केक खाऊन सगळे आपापल्या टेबलवर सेटल होताच डीजेने डान्सची घोषणा केली. सगळे दिवे बंद झाली आणि झगझगीत फोकस मिनूचा हात हातात घेऊन डान्स फ्लोरवर जाणाऱ्या वरूणवर पडला. आय फाउंड अ लव्ह.. फॉर मी.. म्हणत एड शीरानचा आवाज सगळीकडे पसरला. त्या तालावर मिनू वरूणचा स्लो वॉल्ट्झ सुरू झाला आणि रात्र रोमँटिक झाली. एकेका ओळीवर हौशी लोकांनी कोरस सुरू केला. चार कडवी झाल्यावर गिरकी घेऊन मिनू थांबली आणि तिने बाकी कपल्सना जॉईन होण्याची रिक्वेस्ट केली. त्यांच्या नातेवाईकांपैकी तीन चार जोड्या जॉईन झाल्या आणि गाणं पुन्हा सुरू झालं.
नोराला डान्स करायची फार इच्छा होती पण बाकी सगळे अनोळखी असल्यामुळे ती शांतपणे हातातली मोठ्या ग्लासमधली मोहितो स्ट्रॉने हळूहळू पीत उभी होती. तिच्या शेजारच्याच टेबलापाशी पलाश त्याच्या मित्रांबरोबर उभा होता. होस्ट करत असलेल्या पार्टीत कधीही न पिण्याचा नियम त्याने आजही पाळला होता. सगळ्या पिणाऱ्या, न पिणाऱ्या लोकांवर त्याचे व्यवस्थित लक्ष होते. नोरा एक मोहितो संपवून दुसरी घ्यायला बारजवळ थांबलेली दिसली. बारटेंडरने ग्रे गूजची बाटली उचलली तेव्हा तिच्यामागून त्याने बारटेंडरला कमी.. कमी म्हणून खूण केली. त्याने मान हलवल्यावर पलाश वळला.
इशिताने अचानक येऊन त्याच्या खांद्यावर हात टाकला. "हे बेबी!" ती जास्तीत जास्त मादक आवाजात म्हणाली.
"हे इशि! डोन्ट बेबी मी!" तो वैताग चेहऱ्यावर न दाखवण्याचा प्रयत्नात खोटं हसत म्हणाला.
"श्श.." तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवले. "आय नो यू मिस्ड मी.." ती त्याच्या कानाजवळ लालचुटूक ओठ नेत कुजबुजली.
बार काउंटरला पाठ टेकून हातातली मोहितो सिप करत नोरा समोर पहात होती. अचानक तिची नजर तिच्याकडे पाठ करून उभ्या पलाशवर थबकली. सॉफ्ट वेव्ही केस, करकरीत पांढरा शर्ट त्यावर ग्रेईश सेमी कॅज्युअल ओपन जॅकेट, ब्लू जीन्स आणि ब्लॅक लेसअप स्नीकर्स. वॉव! हा कॅज्युअल लूकमध्येही चमकायचं सोडत नाही! तेवढ्यात तिची नजर त्याच्या खांद्यावर हात टाकून बोलणाऱ्या गोऱ्यागोमट्या, उंच, स्टायलिश बारीक मुलीकडे गेली. तिच्या गुढघ्यापर्यंत असलेल्या काळपट हिरव्या वेल्वेट बॉडीकॉन ड्रेसची स्लीट पार मांडीपर्यंत होती. नोराने नकळत तोंड वाकडे केले. आता त्या मुलीने त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन बोलायला सुरुवात केली. व्हॉटेवर! माका काय करूचा.. पुटपुटत नोराने तोंड घट्ट मिटून मान हलवली.
"नॉट ऍट ऑल!" पलाश मान हलवत म्हणाला.
"कमॉन यू कान्ट फर्गेट मी, आय नो. ऍट लीस्ट.. लेट्स बी फ्रेंड्स यार." आता तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकले.
शिट! एवढ्या गर्दीत ही पोरगी त्याला किती चिकटते! नोराने पटकन मान वळवली.
"ओके, स्टॉप इट. आय हॅव टू गो." म्हणून त्याने हळूच तिला बाजूला सारले.
न राहवून तिने पुन्हा समोर बघितले तर पलाश आणि ती मुलगी दोघेही दिसत नव्हते. श्वास टाकत तिने गपकन मोठा घोट घेतला. पायलने आपली प्लेट ग्रील्ड तंदुरी पनीर आणि चीज चेरी पायनॅपलने भरून घेऊन आणखी एक प्लेट तिच्या हातात आणून दिली. "मी फ्रुट पंच घेऊन येते, माझी प्लेट बघ." म्हणून पायल बार काउंटरकडे गेली. नोराने प्लेट टेबलवर ठेवून टूथपिक टोचलेल्या पनीरचा एक तुकडा कसाबसा तोंडात कोंबला. तिची भूक मेली होती.
एव्हाना फ्लोरवरचे पब्लिक चेकाळून बॉलिवूड गाण्यांची फर्माईश करायला लागले होते. एकदोन कॉकटेल्समुळे सगळ्यांची डोकीही जरा हलकी झाली होती. पलाशने बारमधल्या रिकाम्या होणाऱ्या बाटल्या स्टॉकअप केल्या. स्टार्टर्सची तयार होणारी नवी बॅच टेस्ट केली आणि परत आपल्या टेबलवर आला. सगळं पब्लिक एव्हाना झिंगाट आणि बदतमीज दिल वर नाचून नाचून दमलं होतं. तेवढ्यात त्याला इशिताने हातातला रेड वाइनचा ग्लास खाली ठेवलेला दिसला. ती त्याच्या दिशेला चालायला लागली. शिट! त्याला अजिबात तिला जवळ येऊ द्यायचे नव्हते. डान्स तर नाहीच! पटकन त्याने आजूबाजूला बघितले, शेजारच्याच टेबलापाशी एका हाताने बनमधून निसटलेले केस सावरणारी नोरा त्याला दिसली.
कसलाही विचार न करता तो चार पावलात तिच्या जवळ पोहोचला आणि तिचा हात धरून डान्स फ्लोरकडे घेऊन गेला. पायल आधी शॉक झाली आणि नंतर तोंडावर हात धरून गो नोरा! म्हणून ओरडली. नोराने मागे वळून तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. तिचे आश्चर्याने उघडलेले तोंड मिटेपर्यंत दिवे बंद झाले आणि सगळीकडे शांतता पसरली. क्षणभरात मंद निळे, गुलाबी लाईटस् सुरू झाले आणि डीजेने सेबी फर्नांडिसचे ओरिजनल 'कोंत्राद सासनाचो' सुरू केले. नोराचे डोळे चमकले आणि चेहऱ्यावर एकदम मोठं हसू आलं. तिच्या सवयीचे प्रत्येक लग्नात डान्स केलेले कोंकणी गाणे. पलाशने तिच्या डोळ्यात बघून मान डोलावली.
"डान्स पार्टनर? आपण?" तिने सुरक्षित अंतर ठेवून विचारले.
"यप्प!.. फक्त माझ्या पायावर पाय देऊ नको" त्याने हसत तिच्या कंबरेला धरून अलगद जवळ ओढले आणि तिचा हात खांद्यावर ठेवला. संगीताचे सूर, समुद्राकडून येणारा गार वारा आणि पोटात गेलेल्या दोन मोहितोंमुळे ती पिसासारखी हलकी झाली होती. तिने त्याच्या गळ्यापाशी ब्लॅक ओपियमच्या सुगंधात खोल श्वास घेतला आणि डोळे मिटून घेतले. नकळत तिचा दुसरा हात त्याच्या मानेवर आणि तिथून त्याच्या सिल्की केसांत सरकला. आजूबाजूची गर्दी आणि त्यांचे आवाज कधीच नाहीसे झाले होते.
