचलेले सिलेक्ट फिंगर फूड सर्व्ह करत होते. दर थोड्या अंतरावर पांढरा टेबलक्लॉथ घातलेली गोल टेबल्स ठेवली होती त्यांच्याभोवती लोक आपापले कंपू करून थांबले. एका कोपऱ्यात लहानसा काँसोल आणि इनहाऊस डीजे होता. त्याच्यासमोरच डान्स एरियावर वेगळे लायटिंग होते. वाइन रेड बॉल गाऊनमध्ये चमकणारी मिनू आणि ब्लॅक सूटमधल्या हँडसम वरुणची पार्टीत एन्ट्री झाल्याबरोबर त्यांना सगळ्यांनी गराडा घातला.

अचानक दिवे मंद होऊन संगीत बंद झाले. आतल्या दारावर फोकस पडला. त्यातून केक ट्रॉली सरकवत पलाश आत आला. "येय! वेडिंग केक!" म्हणत उत्साहाने मिनू पुढे झाली आणि तिचा हात धरून वरूण केकजवळ गेला. समोर तीन थरांचा पैठणी वेडिंग केक होता! केशरी पैठणीच्या तीन घड्या एकावर एक ठेवल्यासारखे तीन थर आणि एका बाजूने तिन्ही थरांवर पसरलेला जरीकाठी बारीक गुलाबी डीटेलिंग आणि मोरांसकट चुण्या असलेला पदर. केकवर पदराच्या बाजूला चार हिरव्या बांगड्या, एक मोठी सोन्यामोत्याची नथ आणि चांदीचे नाजूक पैंजण होते. मिनूने आश्चर्याने आ करून तोंडावर हात ठेवला. "अँड इट्स ऑल एडीबल!" पलाश हसून मिनूकडे बघत म्हणाला.

"आय जस्ट कान्ट इमॅजिन की या लहानश्या गावात इतकी फिनेस असलेला केक मिळेल! आय वॉज रेडी टू ऍक्सेप्ट एनीथिंग.. थॅंक यू!" मिनू मान हलवत म्हणाली. तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

"अ आ, डोन्ट थँक मी! बेकरीवाली तिथे आहे!" त्याने नोराला पुढे बोलावलं. नोरा हसत पुढे आली. मिनूने तिला मिठी मारून थॅंक्यू म्हटले. "मी नाही, ही माझ्या ममाची जादू. इट्स अ मँगो कोकोनट केक विथ मँगो बटरक्रिम ऑन टॉप! अँड, इट्स ऑन द हाऊस! हे माझं गिफ्ट आहे तुम्हाला!" ती पलाशकडे बघत म्हणाली. त्याने नोटेड म्हणून मान हलवली.

'Aww' म्हणत मिनू पुन्हा तिच्या गळ्यात पडली आणि टाळ्यांच्या गजरात वेडिंग केक कापला गेला. नकळत नोरा पलाशच्या अगदी जवळ उभी राहून टाळ्या वाजवत होती. तो तिरक्या नजरेने तिच्या गोबऱ्या गालावर ओघळलेल्या बटेकडे पहात होता.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle