फॅमिली क्रोनिकल्स

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!

फॅमिली क्रॉनिकल्स १ : लग्नाचा वाढदिवस - आमचं सेलिब्रेशन!

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!

------------------------------------------------------------------------------------------------

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! दरवर्षीच अजून एक वर्ष आपण एकमेकांबरोबर कसं काय घालवलं ह्या विचारानी आम्हालाच आश्चर्य वाटतं.

तर सकाळी सकाळी त्याला त्याच्या बहिणीचा का कोणाचा व्हॉटस अप आला वाटतं कारण त्याने घोषणा केली,
"१२ बरं का!"
"१२? काय १२ वाजले? एवढा वेळ झोपले मी आज?" तसा रविवार असल्याने घाई नव्हती पण १२?
"अगं, लग्नाचा १२ वा वादि आहे आज!", तो.
"अरे वा! कोणाच्या?",मी!
"अगं कोणाच्या काय, आपल्या!"
"अरे १२ वा नाही काय मग, तेरावा! १३ वर्ष भोगत्ये मी हे, विसरेन का?"
"अगं, १३ वर्ष लग्नाला झाली म्हणजे १२ वा वादि!"

मग पहिले संयत चर्चा, मग बाचा-बाची, मग थोडी जोरदार आतषबाजी अश्या चढ्या क्रमाने सकाळ आणि वदि ची सुरुवात योग्य मार्गानेच झाली. कोणीसेसे म्हटलेच आहे ना थोडेसे वाद-विवाद चांगल्या नात्याला पोषकच! आमचं नातं त्या हिशोबाने बरंच पोषक झालंय.

या आतषबाजीने मुलं उत्सुकतेपोटी धावत आली.

"काय झालं?"
"अरे आज आमची लग्नाची अ‍ॅनिव्हर्सरी आहे. त्याच्या शुभेच्छा देतोय एक-मेकांना"
"Oh cool!We are so glad you guys got married because then we were born." त्यांचा एक वेगळाच narcissist view! "Lets go out for celebration."

हे मात्र त्यांचं मला पटलंच. एकाएकी anniversary celebration हे कर्तव्या पार पाडण्याची जबाबदारी शिरी घेतल्यासारखी मी तडक बेडमधून बाहेर आले.

कर्म-धर्मसंयोगाने रेस्टॉरंटला जात असताना वाटेत त्याला एक पाटी दिसली - Divorce in $99!

"ओह ,वॉव! अरे अमेझिंग डील आहे. $99 मध्ये डिव्होर्स!...एवढं चांगलं डील परत मिळणार नाही, घेऊन ठेऊया!"
कोणी डील मध्ये विष वाटत असलं तरी मला खात्री आहे हा माणूस घेऊन ठेऊया म्हणेल.
"Buy one get one free आहे का ते विचारलं पाहिजे.मग कोणाबरोबर तरी $99 अर्धे-अर्धे करू, $४९.५० मध्ये डीव्होर्स, फारच अमेझिंग डील!"
भलती स्वप्न बघू नकोस...ह्या जन्मात काय पुढली सात जन्म पण तुला सोडणार नाहीये. आताशा मी वटपौर्णिमा पण चालू केल्ये. मला तुझा त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण तुला आनंद मिळू देणार नाही!

मागून "Oh, you guys are thinking of taking a divorce? just like Steve's parents? How cool, we get to stay one week at dad's house and one week at mom's house" असे काहीसे संवाद ऐकू येऊ लागल्याने मी त्या विषयाला फार पुढे नेलं नाही.

जेवणानंतर नवा स्टार-वॉर्स बघायला जायचं असं गाडीतल्या back-benchers नी परस्पर ठरवून टाकलं आणि पुढच्या चक्रधरानेही तो प्लॅन उचलून धरला. आता घरात युद्ध कमी होतात का की हे पैसे देऊन अजून एक युद्ध बघायला जावं? मूळात मी शांतताप्रिय असल्याने मी तत्परतेने माझा शॉपिंगचा प्लॅन मांडला. कुठेसेसे काय-कायसे सेल्स लागलेत याची वर्णनं ऐकवली. त्यामुळे boys vs girls अशी तट पडून तिघं boys स्टार-वॉर्सला आणि एक girl शॉपिंगला अशी विभागणी झाली. ही तर फारच आनंदाची गोष्ट! नाहीतरी कधीकाळी चुकून ही boys gang शॉपिंगला आली तर लंबगोलाकार चेहरे करून फिरत असतात. नको ते शॉपिंग, चला घरी जाऊ आणि टि. व्ही. ला डोळे चिकटवून बसा एकदाचे असं होऊन जातं.

हे सकाळपासून असे प्रेमळ संवाद चालू असताना मात्र जेवताना मी फेसबुकावर "celebrating wedding anniversary, feeling festive" हे अपडेट टाकायला मी विसरले नाही. त्याबाबतीत मी particular आहे. एकदा माझ्या फोनने, एकदा त्याच्या फोनने सेल्फीज मग त्यातला त्याच्या फोनवर काढलेला आवडल्याने ( त्याच्या फोनवरून माझे फोटोज मस्त बारीक येतात, असं माझं निरेक्षण आहे) तो व्हाटसअ‍ॅपवरून मला पाठवायला लावणे, मग ते फोटोज ड्युली समस्त व्हॉअ‍ॅ गृपवर फॉरवर्ड करणे असं सगळं यथास्तित पार पाडत जेवण उरकलं.

हे व्हॉअ‍ॅ प्रकरण मला फार आवडलय. घरच्या घरी एकमेकांशी बोलायला बरं पडतं ते. मग ती शब्दांची आतषबाजी तेवढी होत नाही. आता घरायल्या ज्युनिअर मंडळींना पण फोन घेतले की झालं. पण मग ते शाळेत घेऊन जाणार आणि सध्याचा शाळेत साधारण ३ दिवसाला एक वस्तू हरवण्याचा स्पीड बघून तो बेत लांबणीवर आहे. तर ते असो.

जेवल्यानंतर घेतले ्या कॉफीचा फोटो बघून एका व्हॉअ‍ॅ गृपवर एकजण चिरकली -
"अगं, नुस्ती कॉफी? काय झालं तरी काय तुला?"
"अगं नुस्ती कॉफी कशी घेईन त्यात आहे ना, कल्हुआ! कॉफी आणि आजचा दिवस वाया थोडीच घालवणार मी?"
"हं, मग ठीके. मला वाटलं अ‍ॅनिव्हर्सरी निमित्त सोडलीस की काय!"
"सोडेन ना, पन्नासाव्या अ‍ॅनिव्हर्सरीला सोडणारच आहे."
"कोणाला, नवर्‍याला?", अजून एकीने विचारणा केली.
"त्याला सोडते म्हटल्यावर त्याच्या चेहर्‍यावर अतीव आनंद दिसतो मला. त्याला बरी सोडेन. १३ वर्षात प्रोडक्ट ठाकून- ठोकून तयार केलंय. एव्हढी मेहेनत घेतल्यावर आता या वयात परत दुसरा गाठून कोण ते ठाक-ठुकीचं काम करणार परत? असू देत, तसंही पुलंनी सांगून ठेवलंय. सगळे नवरे सारखेच, दुसरा बरा दिसतोय म्हणून पहिला सोडण्यात काही तथ्य नाही. पदरी पडलं आणि पवित्र झालं, झालं!", मी!

जेवण असं खेळीमेळीत पार पडल्यावर आम्ही आपापल्या मार्गाने निघालो. म्हणजे ते तिघं स्टार वॉर्स च्या दिशेने आणि मी दुकानं गाठली. “having fun, shopping with the family, feeling happy” असं फेसबुक स्टेटस अपडेट करायला मी विसरले नाही. हो चारचौघांत असं politically correct च लिहावं. थोडया वेळाने फेसबुक परत उघडून बघते तर त्याचं स्टेटस - “having fun, watching star wars with the family, feeling happy!!!”

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स २ : श्रीगणेशा - अर्थातच सुरुवात!

या महिन्याचा सृजनाच्या वाटाचा विषय बघितला आणि म्हटलं, अरे, हा तर आपल्या स्पेशलायझेशनचा विषय... सुरुवात - म्हणजेच श्रीगणेशा.

'आमचे येथे कशाचीही 'सुरुवात' करून मिळेल, म्हणजेच कशाचाही 'श्रीगणेशा' करून मिळेल, पुढचे तुमचे तुम्ही बघा' - अशी आमची फॅमिली टॅग लाईनच ठरेल!

कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याचा आमचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. मग ते व्यायाम करणं असो, एखाद्या विषयावर वाचन असो, डायटिंग असो, घर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम असो. त्यातून त्या उपक्रमाला पैसे घालायचे असतील तर मग उत्साह अधिकच असतो. कुठलीही गोष्ट नुस्तीच न करण्यापेक्षा ती पैसे भरून नाही केली की कसं बरं वाटतं.

म्हणजे कसं - टेनिस क्लासेस - असा बोर्ड दिसला की आम्हाला सर्वांना उत्साह येतो - हा - आता टेनिस शिकायचं. डोळ्यासमोर बोरीस बेकर पासून विलियम बहिणींपर्यंत समस्त मंडळी दिसून जातात आणि लवकरच 'संपूर्ण कुटुंबियांना ग्रँड स्लॅम' अशी वर्ल्ड रेकॉर्ड न्यूज होणार अशी स्वप्न डोळ्यासमोर तरळू लागतात. त्या धुंदीत आम्ही तत्काळ त्या क्लासला अ‍ॅडमिशन घेऊन मोकळे होतो. आता असं वर्ल्ड रेकॉर्ड टेनिस खेळायचं म्हणजे तशी तयारी नको जोरदार? मग तत्काळ समस्त मंडळींना टेनिस रॅकेटस, शूज अशी खरेदी होते. हो! साध्या-सुध्या दर्जाच्या रॅकेटस, शूज हे उद्याच्या स्टेफी ग्राफ, आन्द्रे आगासींना शोभत नाहीत हे लक्षात घेऊन तशीच खरेदी होते. पुढला आठवडाभर मग टेनिस क्लासेस, प्रॅक्टिस यांची धामधूम उडते. घरामध्ये स्पोर्ट्स चॅनेलवर टेनिस मॅचेस बघणे वगैरे चालते. अचानक आठवड्यात एकाला ऑफिसचे बरेच काम निघते, दुसर्‍याचा पाय दुखावतो, तिसर्‍याला त्याचा जन्म टेनिसकरिता झालेला नसून दुसर्‍या एखाद्या गोष्टीकरिता झाला असल्याचा दृष्टांत होतो तर चौथीला विलियम बहिणींच्या पोटावर पाय का आणा असा कनवाळू विचार मनात येतो. टेनिसचं भूत उतरतं. रॅकेटस - असू देत खेळू नंतर परत म्हणून गराजच्या पोटमाळ्यावर जमा होतात.
गराज अश्या असंख्य गोष्टींनी भरलेलं आहे. स्केट बोर्ड, स्केटस, टेनिस-सॉकर-रनिंग असे निरनिराळे शूज, स्किईंगचे स्कीज, शूज, हेल्मेटस, सायकली, त्यांची हेल्मेटं...काही काही म्हणता कमी नाही. सगळ्या श्रीगणेशांचे पुरावे तिथे 'खेळी-मेळी'ने नांदतायत.

तर परवा असाच एक नविन फतवा निघाला - स्नो मध्ये स्नो शूईंगला जाण्याचा. अर्थातच श्रीगणेशा हा स्नो शू खरेदी करण्याने झाला. ही एक पायातल्या शूजवर चढवायची फतकलं. ती घालून फताक-फताक करत बर्फात चालायचं. समस्त कुटुंबियांना स्नो -शूज, बर्फात घालायचे हातमोजे, स्नो-पँटस, टोप्या यांची खरेदी झाली. आता उद्या जायचं. सकाळी-सकाळे चांगले नवाला उठलो. मस्त न्हा-धोके, खा-पी के ११ ला बाहेर पडायला घेणार तेव्हा पायातल्या शूज वर ती स्नो-शूजची फतकलं बसतायत का याची पहाणी चालू झाली. यात एका कुमारांच्या बूटांवर ती फतकलं बसली पण दुसर्‍याच्या बुटांवर ती अडकेनात. मग प्रथम कुमारावर, मग फतकलांवर, मग बूटांवर मग क्रमाने घरातल्या प्रत्येक मेंम्ब्राने उरलेल्या मेंम्ब्रांवर अशी चीडचीड करून झाली. हाती (किंबहुना पायी) काही लागले नाही. मग कुमारांना बूट बदलून दुसरे बूट घालण्याचा एक सल्ला पुढे आला. तो रोजचे शाळेचे बूट घेऊन आला. सहज म्हणून ते उलटे केले तर त्याला रुपयाएवढं भोक - सोलमध्ये. परत एकदा कुमारावर भडिमार....हे कसे झाले अश्या प्रश्नांचा. आता कसे झाले याचे उत्तर तर त्याच्या कडे नव्हते पण - that explains why I feel so cold everyday after the recess in the school- हे त्याचे स्वतःचे स्वतःला explanation!

आता बाहेर पडून त्याला बूट घेणं आलं. मधल्या काळात दुसर्‍या कुमाराने स्वतःचे जॅकेट शाळेतच नीट ठेऊन येण्याचा उपद्व्याप केलाय अशी एक ताजी बातमी हाती आली. पहिल्यांचं जॅकेट तर शाळेत हरवलंच होतं. त्यामुळे दोन नविन जॅकेटस घेण्याचा अजून एक उपक्रम हाती घेण्यात आला. बाहेर पडून दुकानं धुंडाळून, दोन्ही कुमार, सेनिअर मेंम्ब्र - सर्वांना पसंत पडतील अशी जॅकेटस खरेदी करेपर्यंत १ वाजला. मग अर्थातच सर्वांना भूका लागल्या. त्या शमवण्याच्या कार्यक्रमात २-२.३० वाजून आता आज काही जाण्यात अर्थ नाही असा निष्कर्ष काढून मंडळी घरी परतली. स्नो-शूईंगच्या कार्यक्रमाचा असा जंगी श्रीगणेशा झाला!

हरकत नाही! कालच एक नविन चित्रकलेचा क्लास दिसलाय. श्रीगणेशा करायला हवा!

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

फॅमिली क्रॉनिकल्स ३ : कौटुंबिक मिटींग

"I want to have a family meeting today!" अरीनशेटांनी मागणी केली.

कुठेतरी आयत्या वेळी जायचं ठरल्याने त्यांच्या स्क्रीन टाईम वर बाधा आलेली त्यामुळे एक तातडीची family meeting हवी – या प्रकरणाचा छडा लावण्याकरीता – अशी त्याची मागणी होती.

तशी रविवारची संध्याकाळ आमची कौटुंबिक मिटींगची वेळ. समस्त ईन-मीन-तीन-चार कुटंबिय जेवणाच्या टेबलाशी जमून एक-मेकांच्या officially उखाळ्या-पाखाळ्या काढायची हीच ती सुवर्णसंधी. एरवी काढतो त्या unofficially!

दर वेळी कुमार अरिन याचा एकच अजेंडा असतो - screen time वाढवून मागणे. दर वेळी ही त्याची मागणी रिजेक्ट होते तरी न डगमगता तो पुढच्या मिटींगला तिच मागणी घेऊन हजर असतो, एव्ह्ढच नाही तर बरेचदा शनिवार पासूनच मिटींग आज का नाही असे उसासे सोडू लागतो.

रोहन रावांचं एक अजब विश्व आहे. त्या विश्वात अरिन आहे यावर ते तरून जातात. वास्तविक जास्तीचा screen time त्यालाही हवा असतो पण उगिच त्याकरीता कष्ट का करा? माणूस ठेवलाय ना त्याकरीता - तो भांडेल, मिळवेल - मिळाला तर आनंद, नाहीतर असो! अशी ठेविले अनंते तैसेचि रहावे ही वृत्ती. At times, तो व्हिडीओ गेम्स खेळायला देखील अरिनची नियुक्ती करतो, स्वतः नुस्ता तंगड्या पसरून बघण्याचं काम करतो. “तू का नाही खेळत रे?” याचं उत्तर – “I am watching Arin play” हे मिळतं. आरिन हा त्याची कामं करायला नेमलेला माणूस आहे असं त्याचं प्रामाणिक मत आहे, त्या कामात व्हिडीओ गेम्स खेळणं हे देखील आलंच की मग!

अरिन रावांचा मिटींगकरीता तो एक ठरलेला अजेंडा तर याच्याकडे कधी काही अजेंडाच नसतो. "I don't have any issues" - हेच त्याचं दरवेळंचं म्हणणं. तेच ते – ठेविले अनंते - वृत्ती. मग त्याला मानाचा आग्रह होतो – बाबा, ठेव रे काही तरी अजेंडा ठेव. त्याच्यावतीने मग परत मोठे शेटच अजेंडा पुढे सारतात – तोच तो – अजून ज्यादा स्क्रीन टाईम!

दर मिटींग ला मी माझा पण अजेंडा घेऊन येण्याचं काम नियमित करते. यात युवराजांची शालेय प्रगती, आठवडयाच मेन्यु प्लानिंग, माझ्या घरातल्या मोठया मेम्बरच्या तक्रारी, एकंदरीत जगावरच्या तक्रारी - असं बरंच काही असतं पण यातलं काहीही चर्चेच्या गुऱ्हाळावर न येता चर्चा फक्त स्क्रीन टाईम याच विषयावर दरवळत रहाते. बऱ्याच चर्चेअंती आणि अनेक अटी, तह होउन त्या आठवड्याचा स्क्रीन टाईम ठरतो तो मागल्या वीक पेक्षा फार वेगळा असतो असं नाही पण युवराजाला आपण खूपच हुशारी दाखवली असा एक समज होतो, बराच वाद घालायला मिळाला हा एक साईड-फायदा. धाकट्या युवराजांना अजूनही काळ,काम, वेगाचं गणित कळत नसल्याने त्यांना तसाही काही फरक पडत नाही. आम्ही तहात बरीच चोअर्स करून घेण्याची आश्वासनं (तरी) मिळवतो. मिटींग त्या आठवड्यापुरती बरखास्त होते.

पण त्या दिवशी मात्र चक्क रोहन शेटानी एक अजेंडा पुढे सारला. अजेंडा काय तर म्हणे – घरात पू-पी आणि फार्ट सारखे फनी शब्द हवे तेवढे वापरण्याची परवानगी असावी.

झालं असं होतं – आदल्या दिवशीच A & R खालच्या त्यांच्या टॉयरूममध्ये खेळत होते. थोड्या वेळातच अर्थातच जोरदार आरडा-ओरडी, गडबड ऐकू येऊ लागली. सर्व काही रोजचच चालू असल्याने निर्ढावलेले आम्ही चेहेर्‍यावरची माशीही हलू न देता शांतपणे आमच्या खोलीत आमचं महत्वाचं वेबसर्फिंगचं काम करत होतो. अरिन शेट वर अवतीर्ण झाले.

"आई, आई - रोहन अजीत सुरेश पंढरीनाथ खारकर is saying all the dirty pee and poop words."

"हे असं समस्त कूळाचा उद्धार करण्याची काय गरज?", मी!

"oh I just wanted to make sure that you guys are not confusing him with any other Rohan."

"Wow! How very thoughtful of you! " , आमच्या आजूबाजूला अनेक रोहन पसरलेले असून हा नेमका कोणत्या रोहन विषयी बोलतोय हे आम्हाला कळणार नाही म्हणून घेण्यात आलेली खबरदारी बघून मी उपकृत झाले.

“बरं, तू कधीपासून संतपदाला पोहोचलास की, तुला हे शब्द बोललेले आवडेना झाले? अरे, त्याचा या विषयावरचा आद्यगुरू तूच ना?"

"Yeah but aai, he says all those words at school too. He is going to get in trouble."

अच्छा!...how to say these words but still not get in trouble या विषयावर अजून अरिनमास्तरांचा तास झाला नव्हता तर!

"बरं जा, रोहन अजीत सुरेश पंढरीनाथ खारकरला बोलाव."

रोअसुपंखा यांचे आगमनच तारसप्तकातल्या रूदनाने झाले.

मग त्यावर अतितार सप्तक लावून त्याला विचारलं - "बाबारे, तुला हे पी-पू-फार्ट वर्डस फार आवडतात का?"

"Yeah those are funny words".

"हं..but do you realize you can't say those words in public just for fun? जा आत्ता खुर्ची आण बस त्यावर नीट आणि बोलत बस हे शब्द - हवे तेवढा वेळ!”

यात काही sarcasm नावाचा प्रकार असेल असं मनातही न आणता रोहनशेटांनी तत्काळ खुर्ची आणली त्यावर आपलं बूड टेकवून पू-पू,पी-पी, फार्ट, पूपूहेड, पूपूपँटस असा केशवाय नमः, माधवाय नमः च्या चालीत मंत्रघोष चालू केला. यथेच्छ बोलून झाल्यावर मगच त्यांनी तिथून बूड हलवलं.

पण एकंदरीत हा प्रकार पटलाच वाटतं त्याला. कारण हे घरी असे राजरोस "फनी वर्डस" बोलायला परवानगी मिळावी आणि त्याकरीता एक मानाची वेळ मिळवावी असा त्याचा अजेंडा पुढल्या मिटींगला घेऊन तो हजर झाला. तो मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते अर्थातच. बाहेर शाळेत, टीचर्स समोर हे शब्द पारजण्यापेक्षा घरी बरे - असा विचार!

तर आता घरी रोज 'फनीवर्ड' ची पारायणं ऐकू येतात.

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ४ : अभ्यास आणि उपद्व्याप

मुलांचा अभ्यास म्हणजे घरात एक रणधुमाळीच असते. खरं तर अभ्यास फारसा नसतोच. पण जो आहे तो न करण्याकरीता हजारो कारणे पुढे येत रहातात. 'अभ्यास न करण्याची १०१ कारणे' तत्सम काहीतरी पुस्तक नक्की काढू शकतील दोघं मिळून.

पहिले तर होमवर्क लिहीलेलं पानच घरी पोहोचत नाही. बरं कुठे गेलं विचारावं तर शाळेत नक्की बॅगमध्ये टाकलेलं त्यांना आठवत असतं. शाळा ते घर ती बॅग उघडलेली पण नसते पण काहीतरी चमत्कार होऊन ते पान गायब झालेलं असतं खरं...त्यांचा दोष नसतो त्यात.

मग टीचरना ईमेल करून मी तो होम वर्क काय आहे तो मिळवते. मग त्यांना 'आमचे येथे होम वर्क करण्याचे योजिले आहे तरी येणेचे करावे.' असं आमंत्रंण पाठवते. अश्या छोट्या-मोठ्या अडथळ्यांनी मंडळी डगमगत नाहीत. पुढ च्या योजना तयार असतातच. त्यात पेन्सिली जागेवर नसणे, असलेल्यांच्या टोका मोडलेल्या असणे, मग शार्पनर न सापडणे, सगळं मिळवून देऊन आणून बसवलं की तत्परतेने शी- शू येणे ह्या सर्वांतून मार्गक्रमण करत बसले की मग भूक!

"आत्ता काही गिळायला मिळणार नाहीये. आधी तो अभ्यास उरका", असं म्हणायचा अवकाश की "Its ok we can starve ourselves but doing home work is more important" असे हृदयाला हात घालणारे वगैरे डायलॉग ऐकू येतात. मी देखील न डगमगता - अभ्यास झाल्याखेरीज काही मिळणार नाही - हे ठासून सांगते.

"But teacher said that you should never study with empty stomach!" आता अचानक टीचर ने सांगितलेलं ऐकायचं एकदम मनावरच घेतात दोघं. उगीच child abuse केला असं म्हणू नये कोणी मी मुकाटपणे खायला देते. चालूच आहे हे चक्र!

छोटू रावांच्या वर्गात सध्या - अमेरिकेचे प्रेसिडेंटस - ह्या विषयावर माहिती देणं चालू आहे. त्याअंतर्गत परवा शाळेतून एक पुस्तक घेऊन आला - जॉर्ज वॉशिंग्टन! यावर आमचा संवाद घडला तो असा.

"Do you know who George Washington was?", मी.

"अम्म्म्म्म....He was a kinda famous guy???", अर्थातच छोटूशेट.

कुठल्याही, Do you know who ... was? ह्या प्रश्नाचं उत्तर काईंडा फेमस गाय - असं देऊन मोकळं व्ह्यायचं - अशी त्याची strategy आहे. he has figured out he can't go wrong with that answer. आई फेमस नसलेल्या लोकांबद्दल असला प्रश्न विचारायला जात नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलंय.

"kinda famous?", हे बघ, या ठिकाणी मी त्याला डॉलर काढून दाखवले. बघ, डॉलर बिलवर फोटो आहे त्या गायचा.

"Oh this guys is more famous than I thought!"

आनंद आहे! बरंच figure out केलं म्हणायचं. अरे, आपण रहातो त्या स्टेट ला त्या गायचं नाव आहे. मी आपली एक हिंट दिली.

"Oh United states?", या मुलाचं एक लॉजिक आहे. देशातल्या प्रत्येक स्टेटचं नाव United states आहे असं त्याचं म्हणणं आहे.

United states म्हणजेच United states Of America म्हणजेच अमेरिका म्हणजेच USA. आणि ही सर्व देशाची नावं आहेत. स्टेटस ची नावं वेगळी. हे सर्व प्रवचन तो शांत चित्ताने ऐकून घेतो आणि कुठल्याही स्टेटचं नाव म्हटलं की United states सांगून मोकळा होतो. देश, राज्य, शहरं असल्या मानवनिर्मित कःपदार्थ भौगोलिक गोष्टीत त्याला काहीही स्वारस्य नाही.

"अरे, आपण वॉशिंग्टन स्टेट मध्ये रहातो ना?"

"Oh yeah! Forgot about that"

"So our state is named after this George Washington, who was the first president of America!", मी!

"Oh I didn't know America had first president too. I thought America had only 16th president!"
एव्हाना डोक्याचा भुगा झालेला माझ्या.

"अरे, माझ्या राजा, पहिला प्रेसिडेंट झाल्याखेरीज सोळावा निर्माण तरी कुठून होईल?" पण असे प्रश्न त्याला पडत नाहीत.

हे सोळाव्या प्रेसिडेंटचं खूळ कुठून काढलं तर त्याच्या दोन दिवस आधी घरी पुस्तक आलेलं - Abraham Lincoln.
ते सोळावे प्रेसिडेंट हे ज्ञान नीट लक्षात ठेवलेलं पण ते पुस्तक पहिले वाचल्याने सोळावा हाच एकमेव प्रेसिडेंट हे मतही बनवलेलं.

बरं. लिंकन या व्यक्तिमत्वाने भारावलेत का चिरंजीव? तर तसंही नाही! त्या पुस्तकावरचं लिंकनचं चित्र बघून त्याची कॉमेंट होती - "Ooh! This guy looks scary!" लिंकन साहेब - माफ करा!

वाचनाची ही अशी तर्‍हा. हे बरं असं म्हणावं अशी गणिताची तर्‍हा! यांच्या वयाला गणितं तरी काय. एक डिजिट्च्या बेरजा. मी आपली सर्वसामान्य प्रश्न विचारते. - तुला एक कँडी दिली आणि तुझ्या मित्राला एक कॅंडी दिली तर एकून किती कँड्या दिल्या? यात कँडीच्या जागी कूकीज, लेगोज हे बदल. पण मग त्याच्या मते - these problems are boring and you don't even actually give us candies or cookies. I want something funny in the math. आला का फनी कीवर्ड?

(आठवा : फॅमिली क्रॉनिकल ३). आता त्याचा गणितात उत्साह टिकून रहावा म्हणून मीच परिस्थितीला शरण गेले.

"बरं. तू दिवसातून ३ वेळा पी-पी करतो आणि तुझा ब्रदर ४ वेळा. तर दोघं म्हणून एकूण किती वेळा पी-पी करता?" हा प्रश्न मी पुढे केला आणि आत्तापर्यंत बोरिंग असणारं गणित त्याला एकाएकी interesting वाटू लागलं. आता म्हणजे गणिताचा अभ्यास पुरे म्हटलं तरी थांबवायचा नसतो. वेगवेगळे 'फनी वर्डस' घालून गणितं चालूच रहातात.

विचार केला तर या पी-गणितांमध्ये बरंच potential आहे! पुढे जाऊन वेग, त्याहीपुढे Projectile motion....असो!
मी तर विचार करत्ये - 'फनी मॅथ' असं पुस्तकंच काढावं. बरीच गिर्‍हाईकं मिळतील. इच्छुकांनी नाव नोंदवून ठेवा.

थोरले युवराज हल्ली रडत-खडत का होईना स्वतःचा अभ्यास स्वतः करतात. त्याच्या अभ्यासात आम्ही डोकावणं नामंजूर! ही वास्तविक आनंदाची गोष्ट नाही का? पण त्यामुळे आपली कधी-कुठे नाचक्की होईल हे सांगता येत नाही.

गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतरचा होम वर्क होता - अर्थातच समर व्हेकेशन या विषयावर निबंध! उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गेलेलो कॅलिफोर्निआला. त्यात तीन दिवस पॅसिफिक कोस्टल हायवेचा नितांतसुंदर ड्राईव्ह केला. समुद्राचे ते वेगवेगळे रूप न्हाहाळण्याकरीता आम्ही पामर ठायी-ठायी उतरत होतो. अर्थातच ह्या असल्या क्षुल्लक गोष्टीकरीता पायउतार होणे हे मागच्या सीटातल्या मंडळींना मंजूर नव्हते.

युवराजांनी निबंध लिहीला त्यात उल्लेख होता - "My parents were getting off to see the same ocean again and again, like every 3 minutes. They thought the ocean was very "scenic". It was a boring drive, if you ask me! I don't know why they kept on getting off."

त्यापुढे ते लिहीते झाले - "The hotels we lived in were really dirty. The bed sheets were torn and soiled. The showers were broken and there hardly was any water to take bath."

मला न दाखवता तो निबंध तो शाळेत देऊनही आला. पुढल्या वेळेस शाळेत गेले तेव्हा टीचरने अत्यानंदाने हे लिखाण वाचून दाखवले. अविर्भाव असा की - कशी नाही मुलं सत्यकथन करतात! काय बोलणार? उगाच मुलांची कल्पनाशक्ती-तिच्या भरार्‍या असं काही-बाही बोलून परतले. खरंच सांगते - अनेक ठिकाणी अनेक हॉटेल्समध्ये राहिलो. सर्व हॉटेल्स अगदी व्यवस्थित होती. काही-काही ठिकाणी तर सुंदर हिस्टोरिक वगैरे हॉटेल्स होती.

नंतर त्याच्याकडे या असल्या लिखाणाचा जाब विचारला तेव्हा उलगडा झाला त्याच्या या लेखनाचं स्फूर्तीस्थान "Diary of a wimpy kid" या अत्यंत वात्रट पुस्तकात आहे!

