भारतवारी मे-जून २०२२ - भाग २

कधी जायचं भारतात यासाठी सृजन रोज Countdown करत होता, त्यालाही खूप दिवसांनी विमानात बसायला मिळणार होतं. आईची जय्यत तयारी चालू होती. तुम्ही आले की हे करायचं, ते करायचं याच्या याद्या वाढत होत्या. त्या आधीपासून बाबा म्हणत होते की घराला रंग देऊ, आई म्हणत होती आता कशाला? नको एवढ्यात. पण मग मी येणार हे ठरल्यावर बाबा जिंकले आणि रंगाचे काम झाले, त्यामुळे घर पण सगळं सजून धजून होतं. मधल्या काळात घरात नवीन सोफा आला, गार्डन मधल्या फरश्या बदलल्या, नवीन पडदे लागले असे बरेच बदल होते. घरातलं आंब्याचा झाड वाढलं आहे, त्याला कैऱ्या आल्यात त्या बघायच्या होत्या. शक्य त्या सगळ्यांना भेटायचं होतं. घरी पोचल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.

सृजनने घराच्या आत येता क्षणी सगळ्या घरात चक्कर मारुन मग पहिला प्रश्न विचारला की आर्य दादा कुठे आहे? हा म्हणजे आमचा शेजारी, मागच्या सहा वर्षातले शेजारी पण अगदी घरगुती संबंध. काही विशेष भेटी गाठी नाहीत आमच्या, फोन वगैरे पण नाही, आई बाबांकडून ऐकून सगळं माहिती आहे एवढंच. पण त्या दोघांना एकमेकांची अति ओढ आहे. रात्रीचे बारा वाजले होते त्यामुळे अर्थात तो झोपला होता. मग सृजनने हात पाय धुवून आपली बॅग उघडली आणि डायरेक्ट कपाटात स्वतःचे कपडे लावले, खेळणी ठेवली आणि आता ही माझी खोली असं जाहीर करून टाकलं. मग गप्पा मारत जेवण झालं, आणि शेवटी दीड पावणे दोनला झोपलो सगळे. आम्ही पण प्रचंड थकलो होतो त्यामुळे झोपेची नितांत गरज होती.

