देवनागरीच्या पाऊलखुणा (४)

मागील भाग : देवनागरीच्या पाऊलखुणा (३)

"शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले..." खरंय, शब्दातून सगळ्या भावना व्यक्त करता येतीलच असं नाही. शब्दांच्या पलीकडलं अव्यक्त जग निराळं. पण दैनंदिन रहाटगाडगं हाकण्यासाठी भाषा हवीच. भाषेच्या उगम काळात अगदी सुरवातीचे शब्द निरळनिराळे ध्वनी (आवाज) एकत्र करुन बनले असावेत. बोलतांना तोंडातल्या अवयवांचा वापर करुन तयार झालेले ध्वनींना 'वर्ण' (Phonemes) म्हणतात. जसं की, 'घ्' हा वर्ण, त्यात 'अ' वर्ण मिसळला की 'घ' अक्षर तयार होतं. त्यापुढे 'र्' + 'अ' = 'र' हे अक्षर जोडलं की 'घर' असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. हा शब्द अर्थपूर्ण आपल्यासाठी, कारण मराठी भाषेत 'निवासस्थानाला' आपण 'घर' अशी संज्ञा दिली आहे. पण तेच एखाद्या रशियन किंवा फ्रेंच भाषिकासमोर 'घर' शब्द उच्चारला असता त्याला काहीही बोध होणार नाही. वर्णांमधून अक्षरं उमलली, या अक्षरांमधून शब्द. एक-एक शब्द गुंफून भाषा तयार झाली.

भाषा जसजशी विकसित होऊ लागली तसतसा तिचा वापर व्यापार उदीम, कायदे, अभ्यास अशा अनेक क्षेत्रात होऊ लागला. नव्याने तयार होणारी माहीती अचूक आणि कार्यक्षमपणे जतन करुन ठेवण्याची गरज भेडसावू लागली. जगातल्या विविध संस्कृतींनी यावर आपपल्या परीने तोडगा काढला. काहींनी भावभावना, संकल्पना यांची चित्ररुपात मांडणी करायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, इजिप्शियन चित्रलिपी, हडप्पा संस्कृतीतही चित्रलिपी अस्तित्वात होती. तर काही समुदाय उच्चार दाखवण्यासाठी चित्रांऐवजी सोय म्हणून चिन्हांचा वापर करु लागले.

या सगळ्या व्यापात जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात भाषा निराळया पद्धतीने विकसित होत होत्या. दळणवळणाची आणि संपर्काची मोजकी साधनं यामुळे जगाच्या एका कोपर्‍यात काय चाललं आहे ते दुसर्‍या त्याची दुसर्‍या कोपर्‍याला पुसटसी कल्पना नसे अशी परीस्थिती. प्रागैतिहासिक काळापासून जगायचं आणि पुढे जायचं तर संभाषण गरजेचं त्यामुळे आधी भाषा जन्माला आली आणि नंतर लिपी. शब्द सामावून घेण्यासाठी वर्ण तयार झाले. वर्ण लिखीत स्वरुपात मांडण्यासाठी जी चिन्हं तयार केली गेली त्यांना लेखनचिन्हं (Graphemes) म्हणतात. Grapheme हा शब्द जुन्या ग्रीक भाषेतून gráphō अर्थात लिहीणे या शब्दावरुन तयार झाला. आपण ज्यांना अक्षरं म्हणतो.

ध्वनींचा संबंध वर्णांसोबत जोडला जातो जातो. नंतर हे वर्ण लेखनचिन्हांशी जोडले जातात. बरेचदा वर्ण आणि लेखनचिन्हं यांचं १:१ गुणोत्तर असतं. जसं की, आपण 'क्' या वर्णासाठी 'क' हेच चिन्हं वापरतो पण काही वेळा भाषा अशा रितीने काही विकसित होते की प्रत्येक चिन्हं एकच वर्ण दाखवेल असं होत नाही. जसं की, इंग्रजी भाषेतला 'क्' वर्णासाठी 'k' चिन्हं वापरतात. पण 'cat' या शब्दात 'सी' चिन्हंसुद्धा 'क' ध्वनी दर्शवतं.

हे चिन्हरुपी ध्वनी विशिष्ठ क्रमात वर्णमालेच्या रुपात लिहू जाऊ लागले. अमेरीकन हेरीटेज डिक्शनरी 'alphabet' (वर्णमाला) या शब्दाची व्याख्या करतांना म्हणते, "the letters of a given language, arranged in the order fixed by custom; or it may mean the basic or elementary principles of anything." यातला 'custom' हा शब्द मला महत्त्वाचा वाटतो. वर्णमालेची मांडणी भाषेनुसार बदलते. आपल्या पटकन लक्षात येत नाही पण, अनेकदा ही मांडणी त्या त्या संस्कृतीची जडणघडण, वैचारीक प्रगती, भाषेचा प्रवास याचं द्योतक असतं. वर्णमालेच्या रचनेचा अभ्यास करुन, काही सिद्धांत मांडले गेले. १९२० च्या दशकात, पुरातत्वशास्त्रज्ञांना 'उगारीत', (आताचा सीरिया) मधील शाळेत वापरल्या जाणार्‍या डझनभर दगडी पाट्या सापडल्या, ज्या इ.स.पू. चौदाव्या शतकातील आहेत आणि यात उगारीत वर्णमालाचे दोन क्रम दिसून येतात. त्यातली एक, 'northen sematic order' फिनीशियन आणि हिब्रू अक्षरांशी संबंधित आहे. आपल्याला रोमन अल्फाबेट्सचा जो क्रम आज परिचित आहे, त्या क्रमाचा संदर्भ या फिनिशियन तुकड्यात सापडतो.

1280px-Ugaritic-alphabet-chart.svg.png
स्त्रोत : विकीपिडीया

भाषिक वर्णांची, लिखीत स्वरुपात कशी उत्क्रांती झाली ते आता पाहू. ब्राह्मी लिपी फोनिशियन 'उत्तर सेमिटीक लिपी'वरुन (जिचा वापर मुख्यत्वे व्यापार्‍यांद्वारे केला जाई) विकसित झाली असावी असा एक कयास आहे. 'आरामिक' वर्णमाला ही फोनेशियन वर्णमालेचं बदलेलं रुप. पर्शियातलं पहिलं साम्राज्य Achaemenid, यांची कारभाराची भाषा 'आरामिक' लिपीत लिहीली जाई. आरामिक व ब्राह्मी लिपीतली अक्षरं बरीचशी सारखी दिसतात. त्यामुळे, फोनिशयन व्यापार्‍यांकडून आरामिक साम्राज्याकडे आणि तिथून ही अक्षरं ब्राह्मी लिपीत आली असावीत. बहुदा सम्राट अशोकाने स्वतःसाठी हीच आरामिक वर्णमाला घेऊन ब्राह्मी लिपी तयार केली असावी. या गृहीतकाला धरुन माझं वैयक्तिक मत असं की, धर्मप्रसाराठी जलद गतीने, तांत्रिकदृष्या परिपूर्ण लिपी नव्याने तयार करण्यापेक्षा प्रचलित लिपी घेऊन गरजेनुसार तिच्यात बदल करणं जास्त सुकर ठरलं असावं. अर्थात मताला कुठलाही आधार नाही

देवनगरी वर्णमालेचा विचार करता, वर्णांचा क्रम हा उच्चारानुसार ठरतो. लिपीतल्या अक्षरांची मांडणी, ध्वनीविज्ञानावर आधारित केलेली आहे. (तोंडात ध्वनी कसे आणि कुठल्या भागात निर्माण होतात त्यानुसार अक्षरांची मांडणी). सध्या वापरात असलेले अक्षरांचे आकार कदाचित संस्कृत व्याकरणकारांनी विकसित केले असल्याची शक्यता वर्तवता येते. संस्कृत वर्ण लिपीमधे बसवण्यासाठी त्यांनी आधीच अस्तित्वात असलेली लिपी स्विकारुन त्यानंतर आकार विकसित केले असावेत. कारण ब्राह्मी वर्णमालेची पाळंमूळ जरी सेमिटिक अक्षरांत असतील तरी ती ज्या स्वरुपात आपल्याला ज्ञात आहे, तिची ध्वनीनुसार मांडणी, हे फक्त व्यापार्‍यांचं काम नसावं. यासाठी भाषाशास्त्राची नीट जाण असणं अत्यावश्यक आहे. कदाचित सेमिटीक वर्णमाला व्यापार्‍यांच्या संपर्कातून भारतात आली असेल आणि त्यानंतर अशोकाच्या काळापर्यंत ही टप्प्यटप्प्याने विकास झाला असेल.