तिची वेळ काळाची शुद्ध हरपली होती. तिची अवस्था जाणून तो तिला घट्ट मिठीत घेऊन नाचत होता. तिच्या इतक्या जवळ असण्याने तयार झालेल्या उष्णतेत तो विरघळून जात होता. तिने डोळे उघडून जेव्हाही त्याच्या डोळ्यात बघितले तिला प्रत्येक वेळी मऊ उबदारपणाच दिसत होता, आधीचे त्याचे खत्रूड, झोंबणारे डोळे कुठेतरी नाहिसेच झाले होते. शेवटी त्याने वेग थोडा वाढवला आणि गोल फिरताना तिच्या ड्रेसचा घेर त्याच्या पायाभोवती लपेटत होता. ती कणाकणाने हळूहळू त्याच्यात वितळत होती. तिचे टपोरे ओठ, नाजूक गळ्यात थरथरणारी नस आणि झिरझिरीत टूलमधून दिसणारी तिच्या खांद्याची गोलाई बघूनही त्याने कसेबसे स्वतःला सांभाळले.
मान वर करून पापणीही न लवता बराच वेळ त्याच्या डोळ्यात पाहणाऱ्या तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तो जरासा हसला. तिचे ओठ विलग झाले होते. पण त्याने स्वतःला काबूत आणत तिच्या कानावरची बट हलकेच बाजूला केली. "अर्थ टू यू प्रिन्सेस! म्युझिक थांबलंय." तो तिच्या कानात कुजबुजला. त्याच्या उष्ण श्वासाने ती भानावर आली आणि झोपेतून जागी झाल्यासारखी त्याच्याकडे बघून हसली.
गडबडून पटकन त्याच्या मानेतला हात काढून ती मागे झाली. "थँक्स फॉर द ऑसम डान्स! यू आर रिअली गुड ऍट इट!" ती त्याला घाईत म्हणाली.
"थँक्स! टेल मी समथिंग न्यू!" तो पुन्हा तिरकं हसत म्हणाला.
" 'न्यू'? अम्म.. तू जेवढा दाखवतोस तेवढा वाईट नाहीस!" म्हणून हसत ती तिच्या टेबलकडे चालू लागली.
ती टेबलाजवळ पोहोचली तेव्हा पायल दिसली नाही म्हणून तिने इकडेतिकडे पाहिले. तेवढ्यात एक वेटर तिच्याजवळ आला. "पायल मॅडमने ही तुमची पर्स दिली आहे. त्या घरी गेल्या." ओह! तिला दहा वाजताच न्यायला येणार होते. वेटरला थँक्स म्हणून तिने त्याच्या हातातून क्लच घेतला आणि मोबाईल बाहेर काढला. साडेबारा वाजलेले बघून तिला धक्काच बसला. एव्हाना मायाचा कॉल यायला हवा होता. ती भराभर चालत गेटबाहेर जाऊन थांबली. अजून तरी तो आलेला नव्हता. तिने पुन्हा त्याला कॉल केला, बराच वेळ रिंग होत होती पण तो उचलत नव्हता. ती काही न सुचून तशीच थांबून राहिली. बहुतेक भरती सुरू झाली होती. उधाणाच्या लाटांचा रोरावणारा आवाज येत होता. वाऱ्यावर तिचा नाजूक ड्रेस उडत होता म्हणून ती घेर हातात धरून उभी राहिली. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य होते. पावसाळी ढगांमुळे चंद्रही दिसत नव्हता. पुनःपुन्हा ती मायाला कॉल करायचा प्रयत्न करत होती. आतून पार्टीच्या गलक्याचा बारीक आवाज येत होता. गेटवरचा वॉचमन कुठेतरी गायब होता.
तिला फक्त गेटच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन मोठ्या गोल दिव्यांची सोबत होती. अचानक जोरात पावसाची सर आली म्हणून ती जरा कोपऱ्यात पार्किंगच्या पुढे आलेल्या उतरत्या छपराखाली पळाली तरीही ती नखशिखांत भिजलीच. पावसात गेटवरचे दिवे बाकबुक करून बंद पडले. ती कुडकुडत फोनचा टॉर्च लावून आजूबाजूला बघू लागली, उंदीरबिंदीर न दिसल्याने तिने हुश्श म्हणून पुन्हा कॉल केला. तिच्या चेहऱ्यावर अचानक एक सावली पडली आणि तिचा हात जोरात खेचला गेला. दगडी खांबावर डोकं थाडकन आपटलं, मोबाईल असलेला हात कंपाउंड वॉलच्या दगडी भिंतीवर आदळून मोबाईल खाली पडला आणि खळकन तो एकुलता एक प्रकाश नाहीसा झाला.
क्रमशः