काझीरंगा - मेघालय दिवस ५ - चेरापुंजी साईट सीईंग

दिवस ५ -

शिलाँगचं एअर बीनबी सोडून आज चेरापुंजीला रहायला जाणार होतो. आवराआवरी आणि ऑम्लेट-ब्रेड नाश्ता करून निघालो.

पहिला थांबा होता mawphlang sacred forest. हे ठिकाण शिलाँगपासून तासाच्या अंतरावर आहे. खासी जमातीची देवराई म्हणता येईल. एक पठार आणि त्याला लागून जंगलाचा भाग आहे. जंगलाच्या बाहेरच ३ मोनोलिथ्स आहेत.

mawphlang2.jpeg

mawphlang.jpeg

हे जंगल गेली अनेक वर्षं खासी जमातीने जपलं आहे. आतमधली एकही वस्तू - पान, फूल बाहेर आणून चालत नाही. अगदी सुकलेलं पानही नाही. नेटवर कर्स - शापाचा उल्लेख वाचला होता. आतमधे रूद्राक्षाचं झाड दिसलं. पक्षांचे आवाज येत होते पण उंच झाडांमुळे दिसत नव्हते. गाईडने बरेच ट्रिक फोटोज काढले.

हा एक -

trick1.jpeg

साधारण अर्ध्या तासाचा ट्रेल होता. आम्ही अर्धा ट्रेलचं घेतला होता. पूर्ण ट्रेल अजून पुढे १-२ किमी जंगलातून आहे. आतमधे पशुबळीसाठी मुक्रर केलेले दगड आहेत. गाईड माहीती देत होता पण मी जास्त ऐकलं नाही. लहानपणी ह्या जंगलात यायला भिती वाटायची असं काहीतरी सांगत होता. पशुबळी रेग्युलर देतात का कळलं नाही.

mawphlang3.jpeg

पुढचा थांबा होता elephant falls. हा अगदीच पटेल पॉईंट निघाला. नुसती गर्दी कारण व्यवस्थित बांधलेल्या पायर्‍या होत्या उतरायला. आणि धबधबाही काही खास नव्हता.

इथून निघून wei sawdong नावच्या धबधब्यावर जायचं होतं. वाटेत स्काय व्ह्यू पॉईंट लागला. छान बांधलेल्या पायर्‍या आहेत. ठिकठिकाणी व्ह्यू पॉईंटस आहेत. तिथून दिसणारा नजारा -

sky1.jpeg

wei sawdong हा ३ टप्प्यांत पडणारा धबधबा आहे. सगळे धबधबे बघायला मुख्य रस्त्यापासून दरी सदृश जागी चालत / पायर्‍यांनी उतरत जावं लागतं. ह्या धबधब्याला जायला सुरुवातीला थोड्या बांधलेल्या पायर्‍या आणि मग ५-६ बांबूच्या शिड्या आहेत. त्या शिड्यांवरून उलटं वळून उतरावं लागतं होतं. तशी भिती नव्हती, खोल दरी वगैरे नव्हती. अगदीच शिडी तुटली असती (वजनाने) तर थोडसं पडलो असतो आणि लागलं असतं. पण मजा आली. adventerous ट्रेक होता.

wei2.jpeg

wei4.jpeg

weishidi.jpeg

हा व्हिडिओ दुसर्‍या पायरीवरून काढलेला

हा एक पॅनोरमा

शिड्या उतरताना लागला त्यापेक्षा कमी वेळात चढून गेलो. मस्त भूक लागलेली होती. वरती अगदी २-३ टपर्‍या होत्या. मॅगी, तिथली भेळ, बरोबर असलेलं सटरफटर खाऊन घेतलं.

तिथून mawsmai cave. आम्ही तिघे गुहेतला अंधार बघून आत गेलो नाही. चुनखडकाचे फॉर्मेशन्स आहेत गुहेत. काही ठिकाणी खाली पाणी आणि उंची कमी, टोकदार दगडही आहेत. एक ग्रुप आलेला त्यातल्या एका काकांना डोक्याला जखम झालेली दिसली. गुहेच्या बाहेर काहीतरी नोटीस लिहायला हवी असं आमचं मत झालं. कोणाला बंद जागेचा फोबिया असू शकतो, किंवा सिनियर्सना गुहेत चालणं कठीण जाऊ शकतं. बाकी बर्याच ठिकाणी जिंगमहान - खासी भाषेत सूचना दिसल्या त्या पार्श्वभूमीवर इथे काहीच माहीती नसणं जरा खटकलं. बाहेर गुहेचा मॅप आहे, एका ठिकाणी निमुळती जागा आहे असाही उल्लेख आहे. पण ते बघितलचं जाईल असं नाही.

हे सगळं होईस्तोवर ५ वाजत आले होते. अंधार पडायच्या आत हॉटेलवर पोचलो. शिलाँगचं हॉटेल - हॉटेल

एका टेकडीवर होतं हॉटेल. नवीनच बांधलं आहे. ह्याच ओनरचं एक हॉटेल चेरापुंजी गावात आहे. तिथे रूम्स उपलब्ध नसल्याने हे हॉटेल बुक केलं. रात्री छान मोकळ आकाश आणि तारे दिसत होते. धबधब्याचा आवाज येत होता. हॉटेलवर जेवणाचेही बरेच ऑप्शन्स होते.

रात्री छान डाळ खिचडी खाऊन झोपलो. झोपताना लाईट गेले. रात्रभर लाईट आले नाहीत. उंचावर असल्याने ढगांचा गडगडण्याचा आवाज जवळून वेगळा येत होता. रात्रभर पाऊस कोसळत होता. दुसर्‍या दिवशी डबल डेकर रूट ब्रिजला जाणं धोक्यात येईल ह्या भितीतचं होतो सकाळपर्यंत.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle