नोटीस देऊन एक आठवडा झाला तरीही हे लग्न खरंच होतंय असं दोघांनाही जाणवत नव्हतं. आपापल्या रुटीनमधून दोघांनीही एकमेकांना क्वचित वाटलं तरी आढेवेढे घेत काही कॉन्टॅक्ट केला नव्हता. बुधवारमुळे रिसॉर्टवर गर्दी कमी होती म्हणून तो जेवायला घरी गेला. आईने नेमकं चिंबोऱ्यांचं लालभडक कालवण केलं होतं. पलाश बऱ्याच दिवसांनी जेवायला आला म्हणून वहिनीने हौसेने सोलकढीही केली. गरमागरम फडफडीत भातावर कालवण ओतून जेवल्यावर ती परफेक्ट थंडगार सोलकढी पिऊन तो थेट स्वर्गात पोहोचला होता. आई आणि वहिनी नोराबद्दल वेगवेगळी माहिती, तिची आवडनिवड विचारत होत्या पण त्याला अर्थातच काही माहीत नव्हते. त्याने काहीही उत्तरे देऊन, कधी विषय बदलत वेळ मारून नेली. पण लग्न खरं वाटण्यासाठी ह्या गोष्टी दोघांनी बोलायला हव्या हे पण मनात नोट केलं.
बाहेर पावसाची झड लागून हवेत गारवा आला तसे त्याचे डोळे मिटू लागले. लगेचच तो वर खोलीत जाऊन ब्लॅंकेट ओढून सुस्तावला. झोप लागता लागता अचानक त्याचा मोबाईल खणखणला. त्याने उशीशेजारच्या फोनकडे नजर टाकली तर ऍनिमल प्लॅनेट! "हेय फ्यूचर मिसेस!" तो कुशीवर वळून मिटल्या डोळ्यांनी म्हणाला.
नोरा तिच्या सरकारी दवाखान्याच्या लहानश्या खोलीच्या टेबलावर डबा खाता खाता थबकली. मिसेस! ओह माय गॉड.. तिने डोळे फिरवले. हातातल्या आंबोळी आणि दह्यात कालवलेल्या लसणीच्या तिखटाचा घास तिने परत डब्याच्या झाकणात ठेवला. अंगणात जमिनीत ठोकलेल्या गंजक्या लोखंडी पाईपला बांधलेली, पायाला बँडेज होऊन तासभर रवंथ करत बसलेली गुरवाची लाली म्हैस अचानक डोळे उघडून व्हाss य! करून जोरात ओरडली. नोराने हसू दाबत बोलायला तोंड उघडले.
"हाय! ती हळूच म्हणाली. मी फोन ह्यासाठी केला की ममाने तुला डिनरसाठी बोलावलं आहे. म्हणजे सगळ्या फॅमिलीशी नीट ओळख होईल. तुला कधी वेळ असेल?"
"ओह ओके.. लेट मी सी.. सोमवारी मला फार काम नाही. सोमवारी संध्याकाळी जमेल." त्याने मोबाईलवर शेड्युल बघत सांगितले.
"ठीक आहे. साडेसहा सात पर्यंत ये. मी सांगते घरी. सी यू देन." पटकन म्हणून तिने फोन ठेवलाही.
अरे! काय मुलगी आहे ही! म्हणत तो हातातल्या फोनकडे बघत राहिला तोच पुन्हा रिंग झाली.
"सॉरी सॉरी, गडबडीत विचारले नाही. तुला जेवणात काय आवडतं? तिखट, गोड?" त्याने कॉल रिसिव्ह करून बोलण्यापूर्वीच ती सुरू झाली.
"काहीही चालेल, मिडीयम स्पायसी. नॉनव्हेज फक्त चिकन आणि फिश खातो. नो रेड मीट. आणि गोड नको." तो जरा खुलून म्हणाला.
"हम्म गोड नको ते माहीतच आहे!" ती समुद्रात भिजून ओघळणाऱ्या टिशर्टमधले त्याचे ऍब्ज आठवत पुटपुटली.