सकाळी उशीरा उठलो तर सृजन आधीच उठून दात घासून स्वयंपाकघरात गप्पा मारत होता. एरवी तो उठला की आम्हाला उठावंच लागतं त्याच्यासोबत. घरी येता क्षणी बहुतेक आमच्या मेंदूने आता तुम्ही निवांत आराम करा हे समजून घेतलं, नाहीतर तो उठला आणि मला माहीत नाही असं क्वचित होतं. पोळ्या करायला रीटा आली होती तर हा गरम पोळी आणि तूप खात होता. भरपूर गप्पा मारत होता. तेवढ्यात आर्य आलाच, त्या क्षणापासून सृजन पूर्ण वेळ आर्य दादा सोबत होता, तीन वर्षांपूर्वी अगदी थोडा वेळ भेटलेले हे दोघं, तो सृजन पेक्षा वयाने सुद्धा मोठा, दोन देशात राहणारे, पण हे ऋणानुबंध असतील, ते आपण रोज भेटतो अश्या पद्धतीने सोबत खेळायला लागले. आईनी चहा केला, आम्हाला आवडतो तसा. तरी दुधाची चव बदलली की तसा चवीत पण थोडा फरक वाटतोच. आंघोळ केली तरी थकवा, अर्धवट झोप हे फिलिंग होतंच. शेजारच्या आनंद दादाने तोवर रसगुल्ले पाठवले आणि त्याचा फोन आलाच की उसाचा रस प्यायला कधी येताय? त्याच्या कडे उसाचा रस मिळतो, सिझन संपला होता फक्त त्याने खास माझ्या साठी म्हणून थोडे बाजूला काढून ठेवले होते. मग संध्याकाळी गेलो रस प्यायला, तर अजून एका ग्रुपला आमच्या सोबत रस मिळाला. सृजनला आश्चर्य वाटत होतं की एरवी विकतचे ज्यूस अजिबात पिऊ न देणारी आई, इथे स्वतः हून ज्यूस प्यायला सांगते आहे. अनेक वर्षांनी उसाचा रस पिऊन तृप्त झाले. सृजन मराठी अगदी नीट बोलतो, पण तिथे आजूबाजूला बरेच जण विदर्भातली बोली भाषेत बोलतात, लहेजा बदलतो. मग सृजनला एखाद दोन शब्द समजायचे नाहीत, पण तरी त्याच्या सगळ्यांसोबत गप्पा चालू होत्या. अनेक वेळा हा परदेशातून आला म्हणून त्याच्याशी लोक इंग्लिश मध्ये दोन चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करतात. मग सृजन मराठीच बोलतो, कन्फ्युज होतो की अचानक इंग्लिश का बोलतात, एकूण गमतीशीर असतात असे प्रसंग. सृजनला प्रश्न पडतो आहे की इथे दुकानात चप्पल का काढाव्या लागतात? आहे तशी पद्धत बऱ्याच ठिकाणी की चप्पल काढून दुकानात जावं लागतं. असे सगळे मजेशीर प्रश्न येत राहतात, आम्ही मग एकेक विचार करून उत्तरं देतो, त्यातून आम्हालाच अजून नवीन प्रश्न पडतात . त्याच्या sandal घालण्या काढण्यासाठी त्याला प्रत्येक वेळी मग कुठेतरी बसावं लागायचं आणि ते त्याला नको वाटायचं. सतत काढा-घालायला सोपी अशी त्याच्यासाठी नवीन स्लीपर घेऊ असं ठरवलं. बाहेर पडलो म्हणून कोरडी हवा, वाढलेला ट्रॅफिक, हॉर्नचे भयंकर आवाज, धूळ हे खूप जाणवले. अर्धे बुलढाणा शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर आहे असं वाटतं, तरी इतकी गर्दी वाढली आहे. ज्या रस्त्यावर एक दुकान नव्हतं तिथे आता प्रत्येक प्रकारची चार दुकानं आहेत. ज्याचा फायदा होतोच, पायीच्या अंतरावर सगळी कामं होतात, पण त्या प्रमाणात रस्ते अजूनही लहान, सगळ्यांकडे आपापल्या गाड्या आहेत, त्यातून ट्रॅफिक वाढणार हे ही होतंच. रस पिऊन आल्यावर जेवण करून आता झोपू म्हटलं तर झोप येईना. सृजन दिवसभर इतका दमला होता, टीव्ही, फोन वगैरेचे नाव पण काढले नव्हते. त्यामुळे तो पटकन झोपला. मग पुस्तकांचं कपाट उघडून एक पुस्तक शोधून वाचत बसले. यातली कोणती पुस्तकं यावेळी मी नेऊ तिकडे हाही विचार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उशीरा उठून निवांत चहा नाश्ता झाला. नवीन गाडीचे शेजारून ताजे पेढे आले. या लहान सहान गोष्टी विस्मरणात जातात, असे छान ताजे पेढे, तेही कुणाच्या नवीन खरेदीच्या आनंदाचे, त्यामुळे एकदम मस्त वाटलं. गरम पोळ्या खाऊन सृजन पुन्हा आर्य सोबत सृजन खेळायला गेला. आर्य आमच्या घरी म्हणून त्याच्या बहिणीला अभ्यासाला शांतता आणि त्याच्या आईच्या डोक्याला शांतता होती. आता दोन दिवस झाल्यामुळे जरा नॉर्मल वाटत होतं. एटीएम मध्ये जाऊन आलो, मग जरा गच्चीवर जाऊन मनसोक्त सगळी झाडं बघितली. पूर्वी खूप गुलाब होते तेवढे आता नाहीत, पण वेगळी बरीच झाडं आहेत. कोरफड, अळू, कढीपत्ता, मोगरा, कुंदा आणि अजून बरीच झाडं भेटली. कैर्‍या लागलेलं आमचं झाड पाहिलं. उन्हाळ्यात जायचं ठरलं तेव्हाच आंबे खाता येतील याचे मनात खायली पुलाव रचले होते. त्यातून आम्हाला दोघांना हापूस व्यतीरीक्तचे प्रकार खायचे होते, कारण हापूस मिळतो आता इकडे, पण बाकी प्रकार सहज नाही मिळत. दशहरी आंब्याचा रस खाऊन जीव सुखावला. आंबे चोखून पण खाल्ले.

एक दिवस दुपारी सगळे जुने फोटो काढले. माझा एक अपघात झाला होता अकरावीत, तेव्हाचा प्लास्टर मधला हात कसा दिसायचा हा एकमेव फोटो बघण्यात सृजनला मुख्य रस होता, कारण त्याची गोष्ट त्याने ऐकली होती. गंमत अशी की तीन वर्षांपूर्वी त्याने रस्ता क्रॉस करताना हात सोडायचा नाही हे समजावून सांगताना एकदा मी आईचा हात सोडून पळाले आणि लागलं अशी थोडी ट्विस्ट करून ती सांगितली होती. आता कॉलेज मधली मी बघून, ही हात धरून चालण्याच्या वयाची नाही हे तो ओळखेलच, मग त्याला खरा अपघात कसा झाला होता हेही सांगितलं. लहानपणचे माझे फोटो दाखवून सृजनला ओळखायला सांगितलं. काही फोटोंचे फोटो काढून ते मित्र मैत्रिणींना पाठवले. बरेच जुने फोटो बघून हे का काढले असावेत हा प्रश्न आता पडतो, आणि काही बघून खूप छान वाटतं. शिवाय कितीतरी वेळचे फोटो नाहीतच, नुसत्या आठवणी आहेत हेही मग गप्पांमधून लक्षात आलं. संध्याकाळी गच्चीवर जाऊन बसलो. जरा गार वाटावं म्हणून गच्चीवर पाणी टाकून झालं. त्या निमित्ताने मग आपसूकच लहानपणच्या उन्हाळ्याच्या आठवणी, डेझर्ट कुलर, वाळवणं, गच्चीत झोपणे या सगळ्या आठवणींना पण उजाळा मिळाला.

दुसऱ्या दिवशी दुपारी आईच्या दोघी विद्यार्थिनी, ज्या आता स्वतः शिक्षिका आहेत, त्या आईला भेटायला आल्या. अजूनही इतक्या वर्षानंतर तिच्या अनेक विद्यार्थिनी तिला फोन करतात, भेटायला येतात. मधल्या काळात शाळेतले काही शिक्षक गेले, आता जुने कोणतेच शिक्षक नाहीत, ती शाळेबद्दलची ओढ आता वाटत नाही वगैरे गप्पा झाल्या. सृजनने आल्यावर त्यांना छान चित्र काढून दाखवलं आणि शाब्बासकी मिळवली, काहीच ओळख नाही आणि शिवाय मराठीतून बोलला, त्यांनी सृजनला जाताना पैसे दिले तर सृजनला समजेना की पैसे का देत आहेत? मग पुन्हा त्यांनी मला पैसे का दिले हा प्रश्न आला. वाढदिवसाला जसे गिफ्ट्स मिळतात, तसेच इथे यातून तू काहीतरी घेऊ शकतो हे त्याला सांगितलं, तर त्याला मजा वाटत होती, आणि नवल पण वाटत होतं.

एक दिवस शेजारच्यांसोबत हॉटेल मध्ये जेवायला गेलो, म्हणजे आताचे रेस्टॉरंट. आता अनेक कॉलेजेस झालीत त्यामुळे तरुण मुला मुलींचे अनेक ग्रुप्स दिसले. तिथे हात धुवायला गरम पाण्याचे बाउल मिळतात हे पुन्हा सृजन साठी आठवं आश्चर्य होतं. मध्यमवर्गीय लोकांसाठी हॉटेलिंग नवीन होतं तेव्हा हा प्रकार अनेकांना नवीन होता, ते हात धुवायला नसून प्यायला आहे असं समजून ते कुणी प्यायलं होतं हे विनोद असायचे, बाहेर देशात सुद्धा असं काही नसतं, त्यामुळेआता पुन्हा तीच परिस्थिती, सृजनने मग त्यात हात धुणे हे फारच आवडीने केलं. येताना मुद्दाम पायीच आलो. ठिकठिकाणी नवीन मोठ्या इमारती झालेल्या दिसल्या. काही रस्ते नवीनच झाले होते, काहींचं काम चालू होतं. बरेच दवाखाने पण झालेले दिसले. रात्री येताना भटकी कुत्री रस्त्यात असतील हे लक्षातच नव्हतं आलं, नशीबाने कुणी भुंकत आले नाही पण तरी भीती वाटलीच. गल्ली गल्लीतून चालताना निशाणी डावा अंगठा या आवडत्या सिनेमाची पदोपदी आठवण येत होती, पुन्हा एकदा तो बघायला हवं असं वाटलं.

एक दिवस आनंद दादाने घोळ आणि हिरवी वांगी आणून दिली. घोळ ही खास विदर्भातली उन्हाळ्यातली भाजी. रीताने भाकरी केल्या आणि मस्त भाकरी, आईच्या हातचे कैरिकांदा, पालकाची पातळ भाजी आणि नंतर आमरस असं जेवण झालं. इकडे ज्या भाज्या नेहमी खातो त्या आणायच्याच नाहीत असं आम्ही सांगून ठेवलेलं असतं. त्या प्रमाणेच रोजचे बेत ठरायचे. संध्याकाळी आजी आणि नातू मिळून चप्पल आणायला गेले आणि येताना चार टीशर्ट घेऊन आले. त्या दुकानदारानेएक पँट पण दाखवली सृजन साठी, ती पण घेतली. घरात घालायच्या ७/८ टाईप पँट म्हणजे लोअर म्हणतात हे आम्हाला नवीनच समजलं. आम्ही त्यावर फार हसलो. औषधांच्या दुकानात गेलो तेव्हा एक किस्साच झाला. उन्हाळा आहे तर ORS घेऊन जाऊ सृजन साठी असा विचार केला. मी आणि सुमेध पायीच गेलो. ORS साठीचा जर्मन शब्दच डोक्यात, मूळ ORS आठवेचना. तर सुमेध म्हणे ओरल बी औषध. ती दुकानदार कन्फ्युज की हे काय सांगत आहेत. तिने टुथ ब्रश दाखवले, हा पण आहे तो पण आहे. एकदम काय गडबड झाली ते लक्षात येऊन आम्ही हसायला लागलो, पण तरी शब्द आठवेना पटकन, काय आपण इतकं साधं येत नाही असं वाटत होतं. मग आम्ही कश्याबद्दल बोलतोय हे सविस्तर सांगितलं तेव्हा त्यांनीच ORS म्हणताय हे ओळखलं. मराठी इंग्रजी जर्मन अश्या तीन्ही भाषांची सरमिसळ होते अशी ऐन वेळी आणि फजिती होते. हे दुकानदार आई बाबांच्या अगदी ओळखीचे, त्यांचे लेक जावई, एवढे बाहेरच्या देशात राहतात आणि हे माहीत नाही असं त्यांना नक्कीच वाटलं असेल.

आणि पहिल्याच काही दिवसात भारतात ठळक पणे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे डिजिटलायझेशन. हे अगदी पदोपदी जाणवलं. आता भारतात युपीआय, पर्यायाने सगळ्यांकडे जीपे सारखे अनेक पर्याय आलेत. हेच इकडे जर्मनीत अजून काहीच नाही, त्यामुळे आम्ही या सगळ्यात एकदम अज्ञानी आहोत असं वाटायचं. ऑनलाईन ऑर्डर दिल्या कपडे आणि पुस्तकांच्या. तेव्हा आईने मला तिच्या मोबाईल वरून मला जीपे करून दिले. मी आईला शिकवायचं नवीन तंत्रज्ञान की आईने मला हे गमतीशीर वाटलं. भारतातल्या आमच्या खात्याला कार्डला युपीआय जोडता येत नाही, आमच्या फोन वर काही ऍप्स पण चालत नाहीत. भारतातले डेबिट कार्ड आहे पण आता गेल्या दोन वर्षात अनेकांनी कार्ड स्वीकारणे बंद करून फक्त जीपे सारखेच पर्याय ठेवलेत, नाहीतर कॅश. मग आम्ही बहुतांशी कॅश घेऊन फिरायचो. एकदा सृजनच्या चप्पल घ्यायला गेलो तर बाबा त्यांच्या फोन वरून पेमेंट करत होते. ते सगळं बघून मी एकदम इम्प्रेस झाले आणि किती भारी असं त्यांच्याशी बोलले. मग दुकानदाराने कुठे असता ताई तुम्ही असा प्रश्न केला, बाहेरच्या देशात एवढंच मी सांगितलं, तर तो मला तिकडं QR कोड नाही का असं म्हणाला. त्याला बहुतेक असं कसं असू शकतं, ताई बाहेरच्या देशात राहतात आणि हे एवढं माहीत नाही असं वाटलं. जर्मनीत डिजिटल पेमेंट या क्षेत्रात अजून तेवढी प्रगती झालेली नाही. या बाबतीत भारतातल्या खेडोपाडी पोचलेल्या या गोष्टींचे आणि ते सहज स्वीकारणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असो की फारसे न शिकलेले रस्त्यावरचे दुकानदार, या सगळ्या भारतीयांचे प्रचंड कौतुक वाटते. फक्त हे असे बदल ज्या गतीने होतात, त्यातून आमच्या सारख्यांना कधी हे असे वर दिले तश्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं, एवढंच.

दर वेळी भारतात आलो की रोज वर्तमान पत्र येणं आणि ते वाचणं हा एक दिनक्रम होतो. पूर्वी इ वर्तमानपत्र वाचायचो, आता तेही रोज होत नाही, काही बातम्या नकोश्या वाटतात, शिवाय व्हॉट्सअ‍ॅप फेसबुक कृपेने काही घडामोडी कळतात. पण हातात रोज मराठी वर्तमानपत्र घेऊन एकूण एक बातमी वाचणे हे मनापासून आवडतं, त्यातलं शब्दकोडं सोडवायला आवडतं. बरेच शब्द सहज आठवत नाहीत आता, मग बाबा मदतीला येतात. सकाळी सकाळीच रद्दी वाला, भंगार वाला यांचा आवाज येतो. गाड्यांचे हॉर्न तर असतातच. घरापाशी रोज अनेक गायी येतात. मग घरातला काहीतरी खाऊ, कधी शिळी पोळी असेल, शिवाय भाजीपाल्याचा होणारा कचरा हे सगळं गायीला देणे हे सृजनला खूप आवडतं. तो आणि आर्य दोघंही गाय कधी येते यावर लक्ष ठेवूनच असतात. गाद्या, उश्या वेगळ्या वाटतात पहिले दोन दिवस, मग कधी थोडी पाठ दुखते सुरूवातीला, दोन तीन दिवसांनी मग सवय होते. हेच पूर्वी उलट व्हायचं. या खोलीतून त्या खोलीत जाताना पंखे बंद करायचे असतात हे लक्षात ठेवावं लागतं, कारण सिलिंग फॅन नाहीत इकडे. शिवाय इकडे नुसतं चार्जर लावून काम होतं प्लग मध्ये, त्याला अजून एक बटन नसतं. चार्जर लावताना त्याच्या शेजारीच असलेलबटण पण चालू करावं लागतं, हे समजायला दोन तीन वेळा ते चालू न केल्यामुळे फोन चार्ज झालाच नाही हे जेव्हा होतं, त्यानंतर मग लक्षात ठेवून हे केलं जातं. जसं सुरुवातीला इकडच्या अनेक गोष्टींचं अप्रूप असतं, तसंच आता भारतात पण साध्या काही गोष्टींचं अप्रूप वाटतं.

जाण्यापूर्वी बरेचदा मी सृजनशी बुलढाण्यात पाण्याचा कसा दुष्काळ असतो याबद्दल बोलायचे. पाणी जपून वापरायला सांगायचे. तर तिथे आजोबांनी खास सृजन साठी म्हणून बाथरूम मध्ये hand shower बसवून घेतला होता, पण सृजनला उलट बादलीने आंघोळच आवडली. तरी जेवढं पाणी दिसत होतं, त्यावरून सृजनने मात्र तू काहीही सांगतेस का ममा, आहे की इथे पाणी असं मलाच ऐकवलं. आता एवढा दुष्काळ नाही, पण तरी पाणी कमी हे नेमकं सांगणंही अवघड आहे आणि त्याला समजणंही.

सृजनचे काही कपडे घेऊ म्हणून गावात गेलो तर बाबांना ओळखीचे चार लोक भेटले. सृजनला गाडीत पुढे बसता येण्याचा आनंद होता. गाढव दिसलं रस्त्यात तर तो जोरात ओरडून ममा, हे बघ मला घोडा दिसला म्हणाला. त्याला गाढव चित्रातून माहीत आहे, पण प्रत्यक्ष कमी पाहिलं आहे, त्यातून असं रस्त्यात, बिचारा कन्फ्यूज झाला असेल, पण इतकं निरागस होतं हे आणि हसू आवरेना. मग अरे हो हे गाढव आहे असं म्हणून स्वतः पण हसायला लागला. रोज रात्री आजोबांसोबत अ‍ॅक्टिव्हा वर चक्कर मारायची आणि मगच झोपायचं असा एक नियम सृजन स्वतःच ठरवला. आजोबांसोबत जाऊन बॅट आणि बॉल पण घेऊन आला, आणि मग गच्चीत क्रिकेट खेळणं सुरू झालं. त्याने काही मॅचेस बघितलेल्या नाहीत खूप, पण त्याला क्रिकेट खेळायला मनापासून आवडलं, तो लहान म्हणून तो म्हणेल तेव्हा बॅटिंग बॉलिंग त्याला मिळायची. त्याला घेऊन खास रिक्षात पण फिरवून आणलं.

म्हणता म्हणता आठ दहा दिवस गेले आणि उन्हाच्या झळा कमी होत गेल्या. पावसाळ्याची चाहूल लागली. पहिला पाऊस अनेक वर्षांनी अनुभवता येईल असं वाटत होतं आणि तसं झालंही. त्याबद्दल आणि इतर गमती जमती बद्दल पुढच्या भागात.

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle