निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं.
निरंजन या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला.
माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.