कोरांटी

कोरांटी / वज्रदंती

20211113_121100_1.jpg

पाऊस संपता संपता ऑक्टोबरमध्ये कोरांटिच्या झुडपांना कळ्यांचे झुबके धरायला लागतात आणि उन्ह पिऊन, थंडी लेवून नोव्हेंबरमध्ये कोरांटी फुलू लागते. पहिल्यांदा चार दोन फुल दिसायला लागतात आणि मग थंडी वाढायला लागली की बघता बघता फुलच फुल झाडावर बागडून आपल्याला खुणावू लागतात. कोरांटी खूप रंगात आढळते- मी ह्या तीन रंगांत पाह्यलीये कायमच- पिवळी, पांढरी आणि जांभळी.भारत, म्यानमार ते दक्षिण चीन, जवळजवळ संपूर्ण आशियात आढळणाऱ्या ह्या झाडाचं शास्त्रीय नाव आहे Barleria prionitis - पिवळी कोरांटी,Barleria cristata - जांभळी आणि पांढरी कोरांटी आणि फॅमिली आहे Acanthaceae. जांभळ्या कोरांटिला Blue bell barleria तसच Philippine violet, porcupine ही नाव पण प्रचलित आहेत आणि ह्याची फुल इतर दोन कोरांटिच्या फुलांपेक्षा आकाराने थोडी मोठी असतात. पांढऱ्या कोरांटिला White Philippine violet हे नाव प्रचलित आहे आणि ह्यात दोन प्रकार असतात. मोठी फुल असलेली देव कोरांटी असते जीच्या फुलांचा आकार, पुष्पकोश, पानांचा आकार ह्यात फरक असतो. जांभळ्या कोरांटीचेही दोन प्रकार मी पाह्यलेत त्यातही पुष्पकोश आणि पाना- फुलांच्या आकारात फरक आहे.

हा एक प्रकार जांभळ्या कोरांटीचा

20211113_121246_0.jpg

आणि हा दुसरा प्रकार जांभळ्या कोरांटीचा

20220411_001136_0.jpg

20220411_001106_0.jpg

पटकन फुल काढायला गेल्याशिवाय पिवळ्या कोरांटिचा तेज नखरा समजत नाही पण जेव्हा फुल काढताना ह्या काटे कोरांटिचे काटे हाताला बोचतात तेव्हाच समजत हे पाणी वेगळंच आहे कारण पांढऱ्या आणि जांभळ्या कोरांटिला काटे नसतात. ऑरनामेंटल प्लान्ट म्हणून ओळखल जाणार हे झाड खरतर कोणी आवर्जून लावत नाही पण हे सहजच आसपास दिसणार झाड आहे आणि वाईडली पसरणार झाड असल्याने एकटदुकट झाड कधीही दिसत नाही. मोकळ्या जागेत तर तण माजाव तशी ह्याची रोप पसरतात आणि नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये फुलली की बघणाऱ्याच भान हरपवतात. ह्याच्या फुलांचा उपयोग गजऱ्यासाठी केला जातोच पण आयुर्वेदात ह्याचे भरपूर औषधी उपयोग सांगितले आहेत.भारताबाहेरही ह्याची पान- फुल- मूळ औषध म्हणून वापरतात.कोणतंही आयुर्वेदिक औषध वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये ह्या ठाम मताची असल्याने मी कोरांटिचे औषधी उपयोग इथे देत नाहीये.
पिवळ्या कोरांटिचा तजेलदार थोडा भगव्या रंगाकडे झुकणारा रंग मन एकदम प्रफुल्लित करतो आणि त्याच्या फुलांनी ओंजळ भरली की परागकण हातावर पण त्या झळाळत्या रंगाचा शिडकावा सोडून जातात.जांभळ्या कोरांटिचा हलका, तरल रंग मन हळुवार करत. त्याचे निळसर झाक असलेले परागकण तर सौंदर्याची परिसीमाच आहेत. पांढऱ्या कोरांटिची फुल म्हणजे तर अगदी शुभ्र काही जीवघेणे ह्याच ओळींची आठवण करून देतात.अजूनही ही फुल दिसताच क्षणी मला माझ बालपण झरझर नजरेसमोर तरळून जात कारण तेव्हा सिझनला मी रोज कोरांटिचे गजरे माळून अगदी स्वतःला फ्लॉवरपॉट बनवून शाळेत जायचे.मैत्रिणी,शाळेतल्या शिक्षिका ह्यांनाही बरेचदा ह्याचे गजरे बनवून द्यायचे.आमच्याकडे पिवळी आणि पांढरी कोरांटी होती तर शाळेत जातायेता ज्यांच्याकडे जांभळी कोरांटी होती त्यांच्याकडून त्याची फुल मागून घेऊन यायचे. पिवळ्या कोरांटिची फुल काढताना त्याच्या काटयांनी हातावर इतके ओरखडे यायचे पण त्याचा गजरा माळायला मिळणार ह्या आनंदापुढे तो त्रास काहीच वाटायचा नाही. गजरे पण अगदी सुईनी, बिन सुईचा नुसत्या दोऱ्याने, भरगच्च चारही बाजूने फुल येतील असा ओवलेला किंवा दोन- बाजूंना फुल येतील असा दोन- दोन फुलांनी ओवत करायचे. रोज वेगळ्या पद्धतीने ओवलेला गजरा माळून अगदी फ्लॉवरपॉट बनून जायचे मी शाळेत.नंतर तर जांभळ्या कोरांटीच पण कटिंगच लावलेल मी आमच्या अंगणात.
हळूहळू मोठ होताहोता तो सगळा उत्स्फूर्तपणा, हौस निसटून गेली आणि गजरे माळण जणू काही मी विसरूनच गेले. पण तरीही अजूनही फुललेली कोरांटी दिसली की ओंजळभर फुल गोळा केलीच जातात आणि आज तर चक्क भरगच्च असा हातभार गजरा पण ओवून बघितला.

हा मी ओवलेला गजरा, ह्यात जांभळी फुल दोन प्रकारात ओवलीयेत( एकांत दोन बाजूना येतील अशी नंतर भरगच्च गजरा दिसतो तशी चारही बाजूंनी)

20220411_001148_0.jpg

ही पांढरी कोरांटी

20220411_001126_0.jpg

आणि ही पिवळी कोरांटी

20220411_001116_0.jpg

20220411_001159_0.jpg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle