मला आठवणारे पहिले नाटक कुठले असेल तर ते" कट्यार काळजात घुसली" हेच असेल.
आम्ही पेणला रहात होतो तेव्हा आमच्या शाळेच्या ओपन एअर नाट्यगृहात नाटक बघणे हा एक सोहळाच असे. शहरापासून काहीशी दूर, एरवी दिवसाच्या उजेडात दिसणारी शाळा रात्री किती वेगळी भावत असे. रात्रीचा गारठा, सोबत रातकिड्यांची किर्र्रर्र, अंधूक दिवे, नटून ठटून आलेले लोकं, मध्ये खुर्च्या आणि बाजुला असलेली भारतीय बैठक, समोरचा मरून रंगाचा वेल्व्हेटचा पडदा, लावलेली नाट्यगीतं अन भावगीतं, ... सारं सारं वातावरण अगदी भारून टाकणारं. अन मग उघडला जाणारा पडदा अन त्या मागचे एक पूर्ण वेगळे जग. जणू प्रतिसृष्टीच अवतरायची तिथे.
तर आशा वातावरणात बघितलेली सगळी नाटकं आजही मनात ठळक कोरलेली. त्यातून कट्यार सारखं नाट्क, त्याचे सेट्स, तो काळ, संगीत, गुरुशिष्य परंपरा, मीरजेचे ते काळोखे दगडी मंदिर, खासाहेब, त्यांचे शिष्य, त्यांचा दरबार, मैफल, सदाशिवाचे येणे, राजकवी आणि तिघांची ती रागदारी, सदाशिवाची संगीताप्रति असणारी कळकळ-जिद्द, त्याचे खासाहेबांकडे लपून राहणे, पकडले जाणे अन त्यानंतरचा तो आपल्याच काळजाला भेदून जाणारा प्रसंग!
मंत्रमुग्ध होऊन अनुभवलेला तो साराच अनुभव... नाही, नाहीच शब्दात पकडता येणारा....
भार्गवराम आचरेकर, वसंतराव देशपांडे, अजित कडकडे, फैय्याज, प्रसाद सावकार
अशा सगळ्या दिग्गाजांनी मनावर कोरून ठेवलेली कट्यार!
नंतर तिच्यावरच्या निस्सिम प्रेमापोटी अनेकदा बघितली. मग दूरदर्शनवरती अगदी ब्लॉक अँड व्हाईट मध्येही कमी झाली नाही तिची गोडी. अन मग नवीन संचातही कितीदा अनुभवली तिची गोडी. अनेकदा समोर जरी नवीन संचातली कट्यार चालू असली तरी मनात अनुभवणं चालू असे, ते मात्र त्या पहिल्या पाहिलेल्या वसंतरावांच्या कट्यारीचच. अन तरीही कधीही ती गोडी, ती हूरहूर कधी कमी झाली नाही.
कट्यार एक न संपनारी अविट गोडी होऊन निनादत राहिली अगदी मनाच्या आत, आत.
अन मग कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची वार्ता कानी आली... मनात हलकेच एक दुखरी नस पुन्हा छेडली गेली. सध्याचे अनेक अगदी नावाजलेले मराठी चित्रपटही मनास भावत नव्हते. कुठे एडिटींगचा घोळ, कुठे कपडेपटाचा घोळ, कुठे गोष्टीचाच घोळ, तर कधी वरवरची उथळ कथा.... किती वेळा अपेक्षाभंग झाला. मनात हळूहळू मराठी चित्रपटांबद्दल भिती बसत गेली. अनेकदा मुलाला हट्टाने घेउन गेले नवीन नावाजलेल्या चित्रपटांना अन त्याच्या कपाळावरच्या आठ्या पाहून मनातच वरमून परत आलेले.
अन अशात कट्यारची घोषणा एकली. यावेळेस मात्र आपण आधी बघायचा, त्याशिवाय मुलाला आग्रह नाही करायचा असं ठरवलेलं. पण माझ्याच मनात किती किंतू होते. कट्यार सारखे शिवधनुष्य, सुबोध प्रथमच दिग्दर्शनाची धुरा वाहणार, सचिनजींसारखा खंदा अभिनेता, शंकर महादेवन सारखा महान गायक, आणि अभिषेकीबुवांच्या सोबत शंकर अहसान लॉयल अशी संगीताची मोट.... सारेच एकीकडून विलोभनीय अन दुसरीकडून सुळावरची पोळी...
जसजसे चित्रपटाची परिक्षणे येऊ लागली तसे मनात अजूनच धडधडू लागले. मूळ नाटक बघितलेल्यांचे अनुभव कुठे दिसेनात, जावं-जाऊ नये अशा दुविधेत होते, पण मनातल्या कट्यारीला आज पर्यंत कधीच धक्का पोहचलेला नाही, तेव्हा बघूयाच असा विचार करून जायचे ठरवले. फारतर काय, आल्यावर जुनी गाणी पुन्हा ऐकू अन जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करू अशा विचारांनी, अन नाटकाशी अजिबात तुलना करायची नाही हे मनाला समजावत थिएटरमधे पाऊल टाकले.