"काय?" त्याने मोठ्याने विचारले.
"काही नाही, मग ये सोमवारी." परत तिने पटकन फोन ठेवला.
त्याने मान हलवून फोन बाजूला टाकला आणि ब्लँकेट गळ्यापर्यंत ओढून घेतले.
---
संध्याकाळी साडेसहाच्या ठोक्याला बेल वाजली तेव्हा घाईघाईने मारिया आंटी दार उघडायला गेल्या. आज त्यांनी खास जरी काठाची आमसुली रंगाची साडी नेसून अंबाड्यात अनंताचे फुल खोचले होते. माया नेहमीप्रमाणे सोफ्यावर डॅडींशी काहीतरी वाद घालत बसला होता. दार उघडताच समोर मारीयाची भाची इव्हा तिच्या दोन गोलमटोल मुलांना घेऊन उभी होती. कडेवरचा सॅम बोळकं पसरून हसत आजीकडे झेपावला. त्याला उचलून घेत त्यांनी इव्हाच्या बोटाला धरून उभ्या असलेल्या कॅरनच्या डोक्यावरून हात फिरवला.
"तू होय! माका वाटला पलाशच आला! ये ये." म्हणून त्यांनी दार लावले. हळूहळू एकेक करून त्यांच्या नातेवाईकांचा गोतावळाच जमा झाला. नोराच्या खोलीत गप्पा मारत बसलेल्या इव्हाने बोलता बोलता तिचे केस थोडेसे कर्ल करून बनाना क्लिपमध्ये अडकवून दिले. नोराने ममाची साडी नेसायची ऑर्डर झुगारून साधा पांढऱ्यावर निळी फुले आणि नूडल स्ट्रॅप्स असलेला सनड्रेस घातला होता. गप्पा हळूहळू पलाशकडे सरकल्या आणि इव्हाने ते कसे भेटले, प्रेमात कसे पडले वगैरे चौकश्या सुरू केल्या तेव्हा ती पटकन बेल वाजली म्हणून बहाणा करून दाराकडे पळाली.
पलाशने बेल वाजवायला बटन प्रेस करण्यापूर्वीच दार उघडले गेले. नोरा दारातून मागे बघून मायाला ओरडून काहीतरी सांगता सांगता तिला समोर कोणी असल्याची जाणीव झाली. मान वळवताच दाराच्या चौकटीवर हात ठेवून पलाश उभा होता. ब्लू डेनिम्सवर गडद हिरव्यानिळ्या चेक्सचा फ्लॅनेल शर्ट आणि कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या बाह्या.
"ऍनिमल प्लॅनेटवर दाराबाहेरच्या माणसाचा वास पण येतो काय?" तो डोळे बारीक करून किंचित हसत म्हणाला. तो तिच्यापासून अगदी काही इंचावर उभा असल्यामुळे ती फक्त त्याच्या ब्लॅक ओपियमच्या सुगंधात बुडाली होती.
"हेलो?!" तो तिच्या तोंडासमोर हात हलवत म्हणाला.
"माणसाचा नाय, आंब्याचो येतो!" ती भानावर येऊन त्याच्या हातातल्या लहान करंडीकडे बघत म्हणाली. बांबूच्या करंडीत दहा पंधरा लाल केशरी लांबट,पोपटाच्या चोचीसारखे माणकूर आंबे होते.
"हम्म, ह्या माणकुराची ट्यूब जरा लेट पेटते." तो तिरकस हसत म्हणाला.
"नोरा, कोण हाय गोss" म्हणत ममा तिच्या मागे आली आणि पलाशला बघून जागीच थांबली.
"चेडू, त्याला आत तर बोलाव, का दारातच रोमान्स करत थांबायचा आहे?" ती हळू आवाजात म्हणाली. ऐकून पलाश मोठ्याने हसला आणि त्याच्याकडे पाठ करून आत वळल्यावर नोराने डोळे फिरवले.
आत आल्यावर पलाशला उत्सवमूर्ती असल्यासारखं सोफ्यावर बसवून सगळ्या नातेवाईकांची ओळख परेड झाली. त्यांची नावं कशीबशी लक्षात ठेवायला प्रयत्न करतानाच ममाने सगळ्यांना जेवायला हाक मारली. हे सगळे प्रकार सुरू असताना माया चे गवेराचा फोटो असलेला काळा टीशर्ट घालून कोपऱ्यातल्या खुर्चीत बसून बारीक डोळ्यांनी त्याचे निरीक्षण करत होता. माजघरात मोठया डायनिंग टेबलवर ताटं वाढलेली होती. नारळाच्या दुधातली हलकीशी तिखट प्रॉन्स करी, काठोकाठ मसाला भरलेल्या पापलेटाचा रेशाद, तोंडात पाणी आणणारा चिकन शाकुटीचा घट्टसर रस्सा, ताज्या करकरीत कांदा काकडी टोमॅटोचे सॅलड, कोथिंबीर खोबऱ्याची चटणी, चपात्या, भात आणि गोड म्हणून आठ नऊ लेयर असलेले लुसलुशीत बेबींका!
आग्रहाने भरपेट जेवून झाल्यावरही नोराच्या नातेवाईकांच्या गॉसिप - गोंधळ - गप्पा सुरूच होत्या त्यामुळे पलाशला कंटाळा आला. जरा शांत, मोकळ्या हवेत जाऊ म्हणून तो कॉरिडॉरमधून बाल्कनीच्या दिशेने वळला तोच शेजारच्या खोलीतून बाहेर येणारी नोरा त्याच्यावर धडकली.
"आऊच!" ती कपाळ चोळत ओरडली.
"दिवसभर म्हशींच्यात राहण्याचा परिणाम!" तो नाकाचं हाड ठीक असल्याची खात्री करत म्हणाला.
"शट अप यू.." ती दबक्या आवाजात शक्य तेवढी किंचाळली. "डोन्ट शो युअर ऍटीट्यूड हिअर!"
"आय एम बोअर्ड.. आय हेट पीपल. मी हे गेट टूगेदर प्रकार वर्षभर करणार नाही." तो आवाज वाढवून म्हणाला.
"यू हॅव टू. इफ वी हॅव टू 'शो' अ परफेक्ट मॅरेज." ती त्याच्या तोंडाजवळ जाऊन शो वर जोर देत म्हणाली.
"हे फक्त तुला वाटतं आहे. मला गरज नाही वाटत." तो अजून जोरात म्हणाला.
"आss ह. शट अप मॅन.." ती त्याच्या नाकासमोर बोट नाचवत म्हणाली.
त्याने अचानक पुढे होऊन तिच्या दंडाला धरून जवळ ओढून घट्ट मिठीत घेतले. तिला गोंधळून काही सुचेनासे झाले. तिने धडपडून मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला पण कानाजवळ फुंकर मारल्यासारखे त्याने हळूच श्श.. केलेले तिला जाणवले. तिने शांत होऊन त्याच्या मजबूत खांद्यावर गाल टेकवला आणि ब्लॅक ओपियमच्या धुक्यात विरघळून गेली. तिच्या खांद्यावरचा स्ट्रॅप अलगद खाली घसरला होता. तिच्या ओठांचा अस्फुट स्पर्श आणि लयीत येणारा उष्ण श्वास त्याच्या मानेवर हुळहूळत होता. पण त्याने त्यातही स्वतःवर खूप प्रयत्नाने नियंत्रण ठेवत डोळे उघडून आश्चर्य वाटल्यासारखा चेहरा केला आणि त्यांच्या दिशेने येणारी इव्हा तोंडावर हात घेऊन सॉरी सॉरी म्हणत बाहेर पळून गेली. तो स्वतःवर खुष होऊन हसला.
क्रमशः