भारताला अत्यंत संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठेव्याच्या खाणाखुणाही भारतभर अनेक रुपांत विखुरल्या आहेत. त्यातीलच एक रत्नं म्हणजे ऐतिहासिक वास्तू. गड, किल्ले, राजवाडे, वाडे , गढ्या अशा विविध स्वरुपात हा वैभवशाली गतकाळ आपल्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकारी अनास्था आणि जनतेची उदासिनता यामुळे हे अवशेष ढासळत जातात. या अशा एकेकाळच्या देखण्या वास्तूंना पुनरुज्जीवन देऊन मूळचे वैभव परत मिळवून देण्याचा आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना ते अनुभवता येण्यासाठी खुले करून देण्याचा खारीचा वाटा उचलत आहे - नीमराणा हॉटेल्स. कुठला कोण एक फ्रेंच माणूस, श्री. फ्रान्सिस वाक्झिराग, त्यांच्या सरकारचा अधिकारी म्हणून भारतात येतो काय, पुढे योगायोगाने त्याची अन श्री अमरनाथ यांची गाठभेट होते काय आणि मग नीमराणा फोर्ट पॅलेसच्या पुनर्निमाणाच्या निमित्ताने अंकुरलेल्या बीजाचा एक वृक्ष बनतो काय, सारेच अदभुत. यांची साईट मजेशीर आहे. त्यांच्या कडे असलेल्या असंख्य प्रॉपर्टीजचं वर्गीकरणच मुळी त्या कोणत्या शतकातील आहेत त्यावरून केलंय. चौदाव्या शतकापासून ते थेट एकविसाव्या शतकातील अशा एकूण २७ वास्तू ते बाळगून आहेत.
तर ही जुन्या वास्तूंमधून व्यावसायिक हॉटेल्स ( ते त्यांना नॉन-हॉटेल्स म्हणतात) निर्माण करण्याची सुरवात ज्या गढीवजा किल्ल्यातून झाली त्या राजस्थान मधील नीमराणा पॅलेस हॉटेलमध्ये यंदा दिवाळीत जाण्याचा योग आला. आणि एका वेगळ्याच डेस्टिनेशनचा अजून एक अनुभव पोतडीत जमा झाला.
दिल्ली विमानतळापासून केवळ तीन तासाच्या अंतरावर एका छोट्याश्या गावात असलेल्या एका छोट्याश्या डोंगराच्या आधारानं बांधलेला हा किल्ला. ढासळलेल्या मूळ स्वरुपातील हा किल्ला तुम्हाला इथे पाहता येईल. तर दोन व्यक्तींच्या कल्पकतेनं, सृजनतेनं आणि सौंदर्यदॄष्टीनं या वास्तूला हे आताचं देखणं स्वरुप प्राप्त झालं आहे.
हे शिल्प आहे तीन पायाच्या गायीचं. तिचा फंडाही खाली लिहिला आहे.
रिसेप्शनमध्येच असे 'before' आणि 'after' चे फोटो लावले आहेत.
हा बिफोरचा पूर्ण किल्ला
आणि हा आफ्टरचा पूर्ण किल्ला ( दिव्यांचं रिफ्लेक्शन आल्यामुळे फोटो स्पष्ट नाहीये)
पार्किंग आणि बाभळीचं रान :
ऐकूण बांधकामात मूळ किल्ला आता केवळ ३०% आहे कारण आजूबाजूला अनेक पातळ्यांवर बांधलेल्या नवनविन खोल्या, सज्जे, बगिचे, दोन स्विमिंगपूल्स, एक अॅम्पीथिएटर, अनेक सीट-आऊट्स अशा देखण्या बांधकामाची भर पडली आहे. अजूनही पडत आहे. थोडंफार काम सतत सुरूच असतं. पण ही भर इतकी अॅस्थेटीक सेन्सनं केली आहे की नवलच वाटावं. आणि प्रत्येक रुम वेगळी. प्रत्येकीचं नाव वेगळं आणि त्या नावाला साजेशी आतली सजावटही वेगळी.
फॅमिली स्विमिंगपूल. त्यावरच्या पातळीवर आहे ते 'जलगिरी' रेस्टॉरंट.
'जलगिरी' आतूनः
हॉटेलमध्ये फिरताना सतत 'जीने चढू जीने आणि जीने उतरू जीने' असं म्हणायला लागणार याची खात्रीच. इथून तिथून नुसता जिन्यांचा सुळसुळाट! पण तरीही एकूण एक्स्प्लोर करायला मजा आली.
या फोटोत सगळ्यात वर नजर टाका. वरून दुसर्या पातळीवर आमची रुम होती.
जिन्याच्या शेवटी काय वाढून ठेवलंय, या वळणानंतर काय असेल बरं? .... अरेच्चा किती सुरेख हे कोर्टयार्ड. हा इथे सुरेखसा पण चटकन नजरेत न येणारा बगिचा. अरे हा तर मोठा हॉलच. लग्नसमारंभाकरता उत्तम! किल्ल्याची ऑडियो टुअर नेमकी बंद पडली होती आणि कोणी गाईडही नव्हता. त्यामुळे नुसतेच विचारत विचारत आम्ही भटकत होतो. पायाबियाची दुखणी असतील तर इथे निभाव लागणं कठिण आहे. कारण अगदी रुममध्ये सुद्धा बाथरुम पाच पायर्या वरच्या पातळीवर!
या विविध फीचर्सची ही झलक!
एका बागेतला हा भला दांडगा कॅक्टसः
किल्ल्यातील पूर्वीची पाणी साठवण्याची जागा. आता हे पाणी केवळ बांधकामाकरता वापरले जाते :
दिवे लागले अन किल्ला अधिकच झळाळून उठला:
आमची रुम होती - मोर महाल. हा मोर महाल अगदी वरतून दुसर्या पातळीवर (रिसेप्शन सर्वांत खाली म्हणजे शून्य पातळीवर धरले तर त्यानुसार १३ व्या लेव्हलवर). नुकताच एक महिन्यापूर्वी तयार झाला होता. उंचावर असल्यामुळे पूर्ण फोर्टचं दर्शन होत होतं.
रुमच्या सज्ज्यातून दिसणारं दृष्य :
सकाळी उठले तर मोराच्या आरवण्याचा आवाज आला. बाहेर सज्ज्यात येऊन पाहिलं तर लांब खाली गावात एका झाडावरून शेजारच्या गच्चीत मोर उडून अलगद उतरत होते. मोर महालातून मोराचा आरव ऐकत मोर उडताना पाहणे - काय ऐश! अर्थात हे मोर बरेच दूर होते आणि आदल्या दिवशी खालच्या एका बगिच्यातून ते उडताना दिसले होते म्हणून मला लक्षात आलं. या मोरांचे पिसारे झडलेले होते. असे सगळ्या मोरांचे पिसारे सिझनमध्ये एकाच वेळी झडतात याची मला कल्पना नव्हती. ज्या झाडावर त्या मोरांची वस्ती होती त्याच्या आजूबाजूच्या जमिनीवर किती मोरपिसं पडली असतील!
तेवढ्यात एका खालच्या पातळीवरच्या रुमच्या मोठ्या गच्चीवर तंद्रीत बसलेल्या एका माणसाची तंद्री तिथे अचानक आलेल्या माकडानं भंग केली. त्या माकडानं टेबलावरचा एक काचेचा ग्लास उचलून तोंडाला लावला आणि मग चक्क जमिनीवर आदळून फोडून टाकला. तोवर अर्थात त्या माणसानं रुममध्ये सूंबाल्या ठोकल्या होत्या.
शनिवारी त्या अॅम्पिथिएटरमध्ये कथ्थक नृत्याचा एक कार्यक्रम झाला. या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, उघड्या रंगमंचावर पायर्या पायर्यांच्या प्रेक्षागृहात बसून तो कार्यक्रम बघायला मजा आली.
रंगमंच :
प्रेक्षागूह :
मागच्या डोंगरावर झिपलाईनची सोय. जर पुरेसा गृप असेल तर हॉट एअर बलुन राईडचीही सोय. पण हे आधीच हॉटेलबुकींगच्या वेळी सांगावे लागते आणि त्याकरता चिक्कार पैसे मोजावे लागतात.
किल्ल्यापासून जवळच गावात एक नऊ मजली खोल उतरत जाणारी पायर्या पायर्यांची विहीर आहे. आजूबाजूला कोनाडे असलेली. आता अगदी कोरडी ठणठणीत. या अशा विहिरींचा उद्देश काय असावा?
शेजारीच या भल्यामोठ्या विहिरीला जोडलेली साधी विहीर. पण अर्थात तिलाही पाणी नाही.
नीमराणाची स्वतःची फळबाग नैनीतालजवळ रामगढ येथे आहे. तिथे असेच जुने जुने हेरीटेज बंगले आहेत आणि ते नेहरू, टागोर सारख्या व्यक्तींच्या निवासानं पावन झाले आहेत. त्या फळबागांतील फळांपासून बनवलेले जॅम, मार्मलेड्स इथे जेवणात आणि विकायलाही होते. मस्त होते ते. आता रामगढला भेट देणं आलं. बघूया कधी योग येतोय ते!