अन मग सुरू झाला कट्यारचा एक नवीन आणि तितक्याच ताकदीच एक अनुभव, सुखद अनुभव....
मुळात हा चित्रपट हा संगीत च्त्रपट वा संगीत नाटक नाही हे लक्षात घेतले तर हा चित्रपट खरच खूप छान आहे. कथा, तिचा फ्लो, मूळ गाभा अन त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत फुलवत नेणे, सचिनचे अतिशय संयत काम (एखाद दोन वेळा सोडता) , सुबोधचा उत्तम, संयत अभिनय, इतर सर्वांचेच चांगले अभिनय, सुरेख संगीत, सुरेल गाणी, काही जुनी टाळून नवीन गाणी करण्याचा स्तुत्य प्रयत्न , आणि अतिशय उत्तम दिग्दर्शन.
खूप दिवसांनी बेसिक गफलत न करणारा, एडिटरच्या डुलक्या (अगदी लगेच लक्षात न येतील अशा ) नसलेला चित्रपट पहायला मिळाला. या बाबतीत सुबोधला मी तरी सध्याच्या सर्व मराठी दिग्दर्शकांमधे पहिला क्रमांक देईन.
("चित्रपट" पहायला जातो आहोत हे लक्षात ठेऊन ) आवर्जून पहाच हा चित्रपट, ही माझी विनंती
गायकाचा अभिनय करणे, त्यातून शास्त्रीय अन तेही जोरकस, तानांचे गाणे असलेल्या घराण्यातील गायकाचा अभिनय करणे हे खरच ताकदीचे. मान्य 1-2ठिकाणी थोडे जास्ती झालेही असेल पण योग्य न्याय नक्की दिलाय सचिनजींना ! त्यांना माझा नमस्कार ___/\___
सुबोधचे अजून एका गोष्टीसाठी अभिनंदन केले पाहिजे. माझ्या आठवणी प्रमाणे मूळ नाटकातील तीन महत्वाच्या गोष्टी त्याने बदलल्या आहेत. दिन गेले भजनाविण सारे हे गाणं, या भवनातील गीत पुराणे हे गाणं आणि रागमाला. पण हे बदल त्याने खूप जाणीवपूर्वक केले असावेत असं मला वाटतं. दिन गेले भजनाविण हे गाणं कितीही सुंदर असलं तरी त्याला एक निराशेची किनार आहे, ती किनार टाळून नवीन खूप सकारात्मक गाणं सुबोध अन संगीतकारांनी केले, शिवाय त्याचे चित्रिकरणही फार इनोव्हेटिव्ह वाटले मलातरी... एक काहीसा स्वप्नवत वाटावा, असा सदाशिवच्या आयुष्यातील हा अनुभव; आपल्यालाही तोच फिल देतो. त्यामुळे मला तरी हा बदल फार भावला.
दुसरा बदल या भवनातील गीत पुराणे... अतिशय ताकदीचे गाणे, शब्द! खरं तर नाटकाच्या अनेक अविभाज्य घटकांपैकी एक ! पण हे गाणे टाळण्याचे धाडस सुबोधने दाखवले. खूप मोठी रिस्क; पण त्याने ती उचलली. संपूर्ण चित्रपतात उर्दू बोलणारे, जगणारे खासाहेब पंडितजींचा प्रभाव कमी करण्यासाठी मराठी गाणे गातील... हे बहुदा पटले नसावे त्याला. भले नवीन गाणे नाही त्या ताकदीचे, पण तो तोटा पत्करूनही मूळ मराठी गाणे त्याने टाळले हे मला खुप दाद देण्यासारखे वाटते. अतिशय गाजलेल्या गाण्याला केवळ कथेसाठी नाकारण्याचे धाडस सुबोधने केले, सुबोध , जिओ !
आणि तिसरी रागमाला... त्याबाबत मात्र मलाही जराशी मनात हूरहूर आहे. ती असती तर सदाशिव चा प्रवास थोडा जास्त स्पष्ट झाला असता का? पण हे आपले माझे मत. त्यालाही कोणाला तरी उत्तर सुचेल.
हा चित्रपट पुन्हा एकदा "कट्यार काळजात घुसली" हाच अनुभव देऊन गेला...
हा चित्रपट आहे, संगीत चित्रपट वा संगीत नाटक नाही हे एकदा लक्षात ठेवले तर अतिशय सुंदर न्याय या चित्रपटाने दिला आहे. आजही मराठी चांगला चित्रपट निघू शकतो, काढता येऊ शकतो हे सुबोधने दाखवून दिले. एक फार सुरेख, नवीन अनुभूति त्याने दिली. Subodh Bhave मनापासून धन्यवाद ___/\___
आणि सर्व चित्रपट रसिकांना नम्र विनंती, जरूर, जरुर थिएटर मधे जाऊन हा चित्रपट बघा ___/\___