वसंतोत्सव

वसंत रंगात न्हाला गं
वसंत अंगात आला गं
पळस पांगारा शितल अंगारा
लेवून केशरी झाला
- शांत शेळके
शिशिर ओरडतच येतो की वसंत येतोय आणि वसंत जवळ आला की निसर्गप्रेमी मंडळींचा उत्साह जरा जास्तच दुणावतो. ऋतू बदल सभोवताली नजर फिरवली की आपसूक आपल्या लक्षात येतातच आणि म्हणूनच मार्च उजाडला की आमच्या ग्रुपवर येऊर, राणीबाग किंवा कुठे न कुठे नेचर ट्रेलला जायच का ह्या गप्पांना सुरवात होते. हळूहळू एखादा प्लान फायनल होतो, आणि ठरवलेल्या मेंबराममधून टांगारु लोक गळून मोजकी मंडळी ठरलेल्या ठिकाणी भेटून भरपूर झाड , फुल बघायला मिळतील ह्या आनंदात डेस्टिनेशनकडे कूच करतात.
ह्या मार्चमध्ये तर जरा जास्तच उत्साह जाणवत होता कारण मूर्ख, बावळट कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनी अस जाता येणार होत एकत्र. मला मित्रानी विचारल येऊरला जायच का, सुरंगी फुललेली असेल ? सुरंगीच नाव ऐकल्या ऐकल्या मी लग्गेच हो म्हणून मोकळी झाले कारण आजपर्यंत कोणत्या न कोणत्या कारणाने माझं सुरंगीच झाड बघण्याचा योग्य जुळून आला नव्हता.वेड्या मनाने तर ध्यासच घेतलेला बहरलेल सुरंगीच झाड बघायचच हा.सुरंगीचे वळेसर मिळवायचेच मी दर सिझनला पण फुलांनी लदबदलेल सुरंगीच झाड कधीच बघायला मिळाले नव्हते त्यामुळे हा मोका मी हातचा सोडणार नव्हतेच. 20 मार्चच्या शनिवारी आमची येऊर ट्रिप फायनल झाली आणि माझं मन सुरंगीच्या सुवासात,आठवांत न्हाऊन निघाल. फक्त पेपरमध्ये वाचून माहीत असलेली सुरंगी पहिल्यांदा दिसली ती ठाण्याला लॉ करताना मैत्रिणीबरोबर ठाणा मार्केट फिरताना आणि हरखून गेलेले मी तीच रूप बघून, तिच्या मत्त सुवासाने तेव्हाच मनावर आयुष्यभराच गारुड घातल.लॉ कॉलेजला असताना ठाणा मार्केटमधून विकत घेतलेले अनेक सुरंगीचे वळेसर आठवले आणि कॉलेजमधली सुरंगी वेड्यासारखी आवडणारी एक खूप प्रेमळ मैत्रीण सीमा पण आठवली आणि नंतर कितीही शोधाशोध केली तरी अजूनही न सापडलेल्या ह्या मैत्रिणीच्या आठवणीत डोळ्यांत पाणी आल. कॉलेज झाल्यावर प्रॅक्टिस करताना कल्याण आणि उल्हासनगर कोर्ट स्टाफमधल्या एक मॅडम ह्या सिझनला वाड्याला आपल्या गावी गेल्या की ( त्याही सुरंगीच्या ओढीनेच गावी जायच्या सुरंगीच्या सीझनमध्ये) सोमवारी येताना माझ्यासाठी आवर्जून सुरंगीचे वळेसर घेऊन यायच्या ते आठवल. त्या मॅडमकडूनच समजलेलं मला की कश्या सूर्योदयापूर्वी किंवा आदल्या संध्याकाळीच सुरंगीच्या टपोऱ्या कळ्या काढून घ्याव्या लागतात आणि गजरे करून ठेवावे लागतात सुरंगीचे कारण सुरंगीची फुल फुलली की गजरा करायला गेलो की पाकळ्या गळतात फुलांच्या आणि गजरे ओवता येत नाहीत त्यांचे. नंतर त्या मॅडम रिटायर झाल्या पण मी ठाण्याला कोर्टातल्या कामानिमित्त चक्कर मारून ठाणा मार्केटमधून सुरंगीचा वळेसर घ्यायचीच तेही आठवल पण गेल्या दोन वर्षात हे शक्य झालं नव्हत कोरोनामुळे आणि सुरंगी मनातच आठवावी लागली होती. म्हणूनच जरा जास्तच आतुरतेने 20 मार्चची वाट बघत होते मी, त्यात सुरंगीची भुरळ तर होतीच पण कौशी, कुंभा, पांगारा,ह्यावर्षी जवळून बघायला हुलकावणी दिलेला पळस अशी इतरही बरीच कारण होतीच हुरळून जायला.अजूनपर्यंत फक्त सोमि वरच भेटलेले पण मैत्र जुळलेले प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटणार होते त्यात मी सोडून बाकी सगळेच निसर्गाच्या शाळेतले माझे गुरू म्हणता येतील इतके माहितगार होते त्यामुळे भरपूर नवनवीन माहिती कळणार होती.
आदल्या दिवशी संध्याकाळी नवऱ्याला खाऊ आणायला पिटाळल आणि बॅग पॅक करून 20 मार्च उजाडायची वाट बघत बसले. 20 ला भल्या पहाटे उठून येऊरला जायला कूच केल कारण साडे-सात ते साडे-आठ/नऊ ही फुललेली सुरंगी बघायची उत्तम वेळ, ती गाठायची होती. येऊरला पोचल्यावर ग्रुपमधले इतर जण यायला वेळ होता म्हणून जवळचीच झाड निरखायचा प्रोग्रॅम सुरू केला.जवळच पांगारा फुललेला होता पण गेल्या 15 वर्षांपासून मुंबई-पुण्यातल्या शहरी भागांतले पांगाऱ्याचे वृक्ष कोणत्यातरी विषाणूच्या आक्रमणात म्लान झाले आहेत, ना धड अंगभर फुलत ना त्यांना धड पालवी येतेय. तरीही पांगारा आपली थोडीफार फुल घेऊन सुर्योपासक असल्याप्रमाणे सूर्याकडे मान उंचावून बघत सुर्यराजाची आळवणी करत उभा होता. पांगाऱ्याला संस्कृत मध्ये रक्तपुष्प हे अगदी चपखल बसेल अस नाव आहे कारण अगदि लालभडक रंग असतो ह्याच्या फुलांचा. पळस आणि पांगाऱ्यात बरेचदा, बऱ्याच जणांची गल्लत होते कारण दोन्ही झाडांना त्रिदलीय पाने येतात, लालभडक सूंदर फुले येतात आणि दोन्ही झाड भरभरून फुलतात. ह्या साधर्म्यामुळेच पांगाऱ्याच एक संस्कृत नाव पण कंटकी पलाश- काटेरी पळस हे आहे.पण पांगारा काटेरी आहे, ह्याच्या पानांचा देठसुद्धा टोकदार काटयांनी भरलेला असू शकतो आणि हाच मुख्य फरक आहे पळस आणि पांगाऱ्यामधला.दोघांच्या फुलांच्या रचनेत पण फरक असतो तसेच फुलण्याचा काळ पण निदान महाराष्ट्रात तरी थोडा वेगवेगळा आहे म्हणजे पळस फुलून त्याचा बहर ओसरत आला की पांगारा फुलायला लागतो. थंडीत पांगाऱ्याची पानगळ होऊन निष्पर्ण झाडाला ऋतुराज वसंतात दाटीवाटीने बसलेल्या चॉकलेटी रंगांच्या कळ्यांचे 15-20 सेंमी लांबीचे फुलोरे फांद्याफांद्यांच्या टोकाला दिसू लागतात. फांदीच्या खालपासून टोकाकडे एकामागे एक उमलत जाणारी लालभडक, आकर्षक रंगांची नळीसारखी रचना असलेली पाच पाकळ्यांची अतिशय मऊ-मुलायम फुल उमलायला लागली की एक नेत्रसुखद सोहळा महिनाभर रंगत असतो. फुललेला पांगारा त्याच्या आकर्षक रंगामुळे, अनोख्या साजशृंगारामुळे दुरवरूनच आपले लक्ष वेधून घेतो आणि आपले भान हरपायला लावतो. ह्याची इंग्रजी नाव इंडियन कोरल ट्री, व्हेरिएगेटेड कोरल ट्री वाचली तरी त्याची खासियत लगेच लक्षात येते. ह्याचे आणि पळसाचे, बहाव्याचे कूळ एकच- ही सगळीच कडधान्य कुळात( फॅबीसी फॅमिलीत) एरिथ्रीना ह्या प्रजातीत येतात. ह्याच शास्त्रीय नाव आहे एरिथ्रीना व्हेरिएगटा.
फेब्रुवारी संपता संपता मी लेकीला होस्टेलवर सोडण्यासाठी हैदराबादला गेले होते तर विदर्भ आणि तेलंगणात ज्या संख्येने आणि ज्या तर्हेने भरभरून फुललेली पळस आणि पांगाऱ्याची झाड पाह्यला मिळाली की अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायला झाल होत. मी मुंबई - पुण्यात पळस किंवा पांगारा तिकडच्या इतके फुललेले अजूनतरी पाह्यले नाहीत, तिकडची फुललेली ही झाड म्हणजे खरोखरीच फ्लेम ऑफ फॉरेस्ट नाव सार्थ करत होती. जंगलात वणवा पेटलाय असा भास होत होता ही दोन्ही शेकडो भरभरून फुललेली झाड पाहून
तर येऊरला गेल्यावर पहिले पांगाऱ्याने दर्शन देऊन मन खुश करून टाकल, मग जरा आजूबाजूला पाह्यल तर काटेसावर,अंबाडा, पेटारी, रिठा, मोई फुललेले दिसले. इतकी झाड बहरलेली असल्याने भरपूर पक्षीही आसपास दिसत होते, पहिलेच भारद्वाज दिसल्याने सगळेच खुश झालो.सगळी फुल, वेगवेगळे पक्षी बघत, एकमेकांना दाखवत असतो ग्रुपमधले सगळे पोचले आणि आम्ही आज जिच्यासाठी येऊरला आलो होते तिच्याकडे निघालो -सुरंगी.20220407_235614.jpg
वाटेत फुललेले काकड, मोई, जाम, कात्री जास्वंद, लाल, पिवळी, गुलाबी जास्वंद, अबोलीचे ताटवे बघत निघालो. अचानक वाऱ्याबरोबर तो चिरपरिचित धुंद करणारा सुगंध दरवळला. होय,मनावर लक्ष लक्ष मोरपीस फुलवित आसमंतात सुरंगीचा सुवास दरवळत होता. थोडं पुढे गेलो तर समोर सुरंगीचा बहरलेला वृक्ष दिसला. डायरेक्ट फांद्यांवरच पांढरे मोतीच मोती लगडलेत असा भास करून देणाऱ्या कळ्या आणि अगणित टीचभर आकाराची पांढरी सुरंगीची फुलच फुल खोडावर दाटीवाटीने लगडलेली दिसली. खोडाची इंचभर जागाही रिकामी नव्हती, सगळ्या झाडाचं खोड झाकून गेलेलं टपोऱ्या कळ्यांनी आणि इटूक पिटुक आकाराच्या अगणित पांढऱ्या पिवळ्या फुलांनी. किती फुलाव एखाद्या झाडानी अस वाटायला लावत इतकं फुललेल असत बहरलेल सुरंगीच झाड. खोडाची टीचभर जागाही रिकामी नव्हती, ती डायरेक्ट खोडावरची इवलाली सुगंधात न्हाऊन निघणारी फुल बघून ह्याचसाठी केला होता हा अट्टहास अस वाटलं. त्या सुगंधी कुपींवर मधमाश्या आणि भुंग्याचा गुंजारव ऐकताना भान हरपायला होत होत.सुरंगीच शास्त्रीय नाव आहे मॅमिया सूरिगी, संस्कृत नाव आहे सुरापून्नगा. उंडिच्या झाडात आणि सुरंगीच्या झाडात असलेल्या साम्यामुळे कोकणात ती प्रचलित आहे रानउंडी ह्या नावाने.परंतु फुलांवरून आणि फळांवरून दोन्हीतला फरक लगेच ओळखता येतो.सुरंगीच फुल असत लांब देठाचं, चार पांढऱ्या समोरासमोर असणाऱ्या जाडसर पाकळ्यांच आणि मध्यभागी भरपूर पिवळेधम्मक परागकण दाटीवाटीने खेटून उभे असतात.सुरंगीत नर झाड आणि मादी झाड वेगवेगळ असत.नर झाडाच्या फुलांमध्ये फक्त पिवळे सुगंधी पुंकेसर असतात तर मादी झाडाच्या फुलांमध्ये पेल्यासारखा आकार, एक लाल स्त्रीकेसर-जायांग असत आणि भोवती पिवळे पुंकेसर असतात.नर सुगंधी फुले खूप सुगंधी असतात त्यामानाने मादी फुलांना कमी सुवास असतो. फळधारणा देखील मादी फुलांनाच होते, नर फुलांना फळधारणा होत नाही. मादी फुलांच्या पाकळ्या गळून गेल्या की अंडाकृती फळ लागतात व फळामध्ये बिया असतात.ती फळ पक्षी खातात आणि त्यांच्या विष्ठेमार्फत बीजप्रसार होऊन नर आणि मादी रोपांची उत्पत्ती होते. बाजारात सुगंधामुळे नर फुलांनाच मागणी असते, सुरंगी पासून अत्तर पण बनवतात. कोकणात नर झाडाला सुरंगी आणि मादी झाडाला बुरंगा म्हणतात. मला हे कळलं तेव्हा गंमत वाटलेली कारण नाव ठेवताना उलट झाल्यासारखं वाटतय न ही नाव वाचून.सुरंगीची पान तुकतुकीत, चमकदार, लांबट काहीशी चाफ्याच्या पानांसारखी असतात. सूंदर पानांमुळे इंग्रजीत सुरंगीला cute leaf tree असही म्हणतात. आम्ही गेलेलो तिथे नर आणि मादी अशी दोन्ही झाड होती. त्यातल्या मादी बुरंगोवर निसर्गाचा अजून एक चमत्कार बघायला मिळाला,ओंबिलच पानांवर बांधलेल घरट बघायला मिळाल पण सुरंगीची नशा इतकी तेज होती की कोणीही त्याचा फोटोही काढला नाही. सुरंगीच्या फुलांच वेगवेगळ्या अँगलमधून भरपूर फोटोसेशन झाल,अगदी भुंगे आणि मधमाश्यांच गुंजन रेकॉर्ड करत व्हिडिओही बनवले. मन भरतील इतकी फुल गोळा केली,ओंजळभर फुलांचा सुगंध श्वासांत खोलवर भरून घेतला आणि सरतेशेवटी तिथून निघालो.
एव्हाना नऊ -साडे नऊ वाजून गेले होते आणि भल्या पहाटेच घरातून निघाल्याने पोटात कावळ्यांनी शाळा भरवली होती. म्हणून एक खाऊ ब्रेक घेऊन सगळ्यांनी आणलेल्या खाऊवर यथेच्छ ताव मारून मग मोर्चा वळवला तो कुंभाकडे पण हाय रे नशीब, यंदा कुंभा लवकर फुलून गेलेला त्यामुळे चुकार 4-5 फुल होती झाडावर आणि तीही अगदी उंचावर. लहान कुंभाच्या आकाराची फळ मात्र बघायला मिळाली. तिकडेच बाजूला कामल, कुंकूच फुललेल झाड बघायला मिळालं मग त्याच्या फुलांनी हात रंगवून झाले, त्याचही फोटोसेशन झाल,ह्याच्या फळांचा वापर फूड कलर म्हणून करतात.बाजूच्याच भरभरून बहरलेल्या उक्षीच्या मऊ- कोवळ्या पालविला हाताळून तिचा हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर हा लहानपणीचा खेळ एकमेकांना खेळून दाखवत पुढे निघालो.कुठे गर्द गुलाबी काटेसावरीचा नखरा तर कुठे पेस्टल पिस्ता रंगाच्या उक्षीचा बहर, कुठे पांढऱ्या रंगाच्या कुंभाच्या फुलांचा तोरा तर कुठे भडक केसरिया रंगात न्हाऊन निघालेली कौशी, गडद गुलाबी फुलांनी पूर्ण बहरलेला टबुबिया तर पांढऱ्या / हलक्या पिवळसर , जांभळ्या लहाल लहान फुलांच्या फुलोऱ्याने सजलेले मोई, काकड, अंबाडा, पेटारी तर कुठे लालभडक रंगाच्या फुलांनी निळ्या आकाशाला सुशोभित करणारी पांगाऱ्याची फुल, कुठे निष्पर्ण वृक्षांच्या आकृत्या निळ्याशार आकाशाच्या बॅकराउंडवर खुलून दिसत होत्या तर कुठे काळ्या कुडाच्या नाजूक सुगंधी फुलांनी वातावरण भारून टाकल होत. मस्त भडक केशरी रंगांची फुल मिरवत उभी असलेली कौशी, कच्ची फळ अंगभर लेवून उभा असलेला फालसा, मोजकीच 10-15 फुल मिरवत तरीही सगळ्यांच लक्ष स्वतःकडे खेचून घेणारा काळा कुडा, अजून फुलायची वाट बघत उभे असलेले ऐन, पळस,कुसूंब, साग, मोह अशी कितीतरी झाड बघत परत यावच लागेल हे वैभव अनुभवायला, स्वतःतळ हळवेपण जिवंत ठेवायला अस म्हणत शेवटी परतीच्या प्रवासाला लागलो ते श्वासांत, गात्रांत, मनात खोलवर रुजलेल्या सुरंगीच्या सुवासासोबत.

सुरंगी
20220407_235506.jpg

सुरंगीचे वळेसर
20220407_235549.jpg

पांगारा
20220407_235455.jpg

उक्षी
20220407_235439.jpg

कुंभा
20220407_235422.jpg

कौशी
20220320_123454.jpg

शेंदरी-कलम(ह्याच्या फळापासून फूड कलर बनवतात)
20220407_235538.jpg

काळा कुडा
20220407_235527.jpg

शाल्मली-काटेसावर
20220313_114704.jpg

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle