उन्हाळा सुरु होतो. शाळेच्या सुट्ट्यांचे वेध लागतात.
परीक्षा संपल्या कि एकच हुर्यो होतो आणि मे येतो.
सोबत येतो तो.
आंबा.
फळांचा राजा.
आंब्याच्या आठवणी सांगणं कठीण आहे कारण प्रत्येक चांगल्या आठवणीत आंबा आहेच. लहान होतो तेंव्हापासून सगळ्या उन्हाळ्याच्या आठवणी पाडळीशी जोडलेल्या. पाडळी माझं गाव. छोटंसं खेडंच खरंतर. कराड रहिमतपूर रस्त्यावर वसलेलं. डोंगरांच्या मधोमध. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे पाडळीला चांगले दीड महिनाभर सुट्टीला जायचो. वीस बावीस जणांचं कुटुंब. सगळे काका काकू, चुलतभावंडं, आतेभावंडं जमायचो. फुल्ल दंगा चालायचा.