'मराठी भाषेची गंमत' या धाग्यावर रायगडची पोस्ट वाचून मी फार पूर्वी देवनागरीबद्दल लिहिलेलं आठवलं. मी या विषयातली तज्ज्ञ नाहीये, सहज आवड म्हणून गोळा केलेली माहीती आहे.
--
काही वर्षांपूर्वी एका कामासाठी दिल्लीला धावती भेट दिलेली. तेव्हा वेळात वेळ काढून 'नॅशनल म्युझियम' बघून घेतलं. तिथे एका मजल्यावर भारतातल्या निरनिराळ्या लिपी आणि त्यांची उत्क्रांती याचं छोटसं प्रदर्शन बघून इतकं भारावून गेल्यासारखं झालं की लगेच देवनागरी लिपीचा इतिहास शोधायला सुरवात केली. "भारतात लेखनकलेचा उगम कधी आणि कसा झाला असेल?" म्युझियममधली अक्षरं बघून सहाजिक मनात आलेला प्रश्न आणि त्या अनुशंगाने गोळा केलेली ही माहीती आणि त्यातून सापडलेला हा 'आपल्या देवनागरी लिपी'चा प्रवास.
--
लिपी म्हणजे काय? लिपी कशाला म्हणायचं?
मोल्सवर्थ मराठी- इंग्रजी शब्दकोशात लिपी या शब्दाचा अर्थ, 'writing a character', 'painting, drawing', 'smearing' असा सांगितला आहे. पाणिनीने अष्टाध्यायीत (३.२.२१) 'लिपी/लिबी' या शब्दाचा उल्लेख केला आहे परंतु लिपी म्हणजे नक्की कुठली, देवनागरी, ब्राह्मी की आणखी कुठली याचा उल्लेख मात्र केलेला नाही. साध्या शब्दात लिपीची व्याख्या करायची तर, डोक्यात्/मनात येणारे विचार लिखीत स्वरुपात मांडता येण्यासाठी ज्या चिन्हांचा वापर होतो, त्या चिन्हांना एकत्रितपणे आपण लिपी म्हणू शकतो. लिपी भाषेचा एक महत्त्वाचा पैलू. लिपी मुळे भाषा जतन करुन ठेवता येते.
एखाद्या भाषेला लेखन व्यवस्थेची/लिपीची गरज का भासावी? जगात अशाही भाषा आहेत ज्या फक्त बोलल्या जातात. या भाषांना लिपी नाही. त्या भाषा लिहिल्या जात नाहीत. फिन्नो-उग्रीक भाषाकुटुंबातल्या अनेक भाषा अगदी १९व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत फक्त बोलीभाषा होत्या. तरीही या भाषांमधे संवाद, वादविवाद, रोजचे व्यवहार सुरळीत चालू होते. भाषा आधी जन्माला आली आणि लिपी, लिहीण्याची साधनं त्यानंतर. त्यामुळे सुरवातीला संभाषणाचं साधन म्हणून भाषा फक्त बोलल्या जात. लिहीण्याची निकड फार नंतर भासू लागली. सुरवातीच्या काळात अगदी गरज म्हणून किंवा धार्मिक कारणांसाठी लेखनाचा वापर होत असे. या काळात लेखन प्रणाली विकसित होत असतांना अगदी प्राथमिक स्वरुपात चित्रांच्या रुपात कोरून किंवा खणून लिखाण केलं जाई. दगडात कोरणं जिकीरीचं. त्यामुळे आदीम काळातल्या लिपी (प्रोटो-स्क्रिप्ट्स) अगदीच साध्या स्वरुपात कोरलेल्या दिसतात. यांचा वापर महत्त्वाचे व्यवहार, मालकी हक्क , व्यापार यासारखी माहिती लिहून ठेवणे एवढाच होत असे. आता, काही प्राचीन लिपींची उदाहरणं बघूया :
पहीली प्राचीन लिपी अर्थातच, क्यूनिफॉर्म (Cuneiform). इसवी सन पूर्व ३५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमियामध्ये जन्माला आलेली ही लेखन पद्धत. मातीच्या पाट्या आणि गोळ्यांमध्ये 'स्टायलस' दाबून लिहीत असत. (हे 'स्टायलस' आपल्या फोन स्टायलस सारखे दिसत.) हिशोबाची नोंद ठेवायला सहसा या लिपीचा वापर होत असे.
त्यानंतर इजिप्शियन चित्रलिपी (Hieroglyphic) साधारणपणे इसवी सन पूर्व ३२०० वर्षांपूर्वी इजिप्तमधे रुढ झाली. यात शब्द किंवा एखादी संकल्पना चित्रचिन्हं वापरुन लिहीले जात.
जर्मेनिक लोकांनी दगडांत आणि लाकडांत कोरलेली अक्षरं, रुनिक अल्फाबेट्स (runic alphabets) च्या खुणा इसवी सनाच्या दुसर्या शतकापासून सापडतात. भारतात लिपी नक्की कधी अस्तित्वात आली याबाबत बरीच मतमतांतर आहेत.
या सर्व लेखन पद्धतींच्या स्वतःच्या अशा मर्यादा होत्या. अगदी सुरवातीच्या काळात लिपी विकसित होत असतांना लेखन दगडात कोरून लिहीलं जात असे. त्यामुळेच त्या काळच्या अक्षरांच्या आकारात विविधता कमी दिसते. आकार अगदी प्राथमिक, जसं की सरळ रेषा, तिरक्या रेषा, एखादा बिंदू. कोपरे अगदी टोकदार दिसतात. अक्षरं सुद्धा सहसा जाड असत. दोन अक्षरातलं अंतर समान असेलचं असं नाही. ब्राह्मी लिपीतही सुटीसुटी अक्षरं लिहिलेली दिसतात. ताडपत्र, चर्मपत्र, ताम्रपत्र, शाई, बोरु या शोधानंतर या आकारांनी कात टाकली.हातोडा, छिन्नी या अवजारांमधे काळानुसार झालेले बदल आणि पुढे बोरु, ब्रश फिरवून वर्तुळ सहजतेने काढ्ता येऊ लागलं तसं, तसं तसं लिपीमधे गोलाकर वळणं दिसू लागली. जाडजूड अक्षरं ते रेखीव गोलाकार आकार हे स्थित्यंतर अगदी टप्प्याटप्प्यांत झालं. सवय म्हणा किंवा एक औपचारिकता म्हणून जुने जाड ( ब्लॉक) आकारातली अक्षरं वाक्यांच्या सुरुवातीला लिहीली जात. त्यापुढची अक्षरं गोलाकार, लहान आकारात लिहीत. याचीच परीणती पुढे कॅपिटल अक्षरांमध्ये झाली. जर्मन भाषेतही बराच काळ प्रत्येक शब्दाचं सुरवातीचं अक्षरं कॅपिटल स्वरुपात लिहीलं जाई. काळाच्या ओघात ही पद्धत हळूहळू बंद पडली.
आजच्या घडीला जगभरात सात हजारांच्या वर भाषा बोलल्या जातात पण त्यातल्या अर्ध्याहून जरा जास्त (अंदाजे चार हजार) लिहिल्या जातात. लेखन स्वरुपातल्या भाषांमधे ज्या लिपी वापरल्या जातात त्यात बरीच विविधता आहे. बर्यचश्या युरोपियन भाषा लॅटीन लिपीत लिहीतात. ग्रीक भाषा लिहिण्यासाठी ग्रीक लिपी वापरली जाते, तर सिरिलिक लिपी रशियन, बल्गेरियन, सर्बियन आणि इतर स्लाव्हिक भाषांसाठी वापरली जाते. हिंदी, मराठी सारख्या भारतीय भाषा लिहिण्यासाठी प्रामुख्याने देवनागरी लिपी वापरात आहे. जर का, एखादी युरोपियन भाषा लिहिण्यासाठी देवनागरीचा वापर केला तर भाषा नीट मांडता येईलच असं नाही. तसंच अनेकदा आपण मराठी, हिंदी लिहीतांना रोमन लिपीचा वापर करतो तेव्हा अडचणी येतातच, गमतीजमती पण होतात. त्यामुळे भाषेला साजेशी लिपी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. जगभरातल्या अनेक भाषांनी एक तर लेखनासाठी आधीच वापरात असलेली लिपी जशीच्या तशी किंवा काही सुधारणा करुन वापरायला सुरवात केली. असं म्हणतात, आजवर फक्त पाच वेळा स्वतंत्रपणे लिपीचा शोध लागला आहे. अन्यथा, भाषा तयार असलेल्या, आसपासच्या भाषांमधूनच लिपी वापरतात.
इस्टोनियन भाषा जेव्हा लिखीत स्वरुपात जतन करण्यची गरज भासली तेव्हा तत्कालीन जर्मन राज्यकर्त्यांनी लॅटीन लिपीचा वापर केला. अर्थातच, काही ध्वनी जे फक्त इस्टोनियन भाषेत आहेत ते मात्र लॅटीन लिपीत पकडणं अशक्य होतं. मग त्यासाठी विसाव्या शतकाच्या सुरवातीला, लॅटीन लिपी सुधारुन काही नविन अक्षरं जोडण्यात आली. परत, मूळ विषयाकडे वळू, या आहेत पाच प्राचीन आद्य लिपी :
१. मेसोपोटेमियन क्यूनिफॉर्म (Cuneiform)
२. प्राचीन इजिप्शियन लिपी (Egyptian hieroglyphs)
३. प्राचीन चीनी हांझी (Chinese Hanzi)
४. मेसोअमेरीकेत वापरली जाणारी चित्रलिपी
५. इस्टर्न आयलंडवरील रोंगोरोंगो (Rongorongo)
आज वापरात असलेल्या लिपींचा उगम, याच पाच लिपिंमधे कुठेना कुठे आहे असं एक मत आहे. लिपींची विभागणी सहसा पाच प्रकारात होते. थोडं या विभागणी बद्दल समजून घेऊ.
१.वर्णमाला (alphabets) - या प्रकारच्या लेखन प्रणालीत, व्यंजन आणि स्वर, या दोन्हीसाठी स्वतंत्र चिन्हं असतं. उदाहरणार्थ, युरोपियन भाषा वर्णमाला वापरुन लिहिल्या जातात. यात रोमन आणि सिरीलिक लिपीचाही समावेश होतो.
२. अबजाद (abjad) - 'अबजाद' हा शब्द अरबी शब्द 'अल-बा-जद' पासून आला आहे, ज्याचा अर्थ 'लेखन प्रणाली' (writing system) असा होतो. या प्रकातात स्वरांसाठी स्वतंत्र अक्षरं/चिन्हं नसतात. फक्त व्यंजनांसाठी अक्षरं असतात. अरबी, हिब्रू आणि उर्दू आणि पर्शियन सारख्या भाषा लिहिण्यासाठी अबजदचा वापर केला जातो. या भाषांमध्ये, आवश्यकतेनुसार स्वर सूचित करण्यासाठी डायक्रिटिकल मार्क्स किंवा इतर पद्धतींचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रकारातली लिपी वाचतांना संदर्भ आणि उच्चार खूप म्हत्त्वाचा ठरतो.
३. सिलेबरी (syllabary) - प्रत्येक अक्षर स्वतंत्र चिन्ह म्हणून लिहिली जाते. चिन्ह आणि ध्वनीं यामध्ये दृश्यमान संबंध दिसेलच असं नाही. सिलॅबरीत 'एक अक्षरं- एक सिलॅबल' अशी जोडी असते. सिलॅबलमधे सहसा स्वर आणि एक किंवा अधिक व्यंजनं असतात. सिलॅबरीमध्ये, प्रत्येक चिन्ह एकाच सिलॅबल दाखवतं. जपानी (हिरागाना आणि काताकाना), चेरोकी अशा भाषा लिहिण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. अक्षरं आणि लोगोग्राफी यांचा संगम म्हणजे सिलॅबरी.
४. अॅबुगिदा (abugida) - व्यंजनं आणि स्वर दोन्हीसाठी राखीव चिन्हं असतात. व्यंजन लिहितांना, व्यंजनांच्या चिन्हांमध्येच स्वर मिसळून लिहीली जातात. उदा. देवनागरी, क् + अ = क. बाराखडी लिहीतांना आपण स्वर मिसळून व्यंजनं लिहीतो. या पाय मोड्क्या 'क' खाली जे चिन्ह आहे त्याला 'हलन्त' (zero vowel) असं म्हणतात.
५. लोगोग्राफी (logography) - काही लिपी या ध्वनीऐवजी शब्द किंवा संकल्पना चिन्हांमध्ये सांकेतिक चिन्हं वापरुन लिहिल्या जातार. यात प्रत्येक चिन्ह ध्वनी किंवा अक्षराऐवजी शब्द दाखवतं. हा प्रकार, वर्णमाला आणि सिलेबिक लेखनाच्या अगदी उलटा आहे. लोगोग्राफीचं उदाहरण म्हणजे चिनी हांझी लिपी आणि इजिप्शियन हायरोग्लिफिक्स. इजिप्शियन हायरोग्लिफिक्समधे प्रत्येक चिन्ह एक शब्द किंवा संकल्पना दाखवण्यासाठी वापरतात.लोगोग्रफीचा एक तोटा म्हणजे भरपूर चिन्हांमुळे ही लिपी किचकट होते.तसंच शिकायला वेळ लागतो.
ज्या भाषांमधे कमी स्वर आहेत (जसं की, अरेबिक - तीन स्वर) अशा भाषांसाठी अबजाद योग्य आहे, तर क्लिष्ट अक्षररचनांसाठी वर्णमाला ही सर्वात जास्त अनुकूल असते. लोकोग्राफी पद्धतीत चित्रं (glyphs) थोडी गुंतागुंतीची ठरु शकतात. स्पष्ट अर्थ पोचवायचा म्हणजे चित्र अजूनच क्लिष्ट होत जातात.पण जेव्हा लेखन कला विकसित होत होती तेव्हा, प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्हं तयार करण्यापेक्षा फक्त माहीती देणारं चित्र काढणं अधिक तार्कीक होतं. लेखनाचा वापर जास्तीत जास्त होऊ लागला आणि लोगोग्राफी ऐवजी साध्या अक्षरचिन्हांचा वापर वाढला.
लिपी लिहीण्याची दिशा अगदी नक्की नसे. ज्याला जसं वाटेल त्या दिशेत अक्षरं , चित्रं काढली जात. त्यामुळेच प्राचीन इजिप्त चित्रलिपी उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे , उभी, आडवी अशी वेगवेगळ्या प्रकारात लिहिलेली आढळते. अरबी, हिब्रू सारख्या लिपी मात्र नेहमीच उजवीकडून डावीकडे लिहिल्या जात. ग्रीकांनी जेव्हा 'फिनिशियन अक्षरं' आपलीशी केली, तेव्हा ती लिहीण्यासाठी 'बुस्ट्रोफेडॉन' (Boustrophedon) पद्धतीचा वापर करीत. बुस्ट्रोफेडॉन लेखनशैलीत लेखनाची दिशा प्रत्येक ओळीसह बदलते. पहिल्या ओळीत डावीकडून उजवीकडे लिहीलं तर दुसर्या ओळीत उजवीकडून डावीकडे. झिगझॅग पद्धतीने लिहील्यासारखी. ही शैली प्राचीन काळात ग्रीक आणि एट्रस्कॅन लिपींसह अनेक लेखन पद्धतींमध्ये वापरली जात होती. नंतर मात्र या प्रकारात बद्ल होऊन डावीकडून उजवीकडे ही पद्धत अवलंबण्यात आली. नंतरच्या काळात सर्वच युरोपीय भाषांनी हीच दिशा अवलंबली.
झाडांवर कोरुन लिहीण्याची ही एक पद्धत होती. यामुळे लेखनाची दिशा उभी आपसूकच झाली. उभं लिहील्याने झाडाची पूर्ण उंची वापरत येई. 'माया लिपी' सुरवातीला झाडांवर लिहिली गेली. नंतर अंजीराच्या झाडांच्या सालापासून बनवलेल्या कागदावर. चिनी लिपी मात्र, उभी, आडवी, खालून वर अशी कशीही लिहीली जाते. वरपासून खालपर्यंत आणि उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. लिपी विकासाच्या सुरवातीच्या काळात विरामचिन्हांचा वापरही नगण्य होता. वाक्यात स्वल्प विरामाकरीता एक छोटा बिंदू वापरला जाई तर वाक्याच्या शेवटी दोन बिंदू वापरत. ग्रीक आणि लॅटिनमधली विरामचिन्हं बहुधा कवितेतील मीटर दाखवायला वापरत असत.
कागदाच्या शोधानंतर मात्र या प्रस्थापित लेखन पद्धतींना अडचणी भासू लागल्या. जलद लिखाणाची निकड वाढली, व्यापार, धर्म या अगदी मोजक्याच गोष्टींसाठी लागणारं लेखन हळूहळू वैयक्तिक संदेश,हिशोब, घरगुती कामांसाठी वापरात येऊ लागलं. चित्रपद्धत वेळकाढू आणि जास्त जागा घेणारी, तसंच समजायला, शिकायला क्लिष्ट. त्यापेक्षा अक्षरं कागदावर जास्तीत जास्त मावत आणि भरभर लिहीता येत असत. लिपींमधे बदलाचे वारे वाहू लागले. काळाच्या ओघात अनेक लिपींनी कात टाकायला सुरवात केली. पुढे छपाई यंत्राचा शोध बदलाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला. प्रमाणीकरणाची गरज वाढली. छपाईने लेखन लिपीचे प्रमाणीकरण झालं. आता ती कशीही लिहीता येत नव्हती. तसंच ग्रंथांचं मोठ्या प्रमाणात वितरण आणि जतन करण्याची गरज भासू लागली. छपाईतंत्राच्या वापराने मजकूर एकसारखा दिसू लागला त्यामुळे वाचायला, समजायला सोपा झाला. याच बदलाच्या प्रवासात आपण वापरात असलेल्या आधुनिक लिपींचा जन्म झाला.
पुढील भागः देवनागरीच्या पाऊलखुणा (२)
--
संदर्भः
१. Indian Epigraphy: A Guide to the Study of Inscriptions in Sanskrit, Prakrit, and the other Indo-Aryan Languages. Oxford University Press, Richard Salomon (1998).
२. Orthography development: Friederike Lüpke
३. Writing Systems: PETER T. DANIELS