२००१ पासून मी विविध विद्यापीठांचे नाट्यविभाग, विविध नाट्यप्रशिक्षण संस्था, मास कॉम कोर्सेस इत्यादी ठिकाणी कॉश्च्युम डिझाईन शिकवले/ शिकवते आहे.
आता पहिल्यांदाच पुढच्या आठवड्यात अश्या कुठल्या संस्थेच्या, पदवीच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसलेले असे माझे कॉश्च्युम डिझाईनचे वर्कशॉप होते आहे. फ्लेममध्ये मी कॉश्च्युम शिकवलेल्या बॅचेस मधील एक विद्यार्थिनी तितास दत्ता हिच्या कोलकात्याच्या ग्रुपने ही वर्कशॉप सिरीज आयोजित केली आहे.
वर्कशॉप ऑनलाईन असेल आणि माध्यम इंग्लिश/हिंदी असेल.
“आज काय खास? इतकं तयार होऊन आलीयेस!” ठकूच्या कपड्यांकडे बघून सातासमुद्रापारच्या देशात कुणीतरी साडेसहाशेव्यांदा हा प्रश्न ठकूला विचारला. आपल्या मळखाऊ रंगाच्या, पिदडायच्या सलवार कुर्त्याकडे बघून ठकूला प्रश्नकर्त्याबद्दल साडेसहाशेव्यांदा सहानुभूती दाटून आली. सहाशेएकावन्नावी वेळ आलीच नाही. ठकूने रोजच्या वापरातून सलवार कुर्ते काढूनच टाकले. भारतात परत येताना ते सगळे ठकूने यमीपेक्षा पाचशेपट गोरी असलेल्या आपल्या मैत्रिणीला देऊन टाकले. मैत्रिणीने ते कौतुकाने मिरवत वापरले.
“ती हिंदी सिनेमातल्या दुखियारी माँ सारखे कपडे घातलेली रोमन बाई कोण गं ठकू? तिने साडीचा शोध लावलाय. हो ना?” गुगल संशोधकांनी ठकूला विचारले. “साडी म्हणजे काय वीज आहे का शोध लावायला?” ठकूने नाक उडवले.
वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.