'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
बॅंकेत काम होतं म्हणून भर पावसात चाकंतोड करत दीपक टॉकीजजवळच्या बॅंकेत गेले होते. नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारायचे म्हणून त्या त्या एरीयातली दोन्-चार कामं असतातच बरोबर. म्हणून कालच आणलेल्या चिनी बनावटीच्या टेबललँपच्या प्लगला अॅटॅचमेंट, बॅटरीवर चालणार्या मेणबत्त्यांकरता छोट्या बॅटर्या असे इलेक्ट्रीकच्या दुकानाशी संबधित कामं होती. बँकेशेजारीच एक इलेक्ट्रीक आणि हार्डवेअरचे दुकान दिसले. हे कॉम्बिनेशनमध्ये दुकान का बरं चालवत असतील? हा मला नेहमीच पडणारा सनातन प्रश्न आहे. तो पुन्हा डोक्यात पिंगा घालायला लागला.