चांदणचुरा - ९

"हम्म तर माझ्याबद्दलचा तुमचा अंदाज बरोबरच आहे. मी एक पत्रकार आहे आणि मुंबईच्या 'सिटी बझ'साठी काम करते. मी सोसायटी पेजसाठी लिहिते. हा विषय माझ्या आवडीचा नसला तरीही हे काम मला मिळालं यासाठी मला खरंच कृतज्ञता आहे. मी बऱ्यापैकी चांगली रिपोर्टर आहे आणि मला फक्त एक संधी हवी आहे ज्यात मी प्रूव्ह करू शकेन की माझ्यात झगडणारी खरी माणसं, त्यांच्या खऱ्या स्टोरीज जगासमोर आणण्याची क्षमता आहे. सेलिब्रिटी पार्टीज, कोण कुणाशी अफेअर करतंय, कोण लग्न करतंय हे लिहून मला आता प्रचंड कंटाळा आलाय. इतका कंटाळा की मी ही नोकरी सोडण्याच्या तयारीत होते पण माझ्या एडिटरने मला अट घातली की मी या नोकरीत थांबले आणि तुमची मुलाखत घेण्यात सक्सेसफुल झाले तर ते मला हव्या त्या असाईनमेंट्स देतील. पण हे  किती नेक्स्ट टू इम्पॉसिबल काम आहे हे मला तेव्हा माहीत नव्हतं."

एकदा सगळं एक्स्प्लेन करून सांगायला लागल्यावर ती बोलतच सुटली. ती एवढ्याच आशेवर होती की तिची पूर्ण गोष्ट कळल्यावर तरी आदित्य काहीतरी को-ऑपरेट करेल.

शेवटी त्याला कुणा ना कुणाला तर मुलाखत द्यावीच लागेल, मग तिला का नाही. तिने त्याला शोधून काढले यातून तिची क्षमता थोडी तरी जाणवतेच. त्याच्या पुस्तकाला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली होती. लोक त्याला पर्सनली जाणून घ्यायला प्रचंड उत्सुक होते. त्याची बाहेर किती क्रेझ आहे याची बहुतेक त्याला इथे जाणीवच नाहीये. तिने विचार करत पुढे बोलायला सुरुवात केली.

"समजा तुम्ही मला मुलाखत नाहीच दिली आणि मी निघून गेले तरीसुद्धा जशी मी तुम्हाला शोधू शकले तसे अजून लोकही शोधू शकतात..."

त्याने आता धारदार नजरेने तिच्याकडे रोखून बघितले.

"योर बुक इस अमेझिंग! आणि लोकांना ऑन माय ओन मागचा माणूस जाणून घ्यायचाय. त्यात त्यांची काय चूक? तुमच्या वाचकांना तुम्ही का समजून घेत नाही? पुस्तक प्रसिद्ध करताना हे तुम्हाला जाणवलं असेलच ना?"

तरीही तो शांतपणे बसून होता. तिने आता नवीन तंत्र वापरायचे ठरवले. कदाचित त्याला तिच्याबद्दल दया वाटून तो तयार होईल..
"मी दिवाळीत एकदाच मोठी सुट्टी घेऊन माझ्या आईबाबांना भेटते. वर्षातून एकदाच एवढा मोठा वेळ आम्ही एकमेकांबरोबर मजेत रहातो. पण ह्या मुलाखतीसाठी मी ती सुट्टीसुद्धा कॅन्सल केली. कारण ही मुलाखत मला त्या सुट्टीपेक्षा जास्त महत्वाची वाटली. माझं सगळं फ्युचर करियर ह्या मुलाखतीवर अवलंबून आहे."

बोलता बोलता ती त्याला निरखत होती पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नव्हते.

"आता तुला माझ्याकडून सिम्पथी हवी आहे का?"

"हा! असं काही नाही. अम्म्म.. हो, मेबी थोडीशी.." ती जीभ चावत म्हणाली.

त्याने डोळे मिटून मान हलवली.

"हं! आपण एक काम करू शकतो. मी लेख लिहून तुम्हाला वाचायला देईन, तुम्ही तो वाचून ओके केला तरच तो पुढे छापायला देईन. तुम्हाला आर्टिकल पसंत नाही पडलं तर ते छापलं जाणार नाही." ती उत्साहाने म्हणाली.

