काही वेळा कितीही छान प्लॅनिंग केलेलं असलं तरी आपल्या हातात नसलेल्या घटकांमुळे ट्रिपमधला एखादा दिवस गंडतो. भीमबेटकाचं तसंच झालं!
मला आणि लेकीला बरं नसल्यानं त्या दिवशी हॉटेलमधून निघायलाच उशीर झाला. त्यातून अचानक आदल्या रात्रीपासून पाऊस सुरू झालेला. हवा चांगलीच गारठलेली आणि पावसाची पिरपिर सुरूच होती. आणि त्यादिवशी आमच्या अजेंड्यावर दोन ठिकाणं होती - सांची आणि भीमबेटका. भोपाळ पासून दोन्ही ठिकाणं दोन वेगवेगळ्या दिशेला.
पावसामुळे सांची धावतपळतच पाहिलं. तरीही चार वाजलेच होते. आता यापुढे भीमबेटकाला जावं की न जावं? परतीच्या रस्त्याला फाट्यावर गाड्या उभ्या केल्या आणि दोन्ही गाड्यातल्या मंडळींची मतं घेतली. ती ऐकून झाल्यावर आलेल्या निष्कर्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करून नवर्यानं डिक्लेअर केलं की इथपर्यंत आलोच आहोत तर भीमबेटका होनाईच मंगता है!
पाच वाजता, पावसाळी हवेत, आजूबाजूला ढग भरून राहिलेत, एकाकी रस्ता, शांत-गूढ वातावरण असे आम्ही भीमबेटकाच्या टेकडीच्या परिसरात शिरलो आणि एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचा भास होऊ लागला.
हे इथलं लँडस्केपच वेगळं. रस्त्याच्या कडेलाच पिवळं गवत, पानं असूनही निष्पर्ण भासणारी झाडं आणि भल्यामोठ्या शिळा. कोणीतरी भिरकावून दिल्यासारख्या विखुरल्या होत्या. एका ठिकाणी तर जणू काही वाहतं पाणी अचानक एका क्षणी तिथल्यातिथे स्तब्ध होऊन कातळ बनलं असावं असा भास. गोठलेल्या ढगाळ पावसाळी संध्याकाळमुळे तर एक धूसर, गूढ विश्वच निर्माण झालं होतं तिथे. जणू आम्ही त्या जुन्या काळातच प्रवेश करत आहोत. ती गुहांमधून राहणारी माणसं रहात होती त्या काळात! भूतकाळात शिरलो आहोत.........
भीमबेटकाच्या शैलाश्रयापाशी आम्ही पोहचून चौकशी केली तर सरकारी गाईड घरी गेला होता. गाईडविना अशा ठिकाणाची भेट म्हणजे सुगंधाशिवाय गुलाब! :डोमा: पण समोरच एक साधारण १४-१५ वर्षांचा मुलगा दिसला. त्याला विचारलं तर म्हणे ऑफिशियल गाईड खरंच घरी गेलाय. पण हवं तर मी सांगतो माहिती.
तो जवळच्याच वस्तीत राहणारा आदिवासी होता. आणि लहानपणापासून इथे येत होता. छान चुणचुणीत पोरगा होता. आम्हालाही ऑप्शन नव्हताच. त्यानं छान फिरवलं. जास्त वेळ नसल्यानं थोडक्यात पण चांगली माहिती दिली. अंधार होऊ लागला होता त्यामुळे अक्षरशः धावतच पाहिलं सगळं पण जे पाहिलं त्यानं अशक्य थक्क झालो होतो.
काही फोटो. हवामान आणि अंधार यामुळे खूप खास आले नाहीयेत. पण अंदाज येईल.
बाहेरच असलेला माहितीफलक
प्रवेशद्वारापासून आत जाणारी वाट
याला श्री. वाकणकरांनी* 'मुख्य सभागृह' असं नाव दिलं आहे.
या सभागृहातील हा फलक
या फलकावर दिसतो आहे तसा हाताचा ठसा वर भिंतीवर आहे. पण त्याचा फोटो आला नाही म्हणून टाकता येत नाहीये.
ही काही शैलचित्रे
प्रचि १
प्रचि २
हत्तीवरून शिकार करणारा माणूस
प्रचि ३
जवळून
प्रचि ४
प्रचि ५
घोडा, हत्ती आणि हिरव्या रंगातली चित्रे
प्रचि ६
या फलकावर माहिती लिहिली आहे त्याप्रमाणे त्याखालील चित्र आहे. पण अगदीच अपुरा प्रकाश असल्यानं फोटो नीट आला नाहीये. तरीही अंदाज येईलच.
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
समुहनृत्य
प्रचि ११
गूढ वातावरण
या अशा रचनेमुळे आत माणसे राहू शकली आणि चित्रेही पाण्यापासून सुरक्षित राहिली.
खडकाचे कासव
परतीच्या वाटेवर
खरं तर भरपूर वेळ घेऊन आणि स्वच्छ हवामान असताना दिवसाढवळ्या ही शैलचित्रं बघायला हवीत हे कबुल. पण योगायोगाने त्या दिवशी हवामान आणि सायंकाळ याचं जे काही गूढ मिश्रण घडून आलं होतं की त्यामु़ळे हा अनुभव एकदम surreal होऊन गेला. शीळांचे ते अवाढव्य, चित्रचित्रविचित्र आकार, त्या शीळांमधील ते आश्रय**, ती आदीम चित्रं, फिरण्यासाठी काढलेली ती छोटीशी सुघड वाट ..... केवळ अविस्मरणीय यात्रा!
भीमबेटकाची भेट गंडली असं तरी कसं म्हणायचं खरं तर!
********************************************************************************************************
* श्री. विष्णु वाकणकरांनी या शैलचित्रांचा शोध लावला. वाकणकर स्वतः पुरातत्त्वशास्त्रज्ञ. एकदा ते ट्रेनने भोपाळला जात असताना त्यांनी या टेकडीवरच्या या भल्यामोठ्या शिळा पाहिल्या. उत्सुकता वाटून ते इथे आले आणि मग या शैलचित्रांचा शोध लागला.
** हे शैलाश्रय म्हणजे गुहा नव्हेत. शीळेच्या पोटात घुसलेली उघडी गुहा असं म्हणता येईल फारतर. वरून छताप्रमाणे बाहेर आलेल्या शीळेमुळे आत सुरक्षित आश्रय निर्माण झालेले आहेत. याच आकारामुळे पाणी आतवर न पोहोचल्याने काढलेली चित्रे सुरक्षित राहिली आहेत.
भीमबेटकाची आख्यायिका : भीमबेटका हा भीमबैठका अथवा भीमवाटिका या शब्दांचा अपभ्रंश आहे असे मानण्यात येते. एका कथेनुसार हनुमानाने भीमाचं गर्वहरण या ठिकाणी केलं. हनुमानाची शेपटी उचलण्याचा प्रयत्न करून करून भीम थकून इथे बसला म्हणून भीमबैठका. तर दुसर्या कथेनुसार अज्ञातवासात असताना भीम द्रौपदी आणि आपल्या भावांसह काही काळ इथे वास्तव्यास होता. त्यावेळी तो फिरत असलेली वाटिका म्हणून भीमवाटिका.
***********************************************************************************************************
भीमबेटकाबद्दलची अधिक माहिती इथे वाचता येईल.
http://en.wikipedia.org/wiki/Bhimbetka_rock_shelters
http://asi.nic.in/asi_monu_whs_rockart_bhimbetka_detail.asp