१९६० चे दशक हे कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्काकरता निर्णायक होते. १९६४ साली सिव्हील राईट्स कायद्यानुसार अमेरिकेतील सेग्रिगेशन संपले, १९६५ च्या वोटींग राईट्स कायद्यानुसार मतदानाकरता नोंदणी आणि मतदान या दोन्ही बाबींमध्ये पारदर्शकता आणण्यात आली, १९६८ च्या फेअर हाउसिंग कायद्यानुसार घराकरता कर्ज घेताना, घर विकत/भाड्याने घेताना, विकताना कृष्णवर्णीयांविरुद्ध वर्णभेद करणे बेकायदेशीर झाले. कृष्णवर्णीय समाज मुख्य धारेत आणण्याकरता हे तिन्हीही कायदे महत्त्वाचे ठरले. १९६८ साली शर्ली चिझम ही अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडली गेलेली पहिली अफ्रिकन अमेरिकन महिला ठरली. या दशकात शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक पातळीवर समानतेसाठी कृष्णवर्णीयांचा प्रवास सुरु झाला. काही गट आपला हक्क मिळवण्याकरता हिंसेचे समर्थन करणारे असले तरी नागरी हक्क हे प्रामुख्याने शांततापूर्ण चळवळीतून प्राप्त झाले. १९६८ साली शांततेच्या पुरस्कर्त्या मार्टीन ल्युथर किंग ज्युनियरची हत्या झाली आणि त्याचे पडसाद मात्र अमेरिकेच्या सर्व भागात उमटले. गेल्या १५ वर्षात कृष्णवर्णीयांनी कमालीचा संयम दाखवून, पदोपदी हिंसेला सामोरे जाऊन आपला हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र किंगच्या हत्येचा निषेध करण्याकरता आणि आपला उद्वेग, राग, अगतिकता बाहेर काढण्याकरता देशभर त्याच्या समर्थकांनी मोर्चे काढले आणि त्यातल्या बहुतेक मोर्चांना हिंसेचे गालबोट लागले. शिकागो, वॉशिंग्टन डिसी, बाल्टीमोअर, न्युयॉर्क, डेट्रोईट, पिट्सबर्ग आणि इतर अनेक ठिकाणी संतापलेल्या जमावाने जाळपोळ, तोडफोड करुन मालमत्तेची हानी केली. हा त्यांनी दाखवलेला पहिला हिंसक उद्रेक होता आणि या उद्रेकाला साडेतीनशे वर्षांचा इतिहास कारणीभूत होता.
१९६८ साली National Advisory Commission on Civil Disorders (उर्फ कर्नर कमिशन) ने राष्ट्राधक्ष लिंडन जॉन्सनसमोर एक अहवाल प्रस्तुत केला. सामाजिक आणि आर्थिक स्तरावर कृष्णवर्णीय तोंड देत असलेल्या विविध प्रकारच्या असमानतेचा अभ्यास करुन त्याची विस्तृत आकडेवारी त्यांनी या अहवालाद्वारे मांडली. आज ५० वर्षांनंतर एकत्रित समाज म्हणून अमेरिका कुठेपर्यंत पोहोचली आहे याची तुलना करण्याकरता हा अहवाल खूप महत्त्वाचा आहे.
शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजाने गेल्या ५५ वर्षात खूप प्रगती केली आहे. राजकारणाचे उदाहरण घ्यायचे झाले तर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर याचा शिष्य आणि सहकारी जेसी जॅक्सन १९८४ आणि १९८८ साली राष्ट्राध्यक्षपदाकरता डेमोक्रॅटीक पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याकरता उभा राहिला. सर्वात जास्त मते न मिळाल्यामुळे त्याला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, परंतु दोन्हीही वेळा त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. २० वर्षात ज्या लोकांना शेजारी बसवून घ्यायला दक्षिणेत परवानगी नव्हती त्यांचाच एक प्रतिनिधी राष्ट्राध्यक्ष बनण्याची स्वप्ने बघतो आणि त्यात त्याला अनेक श्वेतवर्णीय लोकांचाही पाठींबा मिळतो ही मोठी बाब होती. १९८९ साली जॉर्ज एच डब्ल्यू बुशच्या मंत्रीमंडळात कॉलिन पॉवेल याने Joint Chiefs of Staff चे अध्यक्षपद भूषविले. या महत्त्वाच्या पदाकरता निवडला जाणारा तो पहिला कृष्णवर्णीय होता. थरगूड मार्शल याच्या मृत्यूनंतर १९९१ साली क्लॅरेन्स थॉमस याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली. रॉन ब्राउन याने १९९३ साली बिल क्लिंटनच्या मंत्रीमंडळामध्ये वाणिज्यमंत्र्याचे पद भूषविले. २००१ साली जॉर्ज डब्ल्यू बुशच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत कॉलिन पॉवेल याने 'Secretary of State' हे मंत्रिमंडळामधील सर्वात महत्त्वाचे पद भूषविले. काँडोलिझा राईसने २००१ साली सुरक्षा सल्लागार सहाय्यकाचे काम केले. ५० वर्षांपूर्वी या प्रकारची पदे कृष्णवर्णीय भूषवितील याची कोणी कल्पनाही करु शकत नव्हते. पण हा बदल यायला सुरुवात झालेली होती. २००७ साली अमेरिकेतील सिनेटमध्ये निवडला गेलेला (फक्त) तिसरा कृष्णवर्णीय असलेल्या बराक ओबामाने जेंव्हा २० जानेवारी २००९ साली अमेरिकेच्या ४४ व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली तेंव्हा जगाने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. हा क्षण अनुभवायला १८ लाख लोक अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डिसी येथे पोहोचले होते. अमेरिकेच्या इतिहासात कमालीचा कठीण प्रवास केलेल्या कृष्णवर्णीयांकरता हा क्षण स्वप्नवत होता. ओबामाचा विजय कृष्णवर्णीयांबरोबरच अनेक श्वेतवर्णीयांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाला होता. वंशभेदाच्या वर येऊन समाज एकत्र येतोय याचे हे उदाहरण होते. राजकारणाबरोबरच संगीत, क्रिडा, मनोरंजन, लेखन, शिक्षण या क्षेत्रातही कृष्णवर्णीयांची घोडदौड सुरु होती. संगीत आणि क्रिडा या क्षेत्रात आधीपासून अनेक कृष्णवर्णीय लोकांच्या मनावर राज्य करत होते. यापूर्वी अनेक वेळा त्यांना फक्त रंगामुळे भेदभावाचा सामना करावा लागला होता, पण आता हा भेदभाव मागे पडल्याची चिन्हे दिसत होती. विविध क्षेत्रातील कृष्णवर्णीयांची यशोगाथा पाहता अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाज आता श्वेतवर्णीयांचा पंगतीत येऊन बसलेला आहे असे चित्र दिसून येत होते. पण समाजाच्या सर्वच पातळ्यांवर खरोखरच अशी परिस्थिती होती का? का हे चित्र फसवे होते?
५० वर्षांपूर्वीची आणि आताची कृष्णवर्णीयांची परिस्थिती असा जर अभ्यास केला तर जवळपास सर्वच क्षेत्रात त्यांची प्रगती झालेली दिसते, पण कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय यांच्या परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास केला तर असे लक्षात येते की कित्येक महत्त्वाच्या बाबींमध्ये ते श्वेतवर्णीयांपेक्षा अजुनही कितीतरी मागे आहेत. आर्थिक व शैक्षणिक विकास, बेरोजगारी, घराची मालकी, आरोग्यसेवा (healthcare) या बाबतील सर्वसाधारण मध्यमवर्गीय श्वेतवर्णीय कुटुंबीयाची तुलना त्याच स्तरावरील कृष्णवर्णीयाबरोबर केली तर हे विषम चित्र स्पष्ट होते. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अजुनही मोठी तफावत आहे. श्वेतवर्णीयांच्या जवळपास अडीचपट जास्त कृष्णवर्णीय दारिद्र्यरेषेखाली राहतात आणि सर्वसाधारण मध्यमवर्गीय श्वेतवर्णीय कुटुंबाचे उत्पन्न त्या स्तरावरील कृष्णवर्णीय कुटुंबाच्या १० पट जास्त दिसून येते. बहुसंख्य कृष्णवर्णीय लोक जगण्याकरता १९६८ मध्येही सरकारी कल्याणकारी (social welfare) योजनांवर आणि इतर मदतीवर अवलंबून होते आणि २०१८ मध्येही ही परिस्थिती फार बदललेली नाही आहे. हे प्रमाण अमेरिकेतील इतर कुठ्ल्याही वांशिक गटापेक्षा (लॅटिनो, अशियायी अमेरिकन, श्वेतवर्णीय) जास्त आहे. मोठ्या शहरांमध्ये कृष्णवर्णीयांच्या गरीब वस्तीमध्ये (inner city) कित्येक कुटुंबे ही पूर्णपणे कल्याणकारी योजनांवर जगतात. वर्षानुवर्ष गरीब कृष्णवर्णीय समाज त्याच परिस्थितीत अडकलेला दिसतो आणि त्यांची प्रगती ही अतिशय संथ गतीने होताना दिसून येते. गरीबी, उच्च शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी यामुळे मोठ्या शहरांमध्ये तरुणाईला ड्र्ग्ज, टोळी युद्ध, हिंसा याचा विळखा बसलेला आहे. समस्येच्या मुळाशी न जाता कृष्णवर्णीयांनाच अनेकदा त्यांच्या परिस्थितीकरता दोष दिला जातो. त्यांच्याकडे पूर्वग्रहदुषित नजरेने पाहिले जाते. पण त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास हे लक्षात येते की त्यांच्याविरोधात असलेला वर्णभेद हा अजुनही त्यांच्या विकासाकरता मारक ठरत आहे.
(स्रोत - Kerner Commission)
कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय यांना दिल्या जाणार्या वागणूकीमधली मोठी तफावत आढळते ती म्हणजे पोलिसांकडून थांबवले जाणे, दंड, तुरुंगवास आणि शिक्षा या बाबींमध्ये. अमेरिकन तुरुंगामधील कृष्णवर्णीयांचे प्रमाण हे श्वेतवर्णीय आणि इतर कोणत्याही वंशाच्या लोकांपेक्षा तुलनेने जास्त आहे. त्यांच्या अटकेत, खटल्यामध्ये आणि तुरुंगातही त्यांना अनेकदा पूर्वग्रहदुषीत वर्णभेदाला सामोरे जावे लागते. १९६८ साली दर एक लाख कृष्णवर्णीयांमागे ६०४ जणांना कुठल्या न कुठल्या प्रकारच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. खरं तर ५० वर्षात उंचावलेला आर्थिक स्तर, शिक्षण, पांढरपेशी नोकरी आणि सर्वंकश प्रगती या निकषांवर हे प्रमाण कमी व्हायला हवे. मात्र २०१८ मध्ये कृष्णवर्णीयांच्या अटकेचे प्रमाण २६८ टक्क्यांनी वाढून लाखामागे १७३० वर आले. काहीतरी नक्कीच चुकतंय आणि या विषयाचा अभ्यास केल्यास लक्षात येते की या प्रश्नामागेच ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळीचे मूळ लपले आहे.
(स्रोत - https://www.pnas.org/content/116/34/16793)
अमेरिकेतून वंशभेद हा कधीच हद्दपार झालेला नव्हता. काही बदलेल्या कायद्यांनी अनेक लोकांच्या मनात पिढ्यानपिढ्या रुजलेला वंशभेद नष्ट होणे शक्य नव्हते. श्वेतवर्ण हा सर्वश्रेष्ठ आणि इतर सर्व वंश हे कनिष्ठ ही शिकवणूक अनेक गोर्यांना लहानपणापासून मिळालेली होती. कृष्णवर्णीयांना मिळालेली समानतेची वागणूक ही त्यांना पटत नव्हती आणि फक्त कायद्याच्या धाकामुळे तिचा स्वीकार करावा लागत होता. प्रमाण कमी असले तरी कृष्णवर्णीयांना मिळणार्या समान वागणुकीचा द्वेष करणारी लो़कं ही राजकारण, कायदा आणि सुव्यवस्था, मनोरंजन, शिक्षण, चर्च आणि इतर विविध क्षेत्रामध्ये काम करणारी होती. हा द्वेष त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही रुजला होता आणि कधी कधी तो उफाळून बाहेर येत असे. १९८०-१९९० चे दशक एकूणच शांततेचे आणि कृष्णवर्णीयांच्या विकासाचे असले तरी अधुन मधुन वांशिक भेदभावामधून तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि अशा प्रत्येक घटनेची परिणिती