मला आठवणारे पहिले नाटक कुठले असेल तर ते" कट्यार काळजात घुसली" हेच असेल.
आम्ही पेणला रहात होतो तेव्हा आमच्या शाळेच्या ओपन एअर नाट्यगृहात नाटक बघणे हा एक सोहळाच असे. शहरापासून काहीशी दूर, एरवी दिवसाच्या उजेडात दिसणारी शाळा रात्री किती वेगळी भावत असे. रात्रीचा गारठा, सोबत रातकिड्यांची किर्र्रर्र, अंधूक दिवे, नटून ठटून आलेले लोकं, मध्ये खुर्च्या आणि बाजुला असलेली भारतीय बैठक, समोरचा मरून रंगाचा वेल्व्हेटचा पडदा, लावलेली नाट्यगीतं अन भावगीतं, ... सारं सारं वातावरण अगदी भारून टाकणारं. अन मग उघडला जाणारा पडदा अन त्या मागचे एक पूर्ण वेगळे जग. जणू प्रतिसृष्टीच अवतरायची तिथे.