बराच वेळ सलग रायडींग झाल्यावर राधाने मागेपुढे असलेल्यांना ब्रेक घ्यायची खूण केली. एक टपरीवजा दुकान होतं. सगळे थांबले. मस्त कडक चहा आणि मॅगी खाऊन पुढचा रस्ता सुरु झाला. अखेर संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करायला सगळे थांबले. ते एक लहानसं खेडं होतं. ग्रुपचा मुक्काम तिथल्याच एका होमस्टे मध्ये होता. दिवसभराच्या रायडिंगमुळे सगळेच दमले होते. सर्वांनी फ्रेश होऊन जेवणावर ताव मारला. जेवण साधंच होतं पण ते दिवसभराच्या थकव्यानंतर निशाला खूप आवडलं. झोपण्यापूर्वी सगळ्यांना राधाने परत उद्याच्या सूचना दिल्या. निशाला झोप आली नव्हती.
वेणूला मी कांदेपोह्यांबद्दल सांगितलं होतं ते काही खोटं नव्हतं. एव्हाना मी नोकरीत सेटल झाले होते, कमावती होते. आई-वडिलांनी मला विचारलं की आता स्थळं बघायची का, का कोणी शोधला आहेस? कोणी शोधलेला नव्हता, आणि लग्न करायचं होतं (म्हणण्यापेक्षा, लग्न न करायचं काही कारण नव्हतं) म्हणून त्यांना होकार दिला. तेही दोन-चार वधू-वर सूचक केंद्रांमध्ये ताबडतोब नाव नोंदवून आले. त्यानंतर मग जे काही सुरू झालं त्यासाठी मात्र मी मानसिकरित्या मुळीच तयार नव्हते. पार्ल्यातलं एकटेपण त्यापेक्षा निश्चितच सुसह्य होतं. असो.