ही कृष्णवर्णीय समाजामध्ये संशयाचे, अविश्वासाचे आणि असंतोषाचे वातावरण निर्माण होण्यात झालेली आहे. १९९२ मध्ये मात्र याचा उद्रेक झाला. मार्च १९९१ मध्ये रॉडनी किंग या २६ वर्षीय कृष्णवर्णीयाला दारु पिऊन गाडी चालवल्याबद्दल (जे नंतर सिद्ध झाले नाही) लॉस एंजेलिसमधील पोलिसांनी पाठलाग करुन थांबवले. त्यानंतर ४ पोलिसांनी नि:शस्त्र रॉडनीला जमिनीवर पाडून जबर मारहाण केली. ही घटना एका व्यक्तीने त्याच्या बाल्कनीमधून चित्रीत केली आणि एका टेलिव्हिजन चॅनलला पाठविली. या घटनेत रॉडनीची कित्येक हाडे तुटली आणि तो जबर जखमी झाला. ही घटना प्रक्षेपित झाल्यावर लोकांना पोलिसांच्या या कृर वर्तणूकीचा धक्का बसला. रॉडनीला मारहाण केलेल्या पोलिसांची काही महिन्यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ लॉस एंजेलिसमध्ये मोठी दंगल उसळली, अमेरिकेतील इतर शहरातही मोर्चे आणि दंगली झाल्या. पोलिस खाते कृष्णवर्णीयांबरोबर अधिक बळाचा वापर करते आणि त्यांच्या कृष्णवर्णीय आणि इतर वंशाच्या, खास करुन गोर्या लोकांबरोबरच्या, वागणूकीमध्ये कमालीचा फरक आहे याची चर्चा वर्तमानपत्रे आणि टिव्हीवर मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली. यानंतरही कमीअधिक प्रमाणात कृष्णवर्णीयांबरोबर पोलिसांच्या अत्याचारांच्या घटना घडतच राहिल्या. तो काळ सेलफोन आणि सोशल मिडीयाचा नसला तरी बर्याच घटना टिव्ही, वर्तमानपत्राद्वारे लोकांसमोर येत राहिल्या. १९९६ साली फ्लोरिडामधील सेंट पिटर्सबग या ठिकाणी १८ वर्षीय नि:शस्त्र टायरॉन लुईस याला पोलिसांनी ट्रॅफिक सिग्नलवर गोळ्या घातल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथे दंगे उसळले. या घटनेतील पोलिसांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. २००१ साली ओहायोमधील सिनसिनाटी या ठिकाणी १९ वर्षीय नि:शस्त्र टिमथी थॉमस यालाही अशाच प्रकारे पोलिसांकडून गोळ्या घालून मारण्यात आले. अमेरिकेतील दक्षिणेतील राज्यांमध्ये जेंव्हा सेग्रिगेशन होते तेंव्हा उत्तरेत राहणार्या अनेक कृष्णवर्णीयांना सेग्रिगेशन नसले तरी नियमितपणे वर्णभेदाचा सामना करावा लागे. अनेक शहरांमध्ये गरीबी, त्यामुळे अर्धवट शिक्षण, बेरोजगारी आणि त्यावर वर्णभेद यामुळे तेथील युवकवर्ग गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत होता. याचे मूळ शोधून त्यावर काम करण्याऐवजी त्यांच्या वस्त्यांवर पोलिसांच्या अधिक गस्ता आणि बळाचा सर्रास वापर केला जात असे. कृष्णवर्णीयांच्या उत्तर आणि पश्चिमेतील मोठ्या प्रमाणातील स्थलांतरानंतर (The Great Migration) त्यांना नेहेमीच श्वेतवर्णीय पोलिसखात्याच्या वर्णभेदाचा, संशयाचा सामना करावा लागला आहे. कृष्णवर्णीय हे गुन्हेगारी वृत्तीचे असतात हे पोलिसखात्याचे पूर्वग्रहदुषित मत बनलेले होते. त्यांना सरळ ठेवण्याकरता धमक्या, अपमान, बळाचा वापर, मारहाण या गोष्टी नियमितपणे वापरल्या जाऊ लागल्या. दक्षिणेतील पोलिस हे तर बहुतांशी सेग्रिगेशनला पाठिंबा देणारे होते. जसा दक्षिणेतील कृष्णवर्णीय समाज मोठ्या प्रमाणात मुख्य धारेत येत गेला तशी पोलिसांनी वर्णभेदी वागणुकीतून आपली नापसंती दाखवण्यास सुरुवात केली. कृष्णवर्णीयाविरुद्ध गुन्हा केलेल्या श्वेतवर्णीयाला सोडून देणे किंवा सौम्य शिक्षा देणे हे पूर्वापार चालत आले होते, त्याचीही पुनरावृत्ती या काळात होत राहिली. वेगवेगळ्या काळामध्ये अमेरिकेतील विविध जातीधर्माच्या, वयाच्या, लिंगाच्या लोकांना पोलिसांच्या अतिरिक्त बळाला तोंड द्यावे लागले आहे. पण यात सर्वात जास्त सामना नेहेमीच कृष्णवर्णीय समाजाला करावा लागला आहे. कृष्णवर्णीय व्यक्ती पोलिसांकडून हटकली जाणे, अटक केली जाणे किंवा पोलिसी अत्याचाराला बळी पडणे याची उदाहरणे जशी वाढत होती तसा कृष्णवर्णीय समाजात असंतोष वाढत गेला.
२०१२ मध्ये फ्लोरिडामधील एका गावात १७ वर्षाच्या ट्रेव्हॉन मार्टीन याला संशयास्पद वागणूकीच्या नावाखाली जॉर्ज झिमरमन या माणसाने हटकले, आणि थोडी बाचाबाची झाल्यावर गोळ्या घालून ठार मारले. ट्रेव्हॉन हा तिथे फक्त आपल्या कुटुंबियांना भेटायला आलेला होता. जॉर्ज झिमरमनची या गुन्ह्याकरता निर्दोष मुक्तता झाली. या घटनेनी व्यथित होऊन अलिशिया गार्झा हिने सोशल मिडीयावर #BlackLivesMatter या हॅशटॅगखाली एक संदेश लिहिला. तो पट्रिस कुलर्स आणि ओपल टोमेटी या तिच्या मैत्रिणींनेही वापरला. त्यानंतर हा हॅशटॅग वापरुन अनेक लोकांनी जॉर्ज झिमरमनच्या निर्दोष मुक्ततेचा निषेध केला. २०१२ पासून ते २०१४ पर्यंत कृष्णवर्णीयांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अमानुष वर्तणुकीचा निषेध करण्याकरता BlackLivesMatter हा हॅशटॅग सोशल मिडियावर नियमितपणे वापरला जाऊ लागला. जुलै २०१४ मध्ये एरिक गार्नर या कृष्णवर्णीयाला अटक करताना पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर केल्याने त्याचा गुदमरुन मृत्यू झाला. महिन्याभरातच ऑगस्ट २०१४ मध्ये मिसुरी राज्यातील फर्ग्युसन या ठिकाणी मायकल ब्राउन या १८ वर्षीय तरुणाची पोलिसाने ६ गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसाने स्वतःचा बचाव करण्यासाठी गोळ्या झाडल्या असा निर्णय देऊन त्याच्यावर खटला ही दाखल करण्यात आला नाही. मायकर ब्राउन नि:शस्त्र होता. या आधी पर्यंत ब्लॅक लाइव्हज मॅटर ही चळवळ फक्त इंटरनेटवर सक्रिय होती, पण गार्नर आणि ब्राउनच्या मृत्यूनंतर ती रस्त्यावर आली. पोलिसांच्या कृष्णवर्णीयांप्रती पूर्वग्रहदुषित, अमानुष वागणुकीला वाचा फोडण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. संपूर्ण अमेरिकेत विविध गावांमध्ये BlackLivesMatter नावाखाली मोर्चे निघाले, दंगलीही झाल्या. कृष्णवर्णीय समाजाच्या हतबलतेतून हा उद्रेक झालेला होता. ४०० वर्ष झाली तरी त्यांच्या जीवाला किंमत नव्हती. आमचेही जीवन मौल्यवान आहे हे या चळवळीद्वारे त्यांना जगाला सांगायचे होते. प्रत्येक नि:शस्त्र कृष्णवर्णीयांच्या हत्येने त्याचे कुटुंब उध्वस्त होत होते आणि प्रत्येक वर्षी पोलिसांच्या अतिरिक्त बळामुळे अशी कित्येक कुटुंबे उध्वस्त होत होती. पोलिस कोठडीत होणार्या कृष्णवर्णीयांच्या मृत्यूंवरही BlackLivesMatter चळवळीने प्रकाश पाडण्यास सुरुवात केली. २०१४ पासून BlackLivesMatter चळवळीखाली प्रत्येक वर्षी पोलिसांच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शेकडो मोर्चे निघाले. सोशल मिडीयावर #BlackLivesMatter हा टॅग वापरुन कोट्यावधी लोकांनी आपला निषेध, आपले अनुभव मांडायला सुरुवात केली. जगभरात या चळवळीला पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली. पोलिसांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याबरोबरच कृष्णवर्णीयांना सामोरे जाव्या लागणार्या भेदभावाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या चळवळीद्वारे करण्यास सुरुवात झाली. राजकीय दबाव, प्रसारमाध्यमांमध्ये मुलाखती, लोकांमध्ये या विषयावर जागरुकता निर्माण करणे, तसेच पोलिस प्रशिक्षणात बदल, गैरवर्तनाकरता जबाबदार ठरवून शिक्षा, पोलिसांच्या मानसिक स्वास्थ्यावर काम, पोलिसखात्याचे बजेट कमी करणे इत्यादी गोष्टींची मागणी आणि त्याकरता दबाव आणणे हे या चळवळीचे उद्दिष्ट बनले.
२०२० ची सुरुवात जॉर्जिया राज्यात २५ वर्षीय अहमद आर्बरी याच्या खुनाने झाली. आर्बरीला ३ गोर्या माणसांनी गोळ्या घालून ठार मारले. हे तीनही लोक (ज्यातील एक जण निवृत्त पोलिस ऑफिसर होता) ७४ दिवस कोणत्याही खटल्याशिवाय मुक्त फिरत होते. मार्च महिन्यात ब्रिओना टेलर हिचाही पोलिसांच्या गोळ्यांनी मृत्यू झाला. या घटनेतील पोलिसाची निर्दोष मुक्तता झाली. अमेरिकेत पोलिसांना स्वसंरक्षणाकरता गोळी झाडण्याचा हक्क आहे, आणि बहुतांशी वेळेला गरज नसताना गोळी झाडल्याचे निदर्शनास आल्यावरही पोलिस निर्दोष सुटतात. पोलिसांच्या कृष्णवर्णीयांविरुद्ध अमानुष वागणूकीबद्दल संताप वाढत होता आणि तेवढ्यात जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वार्यासारखा पसरला. मे २०२० मध्ये मिनियापोलिस या ठिकाणी जॉर्ज फ्लॉइड या नि:शस्त्र कृष्णवर्णीयाची गळ्यावर पायाने दाब देउन अतिशय क्रुर पद्धतीने एका पोलिसाने हत्या केली. जॉर्ज फ्लॉइडवर दुकानदाराने २० डॉलरचे खोटी नोट वापरल्याच्या आरोप केला होता. या घटनेत जॉर्ज फ्लॉइड नि:शस्त्र होता, त्याने कुठ्ल्याही प्रकारे प्रतिकार किंवा उलट हल्ला केला नव्हता. पोलिसाने गळ्यावर पाय ठेवल्यावर जॉर्ज फ्लॉइड त्याला श्वास घेता येत नाही आहे असे सांगत होता, पण बघ्यांना कुठल्याही प्रकारची मध्यस्ती करण्यास पोलिसांनी मज्जाव केला, शेवटी श्वास घुसमटून तो मेला. त्याच्या अटकेचा आणि मृत्यूचा बघ्यांनी व्हिडीओ काढला आणि तो कोट्यावधी लोकांनी सोशल मिडीयावर जगभर पाहिला. जॉर्ज फ्लॉइड जर गोरा असला असता तर त्याच्यावर हा प्रसंग आला नसता हा विचार बघणार्या प्रत्येकाच्या मनात आला, तो बोलून दाखवला गेला. कोव्हिड-१९ ची पर्वा न करता देशभर मोर्चे आणि दंगली झाल्या. समाजाच्या सर्व स्तरांमधून या धक्कादायक, कृर घटनेचा निषेध झाला. कृष्णवर्णीयांच्या खांद्याला खांदा लावून श्वेतवर्णीयही प्रत्येक ठिकाणी मोर्चात सहभागी झाले. जगभरातून BlackLivesMatter चळवळीकरता पाठिंबा वाढला.
जगाच्या इतिहासात स्वतःला श्रेष्ठ समजणार्या घटकांनी अल्पसंख्यांकांवर, दुर्बल घटकांवर अन्याय केल्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत, घडत आहेत. अमेरिकेत २१ व्या शतकातही स्वतःला श्रेष्ठ समजणार्या, पूर्वग्रह बाळगून भेदभाव करणार्या श्वेतवर्णीयांच्या विचारसरणीत जोपर्यंत बदल घडत नाही तोपर्यंत कृष्णवर्णीयांना कधीही समानतेची वागणूक मिळणार नाही. कृष्णवर्णीयांनी गेल्या ५५ वर्षांमध्ये खूप प्रगती केलेली आहे. त्यात त्यांचे अथक परिश्रम आहेत. या प्रवासात कुठलाही दुजाभाव न ठेवता अनेक श्वेतवर्णीयांनीही त्यांना साथ दिली आहे. मात्र कृष्णवर्णीयांच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना फक्त यशस्वी चेहेरे न पाहता या समाजातील सर्व घटकांकडे पाहणे महत्त्वाचे आहे. विकासाच्या फूटपट्टीवर अजुनही मागे राहिलेल्या घटकांच्या प्रगतीकरता, त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याकरता वर्णभेदी गोर्या लोकांच्या मानसिकतेत बदलाची आवश्यकता आहे. सामाजिक, सरकारी पातळीवरुन धोरणे आणि स्वतः कृष्णवर्णीयांकडून कॉलेज शिक्षणावर भर, हिंसाचार, ड्रग्ज समस्या यावर काम हे ही तेवढेच महत्वाचे आहे. आपल्या बांधवांवर होणार्या अन्यायाविरुद्ध् आवाज उठवण्यासाठी कृष्णवर्णीयांनी BlackLivesMatter चळवळ सुरु केली. बहुतांशी शांततामय निदर्शनांच्या स्वरुपात सुरु असलेल्या मोर्चांना अगतिकता, राग, अन्यायाची भावना यांचा कडेलोट झाल्यावर अनेक वेळा हिंसक वळण लागले. हिंसा ही कधीही समर्थनीय नसली तरीही या उद्वेकामागे ४०० वर्षांचा इतिहास आहे. कित्येक लोकांना तो माहितीच नसतो. मग पोलिसांच्या अत्याचारावरुन लक्ष हटून ते चळवळीतील जाळपोळ, लुटालूट यावर केंद्रित केले जाते आणि त्यावरच टिका होते. मूळ मुद्दा दूरच राहतो. आता या सोशल मिडियाच्या जमान्यात BlackLivesMatter चळवळ जगभरात पोहोचली आहे, सर्व वंशांच्या लोकांकडून तिला पाठिंबा मिळत आहे, या चळवळीच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या वागणुकीच्या निषेधार्थ समाजाच्या सर्व स्तरांमधून अनेक जण आवाज उठवत आहेत. या सर्वाचा त्यांना हवे ते बदल घडवून आणण्याकरता कितपत उपयोग होईल आणि कृष्णवर्णीय समाजातील प्रत्येक घटक खरोखर अमेरिकेतीत इतर वंशांच्या लोकांच्या पंक्तीला कधी येऊन बसेल हे मात्र येणारा काळच सांगू शकेल.
------
२०२१ सालचा Black History Month साजरा करण्यासाठी या लेखांद्वारे कृष्णवर्णीयांचा इतिहास, त्यांची चिकाटी, सहनशक्ती, संयम, धैर्य, त्यांचे प्रश्न आणि त्यांचा संघर्ष मला मराठी वाचकांसमोर आणायचा होता. हा इतिहास फार मोठा आहे आणि माझ्याकडून अनेक गोष्टी सुटल्या आहेत याची मला कल्पना आहे. पण या लेखांद्वारे थोडाफार इतिहास आणि BlackLivesMatter चळवळीमागची भावना समजून घेण्यास लोकांना मदत झाली तर त्याचा मला आनंदच होईल.
-------
स्रोत -
https://en.wikipedia.org/
https://www.britannica.com/
https://www.history.com/