" तुला खरंच वाटतं मी ह्याच्यावर विश्वास ठेवीन?" तो डावी भुवई उचलून म्हणाला.

"ऑफ कोर्स! मी शब्दाला पक्की मुलगी आहे."

"अजून तरी अशी एकही स्त्री मला भेटलेली नाही." त्याच्या शब्दांतून तिरस्कार ओघळत होता. तो उठून लॅपटॉपच्या टेबलकडे गेला. खुर्ची खेचून बसत त्याने हेडफोन लावला. एकदोन स्विच दाबले आणि सॅटेलाईट फोन सुरू केला.

त्याने नक्की फतेबीरला कॉल केला असणार हे तिला लगेच क्लिक झाले. तिला फक्त एकतर्फी संभाषण ऐकू येत असले तरी मुख्य मुद्दा तीच आहे हे न कळायचा प्रश्नच नव्हता.

"ये कोई जोक नही है..  मुझे बिलकुल हसी नही आ रही."
बहुतेक पलीकडे फतेबीर या गोष्टीवर काहीतरी थट्टा करत असावा.

" नही चाहीये यार तेरा फेवर! यहां एक लेडी, वो भी एक लेडी रिपोर्टरको छोडके जाना ये कोई फेवर नही है." तो ओरडून म्हणाला.

"नही. उसको क्या पता है, क्या नही इससे मुझे कोई लेनादेना नही है. -- नही, मुझे कुछ नही सुनना."

"मेरी लास्ट वॉर्निंग है, अगले चौबीस घंटे है तुम्हारे पास. आके ले जाओ उसे यहांसे."
थोडावेळ शांतता पसरली. तो वैतागून दाढी खाजवत होता.

अचानक टेबलवर हात आपटत तो ओरडला, " नो! आय डोन्ट केअर. बर्फबारी! डोन्ट टेल मी, सब तुम्हारी गलती है."

हे ऐकून उर्वी फार चिंतेत पडली. तिला ह्या संताबरोबर एकटं ह्या केबिनमध्ये अजिबात राहायचं नव्हतं. फटाफट इंटरव्ह्यू घेऊन आपण निघू हा तिचा प्लॅन होता. तिकडे दिवाळीमुळे फिल्मी दिवाळी पार्ट्या शेड्युल झाल्या होत्या आणि तिला त्या कव्हर करणं गरजेचं होतं. जर ती इथे राहिली तर हा इंटरव्ह्यू तरी मिळाला पाहिजे तरच डिमेलो तिला सूट देईल. इथे ती थोडाच काळ असली तरी संताबद्दल एक इंटरेस्टिंग लेख आरामात लिहू शकेल याची तिला खात्री होती.

"चौबीस घंटे!" जोरात ओरडून त्याने रागाने हेडफोन काढून टेबलवर आपटला आणि फटाफट सगळे स्वीचेस बंद केले.

उर्वी घाबरून काही न बोलता, शांतपणे जशी होती तशीच बसून राहिली.

आदित्य लाकडी फ्लोअरिंगवर धाडधाड पावलं वाजवत सोफ्याकडे गेला. उभ्या उभ्याच उरलेली कॉफी एका घोटात पिऊन तो कॉफी मग विसळायला सिंकपाशी गेला. अचानक तिला आपल्या हातातल्या रिकाम्या मगची जाणीव झाली. ती उठून लगोलग त्याच्या मागे निघाली. तिच्या जाड सॉक्समुळे पायरव अजिबात जाणवत नव्हता. त्या दोघांनाही समजायच्या आत, घाईत ती त्याच्यामागे खूपच जवळ उभी राहिली होती कारण तो मग ठेऊन जेव्हा मागे वळला तेव्हा त्याच्यामुळे ती चिरडायचीच बाकी होती.

त्याने पटकन तिचे दंड धरून तिच्या डोळ्यात रागाने रोखून बघितले. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. "स्टे आउट ऑफ माय वे" एकेक शब्दावर जोर देऊन त्याने तिला धमकावलेच.

"आय.. आय एम सॉरी. इट वॉज ऍन ऍक्सिडंट.." ती घाबरून गडबडून जात म्हणाली. तेव्हाच तो पुन्हा जोरजोरात पाय वाजवत सरळ मुख्य दारापाशी गेला. स्टँडवरून जॅकेट, टोपी, बूट सगळा सरंजाम चढवून, खाडकन दार आपटून तो बाहेर निघून गेला.

ती थक्क होऊन दाराकडे बघत राहिली. ती जितक्या आशेने इंटरव्ह्यू घ्यायला आली होती त्या सगळ्याचा चुराडा होताना तिला दिसत होता. दाराबाहेर बर्फ कोसळतच होता.

तिने बॅग उघडून केस टॉवेलमध्ये बांधून टाकले. सीडर अजूनही फायरप्लेसच्या उबेत लोळत पडला होता. उर्वी त्याच्याशेजारी रगवर मांडी घालून बसली.

"त्याला मी आवडत नाही" सीडरची पाठ खाजवत ती म्हणाली. त्याने हळूच मुंडी उचलून तिच्याकडे पाहिले. "म्हणजे त्याचं बरोबरच आहे. मीच इथे घुसखोर आहे आणि त्याचं फळ मी भोगतेय."

सीडरने हलकेच डोके उचलून तिच्या मांडीवर ठेवले. आनंदाने तिला धक्काच बसला. आदित्यने त्याच्या चाव्याबद्दल बजावूनही तिने डोक्यावरून हात फिरवला. "तो म्हणतो तसा भयानक लांडगा वगैरे तू नाहीच्चेस." त्याच्या डोक्यावर हनुवटी टेकवत ती म्हणाली. "तू ना नुसता एक फरबॉल आहेस."

अदित्यऐवजी निदान त्याच्या कुत्र्याला तरी ती आवडत होती हे तिला सध्यातरी पुरेसे होते.
"मेबी त्याच्याऐवजी मी तुझाच इंटरव्ह्यू घेते. काय?" त्याच्या दाट फरमधून हात फिरवता फिरवता ती म्हणाली.

त्या ढोल्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदलले नाहीत.

"सो. सीडर मला हे सांग की आदित्य--"

तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला आणि बरोबर थंड हवेचा एक झोत आणि लाकडाचे काही तुकडे घेऊन आदित्य आत आला. रात्रीच्या तयारीने त्याने ते त्यांच्या जागी रचून ठेवले.

"मी काही मदत करू का?" उर्वीने बारीक आवाजात विचारले.

"लीव्ह!"

"आय कान्ट!" ती पुटपुटली.

"हुं! लाईक आय डोन्ट नो दॅट!" म्हणून तो उठला आणि सोफ्याशेजारच्या रॉकिंग चेअरमध्ये जाऊन बसला.

ती त्याच्या मागोमाग येऊन सोफ्यावर बसली. "मला वाटलं होतं मी फत्तेबरोबर तुम्हाला भेटून पटकन मुलाखत घेईन आणि तशीच त्याच्याबरोबर परत निघून जाईन. तो मला इथे सोडून जाईल अशी मला खरंच कल्पना नव्हती."

"पण मी इथे आता तुझ्याबरोबर अडकून पडलोय." तो राग कंट्रोल करायचा प्रयत्न करत म्हणाला.

"आय नो.. मी खरंच त्याबद्दल माफी मागते." ती म्हणाली. एव्हाना त्याने उठून किचनमध्ये जाऊन भाज्या चिरायला सुरुवात केली होती. त्याला स्वयंपाकातसुद्धा तिची मदत नको होती. हे पाहून तिला निदान आपण आपली मोठी बॅग उचलून बाजूला ठेवावी असे वाटले.

"माझी बॅग कुठे ठेऊ?"

"तुला काय गेस्टरूम वगैरे हवीय का?" त्याने तिरकसपणे विचारले.

"हो, चालेल." ती नकळत म्हणाली.

तो कुत्सितपणे हसलाच. "इथे एकच बेडरूम आहे, त्यात एकच बेड आहे. आणि मी आत्ताच क्लीअर करतोय की मी सोफ्यावर अजिबात झोपणार नाही."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle