दिवस ६ -
मेघालयात जायचं ठरवलं तेव्हा ह्या डबल डेकर रूट ब्रिजचे असंख्य व्हिडिओज पाहीले होते.
नेटवरील माहीतीनुसार - मेघालयात हे लिव्हिंग रूट ब्रिजेस अनेक ठिकाणी आहेत - रबर / रबर फिग ह्या झाडाची (जिवंत झाडांची) मूळं वाकवून, मधे मधे आधार देऊन खासी लोकांनी हे ब्रिज बांधले आहेत. इथे खूप पाऊस पडत असल्याने मनुष्यनिर्मित पूलांचं आयुष्य तेवढं नसतं. असे सिंगल ब्रिज अनेक आहेत. नॉन्ग्रियाट गावात असे २ पूल एकावर एक असे आहेत. तिथे पोचण्यासाठी अंदाजे ३५०० पायर्या उतरून जावं लागतं. Tyrna ह्या गावातून हा ट्रेक सुरू होतो. व्यवस्थित बांधलेल्या पायर्या आहेत. वाटेत २ लोखंडी सस्पेंशन ब्रिजेस लागतात. स्टॅमिनाचा कस बघणारा ट्रेक आहे हा.
ह्या ब्रिजचे फोटो आणि जाण्याचे व्हिडिओज बघून ही जागा आम्ही काही झालं तरी करायचीच असं ठरवलं होतं. चेरापुंजीचं हॉटेलही बुक करताना ते हा ट्रेक सुरू करतो तिथून जवळ असेल असं बघितलं होतं.
हॉटेल मधून बाहेर हा नजारा दिसत होता. तिन्ही बाजूंना मस्त धबधबे. एका बाजूला सपाट प्रदेश, तो बांगलादेश असं मॅपवर दिसत होतं.
पहाटे उठलो तर बाहेर रात्री पडलेल्या पावसाच्या खुणा आणि बारीक बारीक पाऊस सुरुच. पावसात पायर्या घसरड्या झाल्या असतील का, बरोबर लहान मुलं, इतकं येऊन हा ब्रिज न करताच जावं लागणार असे विचार यायला लागले होते. ओळखीचा एक जण नुकताच येऊन गेला होता त्याने दिलेल्या गाईडला फोन करून ८ वाजता Tyrna गावात भेटू असं सांगितलं होतं. ७ नंतर पाऊस थांबला आणि जरा उघडीप येत्ये असं वाटायला लागलं. Tyrna गावात जाऊन बघू, गाईडशी बोलून ठरवू असा विचार करून चहापाणी उरकलं, बरोबर थोडं खायला घेतलं. Tyrna गावात पोचलो तर बरेच ग्रुप्स आलेले. पाऊस पुर्ण थांबलेला. लुमलँग - आमचा गाईड म्हणाला जाता येईल, छत्र्या बरोबर घेऊन ठेवा अगदीच वाटलं तर. चढा उतरायला सोयीच्या म्हणून बांबूच्या काठ्या भाड्याने घेतल्या. हा फोटो काढून निघालो -
उतरताना अगदीच सोपं वाटलं. बाजूला धरायला रेलिंग आणि हातात काठी त्यामुळे पटापट गेलो. लीनाची ४ वर्षाची मुलगी पर्णवीही अर्ध्यापेक्षा जास्त पायर्या कडेवर न बसता उतरली. शिरीन आणि तिचा मुलगा असे लुमलँगला पूर्ण रस्ता पिडत होते - किती पायर्या झाल्या, अजून किती वेळ. त्याची छान करमणूक झाली असणार ह्यांच्या हिंदी इंग्लिश प्रश्नांच्या मार्याने. तो पण छान उत्तरं देत होता. चढताना मी ह्याच प्रश्नांचा त्याच्यावर मारा केला. बिचारा सिंसियरली किती पायर्या राहील्या सांगायचा.
पहीला सस्पेंशन ब्रिज -
लोखंडी ब्रिज होता. २ पेक्षा जास्त जण गेले तर थोडा हलत होता. लुमलँगने एकेकाला जायला सांगितलं. खालून धुवाधार पाणी वहात होतं. मोठे मोठे खडक त्यातून उड्या घेणारं पाणी. एकदा आजूबाजूला बघितलं आणि पूर्ण ब्रिज पार करताना फक्त खालची वाट आणि पाय एवढीच नजर ठेवून ब्रिज पार केला.
हा दुसरा सस्पेंशन ब्रिज -
हा तुलनेत ब्रॉड होता आणि कमी हलत होता. उंची पण जास्त वाटली ह्याची. शेजारी असलेला जुना ब्रिज ह्या फोटोत दिसतोय -
ह्या जुन्या ब्रिजच्याही आधी लिव्हिंग ब्रिज होता तो पडला म्हणे. त्याचे अवशेष दिसले पण फोटो काढायचा राहीला.
डबल डेकरला जाताना हा एक सिंगल रूट ब्रिज पार केला -
इथून पुढे थोड्याच पायर्या होत्या. सलग उतरायचं नव्हतं. मधे मधे पायर्या चढायच्याही होत्या. एकदाचे पोचलो -
जास्त गर्दी नव्हती. आलेले सगळे ग्रुप्स दोन्ही ब्रिजवर फोटो काढून घेत होते. सगळ्या गाईडसना फोटो काढण्याचं एक अॅडिशनल काम.
ह्या फोटोत दिसत आहेत त्या पयर्या पार करून पलीकडच्या दगडावर पण बसलो थोडा वेळ. लुमलँग खूप मदत करत होता. कुठे घसरडं आहे कुठे पाय ठेवा वगैरे सूचना देत होता.
शिरीन आणि मी -
सगळ्या फोटोसेशनच्या आधी एका टपरीवजा हॉटेलमधे मॅगी, ब्रेड बरोबर आणलेलं काय काय, चहा , बिस्किट खाऊन घेतलं.
साधारण दिड तासात खाली पोचलो. लुमलँग म्हणाला तुमचा सगळ्यांचा स्टॅमिना चांगला आहे. हेच वाक्य चढताना म्हणाला म्हणजे झालं असं मला मनातल्या मनात झालं.
पोटभर धबधबा, ब्रिज मनात साठवून, फोटो काढून परतीच्या वाटेला लागलो. ब्रिजच्या पलीकडे गाव आहे.तिथे होमस्टे आहेत. हीच वाट पुढे रेनबो ब्रिज आणि ब्लू लगूनला जाते. जे लोक ह्या गावात राहतात ते ही २ ठिकाणं करतात. लुमलँग म्हणाला अजून रेनबो धबधबा म्हणावा तेवढा नाहीये, रेनबो दिसायला ऊन्हाची वेळ गाठावी लागते आणि तुमच्या बरोबर मुलं आहेत तर एवढं अंतर जाऊन पुन्हा वर पोचायला अंधार होईल. सगळा विचार करून रेनबोचा विचार रद्द केला. रेनबो फॉल्स सर्च केलं तर बरेच व्हिडिओज मिळतील.
वाटेत एक सिंगल रूट ब्रिज लागतो. थोडी वाकडी वाट करून आहे.
इथे एका वेळी फक्त २ च लोक उभे राहू शकतात. हा ब्रिज ओलांडून लोकांची शेती आहे. डबल डेकर ब्रिज हा नॉन्ग्रियाट गावतल्या लोकांनी त्यांच्या रोजच्या कम्युट साठी बांधलेला आहे. आम्ही उतरत असताना शाळेची मूलं चढत होती.
सिंगल ब्रिज बघून एका सस्पेंशन ब्रिजपाशी भेळ खाल्ली. लुमलँगलाही आमच्या महाराष्ट्राची स्पेशॅलिटी म्हणून दिली :)
एकदाचे वर पोचलो - लुमलँगबरोबर फोटो -
चढताना एक स्ट्रेच खूप स्टीप आहे. मधे मधे थांबत पाणी पित चढलो. चांगलचं दमायला झालेलं.
ब्रिजपाशी जी टपरी होती तिथल्या मुलीला विचारलं इथेच तुझं गाव आहे का तर म्हणाली गाव हेच पण राह्ते चेरापुंजीला (सोहरा - तिथले लोक सोहरा म्हणतात चेरापुंजीला). रोज जॉबसाठी ३५०० पायर्या चढ उतार, तरीच चवळीची शेंग होती. इथे बुडाशी गाडी/रिक्षा आहे तरी महीन्यातून एक आठवडा ऑफिसला जायचं तर मी इतकी कट्कट करत होते त्याची लाज वाटली.
वर पोचलो तेव्हा ३:३०-४ झाले होते. चहा-सरबत घेऊन लुमलँगला टाटा केला. तो तिरना गावातलाच आहे. ओळखीचं कोणी आलं तर नक्की नंबर शेअर करु असं आश्वासन दिलं.
हॉटेल अगदी १०-१५ मिनिटांवर होतं पण अचानक इतकं धुकं पडलं. हॉटेलवर पोचून हुश्श केलं.
मस्त गरम पाण्याने आंघोळी केल्या, थोडं खाऊन आराम केला. जेवून लगेच पडी टाकली.