शेवंती( Chrysanthemum )
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते...
किल्वरच्या आकाराची फुलांच्या सुगंधात स्वतःलाही माखून घेऊन स्वतःला सुगंधी करून घेतलेली काळपट हिरवीगार पान लेवून वर्षभर जरा दुर्लक्षित असलेल शेवंतीच झुडूप थंडी पडायला लागल्यावर मात्र गोल गोल मण्यांच्या माळा अंगोपांगी माळून स्वतःकडे सगळ्यांचच लक्ष वेधून घ्यायला लागत. दिसामाजी ते बारके गोल-गोल मणी भरीव होत जातात आणि एखाद्या बटणासारखे दिसायला लागतात. मग एखादया दिवशी त्या बाळसेदार कळीमधून सकाळच्या थंडीत सूर्याची उगवत्या किरणांची ऊब लेऊन एखाद- दुसरी पाकळी बाहेर डोकावून बाहेरच्या जगाचा अंदाज घ्यायला लागते. तीच बाहेरच्या जगाबद्दलच रंगबिरंगी वर्णन ऐकून दुसऱ्या पण काही पाकळ्या हिम्मत करून दुसऱ्या दिवशी घुंगटातून बाहेर पडतात. एकीच पाहून दुसरी, दुसरीच पाहून तिसरी,तिसरीच पाहून चौथी अस करत करत आठ- दहा दिवसांत सगळ्या पाकळ्या उमलून भरगच्च संपूर्ण फुललेल शेवंतीच फुल फुलत आणि बघणाऱ्याचा नजरेला आनंद देत.संपूर्ण झाडभर शेवंतीच्या फुलांचच राज्य असत मग पुढचे काही दिवस कारण भरपूर पाकळ्या असलेलं शेवंतीच फुल टिकतही बरेच दिवस.शेवंतीचा सुगंध कितीतरी वेळ हाताला येत राहतो फुलाला हात लावल्यानंतर आणि गंमत म्हणजे फुल नसतानाही बेमौसम सुद्धा त्या सुगंधाची आठवण आली तर बिनदिक्कत शेवंतीच्या झाडाजवळ जाऊन त्याच्या पानांना आजारा- गोंजाराव,हाताला तोच फुलांचा सुगंध येतो आणि खूप वेळ दरवळतही राहतो.
पिवळी आणि पांढऱ्या शेवंतीसोबतच माझी लाडकी बटन शेवंतीची फुलही फार गोड दिसतात.शेवंतीला देवाच्या पूजेत, हारात जस अढळ स्थान मिळालय तसच शेवंतीच्या वेणीने देवीबरोबरच तमाम स्त्रियांच्या अंबाड्या,वेणीची पण कायमच शोभा वाढवली आहे.शेवंतीच्या फुलांना लहानपणी
पुस्तकांमध्ये,वह्याममध्ये सुकवून तो सुगंध आणि तीच रूप टिकवायचा निरागस वेडेपणा केला असेलच ना तुम्हीही?