मी गेले काही दिवसांपासून दारापाशी रोज रांगोळी काढते. कारण विशेष काही नाही. सातत्याने काही करायची सवय लागावी म्हणून, बघताना छान वाटतं म्हणून, हात - बोटांना व्यायाम घडावा म्हणून. मी रांगोळ्या मनाने काढत नाही. मला आवडतात, तशा भूमितीतले आकार असलेल्या, ठिपक्यांच्या आणि छोट्या रांगोळ्या असणार्या वेबसाईट मी शोधून काढल्या आहेत. इथे लिंक देते.
दिवाळी, गणपती, आम्ही भारतात सुट्टीसाठी जातो तेंव्हा आमच्या स्वागतासाठी , नाती पहिल्यांदा घरी आल्या त्यावेळी , सुनेचं डोहाळजेवण ह्या आणि अशा अनेक वेळी घरी काही छोटं-मोठं कार्य असेल तेंव्हा अतिशय उत्साहाने बाबा दारात रांगोळी काढतात.
ज्या दिवशी रांगोळी काढायची असेल त्या दिवशी पहाटे उठून मार्केट यार्ड मध्ये त्यांच्या आवडीची फुलं आणायला जातात. आणि मग सगळी फुलं, पानं घेऊन दारात ५-६ तास बसून रांगोळी काढतात.