कौन देता है जान फुलों पर
कौन करता है बात फुलों की
कित्येक रूपांत ही वेगवेगळी फुलं आपलं मन मोहवत असतात. कधी त्यांच्या सुवासाने तर कधी नजर हरखून जाईल अश्या रंगांनी फुल आपलं अस्तित्व दाखवत असतात, आपलं भावविश्व समृद्ध करत असतात. मनाचा हळवा कोपरा जपणारी ही फुलं म्हणूनच तर कित्येक कविता, गाणी फुलांशिवाय अपूर्ण असतात.
झाडांबद्दल बोलायचं तर आपल्या पर्णसंभाराच वैभव दिमाखात मिरवत उभी असलेली हिरवीगार झाडं, फुलांच्या बहराने वेडावलेली झाडं ते अगदी शिशिरातली पानगळ झेलून पण उद्याच्या हिरव्या भविष्याची खात्री बाळगत उभी असणारी एखाद्या तपस्वासारखी भासणारी झाडं - अशी झाडांची सगळी रूपं आपल्याला भावतात. कधी झाडांच्या मऊ, मुलायम, लुसलुशीत कोवळ्या गुलाबीसर, पोपटी पालवीचं सौंदर्य लुभावत तर कुठे कोणाच्या कळ्या झाडाला शोभिवंत करत असतात तर काही झाडांची फुलं बहरात झाडाला आगळं-वेगळं लावण्य बहाल करून देतात तर काही झाड सुगंधी बरसात करून मोहात पाडत असतात. पानगळ झालेली बोडकी झाडं आपल्या निष्पर्ण फांद्यांनी एखाद्या नृत्यांगनेची नृत्याराधना आठवायला लावतात. काही झाडं फळांनी लगडल्यावर सुंदर दिसतात तर सावरीसारख्या झाडांच्या शेंगा उकलून त्यांतला कापूस शेंगातून उडायच्या बेतात असताना कोवळ्या उन्हात देखणेपणाची हद्द पार करत असतात.
फुलांबद्दल बोलायचं तर टीचभर आकारापासून ते ओंजळीत मावणार नाही इतक्या मोठ्या आकारात कोणती न कोणती फुलं फुलतच असतात वर्षभर - फक्त आपण डोळसपणे भवताल बघायला शिकायला हवंय.
निसर्गाने आपल्याला खूप दिलंय, फक्त आपल्याला ते घेता आलं पाहिजे. कितीही पानगळ होऊ देत, निसर्गाची लय कधी बिघडत नाही, त्याची आनंदी लय कायम रहाते. फक्त ते जाणवण्याइतकं तरल मन आपल्याला जपता आलं पाहिजे म्हणजे कळत निसर्ग काय सांगतोय आपल्याला ते.
ज्या फुलांना रंगांचा साज नसतो त्यांच्या अंतरंगात सुगंधाच भांडार असतं तर सुगंधाने पाठ फिरवली असेल तर रंगांची बहार असते तर काही फुलांना रूप- गंध ह्या दोहोंची साथ असते, पण कसेही असले तरी प्रत्येक फुल खास असते. ते त्याला नेमून दिलेलं काम इमाने इतबारे करत असतं. जे जवळ नाही त्यावरून रडत बसणे नाही, की आहे त्याचा माज नाही, अप्लायुषी असो, नाहीतर आठवड्याभराचं आयुष्य असो, वाऱ्यावर आनंदाने डोलत जगणारी ही फुलं न रडता आहे ते आनंदाने स्वीकारून सदा सुखी कसं रहावं, ह्याचा पाठ देत असतात आपल्याला.
तर ह्या मालिकेत आपण जाणून घेऊयात वेगवेगळ्या फुलांबद्दलची माहिती.