शाळेतले त्याचे उद्योग तर काय वर्णावे! छोटेशेटांचं एक बरं आहे. त्याच्या तेवढ्या तक्रारी येत नाहीत घरी. ते डीपार्ट्मेंट मोठ्यांनी स्वतःकडे ठेवलंय.शाळेत गेले तर टीचर्स हेच ऐकवतात - नियम असला की तो पाळायचाच हे छोटेरावांचं मत तर असलेला प्रत्येक नियम हा तोडायचाच हा मोठे रावांचा नियम!

त्यांच्या शिक्षिकेची एक पध्दत आहे. रोज शाळा सुटण्यापूर्वी ती color coded behavior slips द्यायची सर्व मुलांना. लाल - म्हणजे needs improvement, पिवळा म्हणजे below the expectation, निळा म्हणजे - met the expectation आणि हिरवा म्हणजे exceeded the expectation.

पिवळी अथवा लाल स्लीप घरी आली म्हणजे पालकांनी मुलाशी चर्चा करावी अशी अपेक्षा. शाळा सुरू होऊन महिना उलटला. एखाद-दोन लाल-पिवळ्या चिठ्ठ्या सोडल्या तर बहुतेक निळ्या-क्वचित हिरव्या चिठ्ठ्या घरी येत होत्या. सर्व काही ठीक चालू आहे या भ्रमात मी असताना एक दिवस शाळेत गेले. वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आणि त्यासमोर त्याला रोज मिळालेल्या स्लीप्सचा रंग असा तक्ताच होता. आणि आमच्या युवराजाच्या नावासमोर तर लाल-पिवळ्यांचं तोरणच होतं. अधिक चौकशीअंती पत्ता लागला - रोज याला -त्याला बुकलून काढ, धक्का-बुक्की या उद्योगात दंग झालेले असतात युवराज. पण मग घरी निळे-हिरवे रंग यायचे कारण काही उलगडेना. विचाराअंती टीचरला कळले की टीचर शाळा सुटण्यापूर्वी प्रत्येक मुलाच्या
टेक-होम फोल्डर जवळ त्याची त्या दिवशीची स्लीप ठेवते. हे बेणं स्वतःची सोडून दुसर्‍या कोणा-कोणाच्या स्लीप्स उचलून घेऊन येत होतं. आपलं मुल एवढं आदर्श कसं झालं अशी शंका आम्हाला येऊ नये म्हणून अधून-मधून स्वतःच्या (पक्षी : लाल-पिवळ्या) पण घेऊन येत होतं. बाकी राहू देत. हा ज्या कोणाच्या निळ्या-हिरव्या चिठ्ठ्या घरी घेऊन येत होता, आणि त्या मुलांना स्वतःच्या लाल-पिवळ्या बहाल करत होता त्यांच्याबद्दल मनात अतीव दया दाटून आली.

काय करणार? Taking one day at a time! स्वतःला वेड न लागता निभावणं एवढच ध्येय ठेवलय!

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ५ : आमचे घर रिमॉडेलिंगचे प्रयोग!

आळशीपणात आमचा नंबर फार वरती लागतो. तहान लागल्याखेरीज विहीर खोदायची नाही हे तत्व! पूर्वी तर आमच्या राजा-राणीच्या संसारवेलीवर फुलं का काहीसं फुलायच्या आधी, शनिवार-रविवार सकाळी उठलो की आम्ही टि.व्ही. समोर सोफ्यावर तंगडया पसरून जे बसून रहायचो की बस्स! भूक लागली, काहीतरी नाश्ता बनवूया असा उच्चार दोघांपैकी जो पहिले करेल त्याने उठून मुकाट नाश्ता बनवायचा हा एक अलिखित नियम होता. त्यामुळे व्हायचं एवढंच की ११-११.३० वाजेपर्यंत दोघंही कुळकुळत पोटातले कावळे घेऊन बसून रहायचो पण उठून करावं लागेल या भीतीने ते ओठावर आणण होईल तेवढ टाळायचं! शेवटी एकाची विकेट पडायची आणि मग त्याचा नंबर लागायचा नाश्ता बनवायला.

हे असं असताना आमच्या आजूबाजूला नेमकी लोकं अशी भेटतात ना! ओळखीतल्या एकांनी एकदा घरातलं सगळं किचन - म्हणजे कॅबिनेटस, जमिनीवरचं हार्डवूड सगळं उखडून काढलं आणि सारं नविन बसवलं. हे असं काही घरच्या घरी (म्हणजे स्वतःचं स्वतःला) करता येतं हेच आम्हाला माहिती नव्हतं... पुलंनी म्ह्टलय तसं - कापूस गादीतच जन्माला येऊन तिथेच वाढतो आणि नष्ट पावतो - तसं आमचं प्रामाणिक मत - या सर्व गोष्टी घराबरोबरच येतात आणि यथावकाश घराबरोबरच नष्ट होतात. यात आपल्याला काही उलाढाल करता येते हे गावीच नव्हतं आमच्या.

तर आता ह्यांनी हे असं संपूर्ण किचन उसकून सगळं नविन बसवलं हे दुसर्‍या कोणाकडे महान आश्चर्य म्हणून आम्ही व्यक्त केलं तर त्यांनी ऐकवलं त्यात काय - आम्ही सगळ्या घरामध्ये हार्डवूड बसवले स्वतः. हे काही फारसं कठीण नाही हे ही वर जोडलं. अरेच्या! आपण फार म्हणजे फारच 'हे' आहोत असं वाटू लागलं.

तसं नाही म्हणायला आमच्या खात्यावर एक ऐतिहासिक असं टेबल बांधल्याची नोंद आहे. एके काळी एक टेबल बनवलेलं आम्ही. म्हणजे त्याचे सगळे भाग तयार आणून ते एकत्रित बांधायचे काम (assemble) केलेलं. ते टेबल बनतोय असा आमचा आपला भाबडा समज होता. प्रत्यक्षात ती निघाली एक ऐतिहासिक इमारत - leaning tower of Pisa! तरीही न डगमगता आम्ही त्यावर कॉम्प्युटर ठेवलाच आणि येणार्‍या-जाणार्‍यांना अभिमानाने आमचं creation दाखवायचो. लोकही दूरून-दुरून तो बघायला यायचे. पण कसं कोण जाणे - एक दिवस आमचा तो टॉवर त्यावरच्या कॉम्प्युटर सकट जमिनदोस्त झाला. आपण बांधलेल्या पहिल्या-वहिल्या गोष्टीचा तो शेवट पाहून परत त्या भानगडीत पडायचं नाही असा आम्ही पणच केला.

अनेक वर्ष तो पण conveniently पाळला पण. मग मात्र एका दुर्देवी क्षणी फसलो. आजू-बाजूचे फारच काही-काही प्रॉजेक्टस करतायत आणि आपण असेच बावळट राहिलोय अशी उगिचच टोचणी लागू लागली. त्या तिरमिरीत काहीतरी उसकूयाच आता असं म्हणून डायनिंग रूम मधलं (वॉल-टू-वॉल जमिनीवर चिकटवून बसवलेलं) कारपेट उसकायचं ठरवलं, त्याजागी चांगलं हार्डवूड घालूया असा एक जंगी प्लॅन आखला.

मग काय? आधी सुरुवात कशानी? खरेदीने! हार्डवूड घेणं आलं...बरीच शोधाशोध करून आणि आमच्या मते जबरदस्त संशोधन करून बांबू घ्यायचं निश्चित केलं. वा! वा! सुरुवात तर जोरदार! आयत्या वेळी दुकानात गेलो तर तिथल्या सेल्समॅनला ३ मिनीटात लक्षात आलं की यडगावची पाहुणी आल्येत. चला बरे बकरे सापडले असं म्हणून त्याने काहीतरी अचाट प्रकारचा बांबू गळ्यात मारायला सुरुवात केली. हाच सगळ्यात मजबूत हे सांगितलं आणि वर आमच्याकडे आपादमस्तक न्याहाळत तुम्ही चाललात तरी काही होणार नाही असा निर्वाळा दिला! ...भरगच्च डील जाहीर केलं पण त्याच बरोबर हा प्रकार आता discontinue होणार आहे हे ही नमूद केले. हीच ती जिनकी हमको तलाश थी असं ठरवून तडक घेऊन आलो त्या लाकडाच्या मोळ्या घरी.

दुसऱ्या दिवशी आधी पाहिलं ते जमिनीला बसवलेलं कारपेट, त्याखालचं पॅड यांच उत्खनन कार्य पार पाडणं झालं. ते करण्यात मंडळींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. हाती सापडेल त्या आयुधाने ज्युनिअर, सिनिअर - समस्त मंडळींनी आपापले हात साफ करून घेतले. उत्साहाच्या भरात आता पायापण खणून काढतायात की काय अशी परिस्थिती उद्भवली. पण एकंदरीत आम्हीच आमच्यावर खूष झालो. ह्या! उगाच लोकांचं कौतुक केलं; हे एवढं सोप्पं आहे होय! लोकांचं फुका कौतुक केल्याने जरा दु:खीच झालो. असो. आता दुसऱ्या दिवशी ही आणलेली लाकडं ठोकायची की झालं! असं म्हणून त्या उचकटलेल्या जमिनीसमोर एक यथासांग फोटो सेशन झालं सर्वांचं. मग एवढं काम करून आता दमलो बुवा म्हणून तडक जेवायला बाहेर जाऊन मनसोक्त हादाडूनही झालं.. आता आपणही सर्वांसमोर फुशारकी मारत आम्ही केलंय बरं का हे – असं सांगत फिरून, अजून कोणा ४ जणांना न्यूनगंड देऊन सोडू अशी स्वप्नं बघत जेवलो.

दुसऱ्या दिवशीकरीता ज्या मित्राने ‘फारसं काही कठीण नाही’ म्हणत आख्ख्या घरात जमिनीवर लाकडं ठोकून काढलेली त्याला साकडं घालून ठेवलेलं की बाबा ये – आम्हालाही दाखव कशी ठोकायची ही लाकडं आणि आमची बोहोनी करून दे! दुसऱ्या दिवशी सक्काळी सक्काळी न्हा-धोके तो त्याच्याकडील हत्यारं पारजत हजार झाला. ही अशी लाकडं मांडायची आणि मग त्याला हे मोठं हार्डवूड फ्लोरिंग करीता असलेलं स्टेपल मारायचं. असं म्हणत त्याने त्याच्या आयुधाने पाहिलं स्टेपल मारलं. लाकूड जसच्या तसंच. स्टेपल पिन मात्र मान मोडून पडली. असं-कसं झालं, म्हणत तो आणखी जोर लावत परत, परत-परत पिन मारू लागला. आम्ही मागून त्याला पिना मारतोय – "जोर लगाके हैश्या!" – असं म्हणत! वर आणखी “असा कसा रे तू? नक्की तूच केलंस ना तुमच्या घरातलं काम?” – असंही टोचलं. अनेक पिना धारातीर्थी पडल्यावर मग मात्र त्याने हात वर केले. “ही लाकडं आहेत की दगडं?” हे काय आपल्याला जमणेबल काम नाही, उगाच माझं हे स्टेपलर मात्र तुटायचं या नादात - असं म्हणत त्याने त्याची हत्यारं गुंडाळायला सुरुवात केली.

आता आली का पंचाईत? कप्तानानेच असं सुकाणू सोडल्यावर आम्ही तर कसला टिकाव धरतोय?आमचं अवसान पारच गळालं. एव्हाना निरनिराळे उपाय अवलंबून बघत निम्मा दिवस वाया घालवला होता. आता काय करावं म्हणत शेवटी विचार केला – तेथे पाहिजे जातीचे – आता हे स्वत: करण्याचे उद्योग बास झाले. एखादया प्रोफेशनल लाकडं ठोकणाऱ्यालाच बोलवावं झालं आता, असा ठराव तत्काळ पास झाला. त्या कारागिरांना फोनाफोनी करणं चालू झालं.

आता आयत्या वेळी हवं तेव्हा धावून यायला ते बसलेत? कोणी सांगतोय १५ दिवसांनी येतो तर कोणी ४ दिवसांनी आधी येणार पहाणी करायला मग ठरवणार काम करणार की नाही ते! आता यांची मर्जी होत्ये की नाही याची आम्ही वाट बघत बसणार का? ती उचकलेली डायनिंग रूम, तो सगळा पसारा, खिळे, इतर आयुधं आणि त्यातून नाचणारी ज्यु. मंडळी! ते शक्यच नव्हतं. मग काय एक कारागिर भेटला नावसा-सायासाने. त्याच्या अटी – मला फक्त उद्या वेळ आहे – ९ ते ५. त्यात जेवढं जमेल तेवढंच मी करणार. ५ वाजले की काम असेल त्या अवस्थेत ठेऊन निघणार, पुढचं तुमचं तुम्ही बघून घ्यायचं – काय नी काय! मान्य करण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते महाशय त्यांची हत्यारं पारजत अवतीर्ण झाले.

मग त्या महाशयांनी त्यांचे प्रयत्न जारी केले. स्टेपल ह्या हार्डवूड वर चालत नाही ह्या आमच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष करून त्याने परत एकदा सुरुवात स्टेपलने केली. तासभर ती खटाटोप करून झाल्यावर, बांबू आणलेल्या दुकानाला अनेक फोन करून झाल्यावर, ह्या प्रकारच्या बांबूवर स्टेपल चालत नाही असं त्याने जाहीर केलं. मग आम्ही तुला हे तुझ्याच मायबोलीत सांगत होतो ना रे, आमच्या नाही ना, आँ! – हे आम्ही आपलं मनात म्हटलं. हो, उगीच अपमान झाला तर काका चालते व्हायचे! सध्या तर तूच आमचा तारणकर्ता ह्या भावनेनी त्याच्याकडे बघत होतो.

आता काय म्हणून आम्ही आपले त्याच्याकडे बघत असताना त्याने पुढला पर्याय फेकला – ग्लू – commercial glue! एव्हाना लाकडं जोडायला एक भलं थोरलं स्टेपलर येते या धक्क्यातून बाहेर पडून आता लाकडं जोडायला एक गोंद येतो ही बातमी पचवायला घेतली. मग काका तो ग्लू आणायला अंतर्धान पावले. आता चमत्कार होणार या आनंदात आम्ही होतो. काका ग्लू घेऊन हजर झाले एकदाचे आणि तो ग्लू लाकडाच्या पट्ट्यांना लावून तासभर ठेऊ असा प्लान दिला. त्यानुसार तासाभराने मस्त चिकटलेली ती लाकडं बघायला आम्ही आतुरतेने गेलो. एक पट्टी खेचून बघितली तर काय छानपैकी हातात! commercial glue ला पुरून उरलेले ते बांबू! एव्हाना आम्ही हात टेकले. आता ही लाकडं नेऊन फेकुया त्यांच्या डोक्यावर आणि पैसे परत नाही दिले तरी चालतील पण ही लाकडं तुम्हाला साभार परत असं सांगायची वेळ आलेली.

पण काकांनी अजून एक प्रयत्न म्हणून मोठाले रबरबँड पोतडीतून बाहेर काढले. ते त्या लाकडाच्या पट्ट्यांवरून गुंडाळले. आता हे ४-५ तास ठेवणार असे जाहीर केले. सर्व हार्डवूडला अश्या रीतीने ४-५ तास बांधून संध्याकाळी ते काढून टाकून आता ५ वाजले मी निघालो असं म्हणत काकांनी पोतडीत साहित्य ठेवायला सुरुवात केली. हुश्श! ते बांबू आता एकदाचे लागले होते जागी! पण त्या बाजूच्या दोन पायर्‍यांचं काय – त्या तश्याच उघडया पडल्यात हे विसरले का, असे विचारे पर्यंत काका वदले “आता तुम्हाला कळलंच किती सोप्पं आहे हे! करून टाका त्या दोन पायऱ्या.” आणि पैसे घेऊन पसार झाले. पुढचे दोन दिवस त्या हार्डवूड फ्लोअर्स वर पाय ठेऊ नका अशी एक धमकी देखील जाताना देऊन गेले.

आता झालं? हे प्रकरण परत आमच्या गळ्यात पडलं . पण काही पर्याय नव्हता. आता त्या उघड्या पडलेल्या पायऱ्या झाकणं भाग होतं. मग काकांना स्मरून ती लाकडं डकवली त्या पायर्‍यांवर आणि ते रबरबँड बांधून ठेवले त्यावर. २ नाही तर चांगले ४ दिवस वाट बघून अखेरीस ते सर्व रबरबँड काढून घाबरत पाय टेकवले. सुदैवाने चिकटलेली बुवा ती लाकडं. पण आमच्या त्या पायर्‍यांची कथा काय वर्णावी! एका टोकाला पाय ठेवला की दुसरी बाजू कर्र्रर्र करत इंचभर वर यायची...दुसर्‍या बाजूला तो प्रश्न नव्हता. ती तशीही तर दोन इंच वरच आली होती.

पण तरीही 'आपला' प्रोजेक्ट एकदाचा पार पडला या आनंदात आम्ही होतोच. आता थोडीशी मदत घेतली तर काय! मुख्य काम तर आम्हीच केलं नव्हतं का! यानंतर कोणी घरी येणार म्हटलं की घरी आवर्जून म्युझिक - जरा जोरातच लावायची काळजी मी घेऊ लागले. ती कर्र्रर्र्र्र कर्र्रर्र झाकायला!!! पण लोकं बाकी भोचकच! फार बारीक न्हाहाळणी करतात आणि फार प्रश्न विचारतात.

तर अश्या प्रचंड यशस्वी प्रोजेक्ट नंतर वर्षभरात आम्ही आणखी काही remodeling करायचं ठरवलं. आणि आपल्या चुकांतून शिकतो ना माणूस...म्हणून यावेळी अजिबात स्वत: न करता एक कॉन्ट्रॅक्टर आणू असा ठराव पास केला. या आपल्या कृतीतून आपण एका बिझीनेसला प्रोत्साहन देतोय असा एक उदात्त विचारही केला.

तर यावेळी एक नीट, भलत्या-सलत्या अटी न घालणारा कॉन्ट्रॅक्टर पकडून आणला. या बाब्याने घर बघायला आल्यावर पहिला प्रश्न टाकला – हे या पायर्‍यांवर हार्डवूड कोणी बसवलं? नवरा आजू-बाजूला नाहीये हे बघून मी बिनदिक्कत ठोकून दिलं – आधीच्या कॉन्ट्रॅक्टरने! यावर त्याने त्या न पाहिलेल्या कॉन्ट्रॅक्टरला मजबूत शिव्या घालून तो कसा बावळट असणार हे मला ऐकवलं. मी देखील न डगमगता त्याच्या हो त हो मिळवून दिला.

त्याला बहुदा काहीतरी शंका आली असावी. कारण त्याने मी आस-पास नसताना परत नवऱ्याला – या पायर्‍या कोणी शाकारल्या हा प्रश्न परत एकदा विचारला . आणि जगात सत्याचा वसा घेतलेल्या नवऱ्याने आम्हीच लावले असे मान्य पण करून टाकले – व्यवहार चतुराई ती कशी नाहीच! यावर त्या बाब्याने तुम्ही कित्ती बावळट आहात हे त्याला सुनावले. आता मी हे सारं उचकून काढतो – अशी तंबीही देऊन टाकली.

ह्या बाब्याने ही Divide and conquer strategy पुढे सर्व remodeling च्या दरम्यान भरपूर वापरून घेतली. कुठलीही गोष्ट त्याला हवी तशीच करून, कारे बाबा असं केलंस – असं विचारलं की - मला बाजूला गाठून तुझ्या नवऱ्यानेच असं कर सांगीतलं आणि त्याला बाजूला घेऊन बायकोने सांगितलंय - अश्या खेळी करून त्याच्या मनाप्रमाणे आमच्या घराचं remodeling करून दिलं. आता काय आपण अगदी ‘हे’ आहोत ते एव्हाना पटल्याने फारश्या भानगडीत न पडता त्याने जे केलं ते मान्य करून घेतलं. निदान ते कर्र्र्रर्र्र कुर्रर्र आवाज तर नाहीत ना हे समाधान!

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ६ : Blame it on Neilson!

नेल्सन हा आमचा क्लीनर( घर सफाईला येणारा मदतनीस) ! पंधरवड्यातून एकदा असा गेली  ७-८ वर्ष  तो आमच्याकडे  येतोय   -  यावरूनच  हा माणूस किती चिवट असावा याचा अंदाज येतो!  दर वेळी तो यायच्या आधीची  माझी भीती....एखादं मोठ्ठं वादळ नुकतंच धडकून गेल्यासारखा घराचा अवतार बघून हा  त्याचं चंबू-गबाळं आवरून नक्कीच त्याच्या  मूळदेशी - होंडुरसला पळून जाणार!  नेल्सन काही  परत आपल्याकडे येत नाहीये.  पण तो येतो. परत परत येतो...पोटापाण्याकरीता माणसाला काय-काय करावं लागतं नाही...? 

तो येऊन गेला की  घराचं जे काही 'रूप पाहता लोचनी' होतं ना, ते पाहून माझा दरवेळचा फतवा असतो - आता आपण सगळ्यांनी बॅग्ज पॅक करून पुढचे १५ दिवस हॉटेलमध्ये रहायला जाऊया...हे घर असंच लख्ख राहू देत. त्याच्या पुढील फेरीच्या आदल्या दिवशी परत येऊ  आणि मग घाला घरात काय हैदोस घालायचाय तो - एक आख्खा दिवस! हे स्वप्न तर काही साकार होत नाही. उलट तो गेल्यावर सुमारे दोन तासात दोन्ही युवराज (आणि राजा-राणीसुद्धा) घर मूळपदाला आणण्यात यशस्वी  होतात -  इतके की प्रत्यक्ष नेल्सन २ तासांत परत आला तर त्याचा पण विश्वास बसणार नाही - आपण आजच, दोन तासापूर्वी हे घर साफ करून गेलोय यावर!

त्याच्या एका वेळच्या सफाई खेपेनंतर त्याच संध्याकाळी आम्ही व्हेकेशनला भारतात गेलो - ३ आठवड्याकरीता. नेल्सनला आता २ आठवड्याने तू येऊ नकोस हे सांगायला आम्ही अर्थातच विसरलो...चालायचंच . तो पुढल्या वेळी हजर झाला (तो कित्येकदा आम्ही घरी नसताना येतो आणि त्याला दिलेल्या कोडने घरात प्रवेश मिळवतो) तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असणार नक्की.... ऑलमोस्ट चक्कर येऊन पडला होता - असे खात्रीलायक सोर्सेसकडून (म्हणजे त्याच्या बरोबर येणार्‍या मदतनीसाकडून) समजले.

तर हा असा आमचा तारणहार! तो तारणहार असला तरी काही बाबतीत मात्र नको  करून सोडतो.

आळशीपणात आमचा नंबर फार वरती लागतो  हे मी आधीच  सांगितलं आहे. आणि गलथानपणात - त्याही वर... खरं तर काही लोकं त्याला गलथानपणा म्हणतात पण  आम्ही कश्या सगळ्या  वस्तू अगदी हाताशी लागतील अश्या ठेवतो. म्हणजे कश्या - conveniently placed. आता घरातल्या प्रत्येकाचा स्वतःचा असा एक स्वतंत्र convenience असल्याने त्या वस्तूंची जागा सदैव बदलत असते आणि घरात आमचं मुख्य काम सदैव एक-ना-एक  वस्तू शोधत रहाणे हे असतं. पण यात एक नक्की की ती वस्तू तिच्या मूळ (ज्या जागेवर आमच्या घरात आलेली वस्तू सुमारे  पहिले साडे-तीन तास असते.)जागी नसते कधी हे आम्हाला पक्कं ठाऊन असल्याने तिथे कोणी एरव्ही शोधायला जात नाही.
नेल्सन  येतो आणि दणादण ड्रॉव्हर्स, कप्पे उघडून वस्तू  त्यांच्या -त्यांच्या जागी कोंबतो हो! कश्या  सापडाव्या मग त्या आम्हा पामरांना? एरव्हीही एकही गोष्ट जाग्यावर सापडत नाही  म्हणून एकमेकांवर डाफरणारे आम्ही,  नेल्सन येऊन गेला की (त्याच्या पश्चात) पुढले २-३ दिवस  त्याच्या नावाने- त्याच्यावर डाफरून घेतो. मग त्यात चपलांपासून - चेकबुकपर्यंत का ही ही असू शकतं. 

साधारण संवाद असे घडतात :  अरे,  माझा लॅपटॉप  कुठे गेला? काल तर इथेच ठेवलेला ना?  नाही, मी  सकाळी खालच्या टेबलवर बघितलेला, नाही-नाही तो सोफ्यावर होता मघाशी, अगं तू त्यादिवशी ऑफिसला घेऊन गेलेलीस तो आणलाच नाहीस परत...अश्या सगळ्या राउंडसनंतर एकदम सगळ्यांना साक्षात्कार होतो - नेल्सन!! हा नेल्सन ना कुठेही (पक्षी: त्या वस्तूच्या  अतिमूळ नेमलेल्या जागी!) काहीही कोंबतो... मग त्या लॅपटॉप करीता म्हणून पौरातन काळी आणलेले एक टेबल बेडरूमच्या एक कोपर्‍यात  आहे याची आम्हाला स्वतःला आठवण करून द्यावी लागते.(एरव्ही ते आठवतच नाही कारण त्यावरच्या पसार्‍यामुळे  त्याचं दर्शन होतंच नसतं!  नेल्सन येऊन गेला की त्या दिवशीच अश्या गोष्टी डोळे भरून डोळ्यात साठवून ठेवायच्या असतात...नंतरचे चौदा दिवस त्यांचे  दर्शन  दुर्मिळ होते. ) त्या टेबलावर त्याच्या मूळ जागी विराजमान  झालेला लॅपटॉप बघणे ही हृद्य घटना असते!  त्याची तुलना केवळ मखरात बसवलेल्या गणपतीचं रूपडं बघताना होणार्‍या आनंदाशी  होऊ शकते. 

तर काय, नेल्सन येऊन गेल्यानंतर पुढचे चौदा दिवस आम्हाला  बिलं फाडायला एक हक्काचा माणूस मिळतो.  गेल्या खेपेस नेल्सन आला त्याच दिवशी  नवर्‍याने सकाळी ऑफिसला गाडी नेली पण संध्याकाळी मी त्याला ऑफिसमधून पिक अप करून कुठेशी कामं उरकून मग  घरी आणले.  त्याची गाडी ऑफिसलाच  ठेवली. तर दुसर्‍या दिवशी सकाळी गाडी कुठे - हा नेल्सन  ना कुठेही ठेवतो गोष्टी...असा विचार करत असलेला नवरा आढळला.... आता बोला!...ब्लेम  इट ऑन नेल्सन! 
 आदल्या दिवशी डब्यात  पूर्ण भरलेले   शेंगदाणे,  चकल्या - हे डबे  दुसर्‍या दिवशी रिकामे दिसले की - नेल्सनने चकल्या-शेंगदाणे दुसरीकडे कुठेतरी ठेवल्या - हे बिनदिक्कत सांगायला  आमच्याकडची मंडळी डगमगत नाहीत (नशिब नेल्सनने खाल्या सांगर नाहीत!)... ब्लेम इट ऑन नेल्सन!
इतकंच काय, हल्ली  ज्यु. मंडळी शाळेत होमवर्क न्यायला   विसरली,  की त्यांनी  टीचरला काही सांगण्या आधी, टीचरच  विचारते - काय नेल्सन येऊन गेला की काय...तुम्ही अभ्यास केलेला असणारच आहे, याची मला खात्रीच आहे पण तो अभ्यास जागेवर सापडला नसेल ना!!    शिक्षक  मंडळींनाही कळलंय- ब्लेम इट ऑन नेल्सन!!! 

तर असा हा नेल्सन!  तो येऊन गेल्यावर केवळ २  तास घर स्वच्छ रहाते, तर एवढा खर्च करून आपण त्याला का  ठेवले आहे, यावर अधून-मधून आम्ही चर्चा करतो. पण मग लक्षात येते, की घर साफ होते, हा तर साईड फायदा आहे, मुख्य  फायदा म्हणजे बिनदिक्कत डाफरायला एक बकरा हवाय आपल्याला... घरात  सततच  न सापडणार्‍या गोष्टींची जबाबदारी घरच्या मंडळींनी  एकमेकांवर  ढकलून हाणामार्‍या करण्यापेक्षा एका  थर्ड पार्टीवर ढकलायला मिळते हा मुख्य फायदा - म्हणून आपण ते पैसे मोजतोय!!  कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता ही है! 

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ७ : खरेदी आख्यान

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
------------------------------------------------------------------------------------------------

आता खरेदी या विषयावर मी लिहीणं-बोलणं म्हणजे डोनूदादांनी स्त्री-पुरुष समानता, स्त्रीयांविषयी आदर, पर्यावरण-रक्षण वगैरे विषयांवर बोलण्यासारखं आहे. माझ्या मुलखाच्या आळशीपणात, काहीही करण्यात येणारा कंटाळा यात अगदी खरेदीचाही समावेश होतो. मागे कधीतरी मी खरेदी करण्याबाब्त लिहीलं असलं तरी सांगून टाकते आता - सरड्याची धाव कुंपणापर्यंत आणि अस्मादिकांची फार तर २ दुकानांपर्यंत!

म्हणजे मला theoretically खरेदी करायला फार आवडते हं. कोणी काही नविन मस्त खरेदी केलेली बघितली, कुठे आपलया त्या फेबुवरचे फोटो- बिटो बघितले की मलापण नशा चढते, आपण पण खरेदी करुया! मग आजू-बाजूच्या, फेसबुकावरच्या बायका कसे नवर्‍याबरोबर खरेदीला गेल्याच्या पोस्टी टाकतात, कसे बाई आम्ही रोमँटिक म्हणून - त्याला स्मरून मी घरी आदेश काढते - या रविवारी तू आणि मी खरेदीला जायचंय - कध्धी कध्धी म्हणून तू माझ्या बरोबर खरेदीला येत नाहीस. बाकीचे नवरे बघ कसे त्यांच्या बायकांबरोबर मस्त खरेदीला जातात. आमच्या मेल्या नशिबी हे काही नाही. हा माझा भडिमार नवरा शांतपणे ऐकून घेतो. मला माझा त्रैमासिक अ‍ॅटॅक आलाय याची त्याला मनोमन खात्री असते. मग नेहेमीप्रमाणे तो आपला - अगं जाऊ की. या रविवारी जाऊ - असं बिनदिक्कत कबूल करतो. त्याला पूर्ण खात्री असते, एक वेळ तो खरेदीत उत्साह दाखवेल पण मी!

