१९६० चे दशक हे कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्काकरता निर्णायक होते. १९६४ साली सिव्हील राईट्स कायद्यानुसार अमेरिकेतील सेग्रिगेशन संपले, १९६५ च्या वोटींग राईट्स कायद्यानुसार मतदानाकरता नोंदणी आणि मतदान या दोन्ही बाबींमध्ये पारदर्शकता आणण्यात आली, १९६८ च्या फेअर हाउसिंग कायद्यानुसार घराकरता कर्ज घेताना, घर विकत/भाड्याने घेताना, विकताना कृष्णवर्णीयांविरुद्ध वर्णभेद करणे बेकायदेशीर झाले. कृष्णवर्णीय समाज मुख्य धारेत आणण्याकरता हे तिन्हीही कायदे महत्त्वाचे ठरले. १९६८ साली शर्ली चिझम ही अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडली गेलेली पहिली अफ्रिकन अमेरिकन महिला ठरली.
मे १९५४ मधील ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन खटल्यातील निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने शाळेमधील सेग्रिगेशन रद्द केले आणि दक्षिणेत कृष्णवर्णीयांना आशेचा किरण दिसला. वर्णभेद, विभक्तीकरण, असमानता या बाबतीत फारसा बदल झाला नसला तरी शहरांमध्ये कृष्णवर्णीयांनी त्याबद्दल आपापल्या परीने निषेध नोंदवण्यास सुरुवात केली होती. मात्र १९५५ च्या ऑगस्ट महिन्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे वर्णभेदी दक्षिणेत कृष्णवर्णीय समाज न्याय या गोष्टीपासून किती दूर आहे हे सार्या देशाने परत पाहिले.