लेकीची शाळा, नविन वर्षं सुरू झालं आणि अचानक मला माझ्या शाळेतली एक गमाडीगंमत आठवली. लेकीला ती शिकवण्याच्या निमित्ताने बर्याच दिवसांनी हस्तकलेचा अनुभव घेतला.
ती गंमत म्हणजे शाळेचं वेळापत्रक. आठवतंय का कोणाला? पुठ्ठ्याचं, दोन्ही बाजूनं उघडणारं आणि जादूनं केवळ तीनच दिवसांचं वेळापत्रक दाखवणारं? आठवलं?
या करता लागणार्या वस्तु अगदी हाताशी होत्या. एका लग्नाची निमंत्रणपत्रिका आली होती. चांगले जाड पुठ्ठे होते आणि आकारही अगदी योग्य होता. मी ते वापरले. बाकी साहित्य म्हणजे - योग्य आकाराचे पुठ्ठ्याचे दोन सारखे तुकडे, कोणतेही रंगित कागद (त्यातला एक जरा जाड असेल तर उत्तम. मी निळ्या रंगाचा चार्ट पेपर वापरला आहे.), एक कोरा कागद, कात्री, फेविकॉल/ग्लुस्टिक वगैरे.
निळा पेपर दोन्ही पुठ्ठ्यांना एका-एका बाजूला लावून घेतला.
लेकीच्या शाळेचं वेळापत्रक कॉप्युवर बनवून, छापून त्याच्या पट्ट्या कापून घेतल्या. जर हाताने लिहिणार असलात तर तुमचं जीवन सोपं होईल. कारण त्याकरता फक्त कोर्या कागदाच्या तीन पट्ट्या कापून घ्याव्या लागतील.
वेळापत्रक छापून घेतलं की जरा डोक्यालिटी वापरावी लागते. कशी ते पुढे पाहू.
या सोमवार ते शुक्रवारच्या वेळापत्रकाच्या पट्ट्या. छापताना पुठ्ठ्यांचा आकार - उंची आणि रुंदी लक्षात घ्यावी लागेल. उंचीत सगळ्या दिवसांचे सगळे तास बसताहेत ना ते पहावे. वेळ घालावी. लंच ब्रेक्स वगैरेही लिहावेत. रुंदीत बरोबर तीन पट्ट्या मध्ये आणि दोन्ही टोकांपासून निदान अर्धा-अर्धा सेंटिमीटर दूर असतील असं बघावं.
छापलेल्या पट्ट्या ५ असतील तर कोरा कागद वापरणार असू तर फक्त ३ लागतील. आता या छापलेल्या ५ पट्ट्यांच्या ३ पट्ट्या करायच्या आहेत. त्याकरता सोमवार-गुरुवार आणि बुधवार्-शुक्रवार च्या जोड्या जमवा. मंगळवार एकटाच राहू द्यात. सोमवार सुलट तर गुरुवार शीर्षासनात ठेवा. तसंच बुधवार सुलट+शुक्रवार शीर्षासनात असं शेजारी शेजारी ठेऊन घ्या.
सोमवार्-गुरुवार एकमेकांना पाठीवर चिकटवून घ्या. सोमवारच्या बरोब्बर मागच्या बाजूला उलटा गुरुवार असेल. तसंच बुधवारच्या मागे उलटा शुक्रवार असेल. वरच्या खालच्या रेषा तंतोतंत जुळतील असं पहा. आता फक्त ३ पट्ट्या तयार झाल्या आहेत. १. सोमवार+उलटा गुरुवार, २. मंगळवार आणि ३. बुधवार+उलटा शुक्रवार. बरोबर?
आता, एका पुठ्ठ्यावर (निळा) कागद लावलेल्या बाजूवर या (पाचच्या तीन झालेल्या) पट्ट्या ठेवा. सगळ्यात डावीकडे गुरुवार, नंतर मंगळवार आणि शेवटी शुक्रवार असतील. फोटो ऑफफोकस असल्याने वार नीट दिसत नाहीयेत. त्याबद्दल क्षमस्व.
यातील पहिली आणि तिसरी पट्टी खालच्या पुठ्ठ्याच्या मागच्या बाजूला वरून आणि फक्त वरूनच चिकटवून घ्या. खालची बाजू चिकटवायची नाहीये हे लक्षात ठेवा.
आता, मधली (मंगळवारची पट्टी) मधोमध ठेऊन त्यावर दुसरा पुठ्ठ्याचा तुकडा (कागद लावलेला भाग आतमध्ये राहील असा) ठेवा. मधल्या पट्टीचा वरचा भाग या वरच्या पुठ्ठ्यावर चिकटवा. तसंच पहिल्या आणि तिसर्या पट्ट्यांचे खालचे भाग या वरच्या पुठ्ठ्यावर चिकटवा. आता खालचा पुठ्ठा वर आणा आणि मधल्या पट्टीचा खालचा भाग (आता वर आलेल्या) पुठ्ठ्यावर चिकटवून घ्या. वाचताना जरा गडबडीचं वाटलं तरी तसं ते नाहीये.
असं दिसायला हवं. एका बाजूला चिकटवलेल्या पट्ट्या दिसत आहेत आणि बाकीच्या ज्या मोकळ्या दिसत आहेत त्या खालच्या पुठ्ठ्यावर चिकटवल्या जातील.
हुश्श्य! डोक्यालिटी संपली. आणि आपलं वेळापत्रक तयार आहे.
एका बाजूनं उघडलं की सोमवार, खाली मंगळवार, पुन्हा वर बुधवार.
दुसर्या बाजूनं उघडलं की गुरुवार, शुक्रवार. खाली (मंगळवारच्या मागची) रिकामी पट्टी.
तुम्ही जर सोमवार+उलटा गुरुवार आणि मंगळवार+उलटा शुक्रवार असं करून बुधवार एकटा ठेवलात तर सोमवार, मंगळवार एका पुठ्ठ्यावर येऊन खालच्या पुठ्ठ्यावर बुधवार दिसेल.
आमच्याकाळी शनिवारीही (अर्धा दिवस) शाळा असल्याने सगळ्या पट्ट्यांच्या दोन्ही बाजू वापरल्या जायच्या. आता एक पट्टी शेवटी रिकामी राहते. त्यावर मुलांनी आपापली कला दाखवावी. चित्रं काढा, स्टिकर्स लावा, सुविचार लिहा, फोटो चिकटवा ... काहीही करायला वाव!
आता वेळापत्रकाच्या बाहेरच्या बाजूला सजवायचं. यात डेकोरेशन करता अगदी 'whole वावर is our'! वेगळ्या कागदावर या आकारात चित्रं काढून, रंगवून इथे चिकटवता येतील, रंगित मणी वगैरे लावून सजवता येईल, ग्लिटर ग्लू, ग्लिटर पावडर लावून चमकवता येईल, शाळेचा फोटो, वर्गाचा फोटो, स्वत:चा फोटो वगैरे लावता येईल. कोलाज करता येईल.
मी लहानपणीचंच आणखी एक हस्तकौशल्य उपयोगात आणलंय. रंगित घोटीव कागदांची चटई. ही एका वेगळ्या (one sided) कागदावर करून मग पुठ्ठ्यावर चिकटवली आहे.
दोन्ही बाजू सजल्या.
वेळापत्रक तयार!
************************************
मराठीला इंग्रजी आणि इंग्रजीला मराठी शब्द सुचवा :
* घोटीव कागद = मार्बल पेपर = एका बाजूनं पांढरा आणि दुसर्या बाजूनं रंगित, गुळगुळीत असलेला. यात भरपूर रंग असतात.
* ? = चार्ट पेपर
* पतंगी कागद = टिश्श्यु पेपर = अगदी पातळ, दोन्ही बाजूंना रंग असलेला. नावानुसार पतंग बनवण्याकरता वापरला जातो. लहानपणी यातल्या लाल रंगाच्या कागदाचे तुकडे पाण्यात बुडवून हाताला चोळून इंन्स्टंट मेंदी बनवली जायची. :)
* पुठ्ठा = कार्डबोर्ड
* ? = कन्स्ट्रक्शन पेपर
* ? = क्रेप पेपर = एक सुरकुतलेला कागद. याच्या फिती डेकोरेशनकरता वापरतात.