ते इतरांचे फेसबुकिय फोटो बघून मी तावातावाने निघते खरी बाहेर. पण काय घ्यावं हेच कळत नसते. कपडे म्हणावं तर ढीगाने घरात पडलेले - माझ्या चंद्रासारख्या कलेकलेने बदलणार्‍या तनुला, सर्व कलांना साजेसे असे असंख्य साईझ मधले अनंत कपडे कपाटात ओसंडून वहात असतात. पण सहज सोप्पं म्हणून त्या दुकांनांकडे पाय, म्हणजे गाडीची चाकं वळतात. आता कपडे घ्यायचं म्हणजे त्यांची ट्रायल घेणं आलं. तिथे घोडं पेंड खातं. आधी आवडेल असं काही शोधा. त्याच्या विविध साईझा ट्रायल करायला घेऊन जा. मग ती ट्रायल रूमच्या बाहेर बसलेली सुंदरी उगाच दमदाटी करून - फक्त ५ कपडे आत नेता येईल असं काहीतरी सांगते. आत नेलेले ५ - त्यांचं आणि माझं अर्थातच जमत नाही - परत आपला मूळ कपडा चढवा, बाहेर या - दुसरे पाच आत न्या... इथपर्यंत माझ्यातला पेशन्स संपतो. चला-चला इथे काही नाही, हे दुकान जरा बोअरच आहे. असं काहीसं बडबडत मी बाहेर पडते. नवरा आपला माझ्यामागे - अगं, आत्ताशी तर एक सेक्शन बघितलास, अजून कित्येक आहेत, बघ हवे तर...नंतर मग म्हणशील मी थांबत पण नाही - असं काहीसं बोलत - मागे मागे धावत येतो.

ते काही नाही..हे दुकान बोअरच आहे. चल आपण जरा स्टारबक्सात जाऊन मस्त कॉफी घेऊ, किंवा ते दोन टोळभैरव नाही आहेत बरोबर तर दोघंच जरा मस्त लंच घेऊ कुठेतरी! आमची गाडी - खाणं - या मूळपदावर येते. मग कुठेतरी मस्त हाणून, वर परत स्टारबक्सात कॉफी ढोसून आम्ही घरी! कशाला नवरा नाही म्हणेल या अश्या खरेदीला सोबत करायला! ही अशी माझी खरेदी! मुलखाचा कंटाळा खरेदीचा.

बरं कपडे सोडले तर पर्सेस, चपला या कधी-मधी उत्साहात मी घेतल्या जरी असतील तरी एकच एक पर्स आणि चप्पल वापरत रहाणे हा माझा खाक्या आहे. पुल म्हणतात तसं - मळखाऊ आणि टिकाऊ - हे धोरण जारी ठेऊन - इतर दहा नाजूक-साजूक पर्सेस आणि चपला सोडून मी आपली माझ्या व्यक्तीमत्वाला शोभेलश्या मळखाऊ आणि टिकाऊ वस्तू घेऊन फिरते. त्यामुळे ते ही राहिलं.
नाही म्हणता, घरातल्या वस्तू घेण्यात मला बरीक उत्साह आहे. पण त्यादेखील तंगडतोड न करता. ते हल्ली अमेझॉननी एक बरं केलं आहे. बेडवर पार्श्वभाग चिकटवून बसल्या बसल्या हवे ते मागवून मोकळं होता येतं. अमेझॉनची निम्मी उलाढाल ही माझ्यामुळे होत असल्याची एक बारीक शंका आहे मला!

तर अशी मी एका खरेदीला मात्र उत्साहात असते - ग्रोसरी शॉपिंग! आधीच खाणे म्हणजे अती जिव्हाळ्याचा विषय...मग त्याकरीता तसं जातीनं शॉपिंग नको करायला? त्यामुळे त्या खरेदीला मी अगदी आवर्जून तयार असते. मग दुकानात जाणे, कित्येक काळ उगीच खाण्याच्या वस्तू न्हाहाळत बसणे आणि मग अर्थातच नको असलेल्या कित्येक घरी घेउन येणे....हे आलंच!
आता खादाडी शॉपिंग – म्हणजे ग्रोसरी शॉपिंग मध्ये सगळ्यात वरती नंबर लागतो तो कॉस्टकोचा! शॉपिंग मध्ये शॉपिंग - ग्रोसरी शॉपिंग, पण कॉस्टको म्हणजे नो मोज मापिंग!!!

दर वेळी ठरवून एक यादी बनवून घेऊन आम्ही आत शिरतो. अगदी पण करून की या यादी बाहेरची एकाही गोष्ट घ्यायची नाही. पण एकदा का कॉस्टकोच्या जादुई गुहेत शिरलं की आत जे काही गुंतून जायला होतं की बस्स! मग मात्र अनेक गोष्टींची गरज एकाएकी निर्माण होते. फळं, नटस, salads दिसले की आता कसे आपण हेल्थी खाणार आहोत, याची आठवण होते. मग ४-५ निरनिराळ्या फळांचे, नटसचे वगैरे (अर्थातच कॉस्टको साईझ) बॉक्सेस कार्टात जाउन बसतात. फिश/ चिकन/ मीट तर विचारही करायची गोष्ट नाही. त्यांची मोठाली पाकिटं कार्टवर आरूढ होतात. (मी दोन गोष्टीची फार ऋणी वगैरे आहे. म्हणजे त्या
जगनियंत्याने मला जन्माला घालण्याआधी, कॉफी व कोंबडी या दोन गोष्टी बनवल्यात हे फार छान केलंय.) मग salad ड्रेसिंग/ कुठलेसे डीप्स वगैरे बाजूच्या गोष्टी घेणं आलंच. त्यांचा प्रचंड आकार, एक नाही तर २-२ बाटल्या यांचं दडपण तेव्हा येत नाही.

दुकानात टेस्टीग counters नामक भूलभुल्लैये लावलेले असतात. तिथे ती लोकं नेमकी काय करतात, कोणास ठाउक पण वाट्टेल तो पदार्थ तिथे चांगला लागतो आणि मग त्याची भव्य-दिव्य पाकिटं आमच्या cart मध्ये विराजमान होतात. एवढंच नव्हे तर घरातल्या प्रत्येक माणसाला आपली नाविन्याची हौस भागवायची लहर ही कॉस्टकोतच येते. कुठलातरी, धड नावही वाचता येणार नाही असा पदार्थ फ्रोजन नाहीतर ताज्या बनवलेल्या पदार्थांच्या रांगेतून उचलायचा. नको म्हटलं की, “तूच तर नेहेमी - नविन पदार्थ नको म्हणण्याआधी चाखून बघावा - असं सांगत असतेस ना, मग आता घेतलाच नाही तर कसा चाखणार?” असं तोडीस तोड उत्तरही तयार असतं. मग अश्या नाविन्यपूर्ण, न चाखता घेतलेल्या पदार्थांचा कार्ट मध्ये शिरकाव होतो.

एव्हाना बाकीचे tempting पदार्थ दिसू लागलेले असतात. कप केक्स, Croissant, चिप्स यासारखे पदार्थ दिसले की आपणच काही वेळापूर्वी हेल्थी खायचं ठरवून असंख्य फळ-फाळवळ आणि salads घेतली आहेत, याचा विसर पडतो. चूक आमची नसते. हा सर्व कॉस्टकोचा महिमा असतो. ज्या कार्टवर खाली ह्या हेल्थी वस्तू असतात त्यातच वर हा सगळा माल स्थानपन्न होतो.

ब्रेड, अंडी, चीज हे तर रोजचे आवश्यक पदार्थ. सर्व प्रकारचे चीज न्याहाळण्यात कित्येक काळ जातो. मग त्यातले काही जुने-नवे चीजचे प्रकार जाउन बसतात कार्ट मध्ये.

नशिबाने भाज्या वगैरे गोष्टी आम्ही कॉस्टकोतून घेत नाही. एवढ्या प्रचंड भाज्यांना घरी उठावच नसतो. बाल-थोर समस्त मंडळीनी भाज्या ऑप्शनला टाकलेल्या आहेत. आमचं तर मत आहे, लोकं घरी भाज्या वगैरे पिकवतात ना, तसं आपण कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन करूया झालं. तेच आपल्याकरीता योग्य आहे. असो.

तर कार्ट अर्थातच ओथंबून वहात असते. हे सगळं आमच्याचकडे घडतं का? एकदा एका मैत्रिणीबरोबर कॉस्टकोला गेले तर त्या पठ्ठीने बरोबर लिस्ट प्रमाणे माल घेऊन पाऊण तासात बाई बाहेर पडायला तयार होती. कार्टच्या तळाशी गोष्टी! बघून सुद्धा भरून आलं मला. तिच्या बिलाचा तो चिटोरा, आमचा लांबलचक रोल!! मग मी माझी समजूत घातली – ते व्हेजिटेरियन आहेत, कशाला एवढ्या गोष्टी होतील, त्यात आपल्याकडे वाढत्या वयाची मुलं! हे मनोमन म्हणत बाहेर येत्ये तर दाराशी दुसरी मैत्रीण, आता येत होती! अगं, काय घेऊन चाललीस एवढ.. आमच्याकरिता काही ठेवलंयस की नाही दुकानात!! झालं!! आता खाणं हा आमचा थोडासा वीक पॉईंट आहे, तो असा चार चौघात जगजाहीर करावा? आजूबाजूच्यांना मराठी येत नसलं तरी अविर्भाव वगैरे समजतातच ना? वर आणखी माझ्या हातात असलेल्या बिलाच्या रोल मध्ये डोकावून डोळेही फिरवून दाखवले!

मग घरी आल्यावर काय होतं कोण जाणे. या कॉस्टकोच्या फळांना ना धड चव पण नाही असा शोध लागतो. छोटी-मोठी समस्त मंडळी कप केक्स, चिप्स वगैरे गोष्टी - थोड्याच खातो-थोड्याच खातो, करत पुढले ४ दिवस हात मारत रहातात आणि संपवतात.. दर वेळी ते खाताना बाकीची salads वगैरे पण आपण खाल्ली पाहिजेत यावर सर्वांचं एकमत होतं. कुक्कुट, मत्स्य मंडळीना यथास्थित सदगती मिळतेच. नटस ची पोती पण भरपेट जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून तोंडात टाकायला उपयोगी येतात.

पण सॅलडस, फळं यासारखे प्रकार मात्र केविलवाणे पणे फ्रीजात पडून रहातात. मग ती फळं संपवायला अतिरिक्त खरेदी करून दूध आणायचे – त्यांचं फ्रूट सॅलड बनवायचं आणि त्यानिमित्ताने अतिरिक्त साखर पोटात ठोसायाची, हे आलंच मागून! सॅलडसची पानं सॅलड म्हणून न खाता शेवटी आमटीत नाहीतर पराठे करून त्यात ढकलून कशीबशी संपवा – त्याकरीता मस्त तुपात भाजलेले आलू पराठे बनवा आणि ४ बटाट्यांमागे ४ पानं खपवा असले साईड उद्योग करायाचे !! चालायचंच....

तिथल्या tasting counters वर taste करून, आवडल्याची खात्री करून आणलेले पदार्थ पैसे मोजून घरी आणल्यावर चव का बदलतात काही कळत नाही. न चाखता आणलेल्या पदार्थ ची परीस्थिती अर्थातच लक्षात आलीच असेल. मग आम्ही नेल्सन आणि तत्सम काही जिवांचे भले करून सोडतो.

“महत्वाच्या” सगळ्या गोष्टी संपल्या की आम्ही तयार पुढच्या ग्रोसरीला, यादी करून आणि यावेळी नक्की यादीनुसार सामान आणायचं असं ठरवून!

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ८ : उन्हाळी सुट्टी

शाळेचं अजून एक वर्ष सरलं...उन्हाळी सुट्ट्या चालू झाल्या. घरातला छोट्यांचा कंपू अफ्फाट खूष तर बाकीचे दोन जीव पुढील दोन महिन्याभर गुदरणार्‍या संकटाच्या चाहूलीने हताश! गेला महिनाभर छोटे कंपनीचं काऊंट डाऊन चालू होतं ते काम आता मोठ्यांकडे लागतं...सुट्टी कधी संपणार याचं काऊंट डाऊन चालू करायचं. बच्चे कंपनीचं काऊंट डाऊन खरं तर शाळा सुरु झाल्या दिवशीच चालू होतं. नविन शाळा-वर्षाचं नविन कॅलेंडर हाती आलं की आधी सुट्ट्या बघून घ्यायच्या आणि मग शाळा संपायला किती दिवस आहेत ते मोजून घ्यायचं...हे पहिलं काम!

आमच्या बहिणाबाईंच्या लेकाने इयत्ता पहिलीत असताना - आई शाळा कधी संपणार - असं विचारलेलं. त्याला बहिणाबाईंनी उत्तर दिलेलं की अरे आत्ता तर सुट्टी संपून शाळा सुरु झाली. आता गणपतीची/ दिवाळीची सुट्टी येईल काही महिन्यांत - या उत्तरावर आमचे भाचेराव वदलेले - तसं नाही, पहिली नंतर दुसरी, नंतर तिसरी - असं किती वर्ष शिकायला लागेल??? आपल्या लेकाचा बालवयातील हा शैक्षणिक आनंद पाहून बहिणाबाई सर्द झालेल्या! आमच्याकडे युवराजांवर याच भाच्याचा जबर प्रभाव असल्याने परिस्थिती काही फार वेगळी नाहीये.

याच भाचेरावाने तिसरीत की काय एकदा शिक्षिकेने कविता म्हणून दाखव सांगितल्यावर मला येत नाही, तुम्हाला येत असेल तर तुम्हीच म्हणा - असे बाणेदार उत्तर दिलेले आहे. त्यामुळे या भाच्याशी आमच्या युवराजांशी बोलणे झाले की माझा पुढला आठवडा शाळेतून आता काय तक्रार येत्ये या चिंतेत जातो.

तर शेवटचा दिवस म्हणून दोघा युवराजांना शाळेत घ्यायला गेले...यात कौतुकाचा भाग नसून शाळेने पाठवलेल्या ईमेलनुसार लॉस्ट अँड फाऊंड सेक्शन धुंडाळायला गेलेले. कारण संपूर्ण वर्षात छोटू शेटांनी हिवाळ्यात प्रत्येक महिन्यात एक या गतीने हिवाळी जॅकेटस हरवून दाखवलेली. आणि हरवली म्हणजे अंतर्धान पावली ती! काय किमया!! आता वर्षाच्या शेवटी तरी त्यातलं एखाद-दुसरं हाती लागलं तर किती बरं या विचाराने मी शाळेत पोहोचले. अबबब! लॉस्ट अँड फाऊंड मधील जॅकेटसचे ढिगारे च्या ढिगारे बघून फक्त एवढा दिलासा मिळाला की आपले दिवटे ही युनिक कॅटेगरी नाही...फक्त फरक एवढाच की बाकीच्या दिवट्यांची जॅकेटस तिथे मौजूद होती, एवढ्या ढिगार्‍यांमधून आमचं तेवढं एकही जॅकेट हाती लागलं नाही....

दिवटी तरी काय! जॅकेटस,पाण्याच्या बाटल्या, डबे ह्यासारख्या obvious गोष्टींबरोबर डंबबेल्स?? हा व्यायामप्रेमी जीव याची देही याची डोळा बघण्याची इच्छा दाटून आली. एक तर पँटस पण दिसली. आता पँटस इथे काढून टाकून तो दिव्य कुमार्/कुमारी घरी कसा पोहोचला/ली याचा विचार मी केला नाही. आमच्या मोठेशेटांनी २ च आठवड्यांपूर्वी नविन घेतलेला चष्मा गायब करून दाखवल्याने तो देखील त्या ढिगार्‍यात शोधायचा अयशस्वी प्रयत्न मी करून बघितला. पण अर्थातच त्याने चष्मा कधीच कुठेच काढला नसल्याने (आणि तो तरीदेखील हरवल्याने!) या ढिगार्‍यात तो सापडणं शक्यच नव्हतं. तरी मी सांगतोय तुला मी चष्मा हरवला नाहीच आहे - हे तुणतुणं बाजूने चालूच होतं. ते ढिगारे उपसताना ही सगळी जॅकेटस शाळेनी सेकंड हँड विकली तरी शाळेची एक आख्खी नवी इमारत बांधता येईल हा विचार मनातून जात नव्हता!

घरी परतताना मोक्याच्या क्षणी तो प्रश्न कानावर येऊन आदळलाच. "aai, isn't middle school optional?" भर वेगात असताना माझ्या गाडीला कचकन ब्रेक लागला. "what do you mean optional?, माझा प्रतिप्रश्न! "ते नाही का, बिल गेटस, मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह जॉब्स सगळ्यांनी मिडल स्कूललाच शाळा सोडली?"...कुठेतरी नसतं काहीतरी वाचलेलं द्यायचं सोडून, समोरचा बेसावध पाहून! ही मोठेरावांची मोडस ऑपरांडीच आहे. तरीही डगमगून न जाता मी उत्तरले, "बाबारे, यातल्या एकानेही मिडल स्कूल पासूनच शाळेला राम-राम ठोकलेला नाही...गेटस साहेब आणि तो मार्क दोघंही हार्वर्ड ड्रॉप-आऊट आहेत. आणि आपल्याला तर कॉलेज सोडायचा
पण ऑप्शन नाही...शिक्षण पूर्ण करण्यावाचून गत्यंतर नाही तुमचे, दुर्देवाने!" यावर शाळेत आपला कसा विकास होत नाहीये, शाळा सोडल्यावर आपणही गेटस साहेबांसारखे काहीतरी भव्य-दिव्य करून दाखवणार आहोत, केवळ शाळा हा प्रगतीच्या मार्गातील अडसर असल्याने असलं भरीव काम आपल्या हातून होत नाही आहे याची खंत व्यक्त करण्यात उरलेला वेळ गेला. त्याच्या दुर्देवाने वो जिस माँ का बेटा है, वो माँ मैं ही हू! काही न बोलता मी गाडी घरात आणून लावली. जेवायला पोळी- भाजी आहे म्हटल्यावर पुढली ठिणगी पेटली.

त्यावरून बाचाबाची झाल्यावर दोघांनी शस्त्र काढले - आम्ही आता भारतात मावशीकडेच रहायला जाणार आहोत. का? तर म्हणे तिथे रोज-रोज मस्त जेवण असतं...कोणी पोळी-भाजी खा म्हणून त्रास देत नाही! ह्या वाक्याला केवळ जेवणाचाच संदर्भ नसून आधीच्या शाळा सोडण्याच्या प्लॅनचा संदर्भ आहे हे मी चाणाक्षपणे ओळखलं. कारण तिथे केवळ ते वरचे भाचेरावच नाही, तर हल्ली मावशीची कन्यका शाळा सोडण्याचे प्लॅन आखत असते, तिच्याशी हातमिळवणी करून काही करता येईल का हा विचार असल्याचे मी ताडले.

कायमचं पाठवून द्यावं कार्ट्यांना तिकडे असा विचार मनात तरळून गेलाच, खोटं का बोला? पण नेमकं तिथे जाऊन सगळी कझिन मंडळी हातमिळवणी करून,आया/मावश्यांना धुडकावून सगळे जणं शाळा सोडायचे. ती भाचीबाई कसले रंगाचे फराटे मारत असते, तिचा पिकासो व्हायचा आणि आमच्या जेष्ठ कुमारांची बत्तीशी खरी ठरून ते बिल गेटस आणि कनिष्ठ कुमार गेला बाजार बिल गेटसचे अ‍ॅसिस्टंट व्हायचे - असा सगळा जामानिमा व्हायचा नेमका...आता हा जामानिमा झाला तर चांगलंच आहे...पण समस्त मंडळी मिळून लगेच एक आत्मचरित्र वगैरे लिहायची - त्यात पहिलं वाक्य टाकायची - घरात राहून आणि शाळेत जाऊन आमची प्रगती होत नव्हती. आईने घराबाहेर काढले, आम्ही मावशीकडे गेलो तिथे आमच्या कझिन्सनी पण शाळा सोडली, आम्ही पिकासो/ बिल गेटस ई.ई. झालो...हे असं काही लिहीलं तर?? झालं!!...आमची शेवटी छी-थू व्हायची...असा सगळा विचार करून मी सांगून टाकलं. काही कुठे जायचं नाही. शेवटी तह होऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत एक दिवसा आड पास्ता - पिझ्झा आणि एक दिवसाआड पोळी-भाजी असा तह झाला. पण तरी त्यात मंडळींनी तहाची कल्मं अ‍ॅड केलीच - भाजी आमच्या त्यातल्या त्यात आवडीची हवी (म्हणजे कोणती देव जाणे!) - वांगं अजिबात चालणार नाही, चिकन करी/ खीमा/ पाव-भाजी ह्या भाज्याच आहेत! ई. ई.

बाकीचे पालक मुलांना कुठे-कुठे उन्हाळी शाळांना घालतात. झालंच तर ही मुलं रविवारच्या मराठी/ चायनीज अश्या कुठल्या कुठल्या शाळांना जात असतात. आजू-बाजूच्या मराठी शिकणार्‍या मुलांना बघून मी ही आमच्या कुमारांकडे तुम्हाला रवीवारच्या मराठी शाळेत घालूया, असा प्रस्ताव मांडला. मोठेशेटांनी यावर तत्परतेने - होssss असा मोठा होकार दिलेला पाहून काहीतरी गडबड आहे हे मी ओळखून चुकले. पुढील चौकशीअंती लक्षात आले की त्यांनी असा समज करून घेतलेला की एक दिवसाच्या रविवारच्या शाळेला गेलो की आपली आठवड्याभराच्या शाळेतून सुटका होईल...हा त्याचा भ्रमाचा भोपळा फोडल्यानंतर मग पुढील प्रश्न हजर झालाच. दोन-दोन शाळांना मी जाणार नाही....Choose one. Do you want me to go to English school or Marathi school? काय बोलणार!! बाबांनो, रोजच्या इंग्लिश शाळेत जा...राहू देत ती मराठी शाळा...यात इंग्लिश शाळेच्या आवश्यकतेपेक्षा ती ५ दिवस रोजचे ६.३० तास असते तर मराठी शाळा एक दिवस तीन तास असते - हा विचार आमच्या मनात येऊन गेलाच नाही, असं नाही!!

तर आता ही उन्हाळ्याची सुट्टी लागली. खरं सांगायचं तर एका परिने आमच्याकरीता पण आनंदाची गोष्ट आहे. कारण वर्षभर रोजच्या रोज शाळेतून येणार्‍या तक्रांरीना तरी सामोरं जावं लागणार नाही आता, पुढले दोन महिने! हो! शाळेमध्ये वर्गात वर्ग चालू असताना फाल्तू जोक्स करून आजू-बाजूच्यांना हसवणे (त्यामुळे समस्त मित्रवर्गात 'फनी गाय' हा किताब मिळवून रहाणे, वर तो जपण्याकरीता अधिकाधिक प्रयत्न करत रहाणे) लंच लेडीज, रिसेस टीचर्स, स्कूल-बस ड्रायव्हर यांच्याशी they are not being fair म्हणून स्वतःकरीताच नाही, तर दुसर्‍या मुलांच्या वतीने देखील वाद घालणे (ती मुलं भले गप्प् का बसेनात!). मग बस स्लीप्स मिळणे, बसमधून आठवड्याकरीता बॅन होणे - मग आपली ऑफिस वगैरे शुल्लक कामं सोडून शाळेत नेण्या-आणण्याचं भरीव काम माता-पित्यांनी करणे. त्याबद्दल चीड-चीड व्यक्त केली तर, its ok, I can stay home for a week - असं दिलासादायक, काळजाला घरं पाडणारं बोलणे - ह्या सगळ्यातून दोन महिन्यांकरीता सुटका म्हणून आनंद मानावा की ह्या सगळे वात्रट चाळ्यांना आता आपल्याला घरी सामोरं जावं लागणार याचं दु:ख - हे ठरवणं कठीणच!!

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ९ : लिमिटेड संस्कार

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!

------------------------------------------------------------------------------------------------

ऑफिसमधून येऊन नुकतीच घरात शिरले तर बाजूच्या खोलीतून किंकाळी आली - I am dead, I am dead!! -
मोठेशेटांचा आवाज! नसलेलं मातृहृदय घेऊन मी हबकून त्या खोलीत गेले. तर चिरंजीव कॉम्प्युटर समोर डोकं धरून बसलेल्या अवस्थेत आढळले. जवळ जाऊन जरा अंदाज घेतला, तर सगळं ठीक वाटत होतं, म्हणजे जी आरोळी ठोकण्यात आलेली, तसं तर काही दिसलं नाही!! मी अशी डोकावून बघत असताना, अचानक चिरंजीव जोरात उठले आणि रोहन, यू किल्ड मी..व्हाय डिड यू डू दॅट - असं ओरडून वरच्या मजल्याकडे पळाले. वरती एक अशक्य, वर्णन न करता येण्याजोगं रणकंदन माजलं. (अमेरिकेतली घरं लाकडाची असली तरी खूप मजबूत असतात हे मी ठामपणे सांगू शकते!) या गोष्टीला मी सरावले असल्याने, सावकाशपणे कॉफी बनवून, पिऊन मी वर पोहोचले. लठ्ठालठ्ठी अजूनही जारी होतीच. काय झालं, कोण का मेलं - याची मी चौकशी चालू केली असता हाती बातमी आली की - खेळत असलेल्या व्हिडीओ गेम्स मध्ये थोरल्यांना धाकट्यांनी मारलेलं आहे. "हे कसले रे व्हायोलंट गेम्स खेळता तुम्ही!! मी सतराशे-एकसष्टाव्यांदा परत डायलॉग मारला. “तो बॅड गाय होता, मी पोलिस. म्हणून मी मारलं त्याला”, धाकटे शेट उत्तरले. “असले गेम्स खेळू नये. छान काहीतरी चेस नाहीतर काय तो मोनॉपोली वगैरे खेळा बरं..”, मी एक केविलवाणं वाक्य टाकलं. यापुढचे सर्व डायलॉग्ज सर्वांनाच पाठ असल्याने, आम्ही तिघांनी ते सर्व एका-सूरात म्हणून तिन्ही जीव परत आपापल्या कामांकडे वळले, दोन जीव गेमचा पुढला राऊंड खेळायला तर माझा जीव सोशल मेडिया सोशलायझेशन करायला, तब्बल एक तास सोमि पासून दूर राहिल्याने जीवाची खळबळ झालीच होती!

सोशल मिडीया वर नेमकी पहिलीच पोस्ट - व्हायोलंट गेम्स खेळल्याने बालमनावर होणारे दुष्परिणाम वगैरे! वाचता-वाचताच ठरवलं की ते काही नाही, या कार्ट्यांवर संस्कार केले पाहिजेत नीट...नुस्ते घाणेरडे गेम्स नाहीतर हाणामार्‍या करत फिरत असतात. आज त्यांचा बाप आला की त्याला ह्यांचा संस्कारवर्ग घ्यायला लावते. अशीही दिवाळी आहे - चांगला आहे मुहुर्त!

थोड्या वेळात नवरा आला. आल्या आल्या डबे खरवडून जमेल ते जंक गोळा करून तो टीव्ही समोर चिकटला. आजच्या दिसाचा रोजगार आणून कर्तव्य पार पाडल्याचं समाधान आणि जंक खाऊन मिळणारं समाधान - सारं कसं चेहर्‍यावर दाटून आलेलं. त्यातून समोर तो ६५" समाधान देणारा स्क्रीन! ब्रम्हानंदी टाळी लागल्यासारखा तो बसलेला!

मोका साधायचा तर धोका पत्करावा लागेल असा विचार करून मी देखील नवर्‍याशेजारी बूड चिकटवलं. आता ह्या कृतीत कोणताही रोमांस सामावलेला नसतो, तर ही कसलीतरी नांदी असते, इतपत तर नवर्‍यालाही कळू लागलंय एव्हाना. त्यामुळे त्याने "आता काय?" असा प्रश्न फेकून, एकीकडे तोंडात शेवेचा तोबरा भरून चॅनेल सर्फ करण्याचे काम पुढे चालू ठेवले.

"ह्या मुलांवर आज संस्कार करूया", मी!

"काय? म्हणजे काय करूया?" चेहर्‍यावर भाव असे की, आधी आपण संस्कार म्हणजे काय ते शिकूया, मग मुलांना शिकवूया! आता ते खरं असलं तरी ती वेळ पार निघून गेली आहे.

"अरे, जरा दिवाळी आहे, ते नुसते चकल्या-शेव-लाडू हादण्यापेक्षा जरा त्यांना दिवाळीचं महत्व, आपले सण-समारंभ वगैरे माहिती देऊया!" मला स्वतःला, दिवाळी म्हणजे खाणे-पिणे आणि हल्ली फोटो काढून इथे-तिथे सारत रहाणे - याखेरीज का साजरी करतात अजिबातच आठवत नव्हते, त्यामुळे नवर्‍याकडे ते डिपार्टमेंट देण्याचा हा कट मी रचलेला.

"बरं, जरा वेळानी करुया काय ते संस्कार!" त्याने सध्यापुरती स्वतःची सुटका करून घेतल्याचं लक्षात आलं होतं माझ्या. पण असो!

रात्री जेवणाच्या टेबलाभोवती नवर्‍याने संस्कार वर्ग आखला.

"तर मुलांनो पुढल्या आठवड्यात आहे दिवाळी! "

"ओह येस, द प्रिन्सिपल अनाऊंस्ड टुडे दॅट इट इज अ फेस्टीव्हल ऑफ व्हिक्टरी ऑफ गुड ओव्हर इव्हिल!" धाकटयाने माहिती पुरवली. त्या प्रिन्सिपल बाईंना मी मनोमन तडक धन्यवाद दिले.

"देन अ बंच ऑफ अस डिमांडेड दॅट वी शुड हॅव हॉलिडेज फॉर दिवाळी. मेनी किड्स सपोर्टेट द आयडिया. बंच ऑफ अस वॉक्ड आऊट ऑफ द क्लास टू प्रोटेस्ट!" मोठ्या चिरंजीवांनी अभिमानाने बातमी दिली. यांच्या या गांधीवादी की मार्टिन ल्युथर किंग वादी धोरणाचा सत्कार व्हावा अशी यांची अपेक्षा असावी!

अवाक, हताश अशा अनेक भावनांनी मी त्याच्याकडे बघत असताना पुढली बातमी कानी आली. अर्थातच शाळेकडून डिटेंशन मिळाले होते चिरंजीवांना! त्याचं जितं-जागतं प्रूफ म्हणून त्याने आमच्या हातात प्रिन्सिपलचं गुलाबी पत्रच ठेवलं. तसेही यांच्या पराक्रमाचे गोडवे गायला वेळी-अवेळी शाळेच्या प्रिन्सिपल मला फोन करत असतातच. आता तर शाळा ते घर हॉट लाईन टाकून घ्यायची वेळ आली आहे.

कार्ट्यांना खरंच काही संस्कार म्हणून नाहीत. दिवाळी म्हणून त्यांच्या मावस-चुलत भावंडांना २ आठवडे सुट्टी मिळते म्हणून यांना अमेरिकेत राहून सुट्ट्या हव्यात.. उद्या सर्वपित्री अमावस्येला सुट्टी हवी म्हणून प्रोटेस्ट करतील!!

"चल रे, कर यांच्यावर संस्कार लवकर!", मी परत एकदा नवर्‍याकडे फर्मान सोडलं.

"ऐका रे, एक होता रावण. त्याला दहा तोंडं होती. ", ही संस्कारांची सुरुवात!

"वॉव! एका वेळी केवढं बोलता आणि केवढं खाता येत असेल ना त्याला!",एकाचा प्रतिसाद!

नवर्‍याने त्या वाक्यावर माझ्याकडे पाहिलं. 'ते तर दहा तोंडं नसताना पण जमू शकतं' असा भाव त्याच्या चेहर्‍यावर लिहीलेला मला वाचता येत होता पण आत्ता त्या विषया कडे वळलो तर आधी तासभर भांडणं आणि त्याचा शेवट "चला आता मस्त आईस्क्रिम शेक वगैरे बनवून पिऊया", असा होईल याची मला खात्री होती. म्हणून मी तिथे दुर्लक्ष केलं.

"तर रामाने त्याच्याशी युद्ध करून त्याचा पराभव केला. That was the victory of good over evil!", नवर्‍याने पुढलं संस्कार-वाक्य टाकलं. हे असे लिमिटेड संस्कार! तीन वाक्यात संस्कार संपले!

"बाबा, डिड शिवाजी हेल्प राम?", धाकटे चिरंजीव वदले. याला भारत म्हटला की एकच शिवाजी माहिती आहे. आणि ते नाव कुठल्याही संदर्भात बाहेर फेकलं की आजू-बाजूची जनता खूश होते हे ही यानी चांगलं बघून ठेवलं असावं. त्यामुळे हे असं राम-रावण ते मोदी कोणत्याही विषयावर घरी-दारी चर्चा चालू असेल तर हा शिवाजी नाव टाकून मोकळा होतो. हमखास हश्या आणि टाळ्या!

"अरे बाबा, शिवाजी ४०० वर्षांपूर्वी होऊन गेला. रामायण हजारो वर्षांपूर्वी. काही संबंध आहे का? काहीही बोलतो!" मी खेकसले.

"अगं आई, आहे ना संबंध!!", माझ्याकडे टकामका पहात तो उद्गारला. "कनेक्ट द डॉटस, Can you not connect the simple dots?", हे वर!! झालं!! या आईला कुठलेही डॉटस कनेक्ट करता येत नाहीत, हे दोघांचं ठाम मत आहे. मला मूळात ते डॉटस दिसलेले नसतात, तर ते कनेक्ट कुठून करणार??

"आहे ना संबंध! शिवाजी किल्ड बॅड गाईज. राम/कृष्ण ऑल्सो किल्ड बॅड गाईज”, हिला काही आयुष्यात डॉटस कनेक्ट करता येणार नाहीत अश्या अर्थी डोकं हलवत धाकटे शेट उत्तरले. नाही त्या वेळी लॉजिक कुठून येतं याच्यात देव जाणे!

"See! we do the same thing in our video games! आम्ही पण बॅड गाईजना मारतो. That is also a victory of good over evil! आता आम्हाला सांगू नकोस व्हिडीओ गेम्स कसे violent असतात ते!! ",मोठ्या चिरंजीवांनी कात्रीतच पकडलं आम्हाला!

यावर काय बोलावं न सुचून नवर्‍याने घाईघाईने घोषणा केली, "चला, चला पुरे झालं आता!"

आजचा “लिमिटेड-संस्कार” वर्ग संपला!

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स १० : नविन घर, जुनाच गोंधळ!

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
--------------------------------------------------------------------------------------------------

आमचे धाकटे चिरंजीव यांना एके दिवशी एकदम साक्षात्कार झाला की आपण आपले संपूर्ण आयुष्य एकाच घरात कंठतोय. "all my life, I have been living only in one house. I don't even know how does it feel like living in any other house!" असे उसासे टाकत तो वरचेवर फिरू लागला. त्यावेळी त्याचे वय होते - ७ वर्षे. दोन्ही आजोबांनी, ज्यांनी ४०-५० वर्षं एका घरात काढली, त्यांनी, नातवाचे हे वक्तव्य ऐकलं असतं तर त्यांना झीट आली असती. पण मी मूळातच अतिशय कनवाळू आई असल्याने त्याचं हे म्हणणं लगेचच मनावर घेतलं. आणि घराचा शोध जारी केला. तसं तर घरं बघण रहाणे हा माझा अनादि-अनंत छंद आहे. त्यामुळे पहिलं घर घेतल्यापासून तिसर्‍या महिन्यापासून मी कुठेही ओपन हाऊस दिसलं की मी बघून यायचे. आता तर काय स्वतःकरीता घर घ्यायचं... कसून तयारीला लागले. पण जवळपास तीन एक वर्षं हा शोध जारीच राहिला...घर नक्की हवंय का, हवं तर कुठे घ्यायचं इथपासून.. घरात आपल्याला काय सुविधा हव्यात हे ठरवण्यातच हा काळ निघून गेला...

आमच्या पिताश्रींना आम्ही नविन घर घ्यायचा विचार करतोय हे काही पचनी पडेना..."नविन घर बघताय?? का, काय वाईट आहे सध्याच्या घरात?" "बाबा, हे घर लहान पडतं आम्हाला", हे माझं विधान ऐकून त्यांना दातखीळ बसली... त्यांच्या मते भलं-थोरलं घर लहान कसं पडतं..असा प्रश्न त्यांना भेडसावत होता (ती ४० वर्षाची परंपरा भानगड तर होतीच!)..आणि तो प्रश्न वारंवार मला विचारून त्यांनी मला भेटसावून सोडलं..."अमेरिकन ड्रीम, अमेरिकन ड्रीम म्हणतात ते हेच!", असं सांगून मी त्यांची बोलती बंद केली.

आखूडशिंगी, बहुगुणी घर शोधणं म्हणजे फारच कठीण काम...त्यातून दोन्ही युवराजांची घराबद्दल स्वत:ची ठाम मतं होती. पहिलं घर घेताना त्यांचं मत विचारात घेतलं नव्हतं असाही एक निषेध नोंदवण्यात आला...आता हे आम्ही कसं साध्य करणार होतो देव जाणे...पहिलं घर घेताना मोठ्या युवराजांचं वय होतं १ वर्ष तर दुसऱ्यांचं वय होतं - (negative) १.५ वर्ष!
पण असं काही विचारण्यात अर्थ नसतो त्यामुळे नविन घरात काय हवंय ते सांगा असं म्हणून गपगुमान सर्वांच्या अटी नोंदवून घेतल्या!
आता ४ जणांच्या सर्व अटींत बसणारं आणि खिशाला परवडणारं घर (ही अट अर्थातच दोघा युवराजांच्या खिजगणतीतही नव्हती!) शोधायचं म्हणजे फारण कठीण काम!

बरीच शोधाशोध..ऊहापोह..भवती-नभवती होऊन अखेर एक नविन घरं बांधणी चाललेली कम्युनिटी आवडली...बांधकामाला सुरूवात व्हायची होती पण घरांचे प्लँन्स पटले..एक plan चौघांना आवडला...चौघांच्या, सर्व नाही पण बऱ्याचश्या अटी पूर्ण होतील असं वाटून घर finalize करायचं ठरलं..आणि बुकिंग अमाऊंट भरून टाकली पण...

आणि पुढले सहा महिने नविन घर सोडून मंडळींना दुसरा विषयच नाही उरला. सतत नविन घराविषयी स्वप्नरंजन करणे आणि वेळी अवेळी बांधकामाच्या साईटवर जाऊन बांधकाम प्रगती न्याहाळणे, घरात कोणत्या खोलीत काय ठेवायचे, नाहीतर नविन घरात फर्निचर काय घ्यायचं हे शोधणे एवढाच उद्योग चालू होता... खरं तर बिल्डरने बांधकाम चालू असताना साईटवर जायचे नाही असं फर्मान काढलेलं...पण त्याला कोण बधतंय...संध्याकाळी कामगार घरी केले की आम्ही पोहोचून पार आतून चकरा मारून कितपत काम पुढे गेलंय याची पहाणी करत फिरायचो. कधी कधी तर दुपारीही पोहोचून मग बिल्डरचा डोळा चुकवून साईटवर फिरणे चालायचे.

HomeSold2.jpg

20180829_181631.jpg

20180920_185330.jpg

20181006_165043.jpg

20181013_160548.jpg

20181102_162400.jpg

20181025_183847.jpg

FinishedHome.jpeg

आता नविन घर पार जमिनीच्या तुकड्यापासून घेतलं म्हटल्यावर कोणालाही वाटेल घरामध्ये आपल्याला हवे ते बदल करून घेता येतील. प्रत्यक्षात म्हणे हे डिझायनर होम आहे! म्हणजे घर घेणार्‍यांना काहीच अक्कल नसेल असं गृहितक घरून, डीझायनर नावाच्या प्राण्याने आपल्याला जे काही बहाल केलंय ते आपण उपकृत भावनेने घ्यावं असा बिल्डरचा नियम होता...घरात काडीचाही बदल करण्याची पॉवर पैसे मोजून घर घेत असलेल्या आम्हाला नाही याचा आम्हाला शोध लागला...त्यामुळे आमच्यासारख्या अजागळ मंडळींना पांढरी कॅबिनेटस नको, आम्ही २ वर्षात ती काळीकुच्च करून दाखवू - ह्या आमच्या सांगण्याचा काहीही उपयोग झाला नाही. डिझायनर म्हणालाय पांढरी कॅबिनेटस म्हणजे चकचकीत पांढरी शुभ्रच कॅबिनेटस मिळणार! नंतर पुढे मी माझ्या शेजारणीकडे बघितली तर सुंदर ग्रे कलर...हा अस्सा रंग मला हवा आमच्या कॅबिनेटसना, असं मी म्हणाल्यावर ती म्हणे, मला पांढराशुभ्र रंग हवा होता...झालं! केली असती जर अदला बदल तर दोन जीवांना खुश नसतं केलं...नाही म्हणायला लहान मुलांना कसं उगी उगी म्हणून आपण थोडं त्याच्या कलाने घेतो, तसं त्यांच्या डिझायनर स्टुडिओ मध्ये जाऊन उगीच ४ फुटकळ गोष्टींची निवड आम्हाला करायला दिली...आम्ही आपले तेवढ्यावर आनंद मानून घेतला...

बघता बघता ६ महिने निघून गेले. घरात पदार्पण करण्याचा दिवस आला...दुपारी चाव्या मिळणार होत्या तर सकाळपासून चौघांना कधी एकदा दुपार होते आहे आणि कधी एकदा चाव्या घ्यायला जातोय असे झालेलं....ज्युनिअरांचे तर प्लॅन्स होते की स्लिपींग बॅग्ज घेऊन जायच्या आणि चाव्या मिळाल्या की त्या रात्री नविन घरात कँपिंग! त्यानुसार ते चौघांना ४ स्लिपिंग बॅग्ज घेऊन तयार राहिले. कम्युनिटीत बाकी बर्‍याच जणांना सुद्धा त्याच आठवडा-पंधरा दिवसात पझेश्न्स मिळत होती आणि प्रत्येकाने किल्ली कधीही मिळाली तरी चांगला दिवस, मुहूर्त बघणे वगैरे करूनच गृहप्रवेश केले. दुसरं घर नसल्यासारखं त्याच रात्री नविन घरात मुक्काम ठोकणारे आम्हीच!

दुपारी चाव्या मिळाल्या आणि आम्ही घरात शिरलो. चाव्या द्यायला आणि घराला आतून वॉक थ्रू करायला बिल्डरचे सेल्स representatives बरोबर होते...ते आपले घर, अप्लायन्सेस दाखवतायत.. कसल्या कसल्या वॉरंटीज एक्स्प्लेन करतायत... आम्ही आपले हो-हो करत त्यांना पिटाळण्याच्या मागे...निघा एकदाचे...आणि आम्हाला नविन घर एंजॉय करू देत असं झालेलं...

ते टळल्यावर घरात मनसोक्त उधळलो...वर-खाली ७० वेळा जाऊन-जाऊन कानाकोपरा बघून आलो...कुठे काय ठेवायया, कसं डेकोरेट करायचं याचे (परत एकदा) खल झाले...रात्री बाहेर जाऊन जेऊन आलो आणि पथार्‍या ऊर्फ स्लिपिंग बॅग्ज पसरल्या. सकाळी उठलो! सामान म्हणून स्लिपिंग बॅग्ज सोडून मी फक्त माझी कॉफी घेऊन आलेले...नविन घराच्या चाव्या मिळणार या आनंदात घरातले लहानच काय मोठेही विचार करण्याच्या पलिकडे गेलेले...आता बाकी सोडा पण बाथरून टिशू तरी आणावे ना... ते देखील नाही म्हटल्यावर सकाळी उठून जुन्या घरी पळ काढण्यावाचून पर्याय नव्हता! दोन दिवसांनी सगळं सामान नविन घरात हलवलं आणि आम्ही नविन घरवासी झालो एकदाचे...

आता नविन घर मित्रांना दाखवायला म्हणून दोघं युवराज मित्रांना स्लिपओव्हरची आमंत्रणं देऊन घेऊन यायला लागले. म्हणजे इथे नाही धड बॉक्सेस उघडलेले, एक गोष्ट सापडायची शाश्वती नव्हती आणि घरात अजून मित्र रहायला बोलावून तो एक कल्ला...बरं समस्त मित्रवर्गाचं मत पडलं की वरून ओपन स्पेस असल्याने हे घर नर्फ गन्स वॉर झोन म्हणून अगदी योग्य आहे. वरून शत्रूवर बुलेटस झाडणं अगदी योग्य पडतं...त्यामुळे घरात वर-खाली नुसता नर्फ गन्सचं रणकंदन माजलं...पाय ठेवावा तिथे नर्फ गन्सच्या बुलेटस! एवढंच नाही तर आधीच्या घरापेक्षा हे घर मोठं असल्याने घरात पळापळी, लपाछपी, बाप-लेकांच्या क्रिकेट मॅचेस, कागदाची विमानं उडवणे हे देखील जोरात रंगू लागलं. त्या बुलेटस, कागदी विमानं कुठे तरी पार वर असलेल्या, हात पोहोचणार नाही अश्या खिडकीच्या फ्रेममध्ये जाऊन अढळपद मिळवून नांदू लागली. एक दिवस घरी आले तर धाकट्या शेटांनी मोज्यात टेनिस बॉल घालून तो मोजा दोरीने वरच्या मजल्यावरच्या रेलिंगला बांधून खाली लिव्हिंग रूम मध्ये सोडून, टेनिसच्या नावाखाली बॉल बडवणे हा एक नवा खेळ चालू केला होता. येता जाता आपल्याला कधी कुठून कुठला बॉल लागेल, विमान येऊन आदळेल याचा नेम उरला नाही. कौतुकाने घेतलेला ओपन फ्लोअरप्लॅन आमच्यावर असा आदळू लागला.

नविन घरात आल्यावर धाकट्या शेटांची शाळा अर्ध्या वर्षात बदलावी लागली. नविन शाळा नविन शिक्षक - हा कसा काय रुळतो याची मला धाकधूक! सुपुत्र शांत! हो, शिक्षण, शाळा या गोष्टी एवढ्या विचार करण्याजोग्या नाहीतच, हे त्याचं मत.. आधीची शाळा काय, नी ही काय! मेलं... इकडून-तिकडून अभ्यासच करायला लावणार ना, मग काय फरक पडतोय! हे त्याचं तत्वज्ञान! नविन शाळा चालू झाली. पहिल्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर मी विचारले, "कशी वाटली शाळा, टीचर कशी आहे?" तर म्हणे "टीचर बरी वाटत्ये...but its too early to make any opinion! Teachers are always good to you on your first day. You need to give it some time to see how she really is! पाच दिवस लागतील मला ठरवायला." पाच दिवस आम्ही आपले चिंतेत... नविन टीचरला अप्रूव्हल मिळतंय की नाही! रोज आल्यावर हेच संवाद! आणि चिरंजीवांचं तेच पालुपद - "prima facie she looks alright but you can't hurry into forming your opinions in such things". शेवटी एकदाचे ५ दिवस पार पडले...टीचरला अप्रूव्हल मिळालं आणि आमचा जीव भांड्यात पडला.

बघता बघता नविन घरात येऊन वर्ष होत आलं. गेला वर्षभर घर सेट अप करणे यात बराच वेळ आणि जीव ओतला..वेगवेगळे प्रोजेक्टस - कुठे कपाटं करून घे, कुठे खिळे ठोका-फ्रेम्स लावा हे अजूनही चालूच असतं. त्यातून आमची जाज्वल्य परंपरा बघता - कुठलाही साधासा वाटणारा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला की तो अक्राळ-विक्राळ रूप धारण करतो.
कुठे काही काम काढलं की होमे डेपो च्या १०० चकरा, गोष्टी आणा, त्या परत करा, खिळा मारायला स्टड शोधताना स्ट्ड फाईंडर ने जिथे स्ट्ड दाखवला की तिथे भुसभुशीत भिंत निघणार आणि इथे स्टड नाही, असं स्ट्ड फाईंडरने छातीठोक पणे सांगितलं तिथे ठोकायला सुरूवार करावी तर तिथे बरोबर स्ट्ड! आमच्याच नशिबी हे असले स्टड फाईंडर्स येतात का, न कळे! एकेक प्रोजेक्ट पार पाडत आता घर बर्‍यापैकी लागलं असं ठरवून मी परत ओपन हाऊसेस बघायला लागले.

घराचे सुरुवातीचे एकमेकांना घर स्वच्छ ठेवण्याची, वस्तू जागच्या जागी ठेवायची वचनं हवेत विरून गेलीत...घर परत "आमचं घर" झालं आहे. जुना गोंधळ नव्या घरात यथास्थित चालू आहे!

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ११ : उद्योग-धंदे

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
--------------------------------------------------------------------------------------------------

"Yes! running a company feels good!" छोटूशेट कॉम्प्युटर रूममध्ये मोठ्या शेटांना कामाला लावून स्वतः लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर टिव्ही समोर तंगड्या पसरता पसरता उद्गारले.
"आता कसली नविन कंपनी स्थापन केलीस बाबा?", मी विचारणा केली.
"सध्या मी फक्त कंपनी काढली आहे, कंपनीने काय करायचे आहे, ह्याचाच रिसर्च करायला मी अरिनला हायर केलंय. I am the CEO. My job is to pay him. His job is to work his butt off and research what the company can create." , रोहनशेट उत्तरले.

ही दोघांनी मिळून काढलेली सतराशे साठावी तरी कंपनी असेल. दर आठवड्याला एक नविन कंपनी स्थापन होत असते. दोघांपैकी एकाच्या डोक्यात काहीतरी पाद्रट ते भन्नाट या स्पेट्रम मधली एक आयडीआ आली की तिच्यावर विचार करण्याऐवजी नविन कंपनी बनवण्याचे विचार चालू होतात. मग कंपनीच्या पॉलिसीज, नविन employees ना घेतल्यावर त्यांच्याबरोबर करायचे contracts आणि NDA चे ड्राफ्टस बनू लागतात. जोरदार interviews, पगाराची बोलणी इ. इ. चालू होतं. कंपनीचं नक्की प्रोडक्ट काय आहे, ते बनवण्याचे काय प्लॅन्स आहेत ह्या सर्व गोष्टी प्रचंड गोपनीयनेच्या कारणास्तव उघड केल्या जात नाहीत!

मध्यंतरी रोहन शेटांनी डिक्लेअर केले की त्याच्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. "आई, Do you have any kaav-kaav right now?", त्याचा प्रश्न एका संध्याकाळी येऊन आदळला. असं त्याने विचारलं की कुठल्यातरी नविन उद्योगाची ही नांदी आहे, हे समजून जावं. त्यांच्या अविरत बडबडीला कंटाळून मी अधून-मधून त्यांना आत्ता माझ्या डोक्याशी काव-काव करू नका असं सांगत असते. त्यामुळे हल्ली आधी मला "कितपत काव-काव आहे" याची चाचपणी करून मग पुढले मोठमोठाले प्लॅन्स सांगण्यात येतात.

तर यावेळी रोहन शेटांची नविन योजना होती की, लोकं चालतात त्यातून निर्माण होणार्‍या vibrations मधून energy निर्मांण करणे ह्याकरीता तो एक कंपनी स्थ्यापन करतो आहे. कंपनीचा भर हा पर्यावरण जतन करून एनर्जी निर्माण करण्याकडे असेल हे देखील नमूद झाले. त्याकरीता नेहेमीप्रमाणेच इंटरव्ह्यू वगैरे प्रोसिजर चालू झाली. बरं ही इंटरव्ह्यू प्रोसेस का घडते याची मला काही कल्पना नाही. कारण रोहन शेटांनी स्थ्यापन केलेल्या कंपनीत अरिन हा एकच इंटर्व्ह्यू कँडिडेट तर अरिन शेटांनी स्थापन केलेल्या कंपनीत रोहन हा एकच इंटर्व्ह्यू कँडिडेट असतो. पण यावेळी मी ही या अश्या एवढ्या environmental friendly कंपनीचा आपणही भाग असावं म्हणून इंटर्व्ह्यू करीता मी पण अ‍ॅप्लिकेशन दिलं. रितसर interview करीता आमंत्रण आलं.

कंपनीचे CEO साहेब, रोहनशेट interview घ्यायला बसले. नेहेमीच्या यशस्वी कँडिडेटचा interview आधीच झाला होता. आपल्याला जबरदस्त चुरस आहे याची मला जाणीव होतीच.

पहिला प्रश्न आला: "किती पगाराची अपेक्षा आहे?"

मी विचारले,"आधी काम तर काय आहे ते सांगा" तर ते गुप्ततेच्या नावाखाली सांगता येणार नाही असं सुनावण्यात आलं.

अर्रेच्या! म्हणजे interview मध्ये candidates ना त्यांना काय काम करायचं आहे, हे देखील सांगणार नाहीत?
यावर मी आक्षेप घेतला तर जुजबी माहिती देण्यात आली. वर आमच्याकडे दुसरा candidate आहे, जास्त बोललात तर हा जॉब तुम्हाला मिळणार नाही, हे सांगण्यात आलं. परत एकदा पगाराची अपेक्षा विचारण्यात आली. आता नक्की काम काय आहे, न कळता देखील पगार किती सांगावा असा विचार करेस्तोवर कानी आलं की दुसर्‍या कँडिडेटला महिना $५ पगार ऑफर झालाय.
"तुमची seniority पाहून महिना $६ देऊ", अशी generous offer देण्यात आली. आनंद/ आश्चर्य/ अवाक अश्या अनेक भावनांनी मी बघत असताना पुढे हळूच विचारणा झाली,"कंपनीकडे सध्या पैसे नाहीत तरी तुम्ही कंपनीला पैसे पुरवणार का? त्यातूनच तुमच्या पगाराची सोय होईल."

आता नेहेमीच ज्या अश्या अनंत कंपन्या बनत असतात, त्यांचे venture capitalist होण्याचा मान आम्हाला मिळतच असतो. पण यावेळी आपणच कँडिडेट असल्याने आपल्याला VC बनावे लागणार नाही अशी मला आशा होती. तर तसं काही दिसेना. बरं हे देखील मान्य केलं...तर पुढे आणखी चार प्रश्न विचारून निर्णय देण्यात आला की त्या पोझिशन करीता माझी निवड झालेली नाही!!! "The other candidate is much better", पण तुम्ही पैसे घालायला तयार आहात तर त्यांच्या पगाराचे पैसे तेवढे पुरवा. असं सांगून आमची बोळवण झाली!!

पण यावेळी ही कंपनी बरीच वाढली बरं का! नाही म्हणजे कामाच्या बाबतीत नाही तर CEO साहेबांनी job description न देता आणखीन ४ कर्मचारी नियुक्त करून दाखवले. अरिन शेटांना CTO पद बहाल झालं. शाळेतल्या मित्रांपैकी एकाला CFO, एकाला Scientist अशी भारदस्त बिरुदं बहाल करण्यात आली. त्यांना पगारांची आश्वासनं देण्यात आली. (हो! आयता, कँडिडेट म्हणून रिजेक्टेड, असा VC होताच!) एकाला चक्क security in-charge बनवण्यात आलं. त्याचं नक्की काय काम विचारलं तर म्हणे कंपनी आणि तिचे प्रोजेक्टस गुप्त ठेवणे याची सर्वस्वी जबाबदारी या security-in-charge ची होती!!

कंपनीच्या हया भारदस्त बोर्डाच्या मिटींग्ज झडू लागल्या. रोज शाळेत, शाळेतून आल्यावर एखाद्या गुपित जागी भेटून ह्या मिटींग्ज घडत होत्या. मिटींग्ज मध्ये काय झालं हे VC ना देखील कळू द्यायचं नाही, असा ठराव म्हणे पहिल्याच मिटींग मध्ये झाला. आणि security-in-charge नी तशी तंबीच मला दिली.

सुमारे ८-१० मिटींग्जनंतर समस्त बोर्ड VC कडे पगार मागायला हजर झालं. आणि VC ने मला तुम्ही नक्की काय करताय हे माहित नसल्याने मी पैसे देऊ शकत नाही म्हणून हात वर केल्यावर पुढील दोन दिवसांत कंपनी बरखास्त झाल्याची बातमी हाती आली!

अर्थातच मंडळी अश्या छोट्या मोठ्या पराभवांनी डगमगून जात नाहीत. पुढल्याच आठवड्यात अरिन शेटांनी "ऑटोमेशन-नेशन" नावाची कंपनी काढली. आता ही कंपनी काय करणार तर ऑटोमेशन करून देणार हे उत्तर मिळाले. "ते आलं रे लक्षात"...यावेळी कंपनीचं नाव बरंच descriptive ठेवलेलं. "पण कसलं ऑटोमेशन?" याचं उत्तर अर्थातच मिळालं नाही.

पण एकदा मध्यरात्री तहान लागली म्हणून झोपेतून उठून मी पाणी घ्यायला मी स्वयंपाकघरात गेले तर बाजूच्या कॉम्प्युटर रूम मधून भलभलते खाट-खूटीचे आवाज येत होते. हे कोण कुठे हातोडे मारतंय आत्ताच्या प्रहराला? घरात चोर शिरलेत आणि त्यांना आपल्या घराखाली पुरलेल्या सोन्याच्या हंड्यांचा सुगावा लागलाय म्हणून त्यांनी हे जमिन खोदकाम चालू केलंय अशी काहीशी शंका माझ्या मनात डोकावली. हळूच अंदाज घ्यावा म्हणून मी कॉम्प्युटर रूममध्ये डोकावले. तर स्क्रीनवर एक कुर्‍हाड आपली स्वतःहूनच झाडं तोडत बसलेली. त्याचाच तो एवढा खाट-खूट आवाज होता.

सकाळी अरिनला विचारले तेव्हा समजले की हेच ती "ऑटोमेशन-नेशन" कंपनी करत आहे. गेम खेळायचे ऑटोमेशन करून देणार म्हणे. म्हणजे तुम्ही रात्रभर "ऑटो" मोड वर गेम खेळायला लावयाचा - सकाळी बघाल तर तुमच्या अकाऊंटला हजारोंनी पॉईंटस जमा झालेले... ह्याकरीता टेस्टिंग म्हणून रात्रभर "माईनक्राफ्ट" ला कामाला लावलं होतं.

"का रे, ती गेल्या आठवड्यात एवढी environment friendly कंपनी काढलेलीत, आणि आता ही झाडं कसली तोडताय रात्रभर?" असं विचारल्यावर "दुप्पट झाडं लावायचं पण ऑटोमेशन करणार आहोत", असं सडेतोड उत्तर हाती आलं.

आता हे असे गेम्स खेळायला "ऑटो" मोड कोण लावेल हा प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. यांच्यासारख्याच यडचप मंडळींची जगात कमी नसणार आहे, असं स्वतःला सांगून मी गप्प बसले. "ऑटोमेशन-नेशन" नी घरात "ऑटोमॅटीक" पैसे आणले तर माझी हरकत नाहीच आहे तशीही!

या अश्या नवनविन कंपन्या स्थापायच्या म्हणजे अगदीच काही काम करावे लागत नाही असं नाही हं. धाकटे शेट नाही म्हणायला सतत कसले तरी प्रोटो-टाईप्स बनवण्याच्या मागे असतात. रॉन व्हिझली चे मोठे जुळे भाऊ "फ्रेड आणि जॉर्ज व्हिझली" यांच्या prank shop वरून प्रेरित होऊन रोहन शेटांनी मध्यंतरी "रोहन's prank shop" ची स्थापना केली. आणि निरनिराळे prototype pranks आमच्यावर टेस्ट होऊ लागले. त्याची खोली विविध कार्डबोर्डस, कागद, झिरमिळ्या, रंग, कात्री, दगड-धोंडे-काटक्या आणि अगणित अगम्य गोष्टींनी भरून गेली. बरं खोलीत शिरायची सोय नव्हती. कारण शिरताना कुठून वर लपवलेला बॉल डोक्यावर येऊन आदळेल, नाहीतर आपल्या लक्षात येणार नाही अश्या लावलेल्या दोर्‍याला आपण अडखळून पडू नाहीतर पायाखाली काहीतरी येऊन डसेल असल्या प्रँक्सची भीती होती. अरिन शेटांनी याचे अनेक अनुभव घेऊन आम्हाला शहाणे करून सोडल्याने ती विषाची परिक्षा घ्यायला आम्ही गेलोच नाही.

पण पुढे घरात आणलेला ब्रेडचा लोफ, चीज स्लाईसेस गायब होऊ लागले तेव्हा शंका येऊन मी परत अरिनलाच रोच्या खोलीत धाडले. तर क्लोसेटच्या कोपर्‍यात त्यांचा साठा केलेला आढळला. माझ्या डोक्याचा स्फोट होऊ लागल्याने "मोल्डी सँडविचेस" बनवून prank shop मध्ये ठेवण्याच्या त्यांचा उपक्रमाला सुरुंग लागला.

तर पुढल्या काही दिवसांत कंपनीने नविन प्रोडक्टची घोषणा केली "fake smelly sandwiches". अर्थातच हे नाव आतल्या गोटातलं होतं. जगापुढे हे सँडविच "World's best sandwiches" म्हणूनच येणार होतं. स्पंजचे ब्रेड, आतमध्ये फार्ट स्मेल असलेलं व्हूपी कुशन - चीज स्लाईस म्हणून! असा सगळा प्लॅन होता. पण पुढे कंपनीतल्या अंतर्गत कुरबुरींमुळे हे प्रोडक्ट देखील मार्केट मध्ये येता-येता राहिलं.

बाकी काही असो, अश्या असंख्य कंपन्या स्थापन होऊन, विरून गेल्या तरी विरस न होऊ देता पुढल्या multi-million डॉलर्स कंपनीची जुळवा-जुळव करण्याची दोघांची चिकाटी वाखाणण्याजोगी आहे खरी!

=================================================================================================

CEO अरिन, candidate रोहन यांचा इंटरव्ह्यू घेत असतानाचा एक व्हिडीओ - दोनेक वर्षांपूर्वी घेतलेला. यात कँडिडेट प्रामाणिकपणे त्यांना आधीच्या दोन कंपनींमधून फायर करण्यात आल्याचे इंटरव्ह्यू मध्ये कबूल करत आहेत. (न करून सांगतात कोणाला, आधीच्या दोन्ही कंपन्यांचे CEO च तर समोर बसलेत ना इंटरव्ह्यू घ्यायला!) आणि तरीही CEO साहेबही न डगमगता त्यांनाच (की स्वतःलाच!) दिलासा देतायत की "you will learn from your mistakes"!

Keywords: 

लेख: