मागील भाग : देवनागरीच्या पाऊलखुणा (२)
मौर्य काळात ब्राह्मी लिपीचा प्रसार झापट्याने झाला. ब्राह्मी लिपी निरनिराळ्या प्रादेशिक लिपींमध्ये विकसित झाली. तिसर्या शतकात ब्राह्मी लिपीची विभागणी साधारणपणे दोन भागात करता येईल : भारताच्या उत्तरेकडची ब्राह्मी (जरा टोकदार कोन असलेली) आणि दक्षिणेकडची ब्राह्मी (गोलाकार, वळणदार). कालांतराने दोन्ही प्रकारच्या ब्राह्मी लिपी तिथल्या स्थानिक भाषांशी जोडल्या गेल्या. उत्तर ब्राह्मीमधून आजच्या वापरात असलेल्या देवनागरी, गुजराती, बंगाली, आसामी, काश्मीरी, उडीया, गुरुमुखी या लिपी बनल्या तर दक्षिण ब्राह्मीमधून तेलुगु, कन्नड, तामिळ इत्यादी लिपी निर्माण झाल्या.
'गुप्त काळा'त (पाचवं शतक) उत्तर ब्राह्मीमधून गुप्त लिपीचा (Late Brahmi) उदय झाला. 'गुप्त लिपी' हे या लिपीचं खरं नाव नसून काल्पनिक नाव आहे. याच गुप्त लिपीमधून सहाव्या शतकात 'सिद्धम' आणि नवव्या शतकात 'शारदा' लिपी तयार झाली. 'शारदा' लिपी, शारदामंडल या जम्मू -काश्मीर भागातली. जिच्यातून पुढे गुरुमुखी आणि टाकरी लिपींची निर्मिती झाली.
गुप्त लिपीमधून अजून एक जन्माला आलेली लिपी म्हणजे 'कुटील लिपी' किंवा 'सिद्धमातृका'. वाकडीतिकडी अक्षरं आणि मात्रा यामुळे या लिपीला 'कुटीलाक्षर' असंही म्हटलं जातं. कुटील लिपी प्राचीन भारतात प्रामुख्याने संस्कृत लिहिण्यासाठी वापरली जात असे. बौद्ध ग्रंथ आणि शिलालेख लिहिण्यासाठी कुटील लिपी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आली. उत्तर भारतात, कुटील लिपीचं रूप हळूहळू विकसित होऊन त्यांचं रुपांतर आधुनिक लिपींत व्ह्यायला सुरवात झाली. त्यातली सर्वात महत्त्वाची म्हणजे 'नागरी'. दुसरी नंदीनागरी. नागरी लिपी सातव्या शतकापर्यंत नियमित वापरात होती. कालांतराने ती पूर्णपणे देवनागरी लिपीत विकसित झाली.
'नागरी' हा शब्द बरेचदा एकतर 'देवनागरी' शब्दाचं संक्षिप्त रुप किंवा 'देवनागरी' शब्दासोबत आलटून पालटून वापरतात. नागरी शब्दाच्या उगमाबद्दल एक प्रवाद असा आहे की, हा शब्द 'नृगर' या प्राकृत भाषेतून आला. 'नृगर' - 'पुरुष एकत्र होणे'. अर्थातच हा अर्थ प्रमाणित नाही. अशोकाच्या काळातल्या पाली भाषेतही 'नगर' शब्द सापडला. पण पहिला ज्ञात 'नगर' हा शब्द तैतरीय आरण्यकात आढळतो. त्यामुळे 'नागरी' शब्दाचा उगम 'नगर' या संस्कृत शब्दात आहे असं धरुन चालू. 'नगर' अर्थात शहर. त्यामुळे नगरात वापरली जाते ती नागरी.
काही जण गुजरातेतल्या 'नागर' ब्राह्मणांवरुन नागरी शब्द आला असं मानतात. पण ते तितकंस बरोबर नसावं कारण नागरी लिपीचा विकास मुख्यत्वे उत्तरेत झाला. एक मत असंही आहे, उत्तरेत त्याकाळी देवदेवातांची पू़जा सांकेतिक यंत्र वापरुन केली जाई. या यंत्रातल्या चिन्हांना 'देवनगर' म्हणत. कालांतराने ही देवनगरातली चिन्हं वर्णमालेत वापरली जाऊ लागली आणि या लिपीला 'देवनागरी' नाव देण्यात आलं.
दुसर्या मतानुसार, वेदांची भाषा संस्कृत नागरी लिपीत लिहीली जाऊ लागल्यानंतर देवनागरी शब्द अस्तित्त्वात आला असावा. तसंही संस्कृत भाषेचं वर्णन साहीत्यात 'गीर्वाणभारती' केलेलंच आहे. 'नगर' शब्द हा पाटलीपुत्र नगराशी संबंधित असावा असाही एक समज आहे. मौर्य आणि गुप्त साम्राज्यांच्या नगरात जन्मलेली नागरी लिपी असं नाव पडलं असावं. अजून एक मत पाहू, उत्तरेतल्या 'नागर' शैलीतल्या मंदीरांवरून 'नगर' नाव आलं असावं. या सर्व प्रकारच्या मीमांसेत, 'देव' हा शब्द 'नागरी' शब्दासोबत नक्की कधी जोडला गेला याचे मात्र ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, निदान ते कुठल्याही तज्ज्ञांनी दिलेले नाहीत. मुळात वर्णमालेला 'नागरी' का म्हणावं हा सुद्धा अनुत्तरीत प्रश्न आहे.
उत्तर भारतात देवनागरी लिपीचा वापर दहाव्या शतकापासून दिसतो. त्याआधीही केला जात असेल पण दहाव्या शतकापासून देवनगरी लिपी जास्त प्रमाणात वापरली जाऊ लागली. गुजरातेतल्या प्रतिहार राजघराण्यातल्या राजांची दानपत्र आणि शिलालेख यावरुन त्यावेळच्या नागरी लिपीचा अंदाज येतो. त्याआधी मोठ्या प्रमाणात 'कुटील लिपी' वापरात होती. कुटील लिपीतून देवनागरीकडे जातांनाच्या संक्रमण काळात, या दोन्ही लिपींचा संगमही दिसून येतो. अकराव्या शतकात मात्र कुटील लिपीची जागा पूर्णपणे देवनागरी लिपीने घेतली आणि तिचं रुपही पालटू लागलं. देवनागरी लिपीने अक्षरावर आडवी रेषा, आयताकृती कोपरे आणि चौकोनी चौकटीत बसणारी समान अक्षरं, आणि स्वरांवर दिलेल्या मात्रा दिसू लागल्या
चौदाव्या आणि पंधराव्या शतकात देवनागरी लिपीची पुन्हा पूर्व आणि मध्य अशी विभागणी झाली. पूर्व शाखेत बिहारी लिपी (सध्या वापरात नाही), मैथिली लिपी अशा काही प्रमुख लिपी आहेत. मध्य शाखेत, गुजराती लिपी (हा देवनागरीचाच एक वेगळा प्रकार आहे.), महाजनी लिपी (राजस्थानमधले व्यापारी वापरत असत), मालवी लिपी, आपली मोडी लिपी तयार झाल्या. मोडी लिपीच्या उगमाबद्दल एक प्रवाद असा की, हेमाडपतांनी ही लिपी श्रीलंकेवरुन महाराष्ट्रात आणली, परंतु तसे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. मोडीचा वापर शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरु झाल्याचं दिसून येतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीनंतर देवनागरी लिपी अधिकृत लिपी म्हणून अवलंबली. असं असलं तरी देवनागरी लिहीतांना अक्षरांवर शिरोरेखा द्याव्या लागत, त्यामुळे लिखाणात फार वेळ जाई.असं म्हणतात, यावर उपाय म्हणून त्यांचे चिटणीस बालाजी आवजी यांनी देवनागरी 'मोडून' नविन लिपी तयार केली. मोडून बनवलेली 'मोडी' जी भरभर लिहीता येत असे. पुढे पेशव्यांच्या काळात मोडी लिपीत बरेच फेरफार करण्यात आले.
तर, परत वळुया देवनागरीकडे. नऊ ते बाराव्या शतकात मिळालेले ताम्रलेख, मुद्रा, नाणी यावर नागरी लिपीचा वापर स्पष्टपणे दिसतो. महंमद गझनीच्या नाण्यांवर देवनागरी लिपीत संस्कृतमधे कलमा लिहिलेला आढळतो. ही नाणी लाहोरमधे इ.स. १०२७ -२८ च्या दरम्यान टाकसाळीत पाडली गेली होती. या नाण्यांवर कूफी (Kufic) लिपीमधे 'ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वा सल्लम ' (१) असा मजकूर आहे तर दुसर्या बाजूला मजकूराचा अनुवाद संस्कृतमधे 'प्रत्यमेक मुहम्मद अवार नृपति महमूद' असा टंकलेला आढळतो. जैन ग्रंथ, नंदीसूत्रातही नागरी लिपीचा उल्लेख आढळतो. राजा जयवर्मन भट्ट सोलंकी (दहावं शतक), याने देवनागरी लिपीच्या वापराला प्रोत्साहन दिलं. परीणामी, त्याच्या कारकिर्दीत ही लिपी लोकप्रिय झाली. चौदाव्या आणि पंधराव्या शतकाततली नागरी लिपी आजच्या पेक्षा थोडी वेगळी दिसते. या काळात लिहिली गेलेली स, घ, प, म, ष, य ही अक्षरं डोक्यावर रेषा नसलेली, विभक्त टोकं अशी दिसतात.
काळाच्या ओघात अक्षरावर शिरोरेखा आखणं, अक्षरं अधिकाधिक गोलाकार, साचेबद्ध करणं असे प्रयोग देवनागरी लिपी सुंदर करण्याकरता वेळोवेळी झाले. पण त्याच वेळी वेगाने लिहिता येण्याजोगी लिपी बनवण्याकडेही कल दिसून येतो. पंधराव्या शतकात संस्कृत आणि मराठी, हिंदी या सारख्या भाषा लिहिण्यासाठी देवनागरी प्रामुख्याने वापरायला सुरवात झाली. इ.स. १५५६ मधे पोर्तुगींजांकडून छपाईतंत्र भारतात पोचलं. तरीही देवनागरी लिपी छापील स्वरुपात यायला अठरावं शतक उजाडावं लागलं. दरम्यान भारताबाहेर, देवनागरी लिपी 'कास्ट' करण्याचा पहीला प्रयत्न इ.स. १७४०ला रोममधे झाला. त्याची परीणती पुढे १७७१ मधे 'Alphabetum Brahmanicum' हे पुस्तक देवनागरीत छापण्यात झाली. या पुस्तकात देवनागरीचा पहिला लेटरप्रेस टाईपफेस दिसून येतो. मराठीने लेखनासाठी विसाव्या शतकाच्या सुरवातीला 'बाळबोध' स्वरुपात देवनागरी लिपी स्वीकारली. स्वातंत्र्यानंतर देवनागरी भारताच्या अधिकृत लिपींपैकी एक बनली.
---
पुढील भाग : देवनागरीच्या पाऊलखुणा (४)
संदर्भः
१. कलमा या वेबसाईटवरुन घेतला आहे.
२. Indian Epigraphy: A Guide to the Study of Inscriptions in Sanskrit, Prakrit, and the other Indo-Aryan Languages. Oxford University Press, Richard Salomon (1998).
३. देवनागरी लिपी : स्वरुप, विकास और समस्याए