मार्च मधले असे सूर्य, उन यांच्या सोबतचे काही दिवस गेले की आपण खुश होतो, पण अजून थंडीची एक शेवटची लाट येणे बाकी असतं. आपला उत्साह कधी कधी, खास करून सुरुवातीला पहिल्या दोन तीन वर्षात असा असतो, की मोठे जॅकेट्स, बूट सगळे नीट पॅक करून कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात टाकले जातात. सवयीने मग हे उन फसवं आहे, अजून एक किंवा दोन वेळा थंडी पाऊस, जोरदार वारा यांची भेट व्हायची आहे हे समजायला लागतं.
काही झाडांचा आलेला बहर हा अगदी आठवडा भरात पूर्ण गळून पडतो. अरे आत्ता तर हे झाड फुलेले होतं आणि आता सगळी फुलं गेली सुद्धा असं वाटतं. पण काही फुलं असतात ती चांगली चार आठवडे टिकतात. आणि काही झाडं मात्र याच वेळेची वाट बघत आता बहरायला लागतात. अगदी नाजूक फांद्यावर लगडलेली फुलं, काही डेरेदार मोठी झाडं आणि तरी नाजूक फुलं, काही दाटीवाटीने स्पर्धा करणारी, फुल आणि फुलाची पाकळी यातला फरक कळणार नाही असे गुच्छ, रस्ता रस्ता भरून हीच फुलं. त्यामुळे एखादा रस्ता गुलाबी फुलं गळून हिरवा दिसतो, तर दुसऱ्या कोणत्या रस्त्यावर वेगळी फुलं दिसायला लागतात. खाली गळून पडलेल्या फुलांच्या पाकळ्या त्या झाडांच्या आसपास सगळी कडे दिसतात आणि ते दृश्य पण अप्रतिम दिसत असतं.
हे सगळं चालू असताना एकीकडे हिरवा रंग खूप जास्त दिसायला लागतो. जागोजागी फुलं उगवतात. सगळ्या गावांमध्ये गल्ली गल्लीत, लोकांच्या अंगणात ट्युलिप दिसू लागतात. तशी सगळी फुलं छान दिसली तरी ऑर्किड, ट्युलिप यांची आपापली ऐट आहे. गावागावात जे रस्त्याचा मधोमध सर्कल असतात, तिथे तर रंगीत फुलांची रांगोळी असते. लागवड पण देखणी असते, मध्येच कोणतं फुल आलं असं नाही, तर अगदी नीट विचार करून रंगसंगती प्लॅन करून फुलांची रचना असते. लॅम्प पोस्ट वर पण डेरेदार फुलांचे गुच्छ दिसतात.
अजून एक, हा इथला फार आवडता प्रकार - Blumen selbst schneiden. बरीच शेतं असतात जिथे, भरपूर फुलं दिसतात आणि स्वतः काढून ती नेता येतील अश्या पाट्या असतात. दोन तीन गाड्या पार्क करता येतील अशी जागा असते आणि एक टेबल, ज्यावर पाच सहा सुऱ्या ठेवलेल्या असतात आणि प्रत्येक प्रकारच्या फुलांची किंमत दिलेली असते. मार्च ते सप्टेंबर दरम्यान ट्युलिप, सूर्य फूल, डेलिया आणि इतरही बरीच प्रकारची फुलं दिसतात. आपण स्वतः आवडतील ती फुलं घ्यायची, हिशेब करून तिथेच एक पेटी असते त्यात पैसे टाकायचे. कुणीही नसतं तिथे चेक करायला, तरी लोक पैसे देतात. शंभर टक्के नसतील कदाचित, पण तरी हे असं शेत मेहनत घेऊन लावणं आणि केवळ लोक प्रामाणिक असतील आणि पैसे देतील असा विचार करून विश्वास ठेवून दर वर्षी हे करणारे लोक हे चांगुलपणावर विश्वास ठेवायला भाग पाडतात. काही ठिकाणी या पाटीवर 'फुलांचे पैसे दिले तरच ती फुलं आनंद देतील' असं पण लिहिलेलं असतं.
ईस्टर आठवड्यावर येऊन ठेपतो, अनेकांना सुट्टी चे वेध लागतात. कुठे जायचं याचे प्लॅन झालेले असतात. उन आलं, थंडी कमी झाली की हे ससे आपल्या जमिनीतल्या बिळातून बाहेर पडतात आणि अंडी हे नवनिर्मितीचं प्रतीक. निसर्ग आणि सण यांचं नातं सगळ्या ठिकाणी सारखच. अनेक रंगीत अंडी (खोटी) झाडांवर टांगलेली दिसतात. रंगवलेली खाण्याची अंडी, किंवा टी घरीच रंगवण्यासाठीचे सामान, अत्यंत क्युट अश्या बास्केट्स दिसायला लागतात. किंडर गार्टन मध्ये पण ईस्टर साठी नवनवीन वस्तू करणे, एक दिवस एकत्र मिळून नाश्ता असे कार्यक्रम असतात. आता यावर्षी तर सृजन ला शेजाऱ्यांकडून ईस्टर ची सरप्राईज गिफ्ट्स पण मिळाली होती. हो आणि ईस्टर नंतर लग्न कर्यांचा काळ असतो, दिवाळी नंतर आपले मुहूर्त असतात तसे. थोड्याच दिवसात चर्च च्या आसपासआणि बऱ्याच गार्डन्स मध्ये या wedding gown घातलेल्या सुंदर्या दिसायला लागतात.
सूर्यफुलाची मोठमोठी शेतं पण दिसतात. आणि रॅपसीड म्हणजे आपल्या मोहरी / सरसो सारखी दिसणारी पिवळी फुलांची शेतं तर फार सुरेख दिसतात. शिवाय बहुतेक वेळा या शेतांच्या आजूबाजूला हिरवीकंच कुरणं असतात त्यामुळे पिवळ्या हिरव्या रंग संगतीत अजूनच उठून दिसतं. घोड्यांचे तबेले बरेच दिसतात प्रत्येक भागात. तिथे पण आजूबाजूच्या मोकळ्या जागेत घोडे चरताना दिसतात आणि बरेचदा घोडेस्वार मुलं आणि अनेक मुली सुद्धा तिथेच रपेट मारताना दिसतात. हिरवाई प्रचंड वाढते. रस्त्याने जाताना बरेचदा खूप गोगलगायी दिसतात. पक्ष्यांचे आवाज सतत सोबतीला असतात. निळं, निरभ्र आकाश आणि त्यात पक्षी, शिवाय अनेक ग्लायडर विमानं पण दिसायला लागतात. हॉट एअर बलून पण दिसायला लागतात. गावागावात वेगवेगळे स्ट्रीट फेस्टिवल्स चालू होतात. काही खाण्याच्या गाड्या, काही दुकानं, लहान मुलांना खेळायला काही खेळणी असं आपल्या जत्रेचं स्वरूप असणारे हे फेस्टिवल्स सगळ्या गावांसाठी एक अभिमानाची आणि मिरवण्याची गोष्ट असते.
याशिवाय द्राक्षांची शेती आणि इथेच पुढे वाईन घेऊन बसलेले लोक हे पण खास वाईन रिजन मध्ये या दिवसांमध्ये दिसणारं दृश्य. आपल्याला उसाच्या शेतात बसून उसाचा रस प्यायला मजा येईल, तशी इथे या शेतात काही ठिकाणी तंबू असतात आणि तिथे वाईन पीत बसलेले लोक दिसतात. मला अशा वेळी हमखास रसवंत्या आठवतात. या दिवसात द्राक्षांची शेती असलेल्या भागात काही शेतांमध्ये लोक वाईन टेस्टिंग साठी जातात. काही तर ट्रेल्स पण असतात जिथे त्यांच्या ठरलेल्या मार्गावर जागोजागी वाईन स्टॉल्स असतात.
घड्याळ एक तासाने बदलतं, नव्या वेळांशी जुळवून घ्यायला पहिला आठवडा जरा अवघड वाटतो. भुकेची वेळ आणि बाहेरचा उजेड यांचा काहीच ताळमेळ लागत नाही. मग त्याचीही सवय होते.
पोलन ॲलर्जी असणाऱ्या लोकांसाठी हा जरा अवघड काळ असतो. भरपूर परागकण हवेत उडत असतात. काहींना फक्त डोळे लाल होणे इतपत त्रास होतो, तर काहींना पूर्ण मास्क धारी बनून राहावं लागतं.
अॅस्परॅगस, strawberry आणि इतरही सात आठ प्रकारच्या बेरीज हे पण या दिवसात सगळीकडे असतात. शेतांमध्ये ऍस्परॅगस आणि strawberry साठी पण पाट्या लागतात, प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून माल खरेदी करता येतो. ज्यात लोकल अर्थव्यवस्थेला हातभार लागतो आणि आपल्याला पण ताजे पदार्थ मिळतात. रेस्टॉरंट्स मध्ये बाहेरच्या जागेत सगळे टेबल भरतात. तिथेही खास उन्हाळी पदार्थांची नावं रोजच्या मेन्यू मध्ये दिसायला लागतात.
हिवाळ्यात अन्न बाहेर ठेवलं तरी चालतं, परंतु आता सगळं फ्रीज मध्ये टाकणे गरजेचं आहे हे लक्षात येण्यासाठी हमखास एखादा पदार्थ खराब होण्याचं निमित्त होतं. मग आता इडली दोस्याचे बॅटर चांगले फुगेल, कडधान्यांना मोड यायला वेळ लागणार नाही हे पण लक्षात येतं आणि रोजच्या खाण्यात पण उन्हाळी पदार्थांचं प्रमाण वाढतं.
वसंत संपून उन्हाळा चालू होण्याची चाहूल लागते. जास्तच ऊन आहे म्हणून तक्रारीचा सूर पण वाढतो. सिलिंग फॅन तसे नसतातच कुठे अपवाद वगळता, पण टेबल फॅन आता बाहेर काढायला हवेत हे लक्षात येतं. स्विमिंग पूल्स कडे जाणारी गर्दी वाढते. उन्हाळी पिकनिक, ग्रिल, बार्बेक्यू, सहली या सगळ्याचे बेत ठरायला लागतात. तर उन्हाळ्याबद्दल आता नंतरच्या भागात.