ब्राह्मी लिपीत प्रत्येक ध्वनीला एक वर्ण नेमून दिलेला आहे. देवनागरीनेही तिथूनच एक वर्ण = एक ध्वनी पद्धत अवलंबली. उच्चार आणि लिपी यांचा थेट संबंध असणं हे देवनागरीचं वैशिष्ठ्य ब्राह्मीमधूनच आलं आहे. हे अल्फाबेट पद्ध्तीपेक्षा थोडं निराळं. रोमन लिपीत जसं, 'एल्' हा वर्ण आहे पण जेव्हा स्पेलिंग लिहीलं जातं तेव्हा तोच उच्चार 'ए' वगळून फक्त 'ल' असा केला जातो.

या ठिकाणी,चर्चेत 'पाणिनी'चं नाव घेणं अपरिहार्य आहे. संस्कृतमधील व्यंजन आणि स्वरांचं अचूक वर्णन अष्टाध्यायीत वाचायला मिळतं. वर्णमालेचा क्रम हा आपल्याला पाणिनीच्या माहेश्वरसूत्रात सापडतो. देवनागरी वर्णमालेतला व्यंजनांचा पहिला गट - 'क' वर्ग. यात येणारी व्यंजनं, 'क', 'ख', 'ग', 'घ', 'ङ.' ही सगळी कंठव्य आहेत. हे पाचही वर्ण वेदीक काळापासून अस्तित्वात आहेत. पाणिनीने माहेश्वरसूत्रात या कंठव्य व्यंजनांची नोंद 'अकुहविसर्जनीयानां कण्ठः' (ज्या वर्णांचा उच्चार कंठातून होतो असे वर्ण – अ, आ, क, ख, ग, घ, ङ, ह आणि विसर्ग) अशी केली आहे.

कंठव्य व्यंजनांच्या अक्षरांची उत्क्रांती बघतांना आपण 'अशोक काळातले शिलालेख ते आजच्या घडीला वापरात असलेली अक्षरं' असा काळ आपण बघणार आहोत. अशोकाच्या काळाआधीही ही अक्षरं अस्तित्त्वात असतील परंतु विषय सोपा करण्यासाठी अशोकाच्या काळापासून सुरु करु. याच काळापासून मुबलक पुरावे उपलब्ध आहेत. संदर्भासाठी फोनिशियन आणि आरामिक अक्षरं सुद्धा बघू.

अशोक काळातली ब्राह्मी लिपी शिलालेख, स्तंभ, गुहा इत्यादी ठिकाणी कोरलेली आढळते. लिपी कोरण्यासाठी वापरलेली प्राथमिक स्वरुपाची अवजारं, कुठल्याही आधुनिक यंत्रांची मदत न घेता खोदलेले आकार यामुळे सर्वसाधारणपणे सरळसोट आणि टोकदार दिसतात. विश्लेषणासाठी मी खाली दिलेल्या फोटोमधल्या माहितीचा वापर केला आहे. तरीही हा फोटो वाचायला अस्पष्ट असल्याने विकिपिडीयावरुन काही प्रतिमा उदाहरणादाखल दिलेल्या आहेत.

पहिल्या फोटोतला काळ, डावीकडून अनुक्रमे: अशोक (इ.स.पू. ३ ) , कुशाण (इ.स.२), गुप्त (इ.स.४), यशोवर्मन (इ.स. ६), वर्धन (इ.स.७), प्रतिहार (इ.स.९), परमार (इ.स. ११), कलिंग (इ.स.११), यादव (इ.स.१३), विजयनगर (इ.स. १५).

brahmi-nagari-evolution-header.png
brahmi-nagari-evolution.png

क :

अशोकन शिलालेखांमधे, वर्णमालेतलं पहिलं व्यंजन, 'क' हे मध्यभागी काटकोनात एकमेकांना दुभागणार्‍या 'अधिक' चिन्हासारखं दिसतं. सेमिटीक लिपीत 'Kaph' हे अकरावं अक्षर. ब्राह्मी लिपी सेमिटीक लिपीवरुन तयार झाली असल्याच्या गृहीतकानुसार आरामिक लिपीतून Kaph('K') अक्षर, ब्राह्मी लिपीत 'क्' वर्णासाठी 'अधिक' चिन्हं आलं असावं.

ph-k.png

(चित्रात डावीकडून पहिलं चिन्हं फोनिशियन, दुसरं आरामिक लिपीमधलं तर चौथ्या रकान्यात ब्राह्मी लिपीतलं चिन्हं. स्त्रोत : विकीपिडीया)

ब्राह्मी लिपीतलं 'क' हे अक्षरं कोरायला अगदीच सोपं असल्याने काळानुसार त्यात झालेले बदल अत्यल्प आहेत. काही ठिकाणी रेषा असमान आणि थोड्या वाकड्याही दिसून आल्या आहेत. बहुतेक दगडात कोरतांना नीट खोदलं नसेल तर आणि असमान आकार बनला असेल. हा आकार इतका सोप्पा आहे की, त्यात फार चूका दिसून येत नाहीत. हे 'अधिक' चिन्हं आजही थोड्याफार प्रमाणात आधुनिक 'क' मधे टिकून आहे. चित्रात नीट निरखून पाहीलं तर अशोकाच्या काळात अक्षरावर शिरोरेखा देण्याची पद्धत नव्हती.

मधली उभी दंडरेषा कुशाणकाळात निमुळती होत जाते. तसंच लांबी किंचीत वाढल्यासारखी दिसते. याच काळात दांडीवर त्रिकोण विकसित झाल्याचा आढळून येतो. अक्षराची लांबी वाढलेली दिसून येते. कुशाणांच्या काळात, डोक्यावर त्रिकोण दिसतो. कुशाणोत्तर काळात, त्याच त्रिकोणाची शिरोरेखा विकसित होतांना दिसते. तसंच बाजू थोड्या गोलाकार दिसून येतात.

प्रतिहार साम्रज्याच्या काळात 'क' ची एक बाजू गोलाकार होतांना दिसेल. तर दुसरी बाजू अधांतरी हवेत तरंगतांना. शिरोरेखाही त्रिकोणी दिसतेय. बहुतेक भरभर लिहीण्यासाठी बोरू, लेखणी न उचलता लिहीतांना तसा आकार तयार झाला असावा. कलिंगाच्या काळापासून 'क' हा सध्या आपण लिहीतो तसा दिसतो. मध्यदंड थोडा वाकलेला. हा आकार कलचुरी राजा 'कर्णदेव' याच्या ताम्रपत्रावर आढळला.

ख :

इंग्रजीमध्ये प्रतिरूप नसलेल्या अक्षरांपैकी एक 'ख' आहे. आरामिक भाषांमधेही 'ख्' व्यंजनं नसावं. पण बहुदा, आरामिक ('Q') चा अपभ्रंश होऊन 'ख' साठी चिन्हं ब्राह्मी लिपीत आलं, असा कयास आहे.

ph-kh.png
(चित्रात डावीकडून पहिलं चिन्हं फोनिशियन, दुसरं आरामिक लिपीमधलं तर चौथ्या रकान्यात ब्राह्मी लिपीतलं चिन्हं. स्त्रोत : विकीपिडीया)

अशोकाच्या काळातलं 'ख' अक्षर आणि आत्ता आपण जसं लिहीतो त्यात बरीच तफावत दिसते. अशोक काळातला 'ख' हा एखाद्या आकड्यासारखा दिसतो. बहुतेक खणण्यासाठी कुदळीच्या वापरावरुन हा 'ख'चा आकार तयार झाला असावा. कुशाण काळातलं 'ख' अक्षर हे गिरनार पर्वताच्या जवळ एका दगडावर सापडलं आहे. हे दुसर्‍या शतकातलं असून क्षात्रवंशाचा राजा 'रुद्रदामा' याच्या एका लेखात आढळतं. गुप्त काळातलं 'ख' हे अक्षरं थोडं आधीच्या 'ख'चं कर्सिव्ह स्वरुप असावं. पण याच्या तळाशी जो गोल आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. हाच गोल आजही आपण 'ख' अक्षरं लिहीतांना वापरतो. फक्त तो आतासारखा एका बाजूला नसून तळाशी आहे. दगडात कोरतांना तळपायाशी कोरणं जास्त सोपं जात असावं. प्रतिहार काळात मात्र बहुदा (कदाचित) सौंदर्य वाढवण्यासाठी शिरोरेखा आखली गेली आणि त्यानंतरच्या काळात दंडामुळे तळाचा गोल बाजूला सरकल्यासारखा दिसतो. त्यामुळेच पुढच्या काळात 'र' आणि 'व' हे आकार वेगवेगळे झाल्याचं दिसतं.
brahmi-kha-evolution.png
(स्त्रोत : विकीपिडीया)

याच आकारात 'ख' आपल्याला पुढेही वापरात असल्याचं दिसतं. काका कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली लिपी सुधार समितीने 'र' ला थोडं खेचून 'व' ला जोडावा अशी सूचना केली. त्यातूनच आधुनिक 'ख' तयार झाला.तोवर हा 'ख', 'रव' वाटत असे.

ग :

'ग' देवनागरीतलं तिसरं व्यंजन आणि ते आरामिक 'Gimel' या अक्षरावरुन तयार झालं असावं. कारण 'ग' हे अक्षर रोमन 'G' सारखंच पण उलटं दिसतं.

ph-g.png
(चित्रात डावीकडून पहिलं चिन्हं फोनिशियन, दुसरं आरामिक लिपीमधलं तर चौथ्या रकान्यात ब्राह्मी लिपीतलं चिन्हं. स्त्रोत : विकीपिडीया)

'क' प्रमाणे 'ग' चा आकार ही साधाच आहे. तसंच अशोकानंतरच्या काळात बाकी अक्षरांप्रमाणे या ही अक्षराला गोल आकार देण्याकडे कल दिसतो. इतर दोन अक्षरांप्रमाणे 'ग' सुद्धा प्रतिहाराच्या काळात जसा दिसे तसाच काहीसा आता आपण काढतो.

ga-brahmi-evolution.png
(स्त्रोत : विकीपिडीया)

'ख' प्रमाणे 'ग' सुद्धा अंत्यदंडयुक्त आहे पण 'ग' त्याच्या कान्यापासून वेगळा आहे तर 'ख' कान्याला जोडला आहे. 'ख' अक्षरात जसं शिरोरेखा दिल्याने 'र'आणि 'व' हे आकार सुट्टे झाले तसंच 'ग' मधे सुद्धा काना वेगळा झाला. गोलाकार 'ग' हा मथुरेचा राजा 'क्षत्रप' याच्या लेखात दिसून येतो. या गोलाकार 'ग' ची उजवी बाजू उभी केली आणि डोक्यावर रेष आखली तर साधारण आज वापरात असलेला 'ग' दिसून येतो.

आपण तपशिलात जातच आहोत तर, 'ग' आणि 'ग़'मधला फरक बघू. ग़ज़लमधला 'ग़', पर्शियन लोकांकडून आला. हा आपल्या 'गणपतीत'ल्या 'ग' पेक्षा वेगळा आहे. त्याचप्रमाणे, कयामत, क़ातिल, काझी यातील 'क' चा उच्चार हा आपल्या भाषेतील उच्चारापेक्षा वेगळा, 'क़' ध्वनी आहे. ध्वनींमधला फरक समजण्यासाठी मूळ अक्षराला नुक्ता देऊन सजवण्यात आलं.

घ :

देवनागरी लिपीतलं चौथं अक्षर 'घ' हे आरामिक 'H/X' मधून आलं असावं.
ph-gha.png
(चित्रात डावीकडून पहिलं चिन्हं फोनिशियन, दुसरं आरामिक लिपीमधलं तर चौथ्या रकान्यात ब्राह्मी लिपीतलं चिन्हं. स्त्रोत : विकीपिडीया)

अशोक काळातला 'घ' मासा पकडायला गळ वापरतात तसा दिसतो. फक्त पायाशी जो गोलाकार आहे त्यातून एक छोटी रेघ निघते. अशोक काळानंतर हा उभा गळ, आडवा झालेला दिसतो. मधल्या रेषेची लांबी ही वाढलेली दिसते. नवव्या शतकापासून शिरोरेखा जोडली गेली. हळूहळू गळासारखा दिसणारा आकार उभा होतांना दिसतो. आडव्या आकाराला शिरोरेखा देणं कठीण जात असावं असा माझा अंदाज. लिखाणाचा वेग वाढवाण्यासाठी बहुतेक 'घ' ही झालेला दिसतो.

brahmi-gha-evolution.png
(स्त्रोत : विकीपिडीया)

ङ:

ङ च्या उत्क्रांती विषयी फारशी माहीती मला मिळाली नाही. देवनागरीतलं हे पाचवं व्यंजन अशोककाळात सापडत नाही. या अक्षराचा वापर कुशाणकाळात जोडाक्षरात सापडतो. याचं पहिलं रुप समुद्रगुप्ताच्या एका लेखातून घेतलं आहे. त्यानंतर 'ङ'च्या पायाचं वळण गोलाकार होत गेलं आणि तो 'ड' सारखा दिसू लागला. आठव्या शतकात 'ड'च्या बाजूला बिंदू जोडायला सुरवात झाली. 'ङ' हा अल्पदंडयुक्त म्हणजेच 'ङ' ची काना छोटीशी, त्याच्या डोक्यावरआहे.ङ:

nya.png
(स्त्रोतः देवनागरी लिपी : स्वरुप, विकास और समस्याए, पृष्ठ क्रमांक : ११२)

'ङ' अक्षराविषयी काही अनुत्तरीत प्रश्न माझ्या डोक्यात घोळत आहेत. ते असे :

- 'ङ' वर्णाला ब्राह्मीमधे चिन्हाक्षर दिसत नाही. अशोक काळातल्या पाली भाषेत 'ङ' हा ध्वनी नव्हता का? त्यामुळे त्यासाठी वेगळा वर्ण तयार केला गेला नसावा का? वर्ण नाही, मग चिन्हंही बनलं नाही.

-चिन्हं पुढे नागरीमधे आलं. याच कारण असं असावं का, संस्कृतमधे 'ङ' वर्ण नियमित येतो. जेव्हा संस्कृत भाषा नागरी लिपीत लिहू जाऊ लागली तेव्हा 'ङ' या वर्णाला चिन्हाची गरज भासली. तसं असेल तर 'ड' च्या जवळ जाणारं चिन्ह का वापरण्यात आलं?

-वेगळेपणा दाखवण्यासाठी नुक्त्यासारखा बिंदू का देण्यात आला? जी संस्कृती त्या काळातली एवढी प्रगत वर्णमाला तयार करु शकते, तीच संस्कृती एखाद्या अक्षराला काहीतरी नाविन्यपूर्ण चिन्हं का शोधू शकली नाही?

माझ्या या प्रश्नावलीने या भागाची सांगता करुया.

पुढील भागात च, छ, ज, झ, ञ.
--

संदर्भः
१. The History and Development of Mauryan Brahmi Script, Qhandrika Singh Upasak.
२. THE ORIGIN OF THE BRAHMI AND TAMI SCRIPTS, EGBERT RIGHTER.
३. देवनागरी लिपी : स्वरुप, विकास और समस्याए.
४. Development of Devanagari script : A.K. Singh : 1990.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle