भारतवारी मे-जून २०२२ - भाग १

फार म्हणजेच फारच उशीराने, मे-जून मध्ये केलेल्या भारताच्या ट्रिप बद्दल आता पाच महिने होऊन गेल्यावर अखेरीस त्याबद्दल पोस्ट करायला सुरुवात करते आहे.

ही बरीचशी दैनंदिनी आहे, थोडं प्रवास वर्णन आहे, भारतातल्या तीन चार आठवड्यांच्या वास्तव्यात दिसणारे, जाणवणारे बदल, येणारे अनुभव, त्याबद्दलचे जरा विचार असं सगळंच आहे. अनेक वर्ष भारता बाहेर राहून प्रत्येक भारतवारी वेळी अनेक बदल दिसतात, कळत नकळत दोन्हीकडची तुलना पण होत असते. काही व्यक्तिगत बाबी तर काही माझ्यासारख्या अनेकांना अश्या वेळी जाणवत असतील अश्या गोष्टी.

तर..घरापासून निघाल्यापासून एकूण सव्वीस तासांचा प्रवास करून रात्री सव्वा अकरा ला घरी पोचलो. Almost अडीच वर्षांनी. प्रचंड उत्सुकता होती सृजनच्या मनात. दर वेळी प्रवास काही ना काही कारणाने असतोच विशेष. यावेळी आम्ही निघणार त्याच दिवशी दुपारी जर्मनीत कोवॅक्सिन बद्दलचे नियम बदलले ही बातमी आली. या कारणाने आई बाबा इकडे येऊ शकत नव्हते, म्हणून एकदम आनंदी आनंद झाला. बॅग विशेष काही पॅक करायच्या नव्हत्या, निवडक कपडे आणि बाकी तिकडे सगळ्यांना द्यायची gifts. ऐन उन्हाळ्यात जात असल्यामुळे यावेळी चॉकलेट न्यायचे नाहीत असं ठरवलं होतं. तसंही भारतात मिळतातच आता त्यातले बरेच प्रकार, बुलढाण्यात सहज मिळत नाहीत, शिवाय मी इकडून आणले याचं कौतुक असतं, पण Frankfurt ते दिल्ली, दिल्ली ते औरंगाबाद आणि मग औरंगाबाद ते बुलढाणा असा उन्हाळ्यात प्रवास बघता ते कॅन्सल केले.

इकडे घरातील सामानाची संपवा संपवी झाली. पहिल्यांदाच इथल्या शेजाऱ्यांशी खूप चांगली ओळख झाली आहे नवीन घरात, आम्ही चार आठवडे नसू हे त्यांच्याशी बोलणं झालं होतं, त्यांना किल्ली नेऊन दिली. घरातली काही झाडं दिली. उरलेल्या भाज्या जवळच्या भारतीय शेजार्यांना दिल्या. शेजारच्या आजीने हात हातात घेऊन फार प्रेमाने 'परत या, मी वाट बघते आहे तुमची' असं सांगितलं तेव्हा माझ्याच डोळ्यात पाणी आलं. तिची मैत्रीण पण तिच्या सोबत 'हो आता गार्डन मध्ये तुम्ही दिसणार नाही, आठवण येईल तुमची' असं म्हणाली. इथेही कुणी आपली वाट बघतं ही भावना कदाचित पहिल्यांदाच एवढी प्रकर्षाने वाटली. सगळी दारं खिडक्या बंद आहेत का चेक करणे, पासपोर्ट पैसे इत्यादी अति महत्वाच्या गोष्टी घेतल्या का हे चेक करणे असं करत असतानाच टॅक्सी आली आणि घराला बाय म्हणून निघालो.

विमानतळावर पोचून चेक इन आणि बॅग द्यायला भली मोठी रांग. PCR टेस्ट बघितली, मग सोबत लहान मुलगा आहे म्हणून त्यांनीच आम्हाला पुढे नेलं. आम्ही ज्या काऊंटर वर थांबलो तिथला माणूस आम्हाला काहीही न सांगता सरळ उठून गेला. मी पाच मिनिटात येतो, बंद होतंय, दुसरं कुणी येईल, नाही येणार का ही च बोलला नाही, आम्हाला कळेना की आम्ही आता दुसरीकडे जायचं की वाट बघायची. मग शेवटी तिथेच दुसरी मुलगी आली. तिच्या मते आमची नावं फार कठीण होती, यावर आम्हाला हसावे की रडावे कळेना. लांबच लांब रंग दिसत असून एक काउंटर बंद करू, एवढे कश्याला हवेत असंही ती म्हणत होती. दोन काउंटर वाढवले तरी चालतील अशी गर्दी असताना हे यांचे अजबच प्लॅन होते. त्यातून त्यांच्या सिस्टीमने आम्हाला तिघांना तीन वेगवेगळ्या सीट दिल्या होत्या. एक पाच वर्षांचा मुलगा असताना तो स्वतंत्र कसा बसेल हा प्रश्न बोर्डिंग पास देतानाही तिला पडला नाही, वेब चेक इन चा पर्याय नव्हताच. एसटी रेल्वे सगळीकडे सीट अलोकेट होताना या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि विमानात नाही, पहिल्यांदाच असं अनुभवत होतो. मग शेवटी तिने कश्या तरी दोन सीट मिळवून दिल्या एकत्र. बॅग गेल्या, आणि आम्ही गेट वर पोचलो तर बोर्डिंग झालेच चालू. सगळ्यात शेवटच्या दोन सीट आणि मग त्याच रांगेत पलीकडच्या खिडकी जवळ सुमेध. सामान ठेवलं. सृजनच्या दोन टोकांना चाललेल्या गप्पा बघता आम्ही एकत्र आहोत हे समजून आमच्याच रांगेतल्या दुसऱ्या एकाने स्वतःहून त्याची सीट ऑफर केली आणि आम्ही त्यातल्या त्यात सोबत आलो. आमच्या समोरची एकही एंटरटेनमेंट सिस्टिम चालत नव्हती. एक तास उशीरा का असेना पण एकदाचे निघालो, नशीबाने सृजन झोपला, आम्ही झोप-जेवण-झोप- ब्रेकफास्ट असा झोपमोडीचा खेळ खेळत दिल्लीला उतरलो. दिल्लीला दहा तास ब्रेक म्हणून तिथलेच हॉटेल बुक केलं होतं.

दिल्ली विमानतळावर फार चालावं लागतं, पण इमिग्रेशन होऊन बॅग आल्या आणि आम्ही बुक केलेल्या हॉटेल साठी त्यांच्या डेस्क जवळ थांबलो. इथला मागच्या वेळचा माझा एक किस्सा होता हा डेस्क न दिसण्याचा. यावेळी अनुभवातून लगेच सापडले. थोड्या वेळात त्यांचा माणूस आला, तो म्हणाला पुढच्या फ्लाईट साठी बॅग देऊन द्या आताच. मग ते झाल्यावर त्या हॉटेल वाल्या मुला सोबत आधी केबिन बॅग स्कॅन करायला, मग त्यावर स्टिकर, कुठे रजिस्टर मध्ये नोंदी..असा एकेक टप्पा पार पाडून शेवटी हॉटेल वर पोचलो. आंघोळ झाल्यावर जरा फ्रेश वाटलं. तिथेच जेवून दोन तास झोपू म्हणून तसे अलार्म लावून झोप काढली, आणि लगेच मग उठून आवरून निघालो. सिक्युरिटीचे सोपस्कार झाले, चहा किंवा कॉफीची गरज होती म्हणून सीसीडी मध्ये गेलो. आता काही तिथली कॉफी तेवढी आवडली नाही. पण तरी जुन्या सीसीडी आठवणीना उजाळा देत प्यायली, जरा तरतरी आली. विमानतळावर पाण्याची बाटली व्हेंडींग मशीन मध्ये चक्क दहा रुपयात मिळाली. याआधी मुंबई विमानतळावर बाहेर येऊन जेव्हा जेव्हा पाणी विकत घेतलं ते महाग होतं, त्यामानाने ही किंमत अगदीच कमी होती. औरंगाबादला जाणाऱ्या या विमानात सीटचे पुन्हा गोंधळ होतेच. तिघांना तीन टोकाच्या सीट. लहान पाच वर्षाचा मुलगा असताना सीट अश्या दिल्या आहेत ही अडचण सांगितली तर सरळ आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही अड्जस्ट करून घ्या असं उत्तर आलं. मग शेवटी बघू आत जाऊन असा विचार केला. माझ्या शेजारच्या माणसाला मग सांगितलं की मला आणि सृजन ला सोबत बसू द्या, तर तो नाईलाजाने तयार झाला. मग आता विंडो सीट नाही म्हणून सृजन रडायला लागला, एरवी तो ही ऐकतो पण आधीच भरपूर प्रवास झाला होता, त्यामुळे त्यावेळी त्याला ऐकायचं नव्हतं. मग त्या खिडकीतल्या बाईला पण विचारले, तिने पण तोंड वाकडं करून शेवटी हो म्हणाली. ही क्रू चेच कपडे घालून होती, पण प्रवासी म्हणून. विमान वेळेत उडाले, अगदी शेवट पर्यंत ही क्रु मेंबर स्वतः मोबाईल वर बोलत होती, दहा वेळा बंद करा सांगून सुद्धा. Sad मग खायला आलं, ज्यूस मिळाला आणि सँडविच मनापासून आवडलं. तरी एक सँडविच आम्ही खाल्लं नव्हतं, ज्यूस पण प्यायला नाही, पाण्याच्या चुकून त्यांनी चार बाटल्या दिल्या त्यातल्या पण दोन तश्याच होत्या. म्हणून मी लँडिंग आधीच क्रू ला सांगितलं की हे जास्तीच घेऊन जा, मला नको आहे, मी हातही लावलेला नाही. तर हो म्हणून कुणी नंतर आलंच नाही. मग एव्हढा वेळ झोपलेली शेजारची बाई, 'परत देऊ नका घेऊन जा' असा आग्रह करायला लागली. मी तिला म्हणले की मी उघडलं पण नाही काही, हे मी पुढे खाणार नाही, पाणी पण already आहे. मी ते पॅकेट उघडलंच नाही, उष्टं केलं नाही, बाटल्या पण तश्याच मग उगाच मला नको असताना मी ते न्यायला नको असं माझं मत, शिवाय आता घरी जाऊन घरच्या जेवणाचे वेध लागले होते, आई गाडीत खायला सुद्धा खाऊ पाठवणार होती, त्यापुढे मला हे बाकी नको होतं पण ते उगाच फेकून द्यावे लागू नये ही मनापासून इच्छा होती. पण ती मात्र मला 'घरी जाऊन खा, उद्या खा, घरच्यांना द्या, शेजार्यांना द्या' इथवर आली. मी तिलाच विचारलं, तुम्हाला हवं का? तर म्हणे मला नको. मग शेवटी ते घेऊन निघालो तसेच, कारण तसंही कुणीच आलं नाही न्यायला.

पोचल्यावर पाच मिनिटात बाहेर आलो, बॅग आल्या, हे एक मला औरंगाबाद सारख्या लहान विमानतळांचं फार आवडतं, विशेष चालावं लागत नाही. बाहेर येऊन बाबा भेटले, सृजनने पळत जाऊन त्यांना मिठी मारली आणि आम्ही बॅगा गाडीत टाकून निघालो. बाहेर एकदम भट्टीत आल्या सारखं वाटलं. रात्री आठ वाजता असं, तर दिवसभर काय होत असेल माहीत नाही. गाडीत बसून एसी लावला तेव्हा जरा बरं वाटलं.

सृजन मागच्या सीट वर आडवा झोपला आणि आम्ही निघालो. त्याला कार सीट शिवाय असं मोकळं बसता झोपता येतं याचं अप्रूप, त्यामुळे तो त्यातच खुश होता आणि क्षणात झोपला सुद्धा. लग्नांच्या वराती, band चे आवाज, लायटिंग, झगमग रोषणाई, फटाके वाजत आहेत, बेधुंद होऊन लोक नाचत आहेत, दुकानांमध्ये चिप्सची पाकिटं लटकवलेली आहेत, चहाच्या टपरीवर एल्युमिनियमच्या पातेल्यात चहा उकळला जातोय, तिथे गर्दी पण आहे, प्रत्येक गाडीचे हॉर्न वाजत आहेत, गायी रस्त्यावर आहेत असं सगळं चित्र दिसत होतं. या सगळ्या गोष्टी आम्हाला कितीही सवयीच्या असल्या, तरी हे बघून सृजनचे काय प्रश्न असू शकतात हेही मनात आलं. बराच रस्ता चांगला होता, काही ठिकाणी मात्र रस्ताच नव्हता. स्वच्छ भारत लिहिलेली गाडी कचऱ्यातच उभी होती. अकरा वाजले तरी बरीच वर्दळ होती. रात्रीच्या वेळी इतकी वर्दळ हे आता आम्हाला अजिबात सवयीचं नसल्यामुळे वेगळं वाटत होतं. बुलढाणा जवळ आलं, ओळखीच्या काही खुणा दिसल्या, हे किती बदललं, हे तर लक्षातच नाही आलं असे दर वेळी नव्याने दिसणारे फरक पुन्हा जाणवले. आपल्या गावात आलो ही भावना उफाळून आली आणि गाडी घरापाशी थांबली. फायनली, मोठ्ठा प्रवास पूर्ण सुफळ संपूर्ण झाला होता.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle